|| पंकज भोसले

‘हंस’ हे मासिक हिंदीत गेली चार दशकं कथन साहित्याद्वारे समाजमनाची मशागत करतं आहे. त्याच्या आरंभिक पाच वर्षांतील गाजलेल्या १३ कथांचा पहिला खंड नुकताच इंग्रजीत अनुवादित झाला आहे. त्याची दखल घेत भारतीय साहित्यपटलावरील प्रतिकूल काळात ‘हंस’नं घडविलेल्या नवप्रवाहाची ओळख करून देणारं हे टिपण..

वाचन व्यवहाराच्या बाबतीत पारंपरिक ओरडा आपल्याकडे कायम ऐकवला जातो. ‘१९८५ सालाच्या आसपास व्हिडीओ, मग केबल टीव्ही, त्यानंतर उपग्रह वाहिन्यांनी वाचनाऐवजी नवा मनोरंजन पर्याय लोकांसमोर उभा केला. अन् फक्त त्यामुळेच वाचक घटले. मासिके बंद पडू लागली, पुस्तक खरेदी आटली आणि एकूण वाचकांची जमात माळढोक पक्ष्यासारखी अस्तंगत होण्याकडे वाटचाल करू लागली.’ या बोंबांच्या लाटेवर स्वार होत आपली न वाचण्याची कारणमीमांसा आजच्या पिढीतले अ-वाचक किंवा अर्धमनी (फार वाचायला वेळ देता न आल्याने अर्धेमुर्धे पुस्तक कुंथत वाचणारे) वाचक करीत असतात. हिंदूीतील ‘हंस’ मासिकाने या प्रतिकूल काळातच घेतलेली वाचकभरारी ही आजच्या अस्तंगत होत चाललेल्या इतर भाषिक कथावाचकांनी मुळापासून समजून घेणे अत्यावश्यक आहे.

थोडी पार्श्वभूमी..

सदासर्वकाळ ‘शंभर कोटी क्लब’मधले सारे हिंदी चित्रपट पाहून किंवा छोटय़ा पडद्यावरील हिंदी मालिका अनुभवून तुमची राष्ट्रभाषेची जाणीव तगडी बनली असल्यास तुम्ही हिंदूी मासिकांचे सहज वाचक बनू शकता. राज्यातील महत्त्वाच्या शहरांत उपलब्ध होणारी ‘हंस’, ‘कथादेश’, ‘नया ज्ञानोदय’, ‘पहल’, ‘तद्भव’, ‘बया’, ‘पाखी’, ‘वागर्थ’ ही हिंदी मासिक-त्रमासिके समांतर जगण्यावर भाष्य करणाऱ्या ललित, ललितेतर आणि वैचारिक साहित्याची खाणच तुमच्यासाठी उघडून देऊ शकतात. या सर्व मासिकांमध्ये आजचे सर्वात महत्त्वाचे हिंदी साहित्य छापून येते. ही साहित्यिक घुसळण सुरू झाली ती ‘हंस’ मासिकाच्या १९८६ सालच्या पुनरुज्जीवनामुळे. मुन्शी प्रेमचंद यांनी सुरू केलेले हे साहित्यिक व्यासपीठ स्वातंत्र्योत्तर काळाच्या पहिल्याच दशकात मृतावस्थेत गेले. साठोत्तरीच्या दशकात ‘सारिका’, ‘धर्मयुग’ या मासिकांनी बंडखोर साहित्य दिले. मात्र १९८०च्या दशकात वैचारिक ऱ्हासाचा आणि आर्थिक अडचणींचा सामना करताना ती बंद पडली. या काळात समाजात दबलेल्या घटकांना व्यक्त करण्याच्या विशिष्ट हेतूने कथाकार राजेन्द्र यादव यांनी ‘हंस’ मासिकाची उभारणी केली. साहित्यवाचनाला पर्याय म्हणून देशभरात सुरू झालेल्या माध्यमक्रांतीसह अनेक आक्रमणांत जगण्याची जी घुसळण सुरू झाली, त्या काळातील समाजाचे प्रतिबिंब पाडणारे साहित्य ‘हंस’ने जोमाने द्यायला सुरुवात केली.

टीव्ही, केबलच्या मनोरंजनाला पर्यायी ताकदीचे कथन साहित्य, वैचारिक वाद-संवाद ‘हंस’मधून छापून येत होते. उदय प्रकाश, शिवमूर्ती, ललित कार्तिकेय, रमाकान्त, चन्द्रकिशोर जायसवाल, अखिलेश या कथाकारांच्या समाजवास्तवाकडे तिरकस नजरेतून पाहणाऱ्या गोळीबंद कथा ‘हंस’मध्ये येऊ लागल्या. त्यावर गरजेनुरूप चर्चा, विरोध आणि कौतुकांची आवर्तने घडत राहिली. ‘हंस’ने प्रतिकूल काळात नवा वाचक घडविण्याचे धनुष्य पेलले आणि हिंदी साहित्यासाठी आश्वासक वातावरणनिर्मिती केली. गेल्या पस्तीसएक वर्षांतील हिंदूीतल्या सर्वश्रेष्ठ कथांपैकी बहुतांश कथा ‘हंस’मध्ये आलेल्या आहेत. हिंदी साहित्याच्या आजच्या पटलावरील खूपविके आणि गंभीर कथाकार, समीक्षक, कवी आदींची जडणघडणही या मासिकाने केली.

मराठीत बरोब्बर याउलट वातावरण असल्याने नव्वदोत्तरीच्या काळात मासिके बंद पडण्याचा, साहित्यापासून बहुसंख्य समाज दूर जाण्याचा, तत्कालीन जगण्यातील प्रश्नांचा ताकदीने वेध घेणाऱ्या साहित्यिक प्रतिभेचा प्रवाह आटण्यास सुरुवात झाली होती. देशातील अनेक प्रादेशिक भाषांमध्ये अपरिहार्यपणे हीच स्थिती होती. मात्र, ‘हंस’ने त्या स्थितीलाही संधी मानत मार्गक्रमणा केली. याचा परिणाम म्हणजे, आज हिंदीभाषिक पट्टय़ांमध्ये साहित्यिक मासिकांची स्थिती बळकट आहे. गंमत म्हणजे ‘हंस’सारखे ‘कथादेश’ नाही, ‘कथादेश’सारखे ‘पाखी’ नाही, ‘पाखी’सारखे ‘पहल’ नाही आणि ‘पहल’सारखे ‘तद्भव’ नाही. लघु-दीर्घ कादंबऱ्या, लेखकांच्या मुलाखती, जगभरचे साहित्य गाजत असणाऱ्या काळात त्यांचे अनुवाद व इतर भारतीय भाषांतील मौलिक साहित्याचे तातडीने रूपांतर या हिंदी मासिकांत होत असते.

शिवाय, कथन साहित्यातील इतिहास-वर्तमानाची जाणीव करून देणाऱ्या विशेषांकांची भर सतत पडत असतेच. उदा. चंद्रधर शर्मा ‘गुलेरी’ यांच्या ‘उसने कहा था’ला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यावर केंद्रित एक विभाग, भोपाळ दुर्घटनेला तीस वर्षे झाल्यानंतर त्यावर आधारित कथा-कादंबरी आणि लेखांना एकत्रित करणारा अंक ‘नया ज्ञानोदय’ने काढला होता. ‘हंस’ तर रहस्यकथा विशेषांकापासून सोशल मीडिया विशेषांकाचे प्रायोगिक प्रयत्न सातत्याने करताना दिसतो. नोटाबंदी २०१६च्या नोव्हेंबरमध्ये झाली. त्याच्या फटक्याने उद्ध्वस्त झालेल्या हजारो लोकांचे प्रातिनिधिक दु:ख मांडणारी एक सशक्त कथा ‘हंस’च्या २०१७च्या आरंभीच्या अंकात वाचायला मिळाली होती. बरे, हे तातडीचे साहित्य असले तरी त्यात घटनेचे सखोल चिंतनही दिसून आले होते.

आंग्लभरारी..

राजेन्द्र यादव यांच्या संपादकीय धोरणांमधून १९८६ पासून ‘हंस’ मासिकाचा विकास घडत राहिला. साहित्यिक पत्रकारितेचा पायंडा घालणाऱ्या या मासिकातील बहुचर्चित आणि समाजसाहित्यावर पगडा असणाऱ्या कथांना नुकताच इंग्रजीचा साज मिळाला आहे. राजेन्द्र यादव यांच्या मृत्यूपूर्वी (२०१३) सुरू झालेला हा प्रकल्प या वर्षांच्या आरंभी पूर्ण झाला. १९८६ ते १९९१ या पहिल्या पाच वर्षांत ‘हंस’ने गाजविलेल्या १३ कथांचा हा पहिला खंड असून आत्ताच्या काळापर्यंतच्या नाणावलेल्या कथा हिंदीतर वाचकांना उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचे मौलिकत्व जगासमोर सिद्ध करावे, हा प्रामाणिक हेतू या खंडाची निर्मिती करण्यामागे आहे.

उदय प्रकाश यांच्या कथेची मोहिनी वाचकांवर जेव्हा पडली नव्हती, त्या काळातील त्यांची ‘तिरिछ’ ही कथा यात वाचायला मिळेल. तिरिछ नावाच्या सरडय़ासारख्या मात्र विखारी प्राण्याच्या दंशानंतरचा वडिलांचा मृत्युवृत्तांत मांडणाऱ्या निवेदकाची ही कथा गाव-शहरातील भेदाशी आणि भीषण जगण्याशी वाचकाला परिचित करते. परिस्थितीनुरूप आत्मव्यंगात्मक निवेदनाची उदय प्रकाश यांची वैशिष्टय़पूर्ण शैली वाचकाला त्या दीर्घ मृत्युवृत्तांतात सहभागी करून घेते आणि पुढला काही काळ त्याला सुन्न करण्याची ताकद ठेवते. इंग्रजी अनुवादामध्येही या मूळ कथेतील जाणिवांचे स्तर अबाधित ठेवण्यात आले आहे.

कॉलेजवयीन हॉस्टेलमध्ये स्त्री-प्रेम आणि पैसा या दोन्ही गोष्टींनी कफल्लक असलेल्या तरुणांच्या राजकीय-सामाजिक जाणिवांचा कोलाज मांडणारी अखिलेश यांची व्यंगोत्कट कथा ‘चिठ्ठी’देखील या खंडात वाचायला मिळू शकते. या कथेमधील भाषेचा अफलातून वापर आणि लेखकाची कथनशैली वाचकाला या लेखकाच्या प्रेमात पाडू शकेल. साबण न पाहिलेल्या आणि केवळ ऐकलेल्या एका गावात अचानकपणे उडणाऱ्या खळबळीचे रिपोर्ताजी चित्रण करणारी संजय खाती यांची ‘पिंटी का साबून’ हीदेखील नव्वदीच्या दशकातील अफाट गाजलेली कथा यात वाचायला मिळते. इतर लेखकांमध्ये मन्नू भंडारी, अर्चना वर्मा, शिवमूर्ती, ब्रजेश्वर मदान, विश्वजीत, संजीव, मृदुला गर्ग आदींच्या कथा अत्यंत बारकाईने इंग्रजीत रूपांतरित करण्यात आल्या आहेत. वंदना सिंग, रंजना श्रीवास्तव, इरा पाण्डेय आणि मृदुला गर्ग आदी दोन्ही भाषांमध्ये सातत्याने लिहिणाऱ्या लेखकांनीच हे अनुवाद केले आहेत. निवडीपासून त्यांच्या इंग्रजी रूपांतरापर्यंत वाचकाला हिंदूीतील एका काळातील सर्वश्रेष्ठ साहित्य वाचण्याची मौज मिळावी, याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

खंडाचे महत्त्व काय?

मराठी वाचक  म्हणून इंग्रजीहून अधिक आपल्या जगण्यात हिंदीचा अंतर्भाव रोजच होत असतो. ‘हंस’च्या पहिल्या इंग्रजी खंडातील या कथा इतक्या गाजलेल्या आहेत, की बहुतांश कथा ‘हिंदूी समय’ नामक संकेतस्थळावर मूळ रूपात सहज मिळतात. तरीही हिंदी वाचण्याची सवय नसलेल्यांना आणि इंग्रजी वाचनाचा वेग आत्मसात करणाऱ्यांना हिंदी साहित्यातील ‘नई कहानी’च्या आरंभाचा अभ्यास या पहिल्या खंडात अनुवादित झालेल्या कथांमुळे होऊ शकेल. ‘हंस’ मासिकाइतकी जगण्याविषयीची सजग जाणीव सध्या तरी कोणत्याही भारतीय साहित्यिक नियतकालिकात दिसत नाही. नव्या लेखकांची पहिली कथा गाजावाजा करत छापून, दिल्लीतील छोटय़ा वस्त्यांमधल्या चौदा-पंधरा वर्षांच्या मुलांना लिहिते करून आणि वर नाणावलेल्या कथाकारांचे अव्वल साहित्य, वैचारिक लेख प्रत्येक अंकात आणून ‘जनचेतना का प्रगतिशील कथा-मासिक’ या ब्रीदवाक्याला ‘हंस’ जागत आहे.

गेल्या तीस-पस्तीस वर्षांत मराठीत मासिकांची संख्या कमी झाली आणि त्याबरोबर साहित्याचा दर्जा उतरू लागला. कथन साहित्य फार लोक वाचत नाहीत, असा उफराटा साक्षात्कार झाल्याने मराठी नियतकालिकांतून बोजड-वैचारिकतेचा मारा अधिक होऊ लागला. त्याच काळात आपल्या शेजारील राज्यांमध्ये या ‘हंसा’ळलेल्या कथांनी समाजमनाची मशागत कशी होत होती, याचा तपशीलही या कथांच्या आस्वादातून घडू शकेल.

pankaj.bhosale@expressindia.com