|| पंकज भोसले

ब्रिटनमधल्या, पण जगभरातील कथात्म साहित्यासाठी खुलं असलेल्या ‘मॅन बुकर इंटरनॅशल प्राइझ’ची चर्चा केवळ साहित्यापुरतीच असते असं नाही. हे भलंथोरलं ५०,००० ब्रिटिश पौंडांचं पारितोषिक यंदा कुणाला, यावर लागणाऱ्या सट्टय़ाचीही चर्चा होते. पण साहित्यातले नवे प्रवाह, अनवट कथावस्तू ‘बुकर’च्या निमित्ताने चर्चेत येतात. हे पारितोषिक यंदा ५० व्या; तर मराठीत त्याची चर्चा अधिक सशक्त व्हावी म्हणून सुरू झालेलं ‘बुकरायण’ हे नैमित्तिक सदर तिसऱ्या वर्षांत पदार्पण करीत आहे! यंदाची ‘बुकर’ लघुयादी २० सप्टेंबरला जाहीर होईल, त्याआधीचा हा प्रस्तावना लेख..

सांप्रतकालीन वाचनोत्कट समाजाची देशी अन् जागतिक परिस्थिती फार गमतीशीर आहे. म्हणजे एकीकडे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्यासारखी सर्व देशांच्या सीमा भेदणारी मनोरंजक, मनोत्तेजक आणि मनोकर्षक वैचारिक साप्ताहिक-मासिके आर्थिक कणा मोडत चालल्याने अस्ताकडे झुकत आहेत. गेल्या शतकापासून वाचकांची नवी पिढी उभारणाऱ्या या मूलभूत यंत्रणांना मायाजाल व समाजमाध्यमांच्या चरक्यातून निघून आपला उरलासुरला वाचक टिकवण्यासाठी धडपड करावी लागत आहे अन् त्याच इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर वाचनचर्चेचे बेसुमार पीक उफाळले आहे.

ब्लॉग्ज-फोरम्स आणि ऑनलाइन जर्नल्सवर लेखनाचा मृगनक्षत्री सडा धो-धो कोसळतोय, वर आपल्या वाचनाची लाभदायी चर्चा करण्याऐवजी निव्वळ घेतलेली पुस्तके/आवडणारा लेखक/ वाचत असलेले पुस्तक वा भविष्यात वाचणार असलेल्या पुस्तकांची छायाचित्रे फेसबुकावर झळकावून आपली वाचन‘चेष्टा’ जगासमोर सतत उघड केली जातेय. हा ‘ग्रंथ फोटोत्साही’ संप्रदाय गेल्या दोनेक वर्षांपासून फोफावतोय. ‘पुस्तकांवरची पुस्तके’ या ग्रंथप्रकाराला जगातील सर्वच भाषांत चांगले दिवस आले आहेत. या ग्रंथांना ‘साहित्यावर प्रगटायचा क्रॅशकोर्स’ समजून त्यातील ‘पदवीधर’ वाचक अवजड नावांच्या लेखकांची यादी सार्वजनिक भिंतींवर रंगवण्यात धन्यता मानत आहेत. नगरा-नगरांत आणि छोटय़ा शहरगावांत चार-पाच वर्षांपासून शंभर रुपये किलोच्या ग्रंथप्रदर्शनांतून बास्केटा भरभरून लोकप्रिय आणि अभिजात आंतरराष्ट्रीय पुस्तकांची खरेदी होत आहे. घरांतील फडताळे आणि दोनेक वर्षांनी न वाचताच टाकून दिल्याने रद्दीची दुकानेही त्या पुस्तकांनी दुथडी वाहत आहेत. वर्षभरात कित्येक लिटफेस्ट, ग्रंथ(गाव)गप्पा, पुस्तक-नॉस्टाल्जिया पार्टी आणि ग्रंथोत्सवाच्या इतक्या घडामोडी होत असताना, चोखंदळ वाचनाची प्रक्रिया मात्र अस्पष्ट स्वरूपातच दिसते.

या धर्तीवर वर्षभरात जगातील बहुतांश देशांतील कथनात्मक इंग्रजी पुस्तकांतून निवडल्या जाणाऱ्या ‘बुकर’ पुरस्कारासाठीच्या लांबोडक्या यादीचे आगमन आश्वासक ठरते. कारण तिच्या आगमनानंतर सर्वच पातळ्यांवर ही पुस्तके हस्तगत करण्यासाठी आपल्या देशातील शहरांतही चुरस लागते. या वर्षी पाच जणांच्या परीक्षक समितीने तब्बल १७१ पुस्तकांशी वाचनसामना करताना वर्षभरात पाठदुखी, मानदुखी आणि डोळेदुखीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत १३ भिन्न प्रवृत्ती आणि प्रकृतीच्या कादंबऱ्या निवडल्या. पाच ब्रिटिश, तीन अमेरिकी, तीन आयरिश आणि दोन कॅनडामधील लेखकांमध्ये यंदा पुरस्कारासाठी चुरस असेल. यापैकी एक पूर्वाश्रमीचा पारितोषिक विजेता लेखक आहे, तर काही पहिल्याच कादंबरीद्वारे साहित्यप्रांतात उगवलेले नवलेखक आहेत.

परीक्षक मंडळाची आवड..

आफ्रिकी वंशाचे ब्रिटिश तत्त्वज्ञ लेखक-कादंबरीकार क्वामी अ‍ॅन्थनी अपिआ यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षक समिती गेले वर्षभरापासून ग्रंथ घुसळण करीत होती. स्कॉटिश गुन्हेकथा लेखिका वाल मॅक्डरमिड, कला-संस्कृती समीक्षक लिओ रॉबसन, तीनेक वर्षांपूर्वी ‘हर’ या चित्रपटात मानवी काखेला विलक्षण कामासाठी वापरताना दाखविणारे कार्टून काढून आणखी लोकप्रिय झालेली ग्राफिक नॉव्हेलिस्ट लिआन शॅप्टन आणि स्त्रीवादी लेखिका जॅकलिन रोझ.. अशा राबत्या व झळकत्या परीक्षकांनी आपापल्या आवडीला यादीत स्थान दिले आहे. यंदाच्या यादीत खूपविक्या गुन्हे कादंबरीकार बेलिन्दा बावर यांच्या ‘स्नॅप’ला आणि पहिल्यांदाच ग्राफिक नॉव्हेलला (निक डनासो लिखित ‘सॅबरीना’) स्थान मिळाल्याने याच दोन पुस्तकांनी यादी आगमनानंतर पहिल्याच आठवडय़ात बातम्यांचे विषय पटकावले. आता पुढील आठवडय़ात येणाऱ्या अंतिम सहाच्या मानांकनात ही दोन पुस्तके वा आणखी कोणत्या कादंबऱ्या असतील, याबाबतचे कुतूहलढग गडद झाले आहेत. दरवर्षी लघुयादी जाहीर होताच युरोपभर विजेत्यावरच्या सट्टेबाजीला ऊत येतो आणि त्या सट्टेबाजीची किंमत पुरस्काराच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या रकमेहून अधिक भरते. साहित्यात रुची असलेला किंवा नसलेला मोठा वर्ग त्यामुळे या पुरस्काराच्या कक्षेत दाखल होतो.

आपल्याकडचा उत्साह..

गेली दोनेक दशके आपल्या माध्यमांनी सिनेमांच्या ‘ऑस्कर’, संगीताच्या ‘ग्रॅमी’ आणि पुस्तकांच्या ‘बुकर’ पुरस्काराला समसमान न्यायाने जागावाटप केली. हब, टोरंट्स आणि डाटा संस्कृतीची आजची उपभोक्ती आणि लाभती पिढी या घटकांची नवी ग्राहक बनली.

बुकरची लांबडी यादी घोषित झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या पुस्तकांची ‘अ‍ॅमेझॉन’वरून मागणी तर झालीच, शिवाय मुंबईतल्या पुस्तकालयांमधून ती हातोहात खपू लागल्याचेही चित्र दिसू लागले आहे. यंदा लांबोडक्या यादीतील सर्वच पुस्तके मुंबईतील ‘वेवर्ड अ‍ॅण्ड वाइज’ या दुकानात आली. गंमत म्हणजे त्यातील ‘सॅबरीना’ या ग्राफिक नॉव्हेलच्या प्रती दोन वेळा संपून सध्या अनेक ग्राहकांनी या पुस्तकाची आगाऊ नोंदणी केल्याचे वृत्त आहे. भारतीय चलनात एकोणीसशे रुपये फक्त मोजूनही या आठवडय़ात हे पुस्तक विक्रीसाठी दुकानांत मुंबईतील वाचकांना उपलब्ध नाही. (ऑनलाइन मागवल्यास, डिलिव्हरी डेट्सही आठवडा ते दहा दिवस पुढल्या सांगितल्या जात आहेत.) एकच महिन्याने यातील बहुतांश पुस्तके आणि विजेती कादंबरी रस्त्यावरच्या बेस्टसेलर्स पंगतीत रमणार असली, तरी सध्या दुसरीकडे इंटरनेटवर टोरंट्सचे ‘अधोविश्व’ वा अधोजाल या पुस्तकांची देवघेव करण्यास सज्ज होते आहे. यातली अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे, दीर्घ यादी जाहीर झाल्यानंतरच्या चोवीस तासांच्या आत या पर्यायी यंत्रणेमध्ये तेरापैकी आठ पुस्तके दाखल झाली होती! सध्या गाय गुणरत्ने या श्रीलंकन-ब्रिटिश लेखकाच्या ‘इन अवर मॅड अ‍ॅण्ड फ्युरिअस सिटी’ या एका पुस्तकाच्या स्वागतार्थ ही अधोजालातली मंडळी नेट लावून बसली आहेत.

यंदा विजेता कोण?

बहुचर्चित ‘सॅबरीना’ या निक डनासोच्या दुसऱ्या पुस्तकातही अमेरिकेतील दोन दशकांतील ढासळत्या मूल्यांचे चित्रकथन आहे. यापूर्वी त्याच्या ‘बेव्हर्ली’ने फक्त ग्राफिक नॉव्हेल चाहत्यांमध्ये स्थान मिळविले होते. बुकरच्या दीर्घ यादीत स्थान मिळाल्यानंतर या चित्रकादंबरीकाराचा सध्या बोलबाला होत आहे. रिचर्ड पॉवर्स हा अमेरिकी लेखक जणू आपल्या आडनावाला जागून भले-थोरले पुस्तक लिहितो! यंदा त्याची आकाराने आणि पानांनीही मोठी असलेली ‘द ओव्हरस्टोरी’ कादंबरी निसर्गावर मानवाच्या कुरघोडीची कथा मांडते. तिसरी रेचल कुशनेरच्या ‘द मार्स रूम’ या अमेरिकी महिला तुरुंगावरील वास्तववादी कादंबरीने ‘गुडरीड्स’पासून ‘न्यू यॉर्क टाइम्स’, ‘अमेझॉन बुक ऑफ द मंथ’मधून लक्ष वेधून मोठा वाचकवर्ग मिळविला आहे; परंतु गेली काही वर्षे सलग अमेरिकेकडे जाणारा पुरस्कार यंदा ब्रिटन, आर्यलड वा कॅनडातील लेखकांना मिळेल असाही एक अंदाज व्यक्त होत आहे. सॅली रूनी या अतितरुण आयरिश लेखिकेची ‘नॉर्मल पीपल’ ही दुसरी कादंबरी ‘बीबीसी’ने टीव्ही सीरिजसाठी निवडली आहे. लघुयादीत दाखल होण्याआधीच ही छोटुकली प्रेमकथा त्यामुळे चर्चेत आली आहे. बेलिन्दा बावरच्या गुन्हे कादंबरीला एका पूर्वाश्रमी घडलेल्या सत्य घटनेचा आधार आहे. सोफी मॅकिन्टोश, अ‍ॅना बर्न्‍स, डेझी जॉन्सन यांच्या (अनुक्रमे ‘द वॉटर क्युअर’, ‘मिल्कमन’ आणि ‘एव्हरीथिंग अण्डर’) कादंबऱ्या स्त्रीवादी आहेत. इसाय एडय़ुगन हिची ‘वॉशिंग्टन ब्लॅक’ गुलामगिरीच्या इतिहासातील एक धागा शोधून काढते. रॉबिन रॉबर्टसन यांच्या ‘द लाँग टेक’मध्ये गद्य-पद्य यांचा प्रयोग आहे. मायकेल ओदान्शी यांच्या ‘वॉरलाइट’मध्ये थरारक प्रेमकथा मांडण्यात आली आहे. गाय गुणरत्नेची ‘इन अवर मॅड अ‍ॅण्ड फ्युरिअस सिटी’ लंडनमधील दंगलीचा लेखाजोखा मांडते. डोनल रायन यांच्या ‘फ्रॉम अ लो अ‍ॅण्ड क्वाएट सी’मध्ये स्थलांतरितांच्या प्रश्नावर नजर आहे. यापैकी सहा पुस्तकं पुढील आठवडय़ात लघुयादीत दाखल होतील.

बुकर पुरस्कार हा विजेत्या लेखकाला पन्नास हजार पौंडांचा एकरकमी ऐवज सादर करून आयुष्याची आर्थिक चिंता मिटवून देत असला, तरी लघुयादीपर्यंत पोहोचलेल्या इतर लेखकांनाही प्रसिद्धी आणि पैसा याची पुरेपूर उपलब्धी होते. जगभरात सध्या यू-टय़ूबवरील व्हिडीओ पुस्तक समीक्षकांपासून ते समाजमाध्यमावरील ‘ग्रंथ फोटोत्साही’ संप्रदायाला पुस्तकभरते आले आहे. त्या साऱ्यांसाठी बुकर लघुयादीनिमित्ताने पुढील काही दिवस नव्या वाचन-पर्वाचे असणार आहेत.

pankaj.bhosale@expressindia.com