News Flash

‘जेसीबी’ची साहित्यिक उठाठेव

देशाच्या आर्थिक राजधानीतल्या या साहित्य-सोहळय़ात ‘बिझनेस बुक ऑफ द इयर’ हाही ५० हजार रु.चा निराळा पुरस्कार असतो.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईत दर नोव्हेंबरात होणाऱ्या ‘टाटा लिट-लाइव्ह फेस्टिव्हल’मध्ये ‘या वर्षांचे पुस्तक’ म्हणून ५० हजार रुपयांचा पुरस्कार एका ललित किंवा ललितेतर पुस्तकाला दिला जातोच, पण देशाच्या आर्थिक राजधानीतल्या या साहित्य-सोहळय़ात ‘बिझनेस बुक ऑफ द इयर’ हाही ५० हजार रु.चा निराळा पुरस्कार असतो. ‘टाटा लिटलाइव्ह’ मध्ये खरं लक्ष असतं ते, लेखकांना मिळणाऱ्या कारकीर्द-गौरव पुरस्कारांवर आणि कवींसाठीच राखीव असलेल्या ‘पोएट लॉरिएट ऑफ द इयर’ या पुरस्कारांवर. त्याखेरीज, जयपूर लिटररी फेस्टिव्हलमधून २०११ पासून ‘डीसीएम (साउथ एशियन) लिटरेचर प्राइझ’ हे आणखी एक पारितोषिक सुरू झालं, ते २५ हजार अमेरिकी डॉलरचं असतं (यंदा रुपया घसरल्यानं रुपयांत या पारितोषिकाची रक्कम वाढणार! असो). शिवाय रकमेचाच विचार करायचा तर, के. के. बिर्ला फाउंडेशनचा ‘सरस्वती सम्मान’ (१५ लाख), ज्ञानपीठ (११ लाख), साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार (एक लाख), साहित्य अकादमीचाच युवा पुरस्कार (५० हजार) अशी पुरस्कारांची उतरंड लागते. या पुरस्कारांमध्ये अगदी नवी भर म्हणजे ‘जेसीबी भारतीय साहित्य पारितोषिक’. रक्कम २५ लाख रुपये! म्हणजे, बाकीच्यांपेक्षा काही पट जास्त.

हे जेसीबी पारितोषिक फक्त भारतीय नागरिक असलेल्याच लेखकांच्या इंग्रजी (मूळ अथवा अनुवादित) ललित साहित्यकृतींसाठी असेल. त्याच्या यंदाच्या पहिल्या संभाव्य यादीतली दहा स्पर्धक-पुस्तकं पाच सप्टेंबरला जाहीर झाली. त्यात किरण नगरकरांची ‘जसोदा’ आणि नयनतारा सहगल यांची ‘व्हेन द मून शाइन्स बाय डे’ या कादंबऱ्या आहेत. या दोघा ज्येष्ठांखेरीज अमिताभ बागची (हाफ द नाइट इज गॉन), चंद्रहास चौधरी (क्लाउडस्), अनुराधा रॉय (द लाइव्ह्ज वी नेव्हर लिव्ह्ड) आणि जीत थायिल (द बुक ऑफ चॉकलेट सेन्ट्स) या प्रथितयश म्हणावेत अशा लेखकांच्या कादंबऱ्याही आहेत. शुभांगी स्वरूप यांचं ‘ लॅटिटय़ूड्स ऑफ लाँगिग’ आणि  देवी यशोधरन् यांचं ‘एम्पायर’ हे पहिलंच पुस्तक, पण त्यांचाही समावेश यादीत असून तमिळ लेखक पेरुमल मुरुगन (पूनाचि) आणि मल्याळम् लेखक बेन्यामिन (जस्मिन डेज) यांच्या इंग्रजीत अनुवादित झालेल्या कादंबऱ्याही ‘जेसीबी भारतीय साहित्य पारितोषिका’च्या पहिल्या यादीत आहेत.

यातून पाचच पुस्तकांची दुसरी यादी किंवा लघुयादी तीन ऑक्टोबरला जाहीर होईल, तर पारितोषिकाची घोषणा २७ ऑक्टोबरला होईल. अनुवादित पुस्तकांचा समावेश करण्यामागचं कारण ‘भारतीय साहित्य हे अनेकभाषी आहे’ असं या पारितोषिकाचे समन्वयक आणि साहित्यिक राणा दासगुप्ता यांनी सांगितलं आहे. अर्थात, पारितोषिकासाठी पुस्तक मूळ असो वा अनुवादित- ते इंग्रजीत हवंच. ‘जेसीबी’ म्हटल्यावर जे आठवतं, ते- जमिनीची उलथापालथ करू शकणारं महाकाय यंत्रवाहन बनवणाऱ्या कंपनीनंच हे पारितोषिक प्रायोजित केलं असून त्यासाठी निराळी ‘जेसीबी लिटरेचर फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली आहे.

‘टाटायन’ इंग्रजीत..

जमशेटजी, दोराबजींपासून जेआरडी, रतन टाटांपर्यंत तब्बल पाच पिढय़ांनी कर्तबगारी, सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर निर्मिलेल्या उद्योगपर्वाचा वेध घेणारं ‘टाटायन’ हे गिरीश कुबेर लिखित पुस्तक आता ‘हार्पर कॉलिन्स’ या प्रकाशन संस्थेतर्फे इंग्रजीत येत आहे. व्यापारी आणि उद्योजक यांच्यातील फरक नेमकेपणानं ज्यांच्याकडे पाहून सांगता येईल, असं टाटा हे उद्योगघराणं. संपत्तीनिर्मितीतील सात्त्विकता आणि नीतिमत्तेचं ते प्रतीकच!  या उद्योगपर्वाच्या घडणीचा पट मांडणारे ‘टाटायन’ मराठीत राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं होतं. त्याचा विक्रांत पांडे यांनी केलेला इंग्रजी अनुवाद ‘द टाटाज् : हाऊ अ फॅमिली बिल्ट अ बिझनेस अ‍ॅण्ड अ नेशन’ या शीर्षकाने येत्या नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध होणार आहे. याखेरीज, महाराष्ट्राविषयी कुबेर यांनी इंग्रजीत लिहिलेलं आणखी एक पुस्तकही याच प्रकाशन संस्थेतर्फे पुढील वर्षी येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 1:50 am

Web Title: loksatta book review 24
Next Stories
1 ‘लाल भीती’ची अमेरिकी चित्तरकथा..
2 शुद्ध बफेबाजी!
3 राष्ट्रवाद की अतिराष्ट्रवाद?
Just Now!
X