‘लिटफेस्ट’ हा आता एक उद्योग, एक ‘इंडस्ट्री’ बनला आहे. तेही ठीक. कारण यातून केवळ इव्हेंट व्यवस्थापन कंपन्यांच नव्हे तर लेखक-कवींनाही ‘बिझी’ राहता येतं, प्रवास होतात आणि चार पैसेही मिळतात.. मुख्य म्हणजे महत्त्व वाढतं किंवा मान्य होतं. मात्र, साहित्य उत्सवाचं (लिटरेचर फेस्टिव्हल) इंग्रजी लघुरूप असलेल्या नावापासूनच, ‘लिटफेस्ट’ या प्रकारावर इंग्रजीचा पगडा आहे. तो ठीक नाही, हे पहिल्यांदा दिसलं ते पहिल्याच मोठय़ा लिटफेस्टमध्ये- म्हणजे अर्थातच जयपुरात, सहा वर्षांपूर्वी. मग हिंदीसाठी एक, राजस्थानी साहित्यिकांसाठी सुद्धा एक, अशी एकेक सत्रं देऊन जयपूरवाल्यांनी वेळ भागवली! हाच वेळभागवू, तोंडालापानंपुसू फॉम्र्युला किंवा ‘एखाद्या सत्राचं सूत्र’ इतर अनेक लिटफेस्टांनी जसाच्यातसा राबवायला सुरुवात केली.
या पाश्र्वभूमीवर, मुंबईचा ‘गेटवे लिटफेस्ट’ वेगळा ठरतो. ठरणारच, कारण तो मुंबईतून उगवलेला आहे! मुळात मुंबई अठरापगडच.. त्या पगडय़ा काळाच्या ओघात उतरल्या, मग कुणा तगडय़ा पक्षानं पगडय़ाच काय पण लुंगीलाही हात घालू पाहिला, हा मुंबईचा इतिहास असला तरी याच इतिहासात अरुण कोलटकर होते.. मुंबईवर प्रेम करणारे आणि इंग्रजीप्रमाणेच मराठीत लिहिणारे किंवा मध्येच ‘साब देखो ये न्यू येर भी क्या है’ अशी अख्खी ‘बम्बइया हिंदी’भाषेतली रचना करणारे! किरण नगरकर, सीपी सुरेंद्रन, जीत थायिल, मनिल सुरी ही नावं एकत्र सहसा घेतली जात नाहीत ; पण मुंबईच्या खाचाखोचा जाणणारं इंग्रजी लिखाण करताना त्यांना आपापल्या भाषिक संस्कृतींचा आणि मुंबईच्या संमिश्रतेचाही प्रत्यय वाचकांना दिला. असे अनेक लेखक, कवी ज्या शहरात आहेत, तिथं हा समन्यायी भाषासाहित्य सोहळा होणं हे फार नवलाचं नाही. या लिटफेस्टचं यंदा दुसरं वर्ष आहे.
‘भारतीय इंग्रजी साहित्याच्या दबदब्यापुढे प्रादेशिक भाषांतील साहित्य हरते आहे का?’ या विषयावरला पहिलाच परिसंवाद, दोघा ज्ञानपीठ-विजेत्यांच्या सहभागानं ‘संपन्न’ होणार आहे.. उद्घाटक अडूर गोपालकृष्णन हे पुढे परेश मोकाशी आणि (अनंत महादेवन् यांचा सहभाग असलेल्या ‘चित्रपटांतील वास्तव’ या परिसंवादाचे अध्यक्षही आहेत. ईशान्येकडल्या भाषांबद्दल, भाषांतराच्या प्रश्नांबद्दल पहिल्या दिवशी परिसंवाद आहेत. कविसंमेलनात द्वैभाषिक कवी हेमंत दिवटे आहेत. तर दुसऱ्या दिवशी दुपारी, मराठी साहित्यातले साठोत्तरी आणि नव्वदोत्तरी संघर्ष, या विषयावर सचिन केतकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आहे.
कुठल्याही मुलखात आपलं भाषाप्रेम जपणाऱ्या आणि तरीही इंग्रजीत कुठेही मागे नसणाऱ्या मल्याळम् समाजातील काहींचा पुढाकार या उत्सवाच्या आयोजनात आहे, हा काही केवळ योगायोग नाही. पण असा सार्वभाषिक उत्सव खासगी सहभागातून होण्याचे प्रसंग कमीच असतात, म्हणून याचं कौतुक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठे : मुंबईत, राष्ट्रीय संगीत नाटय़ केंद्राच्या (एनसीपीए) प्रायोगिक नाटय़गृहात
कधी : २० आणि २१ फेब्रु.; सकाळी १० पासून
वैशिष्टय़ : १५ भाषा, ७० लेखक/कलावंतांचा सहभाग, श्रोत्यांसाठी मोफत प्रवेश

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Literature festival event management
First published on: 20-02-2016 at 03:50 IST