आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्यविषयक पुरस्कारांमध्ये ‘नोबेल’च्या तोडीस तोड स्थान मिळवणाऱ्या ‘मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइझ’ची यंदाची दीर्घयादी (प्राथमिक यादी) बुधवारी जाहीर झाली. मार्चच्या मध्यात दीर्घयादी जाहीर करण्याचा शिरस्ता कायम राखत मॅन बुकर इंटरनॅशनलच्या निवड समितीनं जाहीर केलेली १३ पुस्तकांची ही यादी इंग्रजी ग्रंथव्यवहारातले बदलते प्रवाहच अधोरेखित करणारी आहे.

मूळ इंग्रजीतच प्रसिद्ध वा इंग्रजीत अनुवादित आणि ब्रिटन -आर्यलडमध्ये प्रकाशित झालेल्या जगभरातला कुठल्याही लेखकाच्या कथनसाहित्याला दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात झाली २००५ साली. आधी द्वैवार्षिक असणारा हा पुरस्कार २०१६ पासून वार्षिक झाला. जगभरातील उत्तम कथनसाहित्य इंग्रजीत येणं आणि त्या-त्या लेखकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणं, हे या पुरस्कारामुळं साध्य होतंच; परंतु अनुवादित पुस्तकाच्या लेखक व अनुवादक अशा दोघांमध्ये ५० हजार पाऊंडांची (म्हणजे सुमारे ४५ लाख रुपयांची!) घसघशीत रक्कम विभागून देणाऱ्या या पुरस्काराबद्दल गेल्या काही वर्षांत उत्सुकता वाढली आहे.

यंदाची दीर्घयादी ही उत्सुकता आणखी वाढवणारी आहे. १२ देश व नऊ भाषांतल्या १३ लेखकांची ही यादी. त्यात गतवर्षी ‘फ्लाइट्स’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळवणारी पोलिश कार्यकर्ती- लेखिका ओल्गा टोकरचक हिची ‘ड्राइव्ह यूअर प्लो ओव्हर द बोन्स ऑफ द डेड’ अशा लांबलचक नावाची कादंबरी आहे. ओल्गाला यंदाही पुरस्कार मिळतो का, याबद्दल अनेकांना उत्सुकता असेल. ओल्गाबरोबरच यंदाच्या यादीत आणखी सात स्त्री लेखकांचा समावेश आहे, हेही या यादीचे वैशिष्टय़च म्हणावे लागेल. स्पॅनिश लेखिका सामन्ता श्वेब्लिन (‘माऊथफूल ऑफ बर्ड्स’), अरबी भाषिक जोखा अल-हार्थी (‘सेलेस्टिअल बॉडीज्’), चिनची कान शू (‘लव्ह इन द न्यू मिलेनियम’), फ्रान्सची अ‍ॅनी इरनॉक्स (‘द इयर्स’), जर्मनीची मॅरियन पॉशमन (‘द पाइन आयलँड्स’), स्वीडनची सारा स्ट्रीड्सबर्ग (द फॅकल्टी ऑफ ड्रीम्स’), आलिया त्रॅबुको झेरान (‘द रिमेन्डर’)- या त्या स्त्री लेखक! याव्यतिरिक्त या यादीत द. कोरियाचे बुजुर्ग लेखक हांग सोक-यांग (‘अ‍ॅट डस्क’), पॅलेस्टिनी लेखक माझेन मारूफ (‘जोक्स फॉर द गनमेन’), फ्रान्सचा कादंबरीकार हबर्ट मिंगारेली (‘फोर सोल्जर्स’), कोलंबियन लेखक जुआन गॅब्रिएल वास्क्वेझ (‘द शेप ऑफ द रुइन्स’) आणि डच कादंबरीकार टॉमी वेयिरगा (‘द डेथ ऑफ मुरात इद्रिसी’) या पाच पुरुष लेखकांचा समावेश आहे.

यातील येल युनिव्हर्सिटी प्रेसचं एक आणि ग्रँटाची दोन पुस्तकं वगळता, यादीतील इतर पुस्तके मात्र छोटय़ा, फारशा गवगवा न झालेल्या प्रकाशन संस्थांनी प्रसिद्ध केली आहेत, हेही या यादीचे एक वैशिष्टय़च! येत्या ९ एप्रिलला यातील सहा पुस्तकांची लघुयादी जाहीर होणार आहे.