‘पाश्चात्त्यांचा विध्वंस स्थलांतरितांमुळे होणार नसून, तो स्थलांतरितांच्या भीतीमुळे मात्र होऊ शकतो’ असं सूत्रवजा वाक्य लिहून जाणारे सुकेतू मेहता यांनी जागतिक स्थलांतरित, निर्वासित लोकांच्या ‘प्रश्ना’बद्दल पुस्तकच लिहिलं असून ते ४ जून रोजी प्रकाशित होणार आहे. ‘धिस लॅण्ड इज अवर लॅण्ड’ हे या पुस्तकाचं शीर्षक. मुंबई आणि मुंबईकर यांच्याबद्दल ‘मॅग्झिमम सिटी’ हे पुस्तक मेहता यांनी २००४ साली लिहिलं. त्यातल्या लेखनगुणांबरोबरच लेखकीय भूमिकेच्या खुलेपणामुळे ते गाजलं आणि त्याची हिंदी-मराठी भाषांतरंही झाली. मग हेच मेहता पॅरिसबद्दल काय लिहितात, जिथं राहतात त्या न्यू यॉर्कविषयी काय लिहितात, याचीही उत्सुकता वाचकांमध्ये वाढली होती आणि मेहतांनी ती पर्याप्तपणे पूर्णही केली होती.

मात्र त्यांचा यंदाचा विषय हा वाचकांना हवासा वगैरे अजिबात नाही, असंच म्हटलं पाहिजे. स्थलांतरितांना विरोध हा भारतातही जर निवडणूक प्रचाराचा मुद्दा ठरू शकतो, तर ट्रम्पसारख्यांच्या अमेरिकेत काय होत असेल आणि ‘काळे’, ‘मुसलमान’ निर्वासित जिथं लोंढय़ांनी येताहेत त्या ‘गौरवर्णीय’ युरोपीय देशांचं काय होत असेल, याची कल्पना सर्वच जण करू शकतात.

‘फुरोगामी’ वा ‘सिक्क्युलर’  असल्यामुळे मेहता ‘त्या लोकां’चीच बाजू घेणार, असं जर कुणाला वाटलं असेल, तर जरा थांबा. कुणा एका वंशाची, धर्माची किंवा देशाची बाजू घ्यायची म्हणून मेहता लिहीत नव्हतेच कधी. ते ‘आधुनिकते’चा विचार करताहेत आणि म्हणताहेत की, स्थलांतर हे आधुनिकतेचं वैशिष्टय़ आहे. पण आदिमता आणि ग्रामीणता ही आधुनिकतेपेक्षा बरीच जुनी असल्यामुळे आधुनिकतापूर्व मानवी प्रवृत्ती डोकं वर काढत असतात आणि या प्रवृत्तींमुळे स्थलांतराला विरोध होत असतो.

जर्मनी, स्वीडन, हंगेरी-सर्बियाची सीमा, शिवाय अर्थातच अमेरिकेतली राज्यं आणि शहरं.. अशा अनेक ठिकाणी, अनेक ‘पुढारलेल्या’ देशांमध्ये मेहता वाचकाला नेतात. यापैकी बऱ्याच ठिकाणी माणसाला माणूस मानलंच जात नाहीये हे दाखवून देतात. याच विषयावर मेहतांनी ‘फॉरेन पॉलिसी’ या प्रतिष्ठित नियतकालिकाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०१७ च्या अंकात ‘धिस लॅण्ड इज देअर लॅण्ड’ हा दीर्घ लेख लिहिला होता. त्यानंतरही वर्षभर आणखी काम करून हे पुस्तक त्यांनी लिहिलं. आय वेवे या जगप्रसिद्ध परागंदा चिनी दृश्यकलावंतानं बनवलेल्या ‘ह्य़ूमन फ्लो’ या पुरस्कारप्राप्त माहितीपटाइतकंच भिडणारं आणि विषय-मांडणीत त्याहीपुढे जाणारं मेहतांचं पुस्तक असेल, अशी अपेक्षा आहे.