|| अमोल उदगीरकर

जोनाथन गिल हॅरिस.. शेक्सपीअरची नाटकं करणारे आणि विद्यार्थ्यांना ती समजावून सांगणारे अमेरिकी प्राध्यापक. भारतीय चित्रपटांच्या प्रेमापोटी गेली दोन दशकं ते भारतातच स्थायिक झालेत. स्वत:ला अभिमानानं ‘शेक्सपीअरन’ म्हणवणाऱ्या हॅरिस यांचं नवंकोरं पुस्तक शेक्सपीअर आणि भारतीय सिनेमा यांच्यातील नातेबंधाचा वेध घेतं..

  • ‘मसाला शेक्सपीअर: हाऊ ए फिरंगी रायटर बीकेम इंडियन’
  • लेखक : जोनाथन गिल हॅरिस
  • प्रकाशक : आलेफ बुक कंपनी
  • पृष्ठे: २८२, किंमत : ७९९ रुपये

भारतासारख्या खंडप्राय आणि सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक असं प्रचंड वैविध्य असणाऱ्या देशाकडे आकर्षित होऊन इथंच स्थायिक होणाऱ्या विदेशी नागरिकांचाही एक पंथ आहे. अशा विदेशी नागरिकांची यादी मोठी रोचक आहे. परवीन बाबीच्या एकतर्फी प्रेमात पडून इथं आलेला आणि इथंच छोटय़ा-मोठय़ा भूमिका करत जगणारा बॉब क्रिस्टो, ‘मला आणखी पाच जन्म मिळाले, तर ते मी इथल्याच मातीत घेईन’ अशी ग्वाही देणारा प्रख्यात इतिहास-लेखक विलियम डॅलरिम्पल, भारताच्या गेल्या काही दशकांचा सामाजिक-राजकीय लेखाजोखा मांडणारा मार्क टलीसारखा साक्षेपी पत्रकार आणि इतर अनेक जण या यादीत आहेत. या फिरंगी भारतीयांची एक खासियत म्हणजे ते इथं येऊन नुसतं मौजमजा करण्यात आणि पाटय़ा टाकण्यात दिवस घालवत नाहीत. ते आपल्या संस्कृतीचं, राहणीमानाचं, आवडीनिवडींचं, आपल्या बलस्थानांचं व कमकुवत दुव्यांचंही निरीक्षण करतात आणि त्याची आखीव नोंद करतात. हे निरीक्षण भावनेच्या भरात वाहून न जाता तटस्थपणे केलेलं असतं आणि त्यामुळेच आपल्यासाठी ते महत्त्वाचं ठरतं.

या फिरंगी भारतीयांच्या यादीत असणारं आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे- जोनाथन गिल हॅरिस! जोनाथन गिल हॅरिस हे नाव सर्वसामान्य भारतीयांना अपरिचित असलं, तरी सिनेमाविषयक गंभीर लिखाण वाचणाऱ्यांसाठी ते तसं अपरिचित नाही. जोनाथनच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन महत्त्वाचे पलू आहेत. एक तर तो शेक्सपीअरच्या कलाकृतींचा गाढा अभ्यासक आहे आणि दुसरं म्हणजे, त्याला भारतीय चित्रपटांचं प्रचंड वेड आहे. अमेरिकेत शेक्सपीअरची नाटकं करणारा आणि विद्यार्थ्यांना शेक्सपीअर समजावून सांगणारा हा प्राध्यापक या चित्रपटप्रेमापोटीच अमेरिका सोडून भारतात स्थायिक झाला. २००१ च्या एका रखरखत्या उन्हाळ्यात जोनाथन पहिल्यांदाच भारतभेटीला आला आणि त्यानं दिल्लीतल्या एका चित्रपटगृहात ‘लगान’ सिनेमा बघितला. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात, टाळ्या-शिट्टय़ांच्या गजरात जोनाथननं ‘लगान’ पाहिला आणि त्यालाही- आपल्या भाषेत सांगायचं तर- भारतीय सिनेमाचा किडा चावला! भारतीय सिनेमा आणि जोनाथन गिल हॅरिस नावाचा फिरंगी माणूस यांच्यातल्या प्रेम प्रकरणाची ही फक्त सुरुवात होती. स्वत:ला अभिमानानं ‘शेक्सपीअरन’ म्हणवणाऱ्या या माणसानं भारतीय सिनेमाची एका अतिशय निराळ्या दृष्टीनं घेतलेली नोंद म्हणजे ‘मसाला शेक्सपीअर’ हे पुस्तकं!

भारतीय सिनेमा आणि शेक्सपीअर असं म्हटलं, की आपल्याला विशाल भारद्वाज हा दिग्दर्शक पटकन आठवतो. पण शेक्सपीअरचा भारतीय सिनेमा आणि नाटकांवरील सर्वव्यापी प्रभाव हा भारद्वाजच्याही खूप आधीपासून आणि भारद्वाजच्या सिनेमांच्या पल्याडही खूप मोठय़ा प्रमाणावर आहे. फक्त ‘रोमिओ अ‍ॅण्ड ज्युलिएट’ या शेक्सपीअरच्या नाटकावरच आपल्याकडे असंख्य सिनेमे (भिन्न धर्म/ वर्ग/ जातींचे प्रेमी-प्रेमिका या परिप्रेक्ष्यात) बनले आहेत. जोनाथनला शेक्सपीअरचं हे ‘भारतीयीकरण’ खूप आकर्षक वाटतं. शेक्सपीअर हा सध्या जरी साहित्यिक, नाटककार, समीक्षक मंडळींची मक्तेदारी बनला असला, तरी तो तसा आहे का? तर नाही. भारतीय सिनेमा आणि शेक्सपीअरच्या कलाकृती यांच्यात अनेक साम्यस्थळं आहेत. शेक्सपीअरवर त्याच्या काळात ‘प्रेक्षकानुनयी’, ‘सवंग’, ‘गल्लाभरू’ असे शिक्के मारण्यात आले होते. ‘मसाला सिनेमे’ म्हणत भारतीय सिनेमावरही पूर्वापार (आणि सध्याही) आक्षेप घेतले जात आहेतच. हेच तर्कशास्त्र थोडं पुढं न्यायचं, तर ‘इस फिल्म में ड्रामा है, रोमान्स है, अ‍ॅक्शन है, इमोशन्स है’ असं जे बहुतांश भारतीय सिनेमांबद्दल सरसकट विधान करता येतं, तेच शेक्सपीअरच्या कलाकृतींनाही लागू पडतं. काही शतकांपूर्वी होऊन गेलेल्या एका ब्रिटिश नाटककाराला आणि परभणीसारख्या निमशहरी भागात राहणाऱ्या चित्रपट प्रेक्षकाला जोडणारा धागा तो हाच! या धाग्याचं विश्लेषण करायला जोनाथनपेक्षा योग्य माणूस दुसरा कोण असणार? आलेफ बुक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या या २८२ पानी पुस्तकात जोनाथननं भारतीय सिनेमा आणि त्यावर असणारा शेक्सपीअरचा प्रभाव याचं सखोल विश्लेषण केलं आहे.

पुस्तकाची रचना शेक्सपीअरच्या एखाद्या नाटकाच्या रचनेप्रमाणेच आहे. पुस्तक पाच अंकांत विभागलेलं आहे. प्रत्येक अंकाचं शीर्षक भारतीय सिनेमात वापरल्या जाणाऱ्या शब्दांपासून बनलं आहे. ‘खानदान’स्’, ‘जुगलबंदीज्’, ‘नाटक’स्’, ‘दर्दनाक कहानीज्’ आणि ‘तुफान’स्’ अशा पाच अंकांत जोनाथननं शेक्सपीअरच्या कलाकृतींचा भारतीय कलाकृतींवर असणाऱ्या प्रभावाचा मागोवा घेतला आहे. प्रत्येक अंकात तीन ते सहा प्रवेश आहेत. त्या प्रवेशांमध्ये शेक्सपीअरच्या कलाकृतींचं स्वतंत्र रसग्रहण, त्यांचा भारतीय सिनेमा-नाटकांवरील प्रभाव, शेक्सपीअरचे भारतासंदर्भातले ऐतिहासिक संदर्भ यांचा आढावा घेतलेला आहे. शेक्सपीअरच्या ‘द कॉमेडी ऑफ एर्स’, ‘ए मिडसमर नाइट्स ड्रीम’, ‘रोमिओ अ‍ॅण्ड ज्युलिएट’, ‘ट्वेल्पथ् नाइट’, ‘मॅक्बेथ’, ‘ऑथेल्लो’, ‘हॅम्लेट’, ‘किंग लिअर’ या नाटकांचा भारतीय कलाकृतींवर प्रभाव कसा पडला, याचं मार्मिक विश्लेषण पुस्तकात आहे.

भारतात शेक्सपीअरचा शिरकाव झाला तो वसाहतवादी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून. कलाकारांची सुपीक भूमी असलेल्या भारतात हे शेक्सपीअरचं बीज फोफावलं आणि कालांतरानं त्याचा वटवृक्ष झाला. इथं शेक्सपीअर रुजवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती पारसी थिएटरनं आणि नंतर बंगाली रंगभूमीनं. हळूहळू शेक्सपीअर नामक कलाकाराची साथ सर्व प्रांतांत पसरत गेली. जोनाथननं या ऐतिहासिक प्रवाहाचाही आढावा पुस्तकात घेतला आहे. भारतात शेक्सपीअरच्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला तो एका जहाजावर किंवा पुढं उत्पल दत्तसारख्या प्रतिभावंत अभिनेत्यानं शेक्सपीअर इथं रुजवण्यासाठी कशी धडपड केली, अशा प्रकारची रंजक माहितीही पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात येते.

भारतासारख्या देशात सिनेमा हे फक्त मनोरंजनाचं एक साधन आहे, असं म्हणून सिनेमाची बोळवण करता येत नाही. आपला पलायनवादी सिनेमा प्रेक्षकांना काही वेळ रखरखीत वास्तवापासून दूर नेतो आणि एका सुबक, सुंदर काल्पनिक जगात रमवतो. हे खरं असलं, तरी आपल्याकडे असलेल्या प्रचंड वैविध्यामुळे सिनेमाला अनेकदा सामाजिक, राजकीय, जातीय, धार्मिक, सांस्कृतिक अंत:प्रवाह (अंडरकरंट्स) असतात. सिनेमाचं परीक्षणांच्या पुढे जाऊन विश्लेषण करणाऱ्यांना हे अंत:प्रवाह समजणं आवश्यक आहे. भारतात अवघी दोन दशकं घालवलेल्या जोनाथनला हे सूक्ष्म अंत:प्रवाह नुसते माहितीच नाहीत तर तो ते कोळून प्यायला आहे, हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं. विशाल भारद्वाजच्या ‘मकबूल’ (२००४) या सिनेमाबद्दल जोनाथननं जे लिहिलंय, ते उदाहरण म्हणून पाहता येईल. प्रथमदर्शनी ‘मकबूल’ म्हणजे विशालनं ‘मॅक्बेथ’ला चढवलेला मुस्लीम टोळ्यांमधल्या अंतर्गत रक्तरंजित संघर्षांचा मुलामा, असं अनेकांना वाटू शकतं. परंतु ‘मकबूल’मधले धर्माला पाठीशी ठेवणाऱ्या गुन्हेगारी जगतातील सुप्त धार्मिक ताणेबाणे जोनाथन फार सुंदरपणे समजावून सांगतो. त्यातील गुन्हेगारी जगताचा म्होरक्या अब्बाजी धार्मिक मुस्लीम असला, तरी आपल्या हिंदू सहकाऱ्याच्या मुलाला आपली मुलगी देताना थोडेही आढेवेढे घेत नाही. अब्बाजीचे ज्या मोहिनी नावाच्या अभिनेत्रीशी संबंध असतात, ती त्याच्या मुलीच्या साखरपुडय़ात नृत्याचा कार्यक्रम पेश करते. या हिंदू-मुस्लीम लग्नात मोहिनी (विष्णूच्या स्त्री-रूप अवताराचं नाव) दोन्ही समूहांना जोडणारं नृत्य करते. मोहिनीच्या कार्यक्रमात कथक आणि मुजरा यांचं मिश्रण आहे. हे नृत्य हिंदू संस्कृती आणि मुघल संस्कृती यांच्या साहचर्याचं प्रतीक आहे, असं जोनाथन सोदाहरण स्पष्ट करतो.

ज्याला आपण ‘आयडिया ऑफ इंडिया’ म्हणतो, त्याचं जोनाथनला प्रचंड आकर्षण आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच ‘हे पुस्तक म्हणजे आयडिया ऑफ इंडियाला लिहिलेलं प्रेमपत्र आहे’ असा उल्लेख आहे. तुलनेनं एकसाची समाजात बरंचसं आयुष्य व्यतीत केलेल्या जोनाथनला भारतातल्या वैविध्याबद्दल प्रेम वाटतं, हे पुस्तक वाचताना सतत जाणवतं. पण या वैविध्यासोबतच भारतात अनेक सामाजिक प्रश्न आ वासून उभे आहेत याचीही त्याला जाणीव आहे. ‘ऑथेल्लो’ आणि त्याचा भारतीय सिनेमावरील प्रभाव याचं विश्लेषण करणाऱ्या ‘मसाला कास्ट्स’ या उपप्रकरणात आकडेवारी देऊन जोनाथन भारतातला ‘ऑनर किलिंग’चा प्रश्न किती गंभीर आहे, हे मांडतो. तसंच विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’(२०१४) मधलं ‘द रॉटन स्टेट ऑफ कश्मीर’ही जोनाथनच्या लिखाणात येतं राहतं.

भारतीय सिनेमा म्हणजे फक्त हिंदी सिनेमा असा एक समज भारताबाहेर आणि दुर्दैवानं भारतात एका वर्गातही दृढ आहे. सुदैवानं जोनाथन त्या सापळ्यात अडकत नाही. जोनाथनचा भारतातल्या प्रादेशिक चित्रपटसृष्टींचा आणि रंगभूमीचा (यात दाक्षिणात्य, बंगाली, मराठी चित्रपटसृष्टी व रंगभूमीही आली) अभ्यास अतिशय सखोल म्हणता येईल असा आहे. शेक्सपीअरच्या ‘ट्वेल्पथ् नाइट’ या नाटकाचे सिनेमा-रूपांतरण होण्याआधी त्याचं पहिलं भारतीय रूपांतरण करण्याचा मान ‘सं. मदनाची मंजिरी’ (१९६५) या मराठी नाटकाकडे (नाटककार : विद्याधर गोखले) आहे, अशी माहिती या पुस्तकात मिळते. ‘द टेमिंग ऑफ द श्य्रू’ या नाटकाचं विश्लेषण करण्याच्या निमित्तानं जोनाथन मराठी संगीत नाटकांची वाचकांना अपरिचित असलेली माहिती देऊन जातो. याशिवाय दाक्षिणात्य भाषांमधले सिनेमे, त्यांची रंगभूमी, एक काळ गाजवलेलं पारसी थिएटर, गुजराती थिएटर यांचे अभ्यासू संदर्भ वेगवेगळ्या प्रकरणांत सतत येत जातात. हे पुस्तक भारतीय सर्वभाषिक सिनेमा आणि रंगभूमीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट संदर्भग्रंथ ठरू शकते.

पुस्तकात काही तुरळक ठिकाणी सतत माहिती कुठल्याही विश्लेषणाशिवाय येत जाते आणि काहींना त्या भागात पुस्तक रटाळ वाटण्याची शक्यता आहे. पण लगेच जोनाथनच्या खुसखुशीत भाषेत विश्लेषणाचा भाग सुरू होतो आणि पुस्तकाची गाडी पुन्हा रुळावर येते. अभ्यासू असणारं पुस्तक काही वेळा संदर्भाच्या भडिमारांमुळे वा शैलीअभावी रटाळ बनू शकतं. मात्र, ‘मसाला शेक्सपीअर’च्या बाबतीत तसं होत नाही, हे जोनाथनच्या लेखनशैलीचं यश!

एखादी कलाकृती सार्वकालिक आणि महान असते म्हणजे काय, याचा एक निकष आहे. ती कलाकृती जगभरातल्या इतर कलाकारांना भुरळ पाडते आणि ते आपल्या परीनं त्या कलाकृतीची ‘व्हर्जन्स’ अर्थात प्रतिरूपं तयार करतात. शेक्सपीअरला त्याच्या मृत्यूनंतर का होईना, हे भाग्य पुरेपुर मिळालं. ‘शेक्सपीअरचा भारतीय परफॉर्मिग आर्ट्सवरील प्रभाव’ या विषयावर आतापर्यंत फारसं लिहिलं गेलेलं नाही. जोनाथन गिल हॅरिसचं ‘मसाला शेक्सपीअर’ हे पुस्तक हा अनुशेष समर्थपणे भरून काढतं. सिनेमातल्या नायक-नायिकांवरचं लिखाण वा स्मरणरंजनात्मक लिखाणाच्या पल्याड काही चांगलं वाचायचं असेल, तर हे पुस्तक उत्तम पर्याय ठरू शकतं!

लेखक सिनेअभ्यासक आहेत. त्यांचा ईमेल :

amoludgirkar@gmail.com