|| डॉ. मनोज पाथरकर

हुकूमशाही व्यवस्थेत, मग ती फॅसिस्ट असो की साम्यवादी, सर्जनशील लेखनासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियांना विपर्यस्त स्वरूप प्राप्त होत असल्याने साहित्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो, हे १९४१ सालच्या बीबीसी रेडिओवरील भाषणात जॉर्ज ऑर्वेल स्पष्ट करतो.. त्या भाषणाचा हा स्वैर अनुवाद..

आज साहित्य आणि समीक्षा यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे. व्यापक अर्थाने राजकारण साहित्याचा अविभाज्य भाग झालेले असल्याने समीक्षकाला तटस्थ राहणे शक्य नाही. जिचे निष्कर्ष आपल्याला मान्य नाहीत अशा कलाकृतीतील साहित्यगुण पाहणे त्यामुळे खूप कठीण झालेले आहे. जाणिवेच्या तळाशी निरंतर सुरू असणारा व्यक्ती आणि समाज यांच्यातील संघर्ष उफाळून वर आलेला आहे. अशा परिस्थितीत प्रामाणिक, संतुलित व निष्पक्ष समीक्षा जवळजवळ अशक्य आहे. याचा अर्थ असा की, भविष्यात साहित्य क्षेत्रावर गहिरे संकट येऊ  घातले आहे.

एका अर्थी आज व्यक्तिस्वातंत्र्यच संपुष्टात आलेले आहे; निदान व्यक्तिस्वातंत्र्याचा ‘भ्रम’ तरी नष्ट झालेला आहे. मात्र व्यक्तीची स्वायत्तता गृहीत धरल्याशिवाय आधुनिक साहित्य वा समीक्षेबद्दल बोलणे अशक्य आहे. प्रबोधनोत्तर काळातील युरोपीय साहित्य वैचारिक प्रामाणिकपणाच्या संकल्पनेवर आधारलेले आहे. शेक्सपीअरच्या शब्दांत सांगायचे, तर ‘स्वत:शी प्रामाणिक राहा’ या तत्त्वावर ते बेतलेले आहे. कोणत्याही लेखकाकडून आपली पहिली अपेक्षा असते, की त्याने खोटे सांगू नये. त्याला जे प्रत्यक्षात वाटते तेच त्याने लिहावे आणि जे जाणवते ते मांडावे. या दृष्टिकोनातून पाहता कलाकृतीचा सर्वात मोठा दुर्गुण असतो तिचे स्वत:शी अप्रामाणिक असणे. ललित साहित्याइतकेच हे साहित्यसमीक्षेलाही लागू होते. जोपर्यंत समीक्षक स्वत:शी प्रामाणिक आहे तोवर त्याच्या समीक्षेतील फुटकळ दोषांकडे आपण दुर्लक्ष करू शकतो; जसे की, थोडाफार अभिनिवेश, विचारांच्या विशिष्ट लकबी आणि मध्येमध्ये डोकावणारे फसवे शब्दजंजाळ!

व्यक्तीला जे वाटते आणि जाणवते, त्याची खरीखुरी अभिव्यक्ती करू न शकणारे साहित्य ‘आधुनिक’ साहित्यच नव्हे. अशा साहित्याच्या अस्तित्वालाच आज धोका निर्माण झालेला आहे. कारण हे युग अशा र्सवकष राज्यव्यवस्थेचे आहे, ज्यात व्यक्तीला ‘खऱ्या अर्थाने’ कोणतेही स्वातंत्र्य दिले जाऊ  शकत नाही. मुक्त भांडवलशाहीचे युग संपुष्टात येत असून सर्वच देश केंद्रीभूत अर्थव्यवस्थेचा स्वीकार करीत आहेत. आपापल्या पसंतीनुसार या केंद्रीभूत व्यवस्थेला लोक ‘समाजवाद’ वा ‘भांडवलशाही’ असे नाव देताना दिसतात. या व्यवस्थेत व्यक्तीच्या आर्थिक स्वातंत्र्याचा संकोच होतोय. कसे जगावे, याबाबतच्या निवडींवरही मर्यादा येत आहेत. कार्यक्षेत्र निवडीवर, जगभर संचार करण्यावर आणि इतर अनेक बाबतीत व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधने येत आहेत. अगदी आताआतापर्यंत या सगळ्याच्या दीर्घकालीन परिणामांचा कुणी विचारच केला नव्हता. आर्थिक स्वातंत्र्याचा ऱ्हास वैचारिक स्वातंत्र्यावर काय परिणाम करू शकतो, हे पूर्णार्थाने लक्षातच घेतले गेले नव्हते.

भांडवलशाहीतील विषमतेवर उपाय म्हणून विकसित झालेल्या समाजवादाच्या संकल्पनेत काही गोष्टी ओघानेच गृहीत धरल्या गेल्या; जसे की- समाजवाद म्हणजे नैतिक अधिष्ठान असलेला उदारमतवाद; राज्यव्यवस्थेने व्यक्तीच्या आर्थिक अस्तित्वाचा ताबा घेतल्यावर गरिबी, बेरोजगारी इत्यादी संकटांमधून तिची मुक्तता होईल; त्याच वेळी तिचे वैचारिक स्वातंत्र्य अबाधित ठेवले जाईल.. मात्र, समाजवादाबद्दलचा उपलब्ध पुरावा दाखवतो की, ही सर्व गृहीतके निराधार ठरली आहेत.

कोणत्याही प्रकारची हुकूमशाही राज्यव्यवस्था नागरिकांच्या कृतींवर नियंत्रण ठेवून थांबत नाही. ती त्यांच्या विचार आणि भावनांवरदेखील नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. हुकूमशाहीत विचारांवर असलेले नियंत्रण केवळ नकारात्मक असते असे नाही. विशिष्ट विचार व्यक्त करण्यापासून (अगदी मनात आणण्यापासून) तर व्यक्तीला रोखले जातेच, पण तिने काय विचार करायचा हेदेखील ही व्यवस्था ठरवते. आपली विचारधारा निर्माण करतानाच ही व्यवस्था वागण्याचे काही संकेत निश्चित करते. बाह्य़ जगापासून शक्य तेवढे एकाकी पाडून व्यक्तीला एका कृत्रिम विश्वात बंदिस्त केले जाते. या विश्वात सभोवतालच्या वास्तवाची ज्याच्याशी तुलना करता येईल असा पर्यायच अस्तित्वात नसतो. अशा वातावरणात खरीखुरी साहित्यनिर्मिती शक्य नाही. र्सवकष हुकूमशाही व्यवस्था जगभर प्रस्थापित झाली, तर आपण ज्याला ‘साहित्य’ म्हणून ओळखतो ते संपुष्टात येईल. कुणी म्हणतील की, संपुष्टात येईल ती फक्त- ‘युरोपात विद्येच्या पुनरुज्जीवनानंतर विकसित झालेली साहित्याची संकल्पना’! मात्र वरवर तसे दिसत असले तरी ते खरे नाही.

आजच्या र्सवकष हुकूमशाही व्यवस्था भूतकाळातील सनातन व्यवस्थांपेक्षा अनेक अर्थानी वेगळ्या आहेत. सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे, भूतकाळातील व्यवस्था फारशा बदलत नसत. मध्ययुगीन युरोपात व्यक्तीने कशावर विश्वास ठेवावा, हे धर्मसंस्था ठरवायची हे खरे; पण या संस्थेने लादलेली मते व्यक्तीच्या जीवनकाळात स्थिर राहत असत. तिला सोमवारी एका गोष्टीवर आणि मंगळवारी वेगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवायला सांगितले जात नव्हते. व्यक्तीच्या विचारांवर मर्यादा होत्या हे खरे; पण आपले संपूर्ण आयुष्य एका विशिष्ट विचारव्यवस्थेच्या आधारे चालविणे शक्य होते. व्यक्तिगत भावनांमध्ये त्यामुळे फारशी लुडबुड होत नव्हती.

आजच्या हुकूमशाही व्यवस्थांचे नेमके उलट आहे. या राजवटींचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांना विचारांवर नियंत्रण हवे असते; परंतु स्वत:चा असा (वर्तमानाशी सुसंगत) स्थिर विचारव्यूह नसतो. प्रश्न विचारता येणार नाहीत अशी तत्त्वे घालून देणे या व्यवस्थेचे काम असते; पण ही तत्त्वे रोज बदलू शकतात. तत्त्वे अभेद्य हवीत, कारण त्यातूनच निमूटपणे आज्ञा पाळणारी जनता तयार होते. मात्र सत्तेच्या राजकारणात अपरिहार्य असलेले बदलही नाकारता येत नाहीत. एकीकडे अशी राजवट नेहमीच ‘बरोबर’ असते; पण दुसरीकडे ‘व्यक्तीनिरपेक्ष वस्तुनिष्ठ सत्या’च्या कल्पनेलाच तिचा विरोध असतो. अशा बदलांचा साहित्यावर गंभीर परिणाम होणार हे उघड आहे. कारण लेखनामागे असलेल्या भावना कुणाच्या आज्ञेनुसार बदलू शकत नाहीत.

त्या-त्या वेळच्या विचारसरणीला तोंडदेखला सलाम करणे तसे सोपे आहे; परंतु अर्थपूर्ण साहित्य निर्माण व्हायचे असेल तर लिहिणाऱ्याला आपण जे म्हणतोय त्यातील सत्य मनापासून जाणवलेले असावे लागते. त्याशिवाय सर्जनशीलतेला चालना मिळत नाही. उपलब्ध पुरावा दाखवतो की, हुकूमशाहीला आवश्यक असलेले सततचे भावनिक बदल पचविणे या व्यवस्थेच्या अनुयायांनादेखील मानसशास्त्रीयदृष्टय़ा अशक्य आहे आणि म्हणूनच हुकूमशाहीची जगभरात सरशी होणे याचा अर्थ आपण ज्याला आतापर्यंत साहित्य म्हणून ओळखत होतो त्याचा शेवट होणे.

याचा अर्थ असा नाही, की निरंकुश भांडवलशाहीचा अस्त होताच विचारस्वातंत्र्याचा लोप होतो. ज्या देशांमध्ये उदारमतवादाची मुळे घट्ट रोवलेली आहेत तिथे साहित्य जिवंत राहू शकेल, जसे की लष्करीकरण न झालेले देश, पश्चिम युरोप, उत्तर व दक्षिण अमेरिका, भारत आणि चीन. भविष्यात सगळीकडेच केंद्रीभूत अर्थव्यवस्था येणार हे निश्चित असले तरी या देशांमध्ये समाजवादाचे एक वेगळे रूप उत्क्रांत होईल, अशी आशा ठेवायला जागा आहे. आर्थिक व्यक्तिवाद संपला तरी विचारस्वातंत्र्य जगेल. साहित्याबद्दल आस्था असणारी प्रत्येक व्यक्ती या एकमेव आशेला चिकटून आहे. साहित्याचे मोल आणि त्याचे मानवी इतिहासातील महत्त्व जाणणाऱ्या प्रत्येकाने हुकूमशाहीला विरोध करण्याची निकड लक्षात घ्यायला हवी. मग ती हुकूमशाही बाहेरून लादलेली असो, की व्यक्तीने स्वत:हून स्वीकारलेली!

manojrm074@gmail.com