|| पंकज भोसले

बुकर पारितोषिकाच्या नामांकनात यंदा विषयांचे वैविध्य असले, तरी भूत आणि वर्तमानाचा अस्वस्थ करणारा धांडोळा सर्वच कादंबऱ्यांमध्ये सारखाच घेतलेला दिसतो. पुढील आठवडय़ात पारितोषिक जाहीर होणार असल्याने उर्वरित पुस्तकांविषयी सांगणारा या नैमित्तिक लेखमालेतील शेवटचा लेख..

उदारीकरणोत्तर काळात भारतीय ललनांना ‘मिस युनिव्हर्स’ आणि ‘मिस वर्ल्ड’ किताब गवसल्यानंतर आपल्या देशामध्ये सौंदर्यवर्धनाचा उद्योग ‘ब्युटी पार्लर’नामक घटकाच्या गल्लोगल्ली आवृत्त्यांनी विकसित झाला. या काळात इंटरनेट, मोबाइल आणि डिजिटल तंत्राच्या बळावर वृत्त, मनोरंजनाचा धंदा चक्राकार गतीने विस्तारला आणि सांस्कृतिकदृष्टय़ा समाजाचे ‘ग्लोकलीकरण’ झाले. ‘लगान’च्या ऑस्करवारीने चित्रपटाला दिल्या जाणाऱ्या जागतिक सन्मानाचे महत्त्व स्पष्ट झाले. त्यानंतर थोडय़ाच वर्षांत इथल्या सर्वसाधारण चित्रपटवेडय़ांकडे १९२९ साली पहिले ऑस्कर मिळालेल्या ‘विंग्ज’ (१९२७) या चित्रपटापासूनचे सारेच विजेते सिनेमे संग्रहित झाले. निवडक भारतीय संगीततज्ज्ञांच्या नुसत्या नामांकनांनी दरवर्षी ग्रॅमी पुरस्कारांनाही आंग्ल व देशी वृत्तघुसळणीत अंमळ अधिक महत्त्व आले. लोकप्रिय देशी संगीताचा दर्जा रिमिक्स-रिमेक युगात इतका खालावला, की एका पिढीने सूरश्रवणासाठी ग्लोबल संगीताचा आधार घेतला.

त्यामानाने अरुंधती रॉय यांच्या ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ (१९९७) ते अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाईट टायगर’ (२००८) या बुकरविजेत्या पुस्तकांदरम्यानच्या काळात सहाएक भारतीय नावांची या पुरस्कारासाठीच्या लघू यादीत वर्णी लागलेली असतानाही या पुरस्काराची आपल्याकडे घुसळण (ब्युटी पार्लर या घटकवेगाने) होऊ शकली नाही. नाही म्हणायला देशातील इंग्रजी ग्रंथनिर्मिती संख्यात्मकरीत्या फोफावली. ग्रंथालयांचा दर्जा सुधारला, देशी भाषांमध्ये इंग्रजीतून अनुवादाचा आकडा वाढला. मात्र, वाचनव्यवहाराचा अपेक्षित सखोल परिणाम कुठेही दिसत नाही. फेसबुक आणि आंतरजालावर पुस्तकप्रेमाचे अमर्याद कढ आणि उसासे दाखवले, तरी एखाद्या मराठी पुस्तकाच्या गाजावाजा करीत केलेल्या जाहीर नियोजित प्रकाशन समारंभाला डझनापलीकडेही या उसासेवीरांची उपस्थिती जाऊ शकत नाही, हे आपल्याकडले वास्तव चित्र! तर एखाद्या पुस्तकाबाबत व्यक्त होताना आजही ‘थक्क करणारा विलक्षण अनुभव’, ‘नात्यांची सुरेख गुंफण’, ‘मानसिक हेलकाव्यांचे चपखल दर्शन’ या कालबाह्य़ न झालेल्या वर्णनकळांचा सोस आपल्या वाचिक आणि भाषिक व्यवहारालाही बदलू शकलेला नाही अन् हा बदल करायचा तर आपल्या वाचनव्यवहाराचे स्वविच्छेदन करून त्याचा स्तर वाढविण्याची गरज आपल्याकडे आहे. दरवर्षी जगात हजारो उत्तम इंग्रजी ग्रंथ प्रकाशित होतात. जमवता आले, तर त्यातील दीडेकशे आपण सहज मिळवू शकतो; पण विविध कारणांनी आपल्या वाचनशक्तीला मुंगीवेगासमान करणाऱ्या या संख्येतील समाधानाने वाचू शकणाऱ्या ग्रंथांची संख्या नेहमीच कमी भरते. अशा वेळी एकसमान कालावधीत दाखल होणाऱ्या ब्रिटनमधील बुकर, अमेरिकेतील नॅशनल अ‍ॅवॉर्ड आणि कॅनडाच्या गिलर पारितोषिकासाठीच्या दीर्घ आणि लघू याद्या वाचननिवडीसाठी मार्गदर्शक ठरतात. विविध निकषांवर घासूनपुसून पुढे आलेल्या या पुस्तकांमध्ये ‘थक्क करणाऱ्या अनुभवां’च्या वा ‘नात्यांच्या-भावआंदोलना’च्या मूलभूत पातळ्यांना पूर्ण करून भाषाकळा, रचनाविशेष आणि प्रयोगांची जंत्री पाहायला मिळू शकते. वाचक म्हणून आपल्याला सर्वार्थाने घडविण्याची क्षमता या ग्रंथांमध्ये असते. यंदा बुकरसाठी निवड करण्यात आलेल्या लघू यादीमधील सर्वच पुस्तकांच्या भाषिक ताकदीचा निवड मंडळाने स्पष्ट उल्लेख केला आहे. एकमेकांहून पूर्णपणे भिन्न वातावरणांत, प्रदेशांत आणि अनुभवांच्या विविधांगी पातळ्यांवर जगणाऱ्या या लेखक-लेखिकांच्या कलाकृतींमधील वैश्विकता ही त्यांना स्पर्धेच्या अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन आली आहे. पुढील वर्षांचा नवा वाचनपसारा वाढण्याआत या तुल्यबळ स्पर्धकांच्या पुस्तकांना लवकर संपविणे, ही वाचनाची खरी कसोटी आहे.

‘मिल्कमन’ (अ‍ॅना बर्न्‍स)

प्रत्यक्ष नावांचा वापर न करता ‘मिडल सिस्टर’, ‘मेबी बॉयफ्रेण्ड’ वा ‘मिल्कमन’ अशा उल्लेखांच्या व्यक्तिरेखा कादंबरीभर पसरलेल्या ब्रिटिश लेखिका अ‍ॅना बर्न्‍स यांच्या ‘मिल्कमन’चा काळ आहे सत्तर-ऐंशीच्या दशकातील उत्तर आर्यलडमधील संघर्षवर्षांचा! उत्तर आर्यलडमध्ये कॅथलिक आणि प्रोटेस्टंट पंथीयांच्या कित्येक वर्षे चाललेल्या संघर्षांतून हिंसा आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस झाली. या इतिहासाच्या धाग्याला अ‍ॅना बर्न्‍स यांनी आपल्या निनावी निवेदिकेशी जोडले आहे. भवतालच्या कोलाहलाला विसरण्यासाठी १९ व्या शतकातील पुस्तकांमध्ये रमणाऱ्या या ‘मिडल सिस्टर’ नावाच्या नायिकेकडून बेलफास्ट या शहराचे आणि तेथील परिस्थितीचे दर्शन होते. ‘मिल्कमन’ या लग्न झालेल्या आणि अत्याचार करणाऱ्या व्यक्तीसोबत मिडल सिस्टरचे विचित्र संबंध आणि कथानकाच्या विविध टप्प्यांवर बदलत जाणारी तिची दृष्टी यांचा तपशील कादंबरीमध्ये आला आहे. हे कल्पित कथानक उत्तर आर्यलडच्या इतिहासासोबत या व्यक्तिरेखांमध्ये स्वारस्य निर्माण करते. एरवी आयरिश सिनेमांशीही अपरिचित असलेल्या जगाला या कादंबरीतून अपरिचित भूभागाचा फेरफटका घडू शकतो.

‘द ओव्हरस्टोरी’ (रिचर्ड पॉवर्स)

संगणकतज्ज्ञ, प्राध्यापक अशा बहुढंगी भूमिका जगलेल्या रिचर्ड पॉवर्सच्या लेखनखात्यात एक डझन कादंबऱ्या आहेत आणि अमेरिकेतील मानाचे समजले जाणारे नॅशनल बुक अ‍ॅवॉर्डही त्याला लाभले आहे. ‘ओव्हरस्टोरी’ या जाडजूड कादंबरीत वृक्षकेंद्रित घटनामालिका आणि व्यक्तिरेखांचे एकत्रीकरण आहे. विविध वंशांचे आणि देशांचे प्रतिनिधी जमतील अशा आठ वृक्षप्रेमी किंवा वृक्षसंबंधित आस्था असलेल्यांचा गट यात एकत्र आला आहे. ‘नीलय मेहता’ नावाचा एक संगणकतज्ज्ञही या कादंबरीतील महत्त्वाचा भाग आहे. झाडावरून पडल्यामुळे शरीराने पंगुत्व आलेली ही व्यक्तिरेखा झाडांवर आधारित व्हिडीओ गेम्स तयार करताना दिसते. यातली एक व्यक्तिरेखा झाडांवरील कीटकांच्या अभ्यासात रममाण आहे, तर कुणी झाडांची कत्तल करणाऱ्या उद्योगांच्या राजकारणाविरोधात उभी राहिली आहे. कर्णबधिर, अनाथ अशा विविधांगी व्यक्तींना वृक्षसान्निध्यात मिळणाऱ्या आसऱ्याची ही प्रदीर्घ गोष्ट आजच्या जगभरातील शहरांच्या प्रगतीमागचे वास्तव समोर आणते. व्यक्तिरेखांचा आणि वृक्षांच्या इतिहास-भूगोलाचा विशालपट या कादंबरीमध्ये उभारला आहे.

‘वॉशिंग्टन ब्लॅक’ (इसाय एडय़ुगन)

इसाय एडय़ुगनची ही दुसरी कादंबरी बुकरसाठी नामांकित झाली आहे. ‘हाफ ब्लड ब्लूज’ या कादंबरीला २०११ साली बुकर मिळाले नाही. मात्र, त्याच वर्षी कॅनडातील सर्वोच्च ग्रंथसन्मान म्हणून ओळखले जाणारे ‘गिलर’ पारितोषिक तिला मिळाले. यंदा तोच इतिहास ‘वॉशिंग्टन ब्लॅक’ या ऐतिहासिक विषयाच्या कादंबरीबाबतही झाला आहे. ही कादंबरी बुकरच्या लघू यादीत आहे, तशीच यंदाच्या गिलर पारितोषिकासाठीही नामांकित झाली आहे. हे गिलर पारितोषिक एक लाख डॉलर इतक्या मोठय़ा रकमेचे असते. बार्बाडोसमधील एका मळ्यात गुलाम म्हणून वावरणाऱ्या अकरा वर्षांच्या ‘वॉशिंग्टन ब्लॅक’च्या धाडस आणि प्रवासाची १८३० च्या काळात घडणारी ही गोष्ट आहे. अर्थात गुलामांना दिल्या जाणाऱ्या क्रूर वागणुकीचा, अन्यायाचा अपेक्षित पाढा सुरुवातीला वाचला जात असला, तरी ही निव्वळ अन्यायदर्शनाची कादंबरी नाही. यात इतिहासासोबत गुलामगिरी आणि धाडसासोबत विविध देश आणि खंडांना पालथे घालणारी नायकासोबतची प्रवासवर्णनेही आहेत. इतिहासप्रेमाचा बुकर विजेत्यांचा इतिहास पाहता, त्यात पूर्णपणे बसणारी ही रंजक कादंबरी आहे!

‘एव्हरीथिंग अण्डर’ (डेझी जॉन्सन)

गेल्या काही दिवसांपासून डेझी जॉन्सन आणि अ‍ॅना बर्न्‍स यांच्यापैकी कोण यंदा बुकर पारितोषिक मिळवतो, याचीच चर्चा सुरू आहे. याला कारण सलग दोन वर्षे अमेरिकी लेखकांना पारितोषिक मिळाल्याने यंदा त्याची पुनरावृत्ती घडणार नाही, असा अनेक पुस्तकपंडितांनी अंदाज वर्तवला आहे. डेझी जॉन्सनची ही पहिलीच कादंबरी आहे आणि पारितोषिक मिळाले तर २७ व्या वर्षी पारितोषिक मिळविणारी ती पहिली लेखिका ठरू शकेल. मराठी वाचकांना आवडणाऱ्या वर्णनांतील ‘नात्यांचा पट-गुंफण’ पद्धतीशी अधिक जवळ जाणारी ही कादंबरी आहे. यातली नायिका ऑक्सफर्ड शहरात शब्दकोशतज्ज्ञ असून आपल्या लहानपणातील १३ वर्षे वयापर्यंत आईसोबत घालविलेला काळ तिच्या डोक्यात मुरलेला आहे. सोडून गेलेली ही आई तिला आयुष्याच्या विचित्र टप्प्यावर सापडते. स्मृतिभ्रंश झालेल्या आणि जर्जरावस्थेत असलेल्या आईसोबत भूतकाळाला पुन्हा जिवंत करताना विविध प्रश्नांचा शोध घेऊ पाहणारी नायिका या कादंबरीमध्ये सापडते. एकरेषीय कथानक नसल्यामुळे थोडी अधिक वाचनऊर्जा ही कादंबरी घेत असली, तरी ती ऊर्जा वाया जाणार नाही याची हमी देते.

pankaj.bhosale@expressindia.com