सरत्या वर्षांत लोकसत्ता बुकमार्कपानावरून अनेक वाचनीय पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचली, त्यांची ही पुनर्भेट..   बेस्टसेलरकिंवा टॉप टेनयाद्यांवर तुमच्याप्रमाणेच आमचाही विश्वास नाही, हे खरं.. पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला काय हरकत आहे? म्हणूनच, ‘बुकमार्कनं निवडलेली आणि काळ पुढे सरकत राहिला तरीही जी स्मरणात उरतील, संग्रही राहातील अशीच पुस्तकं इथं आहेत..

प्रायोगिकचा मौखिक इतिहास!

curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

प्रायोगिक नाटकांची देशभरातील ती महत्त्वाची केंद्रे आहेत, त्यातील मुंबई हे कदाचित सर्वात महत्त्वाचे. येथील प्रायोगिक नाटकांची परंपरा उलगडून दाखवणारे ‘द सीन्स वुई मेड -अ‍ॅन ओरल हिस्टरी ऑफ एक्सपेरिमेंटल थिएटर इन मुंबई’ या शीर्षकाचे पुस्तक यंदा प्रकाशित झाले. शांता गोखले यांनी त्याचे संपादन केलेले आहे. बुकमार्कच्या वाचकांना आठवत असेल, या पुस्तकाचा नाटककार मकरंद साठे यांनी (५ मार्चच्या अंकात) करून दिलेला परिचय. भुलाभाई देसाई मेमोरियल इन्स्टिटय़ूट, वालचंद टेरेस आणि छबिलदास शाळा ही मुंबईतील तीन नाटय़सादरीकरणाची अवकाशे. नव्वदनंतरच्या काळात असे अवकाश कमी होत गेले, पण या तीन ठिकाणी त्याआधीच्या काळात झालेल्या नाटकांनी नाटय़सृजनाची एक चळवळच उभी केली होती. या सुमारे तीन दशके सुरू राहिलेल्या प्रायोगिक चळवळीचा मौखिक इतिहास हे पुस्तक आपल्यासमोर मांडते. आजच्या काळाचा विचार करता आधीच्या पिढीने त्यांच्या काळाला दिलेला प्रतिसाद या पुस्तकातून समजून घेता येईलच, त्याशिवाय मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासाचा दस्तऐवज म्हणूनही त्याचे महत्त्व उरतेच!

  • पुस्तक – ‘द सीन्स वुई मेड -अ‍ॅन ओरल हिस्टरी ऑफ एक्सपेरिमेंटल थिएटर इन मुंबई’
  • संपादन – शांता गोखले

 

नेहरू काळातील उद्योग-स्नेह

उद्योगपती आणि राजकारणी यांचे संबंध हा तसा नेहमीच चर्चेचा विषय (आणि सध्या तर अधिक ताजा). स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांत तर उद्योगपतींशी, पर्यायाने भांडवलशाहीशी जवळीक म्हणजे टीकेला आवतन अशी परिस्थिती. तो काळ जवाहरलाल नेहरू यांचा. समाजवादी धोरणांचे नेहरूयुग म्हणून या काळाचा उल्लेख केला जातो. परंतु या काळातच उद्योगपतींची एक फळी काँग्रेस पक्षाशी कशी जोडलेली होती, हे दाखवून देणारे नासिर तय्यबजी यांचे ‘फोर्जिग कॅपिटलॅजिम इन नेहरूज इंडिया’ हे पुस्तक यंदा प्रकाशित झाले. जुनीच माहिती पण आकर्षक शैलीतील मांडणी ही या पुस्तकाची जमेची बाजू. उदारीकरणापूर्वीच्या आणि समाजवादाकडे कललेल्या अर्थव्यवस्थेतही उद्योगस्नेही धोरणे कशी घेतली जात होती, याचा धावता आढावा हे पुस्तक घेत जाते. उदारीकरणाच्या पाव शतकानंतरच्या वाचकाला त्याआधीच्या काळात स्वत:च्या काळाचे प्रतिबिंब यातून दिसले तर ते या पुस्तकाचे यश!

  • पुस्तक – ‘फोर्जिग कॅपिटॅलिझम इन नेहरूज इंडिया’
  • लेखक – नासिर तय्यबजी

 

आर्थिक चढउतारांचा वेध

राजकीय निर्णय आणि त्याचा आर्थिक धोरणांवर होणारा परिणाम यांची शहानिशा करणारे ‘द राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ नेशन’ हे रुचिर शर्मा यांचे पुस्तक. जगभरातील विविध देशांच्या आर्थिक धोरणांमधील चढउतारांची माहिती देणारे. ज्येष्ठ संपादक गोविंद तळवलकर यांनी १७ सप्टेंबरच्या अंकात या पुस्तकाची ओळख करून दिलेली. ‘काही देश वा देशांचे संघ आर्थिक प्रगती जोमदारपणे करीत असल्यामुळे प्रगतीचा वेग दीर्घकाळ टिकण्याची अनेकांना खात्री वाटू लागते आणि आर्थिक विषयाचे तज्ज्ञ तशी भाकिते करू लागतात, पण मध्येच काही तरी असे घडते की सर्व गाडे उलटय़ा दिशेने फिरू लागते..’ अशा शब्दांत या लेखाची सुरुवात होते. हे ‘मध्येच काही तरी घडणे’ जे आहे, त्याचाच वेध रुचिर शर्मा घेतात. सध्याची निश्चलनीकरणाची चर्चा या पुस्तकात येणं शक्यच नव्हतं, पण ते आर्थिक धोरणांमागील राजकीय निर्णयांकडे सजगपणे पाहण्याची दृष्टी नक्कीच देतं.

  • पुस्तक – ‘द राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ नेशन’
  • लेखक – रुचिर शर्मा

 

द सेलआउटचे बुकरयश

बुकमार्कमधील बुकरायण ही लेखमालिका बुकर पुरस्कारासाठीच्या अंतिम यादीतील कादंबऱ्यांची ओळख करून देणारी. त्यातून पंकज भोसले यांनी पाच कादंबऱ्यांचा परिचय आपल्याला करून दिला. त्यातील ‘द सेलआउट’ या पॉल बेट्टी यांच्या कादंबरीने यंदाचा बुकर पुरस्कार पटकावला. अमेरिकेतील सत्तरच्या दशकानंतरच्या पॉप्युलर कल्चर, राजकीय-सामाजिक चळवळींचा वेध घेत ही कादंबरी वंशजाणिवांचे तटस्थपणे विडंबन करीत जाते. ठिकठिकाणी तत्त्वज्ञान, चित्रपट, साहित्य यांचे संदर्भ पेरीत लेखक अमेरिकेतील श्वेतवर्णीयांबरोबर कृष्णवर्णीयांमधील दांभिकताही समोर आणतो. ‘उत्तरआधुनिक अमेरिकेतील उत्तरआधुनिक वांशिकतेचा शोध’ असे काहीसे वर्णन या कादंबरीचे केले गेले आहे. यंदाच्या बुकरयशाने या कादंबरीला महत्त्व तर आलेच आहे, पण त्याहीपेक्षा एकसुरीपणाला दूर सारून साहित्याला जीवनवास्तवाकडे पाहायला लावणारी कादंबरी म्हणून तिचे यश अधिक आहे.

  • पुस्तक – ‘द सेलआउट’
  • लेखक – पॉल बेट्टी

 

अमिताव घोष यांचे नॉनफिक्शन

अमिताव घोष हे कादंबरीकार असले तरी ‘अभ्यास’ हा त्यांच्या लेखनातील ठळक दिसणारा गुण. हे त्यांच्या कादंबऱ्यांमधून जाणवतेच. पण यंदा त्यांचे एक नॉनफिक्शन पुस्तक आले. त्याची बरीच चर्चा वर्षभर झाली. यंदाच्या टाटा साहित्य महोत्सवातही त्याचा गाजावाजा झाला. असो. तर घोष यांचे ते पुस्तक आहे – ‘द ग्रेट डिरेंजमेट’. पर्यावरणप्रश्नांची चर्चा करणारे हे पुस्तक असले तरी या विषयावरील रूढ पुस्तकांपेक्षा ते निराळे आहे. ‘स्टोरीज’, ‘हिस्टरी’ आणि ‘पॉलिटिक्स’ अशा तीन दीर्घ निबंधात ते विभागलेले आहे. हे निबंध म्हणजे त्यांनी शिकागो विद्यापीठात दिलेली व्याख्याने. पर्यावरणाच्या समस्यांचे आज जे स्वरूप आहे, ते तसे का याचा वेध ते यातून घेतात. त्यासाठी इतिहास, त्यातही वसाहतवाद व महायुद्धकालीन इतिहास आणि राजकारणाचे संदर्भ ते देतात. ‘प्रगती’ या संकल्पनेचे विवेचन करून तिचा अन्वयार्थ लावण्यात झालेली चूक ते दाखवून देतात. पर्यावरणरक्षणासाठी जगभरातील सामूहिक प्रयत्नांबद्दल सहमतीचे वातावरण यंदाच्या काही घटनांनी तयार केले आहेच, अशा वेळी घोष यांचे हे पुस्तक महत्त्वाचे ठरते.

  • पुस्तक – ‘द ग्रेट डिरेंजमेट’
  • लेखक – अमिताव घोष

 

कासव जिंकणार का?

ससा आणि कासव यांची गोष्ट भारतीयांना माहीत असतेच. त्यात संथ सुरुवात करूनही कासव चिकाटीच्या बळावर सशाला मागे टाकत विजयी होते हेही सर्वानाच माहीत आहे. या कथेच्या तात्पर्य ध्यानात घेऊन ज्येष्ठ पत्रकार टी. एन. नायनन यांनीही त्यांच्या पुस्तकात भारताला ‘कासवा’ची उपमा दिली आहे. ‘द टर्न ऑफ टॉरटॉइज’ हे त्यांचे पुस्तक. आतापर्यंत कासवगतीने प्रवास करीत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला ससा-कासवाच्या गोष्टीतल्याप्रमाणे जिंकण्याची संधी कशी उपलब्ध झाली आहे, ते नायनन दाखवून देतात. जगभरातील सर्व आघाडीच्या अर्थव्यवस्था थकल्या-भागल्या असताना भारतासमोर वाढलेल्या शक्यतांची ते या पुस्तकात चर्चा करतात. अतिरंजिततेच्या आहारी न जाता वास्तव स्तिथीत आपल्यासमोरची आव्हाने कोणती आणि निर्माण झालेल्या संधी कोणत्या यांचा वेध ते घेतातच, पण येत्या काळात भारताला गाठता येऊ शकणाऱ्या माफक आर्थिक लक्ष्यांची मांडणीही करतात. आणि हे सर्व तितक्याच वस्तुनिष्ठपणे. आर्थिक विकासाकडे सामाजिक व राजकीय परिप्रेक्ष्यातून हे पुस्तक पाहत असले तरी समजून घ्यायला सोप्या लेखनशैलीमुळे ते वाचनीयही झाले आहे.

  • पुस्तक – ‘द टर्न ऑफ द टॉरटॉइज’
  • लेखक – टी. एन. नायनन