बातमी दोन देशांतल्या, दोन पुस्तकदुकानांबद्दलच आहे, की वाचकांबद्दल, की एकंदर सामाजिक-राजकीय परिस्थितीबद्दल, ते तुम्हीच ठरवायचं.. आमच्यालेखी ही ‘बुकबातमी’ आहे दोन दुकानांबद्दल.

पहिलं दुकान इंग्लंडमधल्या साउदम्टन शहरातलं. लंडनपासून दोन तासांच्या अंतरावरल्या या शहरात ‘ऑक्टोबर बुक्स’ नावाचं सुपरिचित दुकान आहे. दुकानाच्या नावातला ‘ऑक्टोबर’ हा रशियात १९१७ साली झालेल्या साम्यवादी क्रांतीतून आला असला, तरी दुकान १९७७ पासून सुरू झालं होतं. ऑक्टोबर, २०१८ मध्ये भाडय़ाच्या जागेतून दुकानाला बाहेर पडावं लागणार, हे स्पष्ट झाल्यावर लोकवर्गणीचं आवाहन करण्यात आलं. काही र्कज आणि बऱ्याच देणग्या स्वीकारून त्याच शहरातल्या त्याच रस्त्यावर काही दुकानं पुढली- एका बंद बँकेची- जागा ‘ऑक्टोबर बुक्स’नं विकत घेतली! या सुखान्तिकेचा पुढला अंक म्हणजे, दुकानातली पुस्तकं आणि सामान एवढय़ाश्शा अंतरावर हलवण्यासाठी टेम्पोला पैसे का द्यावेत, म्हणून पुन्हा लोकांनाच आवाहन करण्यात आलं : येता का मदतीला? दीडशे लोक आले तरीही दोन तासांत दोनेक हजार पुस्तकं इकडली तिकडे जातील, असं यामागचं नियोजन होतं.. प्रत्यक्षात आले २०० हून जास्त. तेही उत्साही.. मग तासाभरात पुस्तकं हललीसुद्धा! आता या नव्या जागेतल्या ‘ऑक्टोबर बुक्स’ची समारंभपूर्वक सुरुवात ३ नोव्हेंबरच्या शनिवारीच होत आहे.

हे झालं पहिल्या दुकानाबद्दल. दुसरं दुकान हे हाँगकाँगमधलं ‘शेवटचं दुकान’, म्हणून त्याची बातमी. चीनमध्ये ज्या पुस्तकांवर बंदी आहे, अशीही पुस्तकं हाँगकाँगमध्ये पूर्वापार मिळत. कॉजवे बे भागात अशी कितीतरी दुकानं होती. पण चीननं अशा दुकानांवर गेल्या चार वर्षांत फक्त र्निबधच नव्हे, थेट छापेसुद्धा घातले. २०१५ मध्ये तर याच भागातल्या पाच पुस्तकविक्रेत्यांना कोठडीत डांबल्याचं उघड झालं होतं. या चिनी कारवायांना तोंड देत ‘पीपल्स बुकस्टोअर’ हे एकच दुकान टिकून राहिलं होतं. तेही अखेर ‘गेलं’, अशी बातमी गेल्या आठवडय़ात आली.

‘ऑक्टोबर बुक्स’चं साउदम्टन आणि ‘पीपल्स बुकस्टोअर’चं हाँगकाँग या दोन शहरांपैकी, अर्थातच हाँगकाँग श्रीमंत आहे. स्पेलिंग मराठीत वाचल्यास ‘साऊथअ‍ॅम्प्टन’ असा उच्चार होणारं साउदम्टन हे पर्यटनाच्या नकाशावर वगैरे नाही. हाँगकाँगइतकं तर नाहीच नाही. पण एका शहरातलं दुकान जगतं, तेही मोठय़ा- स्वत:च्या मालकीच्या जागेत. आणि दुसऱ्या शहरातलं दुकान मरतं! जगणारं दुकान लोकांना आवाहन करतं आणि लोकही उत्साह दाखवतात. मेलेल्या दुकानाबद्दल लोकांना उशिराच कळतं आणि मग ते फक्त हळहळतात, आणखीच निरुत्साही होतात.

या दोन टोकांच्या मध्ये मुंबई-पुणं. पुण्याचं ‘मॅनीज’, मुंबईचं ‘स्ट्रँड’ ही दुकानं झाली इतिहासजमा. अजूनही ‘स्ट्रँड’पासनं चालत जाण्याच्या अंतरावर मुंबईतलं ‘पीपल्स बुक हाऊस’ (पीबीएच) आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी पुस्तकांचं दुकान! ते आहे तस्संच आहे, पण तिथलीही वर्दळ कमी होऊ लागलीय.. काय होणार ‘पीबीएच’चं? साउदम्प्टनसारखं की हाँगकाँगसारखं?