प्रेम छापील पुस्तकांवरच केलं जातं. बाकी ईबुकांचं काय चाललंय किंवा प्रकाशनधंदा कसा चालला असावा किंवा परवा मुंबईत पुस्तकांचं एकेकाळी खरोखरच ग्रंथप्रेमींचं आनंदनिधान असलेलं एक पुस्तक दुकान बंद पडलं, त्या दुकानातल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार, त्यांची देणी पूर्णत दिली गेली आहेत का, याच्याशी कुणाही ग्रंथप्रेमीला काहीही कर्तव्य नव्हतं. आपलं फक्त ‘ग्रंथप्रेम’.. बाकी व्यवहार वगैरे ज्याचा त्यानं पाहून घ्यावा, असा आपला खाक्या. परवा ते दुकान बंद झालं तेव्हाही ‘डिजिटल जगात निभाव लागेना’ वगैरे निरूपणं झाली. पण पुस्तकांच्या एकंदर ‘व्यवहारा’शी ज्यांचा मोठय़ा प्रमाणावर संबंध आहे, जे गांभीर्यानं ईबुकांच्याही व्यवहाराचा विचार करतात, ते काय म्हणताहेत?

नुकतीच ‘हॅचेट’ या जागतिक प्रकाशनसंस्थेचे अध्यक्ष व प्रमुख कार्यकारी अधिकारी अनरेड नोरी यांनी ‘स्क्रोल.इन’ या भारतीय इंटरनेट वृत्त-स्थळाला दिलेली मुलाखत ईबुक व्यवहाराबद्दल बरंच काही बोलणारी होती..

प्रामुख्यानं, प्रकाशक म्हणून ईबुकं परवडतात का, याबद्दल नोरी बोलले. प्रकाशित पुस्तकाच्या किमतीहून ४० टक्के कमी ईबुकची किंमत असणंच ठीक, अशी जाहीर भूमिका त्यांनी २०१४ मध्येच घेतली होती. तोवर ‘अ‍ॅमेझॉन’ नव्या छापील पुस्तकांच्या ईबुक आवृत्त्या (त्यांच्या ‘किंडल’वर) वाटेल तशा पडत्या भावात विकायचं. याला ‘हॅचेट’ आणि ‘सायमन अँड शूस्टर’ या प्रकाशन संस्थांनी आळा घातला. आजही नोरी त्याच भूमिकेचं समर्थन करतात. ‘पडत्या किमती ठेवून संगीत उद्योगानं स्वतचं नुकसान करून घेतलं’ असा दाखलाही देतात. पण त्यांची आजची चिंता निराळी आहे.

इंग्रजीतली ईबुक-विक्री जिथे सर्वाधिक होती, अशा अमेरिका आणि ब्रिटन या देशांत तिचा एकूण ग्रंथविक्रीतला वाटा गेल्या काही वर्षांत फारसा वाढलेलाच नाही आणि वाढणारही नाही, ही ती चिंता. हा वाटा २०१३ च्या आधी १५ टक्के होता, तो गेल्या तीन वर्षांत २० टक्क्यांवर येऊन स्थिरावला आहे, ‘आणि हे स्थिरावणं काही पालटणार नाही’ असं नोरी म्हणतात. म्हणजे ईबुकांच्या प्रत्यक्ष विक्रीचे आकडे वाढतीलही; पण ग्रंथविक्री व्यवहारातलं ईबुकांचं प्रमाण नाही वाढणार. ते २० टक्क्यांवरच राहील असं नोरी म्हणताहेत. खरं आहे का त्यांचं म्हणणं?

पडताळा म्हणून जरा दुसरीकडे पाहू. गेल्या मे महिन्यात ‘ग्लोबल ईबुक रिपोर्ट- २०१७ ’ या अहवालानुसार अमेरिका व ब्रिटनमध्ये सध्याच हा वाटा २५ टक्के आहे. पण हा अहवालसुद्धा ‘अन्य देशांतील ईबुक विक्री प्रमाण वाढण्याची आशा’ व्यक्त करतो. म्हणजे २० टक्के हा आकडा बहुधा फक्त ‘हॅचेट’च्या ईबुकांपुरता असावा. बाकी ईबुक-प्रमाण २५ टक्के (तेही अमेरिका आणि ब्रिटनपुरतंच) आहे हे अधिक विश्वासार्ह. पण ते वाढणार नाही,  असंच हा अहवालही सांगतो आहेच. हा ‘ग्लोबल ईबुक रिपोर्ट’ असंही सांगतो की, मुळात छापील पुस्तकं काढणाऱ्या प्रकाशकांचा एकंदर ईबुक व्यवहारातला वाटा ५० टक्केच असू शकतो. बाकीची ईबुकं ही छापील पुस्तकांच्या वाटेलाच न जाणाऱ्या अगदी छोटय़ा प्रकाशकांनी प्रकाशित केलेली असतात. शिवाय ‘तुम्हीच बनवा तुमचं ईबुक’वाले हौशेगवशे लेखक (आणि हो, कवी!) यात मिळवले की, प्रकाशनसंस्था आणि त्यांना ईबुकांमधून मिळणारं उत्पन्न यांचा हिशेब निराशाजनकच दिसू लागतो की!

जणू ईबुक म्हणजे राक्षस आणि आपल्या पुस्तकांच्या दुकानांना तो राक्षस खाऊन टाकणार, अशी चिंता करताना जरा या निराशेकडेही पाहू या.. ‘हॅचेट’चे नोरी यांनी मुलाखतीत या निराशेमागचं, सखोल आत्मपरीक्षणातून आलेलं एक कारणही मांडलंय. ‘ईबुक हा मूर्खच प्रकार आहे.. जे छापलेलं आहेच, ते सपाट पान फक्त संगणकीय (मोबाइलच्या वगैरे) पडद्यावर न्यायचं. यात प्रकाशकीय सर्जनशीलता काय आहे?  थ्री-डी आणि खरोखरीचं ‘डिजिटल’ असं लोकांना मिळतं आहे, त्यात पुस्तकांमधला आशय आम्ही प्रकाशक मंडळी देऊ शकणार आहोत का?’ असं नोरी म्हणतात. ‘आम्ही नुकत्याच तीन संगणक-खेळ कंपन्या विकत घेतल्या’ असं सांगत ‘हॅचेट’ पुस्तकांतला मजकूर निराळय़ा प्रकारे देऊ पाहणार असल्याचं मधाचं बोटही त्यांनी लावलं आहे. ते होईल तेव्हा होईल. तूर्तास त्यांची मुलाखत आणि ‘ग्लोबल ईबुक रिपोर्ट’ यांवर विसंबून असं म्हणता येतं की, अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये ईबुक मार्केटचं ‘प्रमाण’ खुंटलं तरी त्याचा प्रत्यक्ष आकार मात्र वाढणार. शिवाय, एकंदर जगभरच्या ईबुक व्यवहारात आज अमेरिकेचाच वाटा ३० टक्के आणि ब्रिटनचा ४० टक्के आहे, त्याऐवजी आता अन्य देशांचा वाटा जास्त दिसू लागणार.

हे सारं खरं, पण भारतीय प्रकाशनक्षेत्रात ‘जगरनॉट’सारख्या प्रकाशनसंस्थांनी निराळं वारं आणलं आहे. त्यांची पुस्तकं छापली जातात, ईबुकंही उपलब्ध असतात. पण ‘जगरनॉट’चं स्वतचं अ‍ॅप असून ही पुस्तकं त्या अ‍ॅपवर अति-स्वस्तसुद्धा उपलब्ध असतातच.

हे झालं इंग्रजीचं. मराठीसह अन्य अनेक भाषांत – जिथं काही प्रकाशकच हौशी लेखकांनी पुस्तकात ‘आर्थिक गुंतवणूक’ करावी म्हणतात, तिथं आपलं ईबुक आपणच करून मोफत लोकांपर्यंत पोहोचवलं तरी बेहत्तर, असा  विचार योग्यच ठरणार! अशानं ईबुक-व्यवहार फारसा उभाच राहू शकणार नाही भारतात. जे नुकसान संगीत-व्यवसायानं करून घेतलं असं नोरी म्हणाले, तेच आपण आपल्या ग्रंथव्यवहाराचं करतोय. भले ईबुकला राक्षस माना. पण या राक्षसाला खूप ठिकाणी दुखणी आहेत आणि ती गंभीर आहेत, हे लक्षात ठेवलेलं बरं.