श्रीमद््भगवद्गीता हा धर्मग्रंथ आहेच, पण ‘सेल्फ हेल्प’ किंवा स्वयंविकासासाठी मार्गदर्शक ग्रंथ म्हणूनही त्याकडे पाहिले जाऊ शकते, हे स्वामी विवेकानंदांच्या ‘कर्मयोग’ या ग्रंथातून सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी सिद्ध झाले. अर्थात त्या वेळी ‘सेल्फ हेल्प’ पुस्तकांचा निराळा कप्पा नव्हता. तो वाढू लागला, तेव्हा या कप्प्यात पाश्चात्त्य पुस्तकेच असत. या कप्प्यात बसणारे भारतीय लेखक बहुतेकदा प्रादेशिक भाषांत लिहीत. स्वयंविकासाचा भारतीय कर्मसिद्धान्तावर आधारित दृष्टिकोन इंग्रजी सेल्फ हेल्प पुस्तकांतून मांडणारे लेखक अलीकडेच दिसू लागले, त्यांपैकी निराळे उठून दिसणारे नाव म्हणजे उमेश मिटकर. त्यांचे ‘मॅन हू स्टोल माय पॅराडाइज’ हे पुस्तक सहा महिन्यांपूर्वी आले आहे.

धर्मच माणसाची धारणा करतो, हा विश्वास लेखकाने या पुस्तकाच्या पहिल्या भागात बिंबवला आहे. त्यासाठी आधी विज्ञानाच्या भाषेत विश्वाच्या अफाट पसाऱ्याचे वर्णन करताना, हे निव्वळ यदृच्छेने झालेले नाही असा सूर लावून, पुढे हिंदू धर्म (प्रकरण आठ), तर ख्रिस्ती, इस्लाम व ज्यू धर्म (प्रकरण नऊ) यांनी विश्वोत्पत्ती आणि मानवाचे विश्वातले स्थान आणि भूमिका कशी स्पष्ट केली, हे मिटकर सांगतात. पुस्तकाच्या १७ प्रकरणांची विभागणी दोन भागांत आहे, त्यांपैकी पहिला भाग हा धारणेचा म्हणून धर्माचा, तर दुसरा भाग कार्यकारणभावाचा असे वाचकाला जाणवेल. ‘कर्म’ आणि विवेक या दोन्हीस मिटकर सारखेच महत्त्व देतात, याचे प्रतिबिंब दुसऱ्या भागात अधिक दिसते. माणसामाणसांतील संबंध, भावनांचे व्यवस्थापन, यश आणि अपयशाच्या प्रसंगांमध्ये मानसिक संतुलन कायम राखणे, सकारात्मक आणि नकारात्मक या दोहोंचे महत्त्व ओळखणे आदी विषयांची चर्चा या दुसऱ्या भागात आहे. नातेसंबंधांची चर्चा करताना ‘विवाहांचे (संसारांचे) प्रकार’ – आणि निव्वळ सोय म्हणून केले जाणारे संसार, यांचीही उदाहरणे आहेत. आधीच्या एक-दोन प्रकरणांतही काही व्यवहारी सल्ले आहेत. मात्र शरीर-मन आणि आत्मा यांचे ऐक्य साधलेली माणसे आदर्शवत् असतात, ती कोणत्याही वयाची असली तरी ‘तरुण’ असतात, असा लेखकाचा विश्वासही या भागाच्या अखेरीस जाणवू लागतो. अखेरच्या तीन प्रकरणांत, धर्माचे व कर्मसिद्धान्ताचे महत्त्व पुन्हा अनाग्रहीपणे पटवून दिले जाते. ‘आयुष्य ब्रह्मस्वरूप आहे, पंचेंद्रिये आणि विचारशक्ती ही ईश्वरी देणगी आहे आणि जग सुंदर करण्यासाठी त्याने मानवजात उत्पन्न केली आहे’ अशा प्रकारचा विश्वास ‘आत्मदीप्तीकडे’ या प्रकरणात आहे, तर शेवटून दुसऱ्या प्रकरणात ‘रेझ्यूमे ऑफ गॉड’ या रंजक भासणाऱ्या उपभागातून पुन्हा हेच ठसविले आहे. अगदी अखेरच्या परिच्छेदातही, ‘विधात्याने/ ईश्वराने तुम्हाला ज्याकामी पाठविले आहे ते करा’ असाच अखेरचा सल्ला आहे.

मग पुस्तकाचे नाव असे आत्मकेंद्री भासणारे कसे? याचाही खुलासा अखेरच्या प्रकरणात येतो. नंदनवन ‘इथे’च- पृथ्वीवर- आहे, ते साकार करण्यात आपले कर्म- आपली नियत भूमिका विसरलेली माणसे हीच बाधा आहे, असा या शीर्षकाचा अर्थ!

पु. ग. सहस्राबुद्धे यांचे ‘तरुण पिढीशी हितगुज’ ज्यांनी किशोरवयात वाचले असेल, त्यांना त्या पुस्तकातील अखेरचे – ‘नेति, नेति’ हे प्रकरण आठवत असेल. त्या प्रकरणातून सहस्राबुद्धे यांचा हेतू वाचकास कार्यप्रवण करण्याचा होता. पण मिटकरांचे पुस्तक वाचकांना धर्मप्रवण करेल अशी त्याची रचना आहे. अर्थात, ‘माणसा माणसा, कधी होशील माणूस?’ ही बहिणाबाई चौधरींची कळकळ मिटकरांच्या या पुस्तकातही नक्कीच दिसते.