‘अँट्स अमंग एलिफंट्स’ या सुजाता गिड्ला लिखित पुस्तकाचं ख्यातनाम लेखक नंदा खरे यांनी केलेलं समीक्षण ‘बुकमार्क’मध्ये यापूर्वी (५ मे २०१८ च्या अंकात) आलं होतं. या पुस्तकाला यंदाचं ‘शक्ती भट पारितोषिक’ मिळाल्याची घोषणा झाली आहे! तरुणपणीच  निधन झालेल्या कवयित्री- लेखिका शक्ती भट यांच्या स्मृत्यर्थ, २००८ पासून हे पारितोषिक भारतीय उपखंडातल्या लेखकांच्या पहिल्याच पुस्तकाला दिलं जातं. मानचिन्ह आणि दोन लाख रुपये रोख असं या ‘शक्ती भट फर्स्ट बुक प्राइझ’चं स्वरूप आहे.

यंदाच्या ११ व्या वर्षी, या पारितोषिकासाठी सहा पुस्तकांच्या लघुयादीतून गीता हरिहरन, संपूर्णा चटर्जी आणि रघु कर्नाड या तिघा परीक्षकांनी निवड केली. ‘दारिद्रय़, पुरुषप्रधानता, क्रांतीचा ध्यास आणि तेलंगणच्या कम्युनिस्टांची थोडीफार खबरबात हे सारे- नाटय़मयतेचा लवलेश नसलेले विषय या पुस्तकानं विलक्षण वाचनीय पद्धतीने मांडले आहेत,’ अशी दाद परीक्षकांनी दिली आहे. सुजाता गिड्ला या मूळच्या ‘खंबम’ या आदिवासी समाजातल्या. त्यांची आई आणि वडील, दोघेही प्रतिकूल परिस्थितीत पदव्युत्तर पदवीपर्यंत शिकले होते. स्वत: सुजाता या भौतिकशास्त्रात पदवी मिळवून मद्रास आयआयटीत संशोधन सहायक म्हणून काम करत होत्या, परंतु वयाच्या २६ व्या वर्षी त्या अमेरिकेस गेल्या. न्यू यॉर्कच्या भुयारी रेल्वेत त्या कंडक्टर म्हणून सध्या काम करतात.

पुस्तकातले ‘हत्ती’ म्हणजे प्रस्थापित, सवर्ण समाज आणि ‘मुंगी’ म्हणजे गरीब, विस्थापित, अवर्ण आणि हरतं राजकारण करणारे, हे तर स्पष्टच आहे.

समीक्षक नंदा खरे यांनी या पुस्तकाच्या निमित्तानं मांडलेले विचार मननीय आहेत. खरे यांनी म्हटले आहे-‘‘मराठीतील दलित आत्मकथने तर पन्नास वर्षांहून जास्त काळ वाचनात येतच आहेत. त्यांची कौतुकेही होतात, पण खासगीत उच्चवर्णीयांत त्यांची टिंगलही होतेच. आजही भारतात ‘कायद्याचे राज्य’ ही कल्पना कागदावरच आहे. आपल्या वर्गाच्या, जातीजमातीच्या, लिंगाच्या व्यक्तींवरचे अन्याय ज्या तीव्रतेने लोकांना भिडतात, त्या तीव्रतेने भिन्न वर्ग-जात-जमात-लिंगाच्या व्यक्तींवरचे अन्याय भिडत नाहीत. उलट आपण जाणूनबुजून त्यांना स्वत:ला भिडू देत नाही, असं मानायला जागा आहे.’’

‘‘स्वत:ची पिढी, आई-मामांची पिढी, आज्याची पिढी- या तिन्हींवरचे अन्याय सहन करत, नोंदत सुजाता टिकून राहिली. नुसतीच लव्हाळ्यासारखी महापूर झेलून वाकत-ताठरत नाही; तर बहरत राहिली. हा टिकाऊपणा माझ्या लेखी माणसांच्या कैक पिढय़ांच्या नैसर्गिक निवडीतून आलेला आहे.’’- असंही, अन्य विषयांप्रमाणेच मानवी उत्क्रांतीचाही अभ्यास करणारे नंदा खरे यांनी या पुस्तकाबद्दल ‘लोकसत्ता’त म्हटलं होतं. या पुरस्काराच्या  निमित्ताने ‘अँट्स अमंग एलिफंट्स’कडे वळण्यासाठी वाचकांना आणखी एक निमित्त मिळालं आहे!