मेघना भुस्कुटे

‘द हँडमेड्स टेल’ ही मार्गारेट अ‍ॅटवूड यांची कादंबरी प्रचंड लोकप्रिय ठरली. निर्मितीनंतर ३५ वर्षांनीही तिचं महत्त्व सरलेलं नाहीच, उलट साहित्यकृतीची वेस ओलांडून ती चळवळीशी जोडली गेली. असं काय आहे या कादंबरीत, ते उलगडणारा हा या नव्या बहुलेखकीय पाक्षिक सदरातला दुसरा लेख..

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…

‘द हँडमेड्स टेल’ या कादंबरीबद्दल गेल्या काही वर्षांत खूप लिहिलं-बोललं गेलं आहे. १९८५ साली कॅनडाच्या मार्गारेट अ‍ॅटवूड या लेखिकेनं लिहिलेली ही ‘डिस्टोपियन’ कादंबरी (उपलब्ध प्रतीचे प्रकाशक : व्हिण्टेज, लंडन (१९९६), पृष्ठे : ३२४, किंमत : ३९९ रुपये) गाजली, लोकप्रिय झाली, तिला अनेक पुरस्कार मिळाले. श्राव्य आणि दृश्य माध्यमांतून तिची रूपांतरणं सादर करण्यात आली. तिच्यावर आधारित असलेला इंग्रजी चित्रपट १९९० साली प्रदर्शित झाला. या कादंबरीचा प्रभाव असलेल्या अनेक स्त्रीकेंद्री डिस्टोपियन कादंबऱ्या गेल्या वीसेक वर्षांत लिहिल्या गेल्या. या कादंबरीवर आधारित असलेली मालिका ‘हुलू’ या कंपनीनं २०१७ साली प्रदर्शित केली. सध्याच्या अमेरिकी राजकारणाच्या पार्श्वभूमीशी असलेलं त्या मालिकेचं साम्य थक्क करून टाकणारं होतं. या कादंबरीतल्या ‘हँडमेड्स’चा नखशिखान्त रक्तवर्णी पोशाख स्त्रीवादी चळवळींनी आपलासा केला. निषेधमोर्चामधून वापरला. तो पोशाख कादंबरीच्या पानांतून बाहेर पडून अमेरिकेतल्या स्त्रीवादी चळवळीचं प्रतीक बनला. ‘द हँडमेड्स टेल’चा उत्तरार्ध असलेली ‘द टेस्टामेंट्स’ ही कादंबरी गेल्या वर्षी प्रकाशित झाली; २०१९ सालच्या ‘मॅन बुकर’ पुरस्काराची ती सहविजेती ठरली. इतकी प्रचंड लोकप्रियता, निर्मितीनंतर ३५ वर्षांनीही न सरणारं महत्त्व, साहित्यकृतीची वेस ओलांडून चळवळीशी जोडलं जाण्याचं भाग्य.. असं काय आहे या पुस्तकात?

अतिउजव्या ताकदींनी सत्ता काबीज करून, ख्रिस्ती शिकवणीची ढाल वापरून, सत्तेची नव्यानं रचलेली उतरंड आणि केवळ प्रजननाचं साधन या पातळीला रेटलं गेलेलं स्त्रीचं सामाजिक स्थान असं या कादंबरीचं सूत्र आहे. अपरिमित आण्विक प्रदूषण आणि कमी होणारा जन्मदर हे कादंबरीतलं वास्तव. या नव्या राष्ट्राचं नाव ‘गिलियड’ असं आहे. बायबलमधल्या काही कहाण्यांचा आधार घेऊन गिलियडमधल्या सत्ताधाऱ्यांनी उभारलेल्या कडेकोट व्यवस्थेनुसार उच्च राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळामधल्या अधिकारी पुरुषांना प्रत्येकी एक जननक्षम स्त्री ‘हँडमेड’ म्हणून ‘दिली’ जाते. त्या पुरुषाचं अपत्य जन्माला घालणं इतकंच तिचं काम. त्या अपत्यावर हँडमेडचा नव्हे, तर पुरुषाचा अधिकार. अपत्यप्राप्तीकरता त्या अधिकाऱ्याकरवी त्याच्या पत्नीच्या उपस्थितीत- किंबहुना तिच्या सहभागासह- हँडमेडवर दरमहा समारंभानं आणि कायदेशीररीत्या बलात्कार केला जातो. त्यातून अपत्यसंभव झाल्यावर हँडमेड दुसऱ्या अधिकाऱ्याला दिली जाते. गिलियडमधल्या स्त्रियांनी वाचन वा लेखन केल्यास त्यांच्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. स्त्रीच्या जननक्षम गर्भाशयाखेरीज तिच्या व्यक्तिमत्त्वाला- फार काय, अवयवांनाही- काडीमात्र किंमत नाही. नायिका स्वत:ची गणना उपरोधानं ‘टू-लेग्ड वूम्ब्स’मध्ये म्हणजे चालत्या-बोलत्या गर्भाशयांमध्ये करते. समलिंगी संबंध आणि गर्भपाताला साहाय्य यांसाठी देहान्तशासन आहे. सगळ्या जीवनव्यवहारावर ‘आईज’नामक हेरांच्या जाळ्याची अष्टौप्रहर नजर आहे. गिलियडमधल्या एका हँडमेडनं नोंदलेल्या अनुभवावर आधारित असलेली संहिता म्हणजे ही कादंबरी!

पर्यावरणाचा सत्यानाश, सर्वंकष सत्ता, दैनंदिन व्यवहारावरचा सत्तेचा पहारा, तंत्रज्ञानाचा वापर, व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, तगून राहण्यासाठी माणसांना मूल्यांशी कराव्या लागणाऱ्या तडजोडी.. ही अभिजात डिस्टोपियाची सगळी लक्षणं तीत आहेत. या कादंबरीत स्त्रीच्या अवमूल्यनासाठी वापरलेली कोणतीही गोष्ट लेखिका अ‍ॅटवूडच्या कल्पनेतून जन्माला आलेली नाही. कादंबरीतल्या सगळ्या छळघटना स्त्रीच्या बाबतीत जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे प्रत्यक्षात घडलेल्या आहेत, याची खातरजमा करून मगच त्या कथानकामध्ये वापरल्याचं लेखिकेनं स्पष्ट नमूद केलं आहे. ‘कल्पनेची उड्डाणं’ अशा शिक्क्याखाली गोष्टीचं गांभीर्य, भीषणपणा आणि विश्वसनीयता जराही उणावू नये यासाठी घेतलेली ही खबरदारी आहे. १९८५ साली कादंबरी प्रकाशित झाली, तेव्हा अमेरिकेत रेगनचं (रिपब्लिकन) सरकार होतं. गर्भपातासाठी उपलब्ध होणाऱ्या अर्थसाहाय्यावर सरकारनं टाच आणली. ‘कुटुंबनियोजन म्हणजे गर्भ राहूच न देणं’ असं अप्रत्यक्ष सरकारी धोरण होतं. त्यामागे रिपब्लिकन- अर्थात अतिकर्मठ ख्रिस्ती- धारणा होत्या. ही राजकीय पार्श्वभूमी कादंबरीला आहे.

कोणत्याही अस्सल डिस्टोपियासारखी ‘द हँडमेड्स टेल’ही वाचकाला भीतीनं पछाडून टाकते. पण प्रश्न असा की, या कादंबरीतला अंगावर येणारा भाग नक्की कोणता? हँडमेड्सना शिस्त लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या- गुरांना विजेचे झटके देण्याच्या- काठय़ा? कायदेशीर मासिक बलात्कार? देशद्रोही असा शिक्का मारून बंडखोराला दगडांनी ठेचून मारणं? की केवळ वर्तमानातलाच विरोध नव्हे, तर भविष्यातल्याही विरोधशक्यता पद्धतशीरपणे संपवत नेणं? त्यासाठी ‘ब्रेनवॉशिंग’पासून ते तगून राहण्याच्या मानवी प्रवृत्तीला जागं करण्यापर्यंत अनेकानेक आयुधं वापरणं? टोकाच्या शारीरिक छळाच्या कहाण्या अंगावर येतात खऱ्या; पण त्यांचा भयानकपणा दीर्घकाळ टिकणारा नसतो. जोवर वेदना होते वा दिसते, तोवरच तिची भीती असते. दुसरा भाग असा की, छळाची वा क्रौर्याची दृश्य तीव्रता जितकी अधिक, तितक्याच घाईनं ‘असं घडणं शक्यच नाही?’, ‘हा अतिरेक आहे’, ‘असं कुठे होतं का?’ इत्यादी अविश्वासाच्या रकान्यातले उद्गार काढून ती अंगाबाहेर टाकण्याकडे कल असतो. संस्थात्मक, शिस्तबद्ध आणि मानसिक पातळीवर होणाऱ्या दडपणुकीबद्दल मात्र तसं होत नाही.

‘द हँडमेड्स टेल’मध्ये पार भाषेसारख्या रोजमर्रा गोष्टीपासून ही दडपणूक दिसत राहते. त्यात शारीरिक छळाची वर्णनं तर आहेतच; पण ‘ब्लेस्ड बी द फ्रूट’, ‘मे द लॉर्ड ओपन’, ‘प्रेझ बी’, ‘अंडर हिज आय’ यांसारख्या वरकरणी प्रभुकृपेची आठवण करून देणारी, येता-जाता वापरण्याची सक्ती असलेली अभिवादनं आहेत. त्यांमध्ये गर्भित धमकी आहे. गाण्यांमध्येदेखील ‘फ्री’ आणि तत्सम ‘धोकादायक’ शब्द येऊ नयेत, असा सरकारी फतवा आहे. ‘फ्रीडम टु’ म्हणजे एखादी गोष्ट करण्याचं स्वातंत्र्य हे चांगलं स्वातंत्र्य नसून ‘फ्रीडम फ्रॉम’ म्हणजे एखादी गोष्ट करण्यापासून मोकळीक हेच खरं स्वातंत्र्य आहे, अशी समजूत पद्धतशीरपणे हँडमेड्सच्या मनांवर बिंबवली जाते आहे. अपत्यनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये पुरुषाचं शरीर सदोष असतं असं सुचवणारा ‘स्टराइल’ हा शब्दच मुळी बेकायदा असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. हँडमेड्सना स्वत:चं नावही असण्याचा हक्क त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे आणि ‘ऑफ फ्रेड’, ‘ऑफ ग्लेन’ – म्हणजे फ्रेडची (स्त्री) वा ग्लेनची (स्त्री) अशी नावं त्यांच्या तत्कालीन मालकानुसार त्यांच्यासाठी मुक्रर करण्यात आली आहेत. याला विरोध करणं बेकायदेशीर व देशद्रोह असल्यामुळे शारीरिक शिक्षेस, तसंच ते समाजाच्या हिताचं नसल्यामुळे निर्भर्त्सनेला पात्र आहे. हे डोळ्यांत तेल घालून पाहण्यासाठी शासकीय व्यवस्था आहे, शासकीय गुप्तहेरांचं खातं आहे, त्याहूनही भयंकर म्हणजे समान पातळीवर समान छळ सोसणारी व्यक्तीही स्वत:ला या व्यवस्थेचा अविभाज्य भाग मानून लहानशा चुकीबद्दल तुमच्या पाठीत खंजीर कधी खुपसेल याचा नेम उरलेला नाही. ही संस्थात्मकता, सर्वंकषता आणि विरोधाचं मूळच उखडून टाकत जगायला मजबूर करणारी परिस्थिती- हे सगळं मिळून वाचणाऱ्याच्या अंगावर काटा उभा करतं. यांतल्या अनेक गोष्टी संस्कृतीच्या नावाखाली समाज म्हणून आपणही सहजगत्या बघत-स्वीकारत, क्वचित करतही आलो आहोत हे ध्यानात येतं, तेव्हा दचकायला होतं. भारतात स्त्रीचा सन्मान कायम तिच्या नवऱ्याच्या अस्तित्वाशी आणि तिच्या पुत्रजननक्षमतेशी जोडलेला होता, आजही आहे. मंगळसूत्रासारखी स्त्रीवरचा पुरुषाचा मालकी हक्क जाहीर करणारी घृणास्पद गोष्ट समाजानं स्वीकारलेली आहे. लग्नानंतर स्त्रीचं नाव बदललं जाण्यात कुणालाही काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. ते टाळणाऱ्यांना मात्र सतत व्यवस्थेतल्या ‘संस्कारी’ लोकांशी झगडत राहावं लागतं.

हे थोडं होतं म्हणून की काय, वाऱ्याची दिशा बदलते आहे. आजचं स्पर्धात्मक आणि अंतहीन महत्त्वाकांक्षेचं जग, तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं भोवंडून टाकणारा वेग, माणसांना येणारं व्याकूळपण आणि तुटलेपण.. या सगळ्यामुळे ‘जुनं ते सोनं’ असं म्हणण्याची प्रवृत्ती जगभर बळावते आहे. उजवीकडे झुकणारी सरकारं येताहेत. पण या पुराणमतवादाची दुसरी बाजू काय आहे?

‘ग्रॅब देम बाय द पुसी’ यांसारखी बीभत्स आणि अपमानास्पद विधानं डोनाल्ड ट्रम्पनं जाहीरपणे केली. गर्भपात करणाऱ्या स्त्रियांना शिक्षा झाली पाहिजे, असं जाहीर विधान करून मग माघार घेतली. गर्भपाताबद्दलचं रेगन सरकारचं धोरण ट्रम्पनं पुन्हा प्रत्यक्षात आणलं. पोलंडमध्ये काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीखेरीज इतर वेळी केलेला गर्भपात बेकायदेशीर ठरवण्यात आला. त्याविरुद्ध तिथले लोक- मुख्यत: स्त्रिया- प्रचंड संख्येनं रस्त्यावर उतरल्या. भारतामध्ये हाथरस घटनेमधल्या बलात्कारितेच्या शवाला रातोरात बेकायदेशीरपणे अग्नी देण्यात आला. हैदराबाद येथील बलात्कार घटनेमधल्या आरोपींना कोणत्याही चौकशीविना ‘एन्काउंटर’ करून ठार मारले गेले. जनक्षोभ होता, पण अशा गोष्टींचं समर्थन करणारे लोकही आजूबाजूला सहज दिसले-दिसतात. स्त्रीवादी भूमिकांवर येताजाता ‘फेमिनात्झी’ वगैरे ठपके ठेवले जातात. ‘मी नाहीये हं फेमिनिस्टबिमिनिस्ट’ अशी विधानं स्त्रीवादी चळवळीचे यच्चयावत फायदे उपभोगणाऱ्या घरांतल्या दुसऱ्या वा तिसऱ्या पिढीच्या स्त्रियाही करतात. ‘भारतात कदापि घडू न शकणारं रानटी वास्तव’ अशी तालिबानची संभावना करणारे बहुतांश आधुनिक भारतीय हे मंगलोर पब हल्ल्याबद्दल, मुलींना पळवून आणण्याच्या जाहीर वल्गना करणाऱ्या राजकीय नेत्यांबद्दल, शिक्षिकांनी साडीच नेसली पाहिजे अशा फतव्यांबद्दल, मासिक पाळीदरम्यान स्त्रीला मंदिर प्रवेश नाकारण्याच्या घटनांबाबत मौन बाळगतात.

वैद्यकीय संशोधन प्रसिद्ध करणाऱ्या ‘लॅन्सेट’ या प्रतिष्ठित नियतकालिकात जागतिक जननदरात होणाऱ्या घसरणीबद्दल चिंता व्यक्त करणारा एक लेख प्रकाशित झाला. जगातल्या बहुतांश देशांची लोकसंख्या २१०० सालाच्या सुमारास कमी व्हायला लागेल, असं भाकीत त्यात होतं. जर हे खरं ठरलं तर त्याचा स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर काय परिणाम होईल, हा विचार करण्याजोगा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपभोग घेणारं शरीर आणि शतकभरापूर्वीच्या नीतिकल्पनांमध्ये अडकून पडलेलं मन अशी आपली आजची गोची असताना, ‘द हँडमेड्स टेल’ पूर्वी कधी नव्हती इतकी धारदार झाली आहे यात शंकाच नाही.

meghana.bhuskute@gmail.com