‘चरित्र/आत्मचरित्र’ या विभागात पडणारी भर अनेकदा स्वान्त:सुखाय असते; पण इंग्रजीत २०१९ सालात येणारी काही आत्मपर पुस्तकं लक्षणीय ठरणार आहेत.

‘माय लाइफ इन मूव्हमेंट्स’ हे कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांचं पुस्तक २०१९ मध्ये प्रकाशित होणार आहे, तर अर्थतज्ज्ञ आणि भारतीय नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष माँतेकसिंग अहलुवालिया यांचं ‘माँतेक रिमेम्बर्स’ हे आगामी पुस्तक केवळ आर्थिक प्रश्नांबद्दलच नव्हे, तर राजकारणातील व्यक्तींसोबत – विशेषत: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत झालेला सहप्रवासही सांगणारं असेल, अशी अपेक्षा आहे. ही अशी ‘राजकीय’ आत्मवृत्तं येतच असतात म्हणून ज्यांना दुर्लक्ष करायचंय, त्यांनी खरोखर अप्रकाशित राहिलेल्या एका समाजभावी लोकप्रतिनिधी महिलेचं २०१९ मध्ये येणारं चरित्र तरी वाचावंच. मुथुलक्ष्मी रेड्डी (१८८६-१९६८) या १९२६ साली मद्रास प्रांतिक कायदेमंडळाच्या सदस्य झाल्यामुळे पहिल्या भारतीय महिला आमदार म्हणून ओळखल्या गेल्या आणि १९३० मध्ये त्यांनी हे पद सोडून, देवदासी प्रथेच्या निर्मूलनासाठी प्रयत्न सुरू केले. पुढे ‘अव्वइ’ या संस्थेद्वारे या कामाचा वटवृक्ष झाला. त्यांचं हे चरित्र ‘पॅन मॅकमिलन’तर्फे येणार आहे.

स्त्रीवादी आणि विकासात्म अर्थशास्त्राच्या तज्ज्ञ म्हणून नावाजल्या गेलेल्या देवकी जैन यांचं ‘द ब्रास नोटबुक’ हे आत्मपर पुस्तकही येत्या काही आठवडय़ांत उपलब्ध होईल. प्रवासवर्णनांतून मानवी जगाचा वेध घेणारे पिको अय्यर यांचं ‘ऑटम लाइट : सीझन ऑफ फायर अ‍ॅण्ड फेअरवेल्स’ हे आत्मपर पुस्तक येत्या एप्रिलमध्ये प्रकाशित होईल.

तस्लीमा नसरीन या ‘डॅशिंग’ बंगाली लेखिका. त्यांची ‘गर्लहूड’ अर्थात बंगालीतली ‘मेयेबेला’ ही तीन खंडांतली आत्मवृत्त मालिका असेल, असं पहिला खंड २० वर्षांपूर्वीच प्रकाशित झाला तेव्हा जाहीर झालं होतं. आता त्यापैकी दुसरा खंड यंदाच्या वर्षी निघणार आहे.. त्याचंही नाव ‘मेयेबेला’ नसेल, अशी अपेक्षा करू या! ‘प्रामाणिकपणानं केलेलं सत्यकथन’ म्हणावं, तर पाचच आठवडय़ांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘व्हेन आय वॉज अ बॉय’ या पुस्तकाबद्दलही तसंच म्हणता येईल, कारण या आत्मवृत्ताचे लेखक आहेत रस्किन बॉण्ड!

गायिका आणि ‘वॉटर’सारख्या कसदार चित्रपटांतील अभिनेत्री लिसा रे यांचं आत्मवृत्त ‘हार्पर कॉलिन्स’तर्फे येतं आहे, पण ते कर्करोगाशी लिसा यांनी दिलेल्या झुंजीवर भर देणारं असेल, असा अंदाज आहे. लेखिका-समीक्षक शांता गोखले यांनीही अशीच यशस्वी झुंज दिली होती आणि त्यांच्या आगामी पुस्तकाचं नाव ‘द बॉडी मॅम्वार’ असं आहे; हा निव्वळ योगायोगच असेल का?

हरीश अय्यर यांचं ऑक्टोबर २०१९ मध्ये ‘वेस्टलँड’तर्फे प्रकाशित होणारं ‘सन राइज’ हे आत्मवृत्त आणि अमेरिकी जेकब टोबिआ यांचं ‘सिसी : अ कमिंग – ऑफ – जेंडर स्टोरी’ हे पुस्तक  यांतही एक साम्य आहे. हे दोघेही, समलिंगींच्या हक्क-चळवळीत सक्रिय आहेत.

धर्मातर करणारे दिवंगत मुष्टियोद्धा कॅशियस क्ले ऊर्फ मोहम्मद अली यांच्या कन्या हाना अली यांनी लिहिलेलं ‘अ‍ॅट होम विथ मोहम्मद अली’ हे पुस्तक अमेरिकेत व अन्य काही देशांतही लोकप्रिय होईल; पण त्यापेक्षा अधिक देशांमध्ये बराक ओबामा यांचं आणखी नवं (हे आजवरचं तिसरं!) आत्मपर पुस्तक यंदा येतंय, ते पोहोचेल!

लिसा रे यांच्या पुस्तकाला ‘फिल्मी’ म्हणता येणार नाही; पण ‘इंटरव्हल : राकेश ओमप्रकाश मेहरा’ (शब्दांकन रीटा गुप्ता) या पुस्तकात अर्थातच पडद्यावर आणि पडद्यामागे काय घडलं, यावर आत्म-जनसंपर्कपर सुरातला भर असणार, अशी शंका रास्त ठरेल. त्याहीपेक्षा गाजवणूक ज्याची होऊ शकते, ते आत्मपर पुस्तक म्हणजे प्रियांका चोप्राचं- ‘अनफिनिश्ड’! जून २०१८ मध्ये ‘ती पुस्तक लिहायला बसल्येय’ अशा बातम्या आल्या होत्या. आता येत्या काही आठवडय़ांत बहुधा ‘पुस्तकाचा प्रोमो व्हायरल’ अशीही बातमी येऊ शकेल.. प्रोमो पाहून पुस्तक घेणाऱ्यांपैकी तुम्ही असतात, तर ‘बुकबातमी’ शेवटपर्यंत वाचली तरी असतीत का?