News Flash

शब्दमीरेचा एकतारी प्रवास..

मॅडेलिन क्रिप्के नावाची १९-२० वर्षांची एक तरुणी मिळेल तो शब्दकोश जमवण्याच्या वेडाने जणू पछाडली होती

मॅडेलिन क्रिप्के

पुण्याच्या ‘नीलकंठ प्रकाशन’ या संस्थेच्या कार्यालयावर १९६० च्या दशकापासून एक पाटी वाचता येई- ‘शब्दकोशातले सगळे शब्द इथे सुंदर होऊन मिळतात’! ती वाचून म्हणे काही अतिचौकस आत्म्यांना प्रश्न पडे- ‘पण नेमका कुठला शब्दकोश? दातेंचा की मोल्सवर्थचा की ह. आ. भावे यांचा?’ – हे तिन्ही मराठी-मराठी शब्दकोश ऐकून माहीत असत; पण १९६० च्या त्या काळात बहुतेकांच्या घरी इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ सांगणारा शब्दकोशच असायचा. अशा त्या काळात (त्या वेळी दूरच्या) अमेरिकेत, मॅडेलिन क्रिप्के नावाची १९-२० वर्षांची एक तरुणी मिळेल तो शब्दकोश जमवण्याच्या वेडाने जणू पछाडली होती. ते वेड कायम राहिले- मृत्यूपर्यंत, मरेपर्यंत, आजीवन, अंतापर्यंत, अखेरच्या क्षणापर्यंत, जन्मभर..

मॅडेलिन क्रिप्के गेल्या, तेव्हा त्यांच्या चारखणी (दोन बेडरूम, किचन, हॉल) घरात २० हजार पुस्तके होती आणि यापैकी बहुतेक सारे शब्दकोशच होते. यात अर्थातच भरपूर वैविध्य होते. जुने आणि नवे, या प्रकाशनाचे आणि त्या प्रकाशनाचे हे झाले साधे फरक. पण आणखीही अनवटपणा या संग्रहात होता. उदाहरणार्थ, एक भिंतच्या भिंत भरेल एवढय़ा मोठय़ा मांडणीवर- म्हणजे शेल्फावर- फक्त बोलीभाषांतल्या किंवा अनौपचारिकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांचेच कोश होते. किंवा गळ्यात पदकासारखे (मेडल नव्हे ‘लॉकेट’सारखे) घालता येईल अशी मधल्या बिजागरामुळे पुस्तकासारखी उघडणारी एक धातूची डबी, तिच्या एका झाकणावर भिंग आणि या डबीच्या आत एक अतिलहान- सूक्ष्मच म्हणावी अशी डिक्शनरी.. डबीतून काढायची आणि डबीच्या अंगच्याच भिंगाने वाचायची.

या मॅडेलिन क्रिप्के कोण, याविषयी विकिपीडियालाही जाग आलेली आहेच, शिवाय मरणोपरांत स्मृतिलेखांतून त्यांच्याविषयीचा आदर आणि आदरांजली-लेखांतून त्यांच्या स्मृती यांनाही जाग येते आहे. त्या कनेक्टिकट नामक संस्थानात सन १९४३ मध्ये जन्मल्या, बालपणापासून पुस्तकांतच रमल्या, त्यांचा भाऊ सॉल क्रिप्के हा तत्त्वज्ञानाचा अभ्यासक, हा तपशील जणू अनिवार्य असल्यासारखा सर्वत्र आढळतोच आहे. पण ‘नॅरेटिव्हली.कॉम’ या फर्मास संकेतस्थळावर डॅनिएल क्रीगर यांनी १९१३ सालीच, म्हणजे मॅडेलिनबाई सत्तरीच्या झाल्या तेव्हा त्यांच्या ‘पेरी स्ट्रीट, वेस्ट व्हिलेज, ग्रीनिच- न्यू यॉर्क’ या पत्त्यावरल्या घरी भरपूर वेळ (की वेळा?) जाऊन, त्यांच्या मुलाखतीवर आधारलेला एक लेख लिहिला आहे. तो मॅडेलिनबाईंच्या दफनानंतर लिहिल्या गेलेल्या साऱ्या लेखांना पुरून उरणारा आहे. डॅनिएल यांना नेमका प्रश्न पडला : शब्दकोशाचा लळा पहिल्यांदा कधी लागला?

‘‘पाचवीत होते मी. वेबस्टर कॉलेजिएट डिक्शनरी मला भेट म्हणून मिळाली तेव्हा!’’ हे त्यावर नेमके उत्तर. अर्थात, शब्दांच्या आणि आशयाच्या नेमकेपणाची समज हे पुढे मॅडेलिन यांच्या चरितार्थाचे साधनही ठरले.. ग्रंथ-संपादनाचे काम त्यांनी वर्षांनुवर्षे केले. त्याआधी अध्यापनक्षेत्रातही उमेदवारी करून पाहिली आणि अधूनमधून पुस्तकविकानांमध्ये चाकऱ्याही केल्या. पण हे सारे करण्याआधी कनेक्टिकटच्या कुठल्याशा कस्ब्यातून नेब्रास्कामार्गे न्यू यॉर्कसारख्या नगरीत येऊन इंग्रजी साहित्य विषयात उच्चशिक्षण घेतले होते ते या भाषेमधल्या शब्दवैभवाच्या प्रेमापायीच, ही खूणगाठ मात्र पक्की होत होती.

वास्तविक शब्दकोशांचा अभ्यास करणे आणि साहित्यकोविद असणे यांचा तसा संबंध नाही. शब्दकोशकार्य आणि शब्दकोशशास्त्र (अनुक्रमे- लेक्सिकोग्राफी आणि लेक्सिकॉलॉजी) या स्वतंत्र शाखाच, व्युत्पत्तिशास्त्र (ईटिमॉलॉजी) ही तर आणखी स्थिरावलेली शाखा. या साऱ्या शाखांचा वृक्ष साहित्याचा नव्हे, भाषाशास्त्राचाच. पण वाचता वाचता मॅडेलिनबाई शब्दकोशविषयक शास्त्रांमधल्या वाचस्पती नक्कीच झाल्या. शब्दकोशकार्यातले मॅडेलिन यांचे आदर्शवत् म्हणजे ‘वेबस्टर्स डिक्शनरी’चे आद्य कर्ते नोहा वेबस्टर (१७५८-१८४३) आणि अ‍ॅलन वॉकर रीड (१९०६- २००२). यापैकी वेबस्टर यांच्यावर तर मॅडेलिन यांची जवळपास भक्तीच. त्या शरणभावातूनच नोहा वेबस्टर यांच्या हिशेबवहीतील पाने, नोहा वेबस्टर यांनी फुंकलेल्या सिगारची पेटी असे काहीबाही मॅडेलिन यांनी जमवले होते. जुनीपानी सिगारपेटी इतकी महत्त्वाची असते हे ज्या कुणाला माहीत नसेल, त्याने ती ‘फुंकून टाकली’.. आणि मॅडेलिनबाईंनी ठेवा समजून जपली! अर्थात, १६९४ सालची ‘लेडीज डिक्शनरी’, १७८५ ची ‘अ क्लासिकल डिक्शनरी ऑफ द व्हल्गर टंग’, १८४० सालचं ‘द लार्क्‍स ऑफ लंडन’ हे लंडनच्या गुंडपुंडांचे चित्रमय शब्दवैभव उलगडणारे पुस्तक.. अशा नाना प्रकारच्या शब्देश्वऱ्या मॅडेलिन यांच्या संग्रहात होत्या. उतारवयात या संग्रहापैकी काही चिजा विकून त्या खर्चही भागवत होत्या.

अ‍ॅलन वॉकर रीड यांनी ‘ओके’ ही दोन इंग्रजी मुळाक्षरे की ‘ओ-के-ए-वाय’ या अक्षरचतुष्टयाचा चतुर उच्चार, हा प्रश्न धसाला लावला होता. त्यांनीच इंग्रजीतला ‘एफ वर्ड’ (जो इथे आम्ही लिहू नये आणि तुम्ही वाचू नये, असा चार अक्षरी शब्द किंवा आख्यायिकेनुसार, ‘फोर्निकेशन अंडर द कन्सेन्ट ऑफ द किंग’चे लघुरूप) देखील अभ्यासला होता. ‘लेक्सिकल एव्हिडन्स फ्रॉम फोक एपिग्राफी इन वेस्टर्न नॉर्थ अमेरिका’ अशा लांबलचक शीर्षकाचा (आणि त्याहून लंब्याचवडय़ा उपशीर्षकाचा) ग्रंथही या अ‍ॅलन वॉकर रीड यांनीच सिद्ध केला. त्यात एका भूभागातली सारी ‘भ’कारी शब्दांची भडास भरभरून भेटते. वरवरच हे पुस्तक वाचले तर ती भंकसबकावली आढळेल, सापडेल, मिळमिळीतपणे ‘मिळेल’.. पण मॅडेलिनबाईंइतक्या शब्दप्रेमी उत्साहाने वाचली, तर.. भेटतेच. ‘‘इतक्या त्याज्य शब्दांचा एवढय़ा प्रमाणावरला अभ्यास क्वचितच आढळेल.. शोधूनही सापडणार नाही’’ या अर्थाचा मॅडेलिनबाईंचे त्यावरील मत महत्त्वाचेच.

या शब्दमीरेचा एकतारी प्रवास अखेर तुटला. एक शब्दकोविद जीव, ‘कोविड-१९’ या आजवर कुठल्याही शब्दकोशांत नसणाऱ्या रोगविषाणूने घेतला.  बुकबातमी एरवी अशी नसते कबूल; पण मॅडेलिन क्रिप्के यांच्याविषयी त्यांच्या निधनानंतर वाचताना, इंग्रजी शब्दवैभवापेक्षा त्या शब्दांच्या अभ्यासाचे वैभव दिपवून टाकणारे ठरते. भाषेतले सारे शब्द समान पातळीवर अभ्यसनीय मानणाऱ्यांचेही कौतुक वाटते.. आणि मॅडेलिन यांच्या निधनाने केवळ दु:ख होत नाही.. ‘लई वंगाळ’सुद्धा वाटते!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 1:26 am

Web Title: madeline kripke doyenne of dictionaries zws 70
Next Stories
1 यशवंतरावांचा मध्यममार्ग
2 वेड आणि विनाश
3 बुकबातमी : मराठी माणसाच्या कर्तेपणाचा इतिहास
Just Now!
X