नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतची १०० कागदपत्रे खुली झाली आणि प. बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत टप्प्याटप्प्याने आणखीही खुली होणार आहेत. पण नेताजी कसे होते- माणूस म्हणून आणि स्वातंत्र्यलढय़ाचे सेनानी म्हणून त्यांच्या निष्ठा काय होत्या, हे कळण्यासाठी काही वेगळे वाचावे लागेल. त्यापैकी सर्वात नवे, त्यांच्या चुलत नातीने लिहिलेले हे पुस्तक.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील शंभर गोपनीय फायली मागील महिन्यात खुल्या करण्यात आल्या. राष्ट्रीय पुराभिलेख संग्रहालयाने महिन्यागणिक अशा पंचवीस फायली खुल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. नेताजींच्या विमान अपघाताला सत्तर वष्रे पूर्ण होत असतानाच भारतीय जनमानसावरील त्यांच्या मृत्यूबाबतचे गूढ अद्यापही कायम आहे. त्याचे विरेचन या फायली खुल्या झाल्यामुळे होऊ शकेल. तसेच, दुसरे महायुद्ध आणि भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या अनुषंगाने नवे पलू उजेडात येतील. वेगवेगळ्या रंगांत बुडवल्यामुळे मूळचे रूप लोपते, तशी आता इतिहासाची परिस्थिती आहे. तद्वतच भगतसिंग, सरदार पटेल आणि नेताजी या प्रखर राष्ट्रप्रेमी, परंतु धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्त्वांना सध्या उजव्या विचारांच्या देव्हाऱ्यात बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे इतिहासाचे सम्यक आकलन होण्याच्या दृष्टीने संबंधित विषयाचे जितके दस्तावेज उपलब्ध होतील, तितके स्वागतार्ह आहे.
त्याच अनुषंगाने खुद्द बोस यांच्या पुढल्या पिढीतील कुटुंबीयांपैकी (चुलत नात) माधुरी बोस यांनी ‘द बोस ब्रदर्स अ‍ॅण्ड इंडियन इंडिपेंडन्स’ हे पुस्तक लिहून सुभाषबाबू आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू शरच्चंद्र यांच्या सार्वजनिक जीवनाचा पट मांडला आहे. माधुरी या शरच्चंद्र यांची नात व प्रख्यात वकील अमियानाथ बोस यांची कन्या. सुभाषबाबूंचा अमिया यांच्यावर अतिशय जीव होता. त्यांनी व शरदच्चंद्रांनी अमिया यांना लिहिलेली पत्रे, बोस बंधूंचा राजकीय पत्रव्यवहार, त्यांच्या संदर्भातील परदेशातील कागदपत्रे, वृत्तपत्रीय लिखाण अशा ऐवजातून हे पुस्तक साकारले आहे. वयाच्या विशीपासून विमान अपघातातील गूढ मृत्यूच्या काळापर्यंत सुभाषबाबूंनी कुटुंबीयांना लिहिलेली पत्रे या पुस्तकात वाचावयास मिळतात. फाळणीच्या काळात बंगालचे विभाजन टळावे व एकसंध बंगाल स्वतंत्र व्हावा, यासाठी शरच्चंद्र यांनी केलेल्या प्रयत्नांचा सविस्तर ऊहापोह या पुस्तकात आहे. सहा भागांत विभागल्या गेलेल्या या पुस्तकाच्या औचित्याबद्दल लेखिकेनेच उत्तर देऊन ठेवले आहे- ‘बोसबंधूंच्या वारशाची वैचारिक मोडतोड होऊ नये म्हणून.’ माधुरी यांनी पहिल्या प्रकरणात आपले पिता अमियानाथ यांच्यावर सुभाषबाबू आणि शरच्चंद्र यांच्यावर असलेला गहिरा प्रभाव व अमिया यांनी आयुष्यभर बोसविचारांची केलेली जपणूक याविषयी कन्येच्या जिव्हाळ्याने लिहिले आहे. आयसीएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लंडनला गेलेले सुभाषबाबू गांधीजींच्या प्रेरणेने १९२१ मध्ये भारतात परततात. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांची मंडालेच्या तुरुंगात रवानगी होते. तिथेच त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील आपल्या विचारांना मूर्त रूप देत ‘पेबल्स ऑन द सी शोअर’ नामक पुस्तक लिहिले. हा प्रवास ‘द रोड टू मंडाले’ या प्रकरणात समाविष्ट करण्यात आला आहे. भारतातील सध्याच्या असहिष्णुता पर्वाच्या पाश्र्वभूमीवर या प्रकरणातील त्यांची भारतीय राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्तीवरील मते जाणून घेणे औत्सुक्याचे ठरेल. ते म्हणतात, ‘‘माझ्यासाठी पुरीच्या जगन्नाथाचे मंदिर आणि ताजमहाल समान अभिमानाचे विषय आहेत. भारतातील विविध धर्मीयांचे झगडे एखाद्या कुटुंबातील भांडणाप्रमाणेच आहेत. प्रौढ समजूतदारपणाने ते संपुष्टात येतील. सहिष्णुता हे बालवयाचे लक्षण नाही. बालके नेहमीच भांडतात. आपला देश सध्या अशा बाल्यावस्थेत आहे. पण एक दिवस असा येईल की, रोमन कॅथॉलिक व प्रोटेस्टंट पंथीयांप्रमाणे िहदू-मुस्लीमदेखील आपापसातील सर्व झगडे मिटवतील.’’ परंतु भारतीय समाजमनाच्या पौगंडावस्थेचा काळ अंमळ जास्तच असावा, असेच सध्याचे चित्र आहे. सुभाषबाबू हयात असते, तर स्वातंत्र्याच्या पासष्टीनंतरही देशातील िहदू-मुस्लिमांचे ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’वाले वर्तन पाहून दु:खी झाले असते.
१९२० मध्ये काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात गांधीजींनी पूर्ण स्वराज्याची साद दिली. त्यानंतर त्यांच्या असहकार चळवळीनेही गती पकडली. ब्रिटिशांची पाचावर धारण बसविणाऱ्या या चळवळीला विराम देण्याचा निर्णय चौरीचौरा प्रकरणानंतर त्यांनी घेतला. गांधीजींच्या या निर्णयामुळे बोस बंधूंसह इतर राष्ट्रवादी विचारांचे नेते संतापले. चळवळीला जनतेचा प्रतिसाद लाभत असतानाच चौरीचौरासारख्या एखाद्या उदाहरणामुळे संपूर्ण देशभरात ऐन बहरात आलेली चळवळ थांबविण्यापाठीमागचा निर्णय अनाकलनीय होता, अशा शब्दांत सुभाषबाबूंनी ‘द इंडियन स्ट्रगल’ या पुस्तकात आपली नाराजी व्यक्त केली. पण ते काँग्रेसचे काम करीत राहिले. त्याचा लेखाजोखा स्वराज्याच्या मागणीला वाहिलेल्या तिसऱ्या प्रकरणातून समोर येतो. चौथ्या प्रकरणात बोस यांची जहालवादी विचारसरणी आणि गांधीजींचा अिहसावाद यांच्यातील सद्धान्तिक मतभेदांचा आढावा घेण्यात आला आहे. १९३८ मध्ये बोस हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष बनतात. समाजवादी भारताचे स्वप्न रंगविणाऱ्या बोस यांनीच या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून नियोजन आयोगाची संकल्पना मांडली होती व त्या संदर्भात बनविण्यात आलेल्या पहिल्या समितीचे अध्यक्ष बनण्यासाठी पंडित नेहरूंना राजी केले होते. असे असले तरी गांधींचा शब्द प्रमाण मानणारी काँग्रेस व बोस यांच्यातील मतभेदांची दरी वाढू लागली होती. दुसऱ्या महायुद्धाची चाहूल लागल्यानंतर बोस यांनी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने ब्रिटिशांविरोधात पूर्णशक्तीने उतरण्याचे भारतीय जनतेला आवाहन केले. गांधीजी व नेहरूंची मते यास अनुकूल नव्हती. पण काँग्रेसमधील सुभाषबाबूंची लोकप्रियता एवढी होती की, १९३९ मध्ये गांधीजींची पसंती असलेल्या डॉ. पट्टाभी सीतारामय्या यांचा दणदणीत पराभव करून ते पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.
अखेरच्या दोन प्रकरणांत माधुरी यांनी आपले आजोबा शरच्चंद्र यांच्या स्वातंत्र्यलढय़ातील कार्याबद्दल लिहिले आहे. भारताची, विशेषत: पूर्व बंगालची फाळणी टळावी, यासाठी शरच्चंद्र यांनी अथक प्रयत्न केले. धार्मिक आधारावर झालेली पूर्व बंगालची फाळणी टिकणार नाही, याचा त्यांनी अगोदरच इशारा दिला होता. बांगलादेशच्या निर्मितीने त्यांचे म्हणणे खरे ठरले.
बोसबंधूंची भारतीय स्वातंत्र्याप्रतीची आस्था, सुभाषबाबूंनी युरोप आणि जपानमध्ये जाऊन भारतीय स्वातंत्र्यलढय़ाकरिता मदत मिळविण्यासाठी केलेली खटपट, आझाद िहद सेनेच्या माध्यमातून त्यांना मिळालेले यश.. याभोवती केंद्रित असलेले हे पुस्तक बोस कुटुंबीयांच्या महान परंपरेचा प्रेरक दस्तावेज आहे.

द बोस ब्रदर्स अँड इंडियन इंडिपेंडन्स, अ‍ॅन इन्सायडर्स अकाउंट
लेखिका : प्रा. माधुरी बोस
प्रकाशक : सेज इंडिया
पृष्ठे : २९६ , किंमत : ७५० रुपये

 

अजित वायकर