अमेरिकी राष्ट्राध्यक्ष हे कुणी तरी मनोरुग्ण आहेत, असंच जणू गृहीत धरून तसल्याच सुरात त्यांच्याबद्दल जगानं बोलणं ही घडामोड डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्ताग्रहणानंतरचीच आहे. त्याआधी ज्युनिअर बुश वा जॉर्ज ‘डुब्या’ बुश यांच्याही कारकीर्दीत इतकं घालूनपाडून बोललं जात नसे. स्वत:ला महान समजून अत्यंत खर्चीक निर्णय लोकांवर लादणारे नेते लोकशाहीत यापूर्वीही झालेले आहेतच. ते मनोरुग्ण होते का?

‘हो’ असं उत्तर इयान ह्य़ूजेस देतात. ते वैज्ञानिक. त्यांची एक पदव्युत्तर पदवी ‘सायकोअ‍ॅनालिसिस’ (मनोविश्लेषण) या विषयात. शिवाय आर्यलड सरकारचे ते माजी विज्ञान-तंत्रज्ञान सल्लागार. त्यामुळे ते कुणी येरागबाळे नसून ‘जातीचे’च आहेत. ह्य़ूजेस यांचं ‘डिसॉर्डर्ड माइंड्स : हाऊ डेंजरस पीपल आर डिस्ट्रॉयिंग डेमोक्रसी’ हे पुस्तक येत्या सप्टेंबरात प्रकाशित होणार आहे. ‘आत्मरत (नार्सिसिस्ट), माझ्या वाईटावर कुणी तरी आहे, देश मी सांभाळतो म्हणून देशाच्याही वाईटावर कुणी तरी आहे असं समजून कारभार करणारे नेते हे एकापरीनं मनोरुग्णच असतात. त्यांचं वागणं, त्यांचे निर्णय कसे रास्त, योग्य किंवा वाजवीच आहेत/ होते, हे या नेत्यांकडून भले कितीही ठामपणे पटवून दिलं जावो.. या मनोरुग्ण नेत्यांमुळे लोकशाहीचा घात होत असतो,’ अशी साधारण मांडणी या पुस्तकात आहे. अर्थात एकेका प्रकरणात अत्यंत संयमानं ही मांडणी केलेली असल्यानं ‘ट्रम्पसारखे नेते मनोरुग्ण असतात’ असं शाळकरी टीका वाटणारं विधान या पुस्तकात नसेल; पण धर्म, नीति आणि पुरुषीपणाविषयीच्या कल्पना यांचा वापर हे असले नेते कसा स्वत:ला योग्य ठरवण्यासाठी करतात, याचं विश्लेषण असेल.

https://disorderedworld.com या ब्लॉगवजा संकेतस्थळावर या पुस्तकाच्या तीन प्रकरणांचे अंश वाचायला मिळतात. ते वाचून लक्षात येतं की, हे पुस्तक केवळ ट्रम्पविषयी नाही. ते जगातल्या (भारतासह) कुठल्याही देशाला लागू पडू शकतं. कम्बोडियातला पोल पॉट किंवा युगांडातला इदी अमीन या क्रूरकर्मा हुकूमशहांबद्दल आपण बोलत नाही आहोत.. ‘लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या- लोकांच्या इच्छेमुळेच सत्तापद सांभाळणाऱ्या आणि प्रचारतंत्रातून आपली आत्मरती झाकू शकणाऱ्या’ आजच्या नेत्यांबद्दल आपण बोलतो आहोत.. हे नेते ‘प्रगत’ देशांमध्ये उगवू पाहताहेत.. याचं पक्कं भान ‘झिरो बुक्स’तर्फे प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाला आहे.