रॉयटर्स या वृत्तसंस्थेत वृत्तसंपादनाचा दीर्घ अनुभव असलेल्या मेरी गॅब्रिएल हे जागतिक पत्रकारितेतील महत्त्वाचे नाव. ‘लव्ह अ्रण्ड कॅपिटल’ हा त्यांचा कार्ल मार्क्‍स आणि त्यांच्या कुटुंबीयांवर लिहिला गेलेला महत्त्वाचा चरित्रग्रंथ. लेखिकेच्या मते, ‘मार्क्‍सच्या मृत्यूनंतर लगेच त्याचे अनुयायी मार्क्‍सला मसीहा करण्याच्या मागे लागले’! त्याच्या (वैयक्तिक) आयुष्यातील महत्त्वाचे संदर्भ दडून राहतील याची काळजी घेण्यात आलेली आहे. अशा स्थितीत विश्वसनीय पुराव्यांच्या आधारे, आठ वर्षांच्या दीर्घ अभ्यासानंतर लेखिकेने या चरित्रग्रंथाची निर्मिती केली आहे. मार्क्‍स आणि त्याच्या कुटुंबीयांसोबतच ‘कॅपिटल’च्या निर्मितीचा संघर्षपट नेमकेपणाने उलगडणारा हा चरित्रग्रंथ म्हणूनच मार्क्‍सवर लिहिलेल्या हजारभर चरित्रग्रंथापेक्षा पूर्णत वेगळा ठरतो.

स्वप्नाळू वयात एकत्र आलेल्या कार्ल आणि जेनी या प्रेमी युगुलाला आयुष्यभर संघर्ष करावाच लागला. तो एकाच वेळी वैचारिक होता तसाच वैयक्तिक पातळीवरही होता. वैयक्तिक आयुष्यातील भयाण दु:खावर मात करत सर्वहारांसाठी मार्क्‍सने दिलेले योगदान म्हणूनच अचंबित करून टाकते. मार्क्‍स कुटुंबीय आणि त्यांनी जगलेल्या क्रांतिकारी काळाचा अतिशय नावीन्यपूर्ण पद्धतीने एकाच वेळी घेतलेला आढावा या चरित्रग्रंथात वाचायला मिळतो.

तरुण मार्क्‍सच्या मते जेनी ही त्या शहरातील सर्वात सुंदर स्त्री होती; तर तिच्या मते तो सर्वात बुद्धिमान पुरुष. स्वप्नाळू काळात एकत्र आलेल्या या प्रेमी युगुलाला लग्नासाठी मात्र सात वर्षे वाट पाहावी लागली. या प्रतीक्षेच्या काळातील या दोघांच्या आणाभाका आणि लिहिलेली प्रेमपत्रे निभ्रेळ मानवी भावनेचा अत्युच्च आविष्कार आहेत. हे प्रेम आयुष्यभर टिकून राहिले. समाजवादासाठी आवश्यक असलेल्या क्रांतीची बीजे कार्ल मार्क्‍सच्या घरात जन्माला येत असताना जेनीसह संपूर्ण कुटुंबाची मात्र प्रचंड होरपळ झाली. अतिशय हलाखीत जगावे लागले. त्यात जेनीचा संघर्ष हा प्रचंड मोठा होता. कार्ल मार्क्‍सने लिहिलेला प्रत्येक शब्द ओढग्रस्त आयुष्यातही तिने जिवापाड जपलेला दिसून येतो. कुटुंब चालविण्यासाठी तिला नेहमीच आर्थिक ताणतणावांना सामोरे जावे लागले. कुटुंबीयातील आप्तेष्टांचे अकाली मृत्यू पचवावे लागले. म्हणूनच आयुष्यभर कार्ल मार्क्‍सला खंबीर साथ देणाऱ्या जेनीच्या प्रेमाला आणि ‘कॅपिटल’मधून निर्माण होऊ पाहणाऱ्या क्रांतिकाळाला महत्त्व देऊन मेरी गॅब्रिएल यांनी ‘लव्ह अ‍ॅण्ड कॅपिटल’ची निर्मिती केली आहे. मार्क्‍स आणि त्याची विचारधारा गेली दोन शतकांतील सर्वात चíचला गेलेला विषय. शास्त्रीय समाजवादाचे वैचारिक हत्यार मार्क्‍सने सर्वहारा वर्गाला दिले. त्यातून एका महान क्रांतीची सुरुवात झाली. क्रांतीला आर्थिक पाया तत्त्वज्ञानाची जोड देण्यासाठी ‘दास कॅपिटल’च्या निर्मितीत त्याने सर्वस्व पणाला लावले. सर्वहारा वर्गाकडे शृंखलांशिवाय गमावण्यासाठीचे काहीच नव्हते पण मार्क्‍स आणि त्याच्या विचारांसाठी जेनी आणि कुटुंबीयांना तसेच फ्रेडरिक एंगल्स या मित्रालाही ऐहिक सुखांपासून वंचित राहावे लागले.

मार्क्‍सला वगळून जगाचा मानवी इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. कार्ल मार्क्‍सची अनेक महत्त्वपूर्ण चरित्रे अलीकडे प्रकाशित झाली आहेत. मार्क्‍सच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या नजरेतून या चरित्रग्रंथाची मांडणी झाली असल्याने, त्यातून दिसणारा मार्क्‍स अन्य चरित्रांपेक्षा पूर्णत वेगळा आहे. ‘दास कॅपिटल’च्या पांडित्याच्या पलीकडे जाऊन कुटुंबवत्सल आणि संवेदनशील मार्क्‍स वाचकांसमोर मांडण्यात लेखिका पूर्णत यशस्वी झाली आहे. कविता लिहिणारा मार्क्‍स, आपल्या प्रियतमेच्या विरहाने व्याकूळ झालेला प्रियकर मार्क्‍स, शिक्षणासाठी बाहेर असताना वडिलांशी हृदयसंवाद साधणारा मार्क्‍स अशी कार्ल मार्क्‍सची विविध ‘भावनिक’ रूपे वाचकांसाठी निश्चितच नवी ठरतील.

हा चरित्रग्रंथ मार्क्‍स नावाच्या एका ध्येयवेडय़ा कुटुंबाचा इतिहास आहे. अति कठीण काळातही या कुटुंबासोबत निष्ठेने जगणाऱ्या एंगल्स नावाच्या मित्राचीदेखील ही कहाणी आहे. याला मानवीय आणि भावनिक मांडणीची जोड आहे. या चरित्रग्रंथातील जेनी आणि मार्क्‍स कुटुंबीयांच्या कष्टप्रद आयुष्यातील अनेक घटना वाचकांना अक्षरश अस्वस्थ करून सोडतात. बíलनला शिकत असताना मार्क्‍सने त्याच्या वडिलांना पाठवलेल्या एकमेव पत्रात त्याच्यासमोर उपलब्ध झालेल्या मुक्त जगाविषयी तो भरभरून बोलतो. अगदी त्याच वेळी जेनीसोबतच्या नात्यातल्या चढउताराविषयी तो लिहितो. जेनीच्या विरहातून कवितेकडे वळालेल्या मार्क्‍सने त्या काळात ‘द बुक ऑफ लव्ह’ या नावाने दोन आणि ‘द बुक ऑफ साँग’ असे कवितेचे तीन खंड लिहून काढल्याचे लेखिका नोंदवते. या कवितेतून जेनी विषयाच्या भावना प्रियातुर मार्क्‍सने व्यक्त केल्या आणि त्या जेनीपर्यंत पोहोचविल्याही. त्यानंतर काही काळातच वयाने चार वर्षांनी मोठय़ा असलेल्या जेनीशी, मार्क्‍स सन १८४३ मध्ये विवाहबद्ध झाला. लग्नानंतर पॅरिसला गेलेल्या कार्ल मार्क्‍सच्या वैचारिक जडणघडणीचा हाच काळ होता. एकंदरीत वैवाहिक आयुष्यासोबत जेनी ही मार्क्‍सच्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यातही अखेपर्यंत सहचारिणी राहिली आहे.

या चरित्रग्रंथातून साकारलेले मार्क्‍स कुटुंबीय आणि त्यांची एकमेकांप्रति असलेली आत्मीयता थक्क करून सोडणारी आहे. भयाण आर्थिक ताण आणि जीवघेणे आजार सोबतीला असतानाही हे कुटुंब आपल्या ध्येयापासून तसूभरही ढळलेले दिसत नाही. कुटुंबातील प्रत्येक माणूस मार्क्‍स आणि त्याच्या विचारधारेला बांधील असलेला पाहायला मिळतो. या कुटुंबीयांना अनेक वेळा लहानग्यांच्या मृत्यूला सामोरे जावे लागले. रात्री मार्क्‍सच्या पुढय़ात झोपलेल्या आठ वर्षांच्या एडगरचा झोपेतच मृत्यू ओढवतो हा प्रसंग आणि त्यातून जेनी आणि मार्क्‍सची झालेली दोलायमान अवस्था लेखिकेने अप्रतिम रेखाटलेली आहे. सर्वहारा वर्गाच्या शोषणाच्या मुळाशी असलेला व्यवस्थेचा क्रूर आर्थिक चेहरा ‘वरकड मूल्याच्या सिद्धान्ता’तून अभ्यासपूर्ण मांडणाऱ्या या महामानवाला कुटुंबाच्या अर्थकारणात कधीच सहभागी होता आले नाही. याची झळ आयुष्यभर जेनीला सहन करावी लागली. लेखिकेच्या मते, ‘मार्क्‍ससाठी ‘इकॉनॉमी’ या शब्दाचा संबंध आयुष्यभर फक्त लिहिण्यापुरताच मर्यादित राहिला.’

– या उपहासगर्भ विधानातून मार्क्‍स आणि कुटुंबीयांच्या उपजीविकेतील जेनी मार्क्‍सचे महत्त्व विशद होते. मार्क्‍सच्या जगलेल्या तिन्ही मुलींनी आपली स्वप्ने आणि आयुष्य, पूर्णत त्यांच्या वडिलांच्या विचारांसाठी अर्पण केलेले दिसून येते. जेनी आणि या तीन मुली म्हणजे एकंदरीत मार्क्‍सचे सपूंर्ण कुटुंबच मार्क्‍सवादासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार होते. लेखिकेने नोंदवल्याप्रमाणे या कुटुंबीयांचे विचार करणेच नव्हे तर आयुष्यभर बोलणे- चालणे, खाणे-पिणे या साऱ्यांत मार्क्‍सवाद भरून उरला होता याची सतत जाणीव होत राहते. मार्क्‍सवादाला भेटलेले हे सर्वात कडवे समर्थक पाहिले की, असे विलक्षण कुटुंबीय अपवादानेच कोण्या महापुरुषाच्या आयुष्यात आले असतील, याची जाणीव होते.

सन १८४४च्या दरम्यान मार्क्‍स आणि एंगल्स पहिल्यांदा भेटले तेव्हा ते सलग दहा दिवस आणि तेवढय़ाच रात्री एकमेकांसोबत समाजवादाची चर्चा करत होते. त्यातूनच घट्ट जुळलेल्या वैचारिक नाळेतून १८४८च्या दरम्यान समाजवादी पूर्वसुरींना ‘स्वप्नाळू’ म्हणून मोडीत काढत या मित्रद्वयीने ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ मांडला. समाजवादी विचारांशी बांधील असलेला हा एकेकाळचा कारखानदार आयुष्यभर मार्क्‍स कुटुंबीयांच्या सोबत सावलीसारखा राहिला. आर्थिक मदतीपासून ते आपल्या मित्राच्या विवाहबाह्य़ा संबंधातून झालेल्या मुलाचे पालकत्व स्वीकारण्यापर्यंत अनेक गोष्टी त्याने सहजच स्वीकारल्या. मार्क्‍सच्या मृत्यूनंतर प्रचंड कष्ट घेऊन एंगल्सने ‘कॅपिटल’चे उर्वरित दोन खंड प्रकाशित केले. सुखी आयुष्याला नाकारून सर्वहारा वर्गासाठी आयुष्यभर झटणाऱ्या फ्रेडरिक एंगल्सचे मार्क्‍स आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी असलेले मौलिक योगदान आणि त्याची मार्क्‍सप्रतिची आत्मीयता लेखिकेने समर्थपणे मांडली आहे.

मार्क्‍स १८५१ सालात एंगल्सला सांगतो की, ‘कॅपिटल’साठी त्याला फक्त पाचच आठवडय़ांची गरज आहे. ‘फक्त पाचच आठवडे’ म्हणत लिहायला घेतलेल्या ‘कॅपिटल’ने तब्बल पंधरा वर्षे घेतली. या दीड दशकाच्या काळात ‘कॅपिटल’ आणि मार्क्‍सभोवती फिरणाऱ्या युरोपीय जगाचा आढावा लेखिका समर्थपणे घेते. याच काळात घडणाऱ्या असंख्य घडामोडी, विविध देशांतील क्रांतिकारक आणि त्यांचा मार्क्‍सशी असलेला संबंध लेखिकेने संदर्भासहित मांडला असून हा काळ मार्क्‍सच्या ‘कॅपिटल’सोबतच क्रांतीच्या जन्माचाही होता हे लेखिका पटवून देते.

‘बहुप्रतीक्षित असलेले ‘दास कॅपिटल’ प्रकाशित झाल्यानंतर संपूर्ण जगातून याची दाखल घेतली जाईल.. एका महान क्रांतीसाठीची ही सुरुवात असणार आहे..’ या समजुतीवरच मार्क्‍सचे संपूर्ण कुटुंबीय प्रेरित होते. पण सुरुवातीच्या काळात ‘कॅपिटल’ची दखल युरोपमधील इंटलेक्च्युअल वर्गाने घेतलेली दिसत नाही. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरातील  एका प्रकाशकाने मार्क्‍सकडे कॅपिटलचे रशियन भाषेत भाषांतर करण्याची परवानगी मागितली. १८७२ साली प्रकाशित झालेले हे कॅपिटलचे पाहिले भाषांतर. हा जाडजूड आणि दुबरेध ग्रंथ कोण विकत घेऊन वाचणार, या समजुतीवर झारकालीन रशियातील सेन्सॉरने त्याला परवानगी दिली. पण तीन हजार प्रती  काही महिन्यांतच विकल्या गेल्या. अगदी त्याच दरम्यान फ्रेंच भाषेतील दहा हजार प्रती काही आठवडय़ांतच हातोहात संपल्या. मूळ जर्मन भाषेतून इंग्लिशमध्ये येण्यासाठी मात्र कॅपिटलला १८८७ सालाची वाट पाहावी लागली. कॅपिटलच्या सुरुवातीच्या काळात यातून काही मानधन मिळेल ज्यातून कुटुंबावरील कर्ज आणि गरिबी दोन्हीही दूर होईल, असे मार्क्‍ससहित सर्वच कुटुंबीयांना वाटत होते. पण असे काहीच घडले नाही. कॅपिटलचे मानधन मिळाले; तेव्हा मार्क्‍स किंवा जेनी यापैकी कोणीच जिवंत नव्हते. शेवटच्या काळात जेनीला कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागले. तिच्या मृत्यूच्या अवघे दोन दिवस आधी, कॅपिटलच्या संदर्भात लिहिला गेलेला पहिलावहिला सकारात्मक लेख मार्क्‍स तिला वाचून दाखवतो आणि फक्त वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी ही महान कॉम्रेड जगाचा निरोप घेते. आजारपणाने पूर्णत थकलेला मार्क्‍स तिच्या शोकसभेलाही उपस्थित राहू शकत नाही. तेव्हा मार्क्‍सचा संदेश एंगल्स वाचतो. तो छोटेखानी शोकसंदेश हा जेनी मार्क्‍स आणि तिने मार्क्‍सवादी विचारांसाठी दिलेले योगदान समजून घेण्यासाठी पुरेसा आहे.

मार्क्‍सने वेळोवेळी लिहिलेल्या वर्तमानपत्रातील लेखातून त्याला थोडेफार मानधन मिळत होते. त्या वेळच्या जगातील सर्वाधिक खपाच्या ‘द न्यू यॉर्क डेली ट्रिब्यून’साठी मार्क्‍स १८५२ ते ६१ या काळात लिहीत होते. ‘व्होर्वार्त्स’ हे मुळात जर्मन वृत्तपत्र, पण पॅरिसहून त्याचा पूर्णत निराळा अवतार प्रसिद्ध होई. पॅरिसमध्ये असताना मार्क्‍स या ‘व्होर्वार्त्स’साठी लिहीत होता. पण कालांतराने ‘व्होर्वार्त्स’च्या संपादकाला अटक करण्यात आली तर मार्क्‍सला तो प्रदेश सोडावा लागला. मार्क्‍सचे लेखन हे सुरुवातीपासूनच प्रचंड बंडखोर होते. त्याने ‘सिव्हिल वॉर इन फ्रान्स’ ही पुस्तिका प्रकाशित केली. त्यातील मार्क्‍सचे प्रशियासाठीचे समर्थन पाहून शिकागोपासून ते व्हिएन्नापर्यंत अनेकांनी मार्क्‍सचा उल्लेख ‘रेड टेररिस्ट डॉक्टर’ असा केलेला आहे. यातच सारे सामावले आहे.

प्रचलित चरित्रग्रंथासारखे फक्त सनावळ्या आणि घटनांच्या माध्यमातून आकाराला येणाऱ्या चरित्रमांडणीला पूर्णत फाटा देत लेखिकेने नावीन्यपूर्ण पद्धतीने हा चरित्रग्रंथ साकारला आहे. मार्क्‍स आणि त्याच्या कुटुंबीयांच्या संदर्भातील उत्कृष्ट संशोधन, प्रत्येक प्रकरणाच्या शेवटाला असलेल्या तळटिपा आणि ओघवती मांडणी या मेरी गॅब्रिएल यांच्या मांडणीच्या जमेच्या बाजू आहेत. मार्क्‍स आणि जेनी यांच्या वडिलांपासून- अर्थात प्रशियातून-  सुरू होणारी ही कहाणी पॅरिस व ब्रसेल्स या शहरातील मुक्कामासह लंडनमध्ये स्थिरावते. अनेक शहरांतील स्थलांतरे किंवा हकालपट्टी यांना सामोरे जाणाऱ्या मार्क्‍स कुटुंबीयांची धाडसी वृत्ती अचंबित करणारी आहे. मार्क्‍स कुटुंबीयांना केंद्रस्थानी ठेवत आकाराला आलेल्या या चरित्रग्रंथातील प्रकरणांची विभागणी लेखिकेने मार्क्‍स कुटुंबीयांचे वास्तव्य असलेले शहर आणि त्या वेळेचे वर्ष यातून केली आहे. तब्बल ७५ वर्षांच्या काळात लेखिकेने मार्क्‍सच्या तीन पिढय़ांचा आढावा घेतला आहे. या ग्रंथामधून मार्क्‍सवादाच्या अभ्यासकांना कदाचित मार्क्‍सवादासंदर्भात नव्याने काही मिळणार नाही, पण त्या विचारसरणीची निर्मिती आणि जडणघडण यांसाठी आयुष्य पणाला लावलेल्या अनेक अनाम चेहऱ्यांची निश्चितच नव्याने ओळख होईल. या चरित्रग्रंथातून शोषणविरहित विश्वनिर्मितीच्या कल्पनेसाठी एकोणिसाव्या शतकात भरडून निघालेल्या मार्क्‍सच्या अनेक आप्तांची शोकांतिक आयुष्ये नोंदविली आहेत. क्रांतिकारी विचारवंतासोबतच, प्रेयसीसाठी प्रेमपत्रे लिहिणारा प्रियकर, लहानग्यांसाठीचा कुटुंबवत्सल पिता, एंगल्सचा जिवाभावाचा मित्र अशा अनेक मानवी कंगोऱ्यांतून साकारलेला मार्क्‍स निश्चितच वाचकांच्या पसंतीस उतरेल. मार्क्‍सच्या जन्मद्विशताब्दी वर्षांनिमित्त पाच मे २०१७ ते २०१८ या काळात अनेकपरींचे साहित्य प्रकाशित होत असले, तरी २०१२ सालच्या या पुस्तकाचे स्थान अढळच म्हणावे लागेल.

  • लव्ह अ‍ॅण्ड कॅपिटल : कार्ल अ‍ॅण्ड मार्क्‍स अ‍ॅण्ड द बर्थ ऑफ अ रेव्होल्यूशन
  • लेखिका : मेरी गॅब्रिएल
  • प्रकाशक : लिटल ब्राऊन अ‍ॅण्ड कंपनी
  • पृष्ठे : ७५२, किंमत : ११९९ रु. (ई-आवृत्ती : ३४३ रु.)

सुशीलकुमार शिंदे

sushilkumar10@gmail.com