डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकेच्या विद्यमान अध्यक्षांविषयी, त्यांनी केलेल्या वक्तव्यांविषयी बरीच चर्चा सुरू असते आणि ते साहजिकही आहे! हे ट्रम्प ज्या बराक ओबामा यांच्यानंतर अध्यक्षपदी आले, त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले आत्मचरित्र गेला आठवडाभर चर्चेत आहे. साधारणपणे आत्मचरित्र म्हटले आणि तेही मिशेल ओबामांसारख्या उच्चपदस्थ, दोनवेळा अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ राहिलेल्या व्यक्तीचे असेल, तर अनेकांना उत्सुकता असतेच. विशेषत: त्यात वादग्रस्त असं काही वाचायला मिळेल म्हणून! मिशेल ओबामांचं ‘बीकमिंग’ हे आत्मचरित्र मात्र तसं काही वादग्रस्त सांगत नाही. मग तरीही ते चर्चेत का आहे?

तर, त्याच्या खपामुळे! १३ नोव्हेंबरला प्रकाशित झाल्यानंतर  पुढच्या आठवडाभरातच जगभरच्या प्रमुख ग्रंथविक्री साखळ्यांच्या खपयादीत ‘बीकमिंग’ हे अग्रस्थानी आलं आहे. अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपासून बहुविक्या पुस्तकांच्या यादीत वरचं स्थान पटकावून असलेल्या बुजुर्ग पत्रकार बॉब वुडवर्ड लिखित ‘फीअर’ किंवा जेम्स कॉमी यांच्या ‘अ हायर लॉयल्टी : ट्रथ, लाइज अ‍ॅण्ड लीडरशिप’ किंवा मायकेल वुल्फच्या ‘फायर अ‍ॅण्ड फ्युरी’ या पुस्तकांपेक्षाही मिशेल यांच्या ‘बीकमिंग’ची विक्री अधिक होत असल्याच्या बातम्या अमेरिकी आणि युरोपीय माध्यमांतून झळकू लागल्या आहेत.

प्रकाशित झाल्यानंतर पहिल्या २४ तासांतच ‘बीकमिंग’च्या तब्बल सव्वासात लाख प्रतींची विक्री झाल्याचं या पुस्तकाची प्रकाशनसंस्था असलेल्या पेंग्विन रॅण्डम हाऊसकडून सांगण्यात येत आहे. चालू आठवडय़ात त्यात आणखी आठ लाख प्रतींची भर पडली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकेतील सर्वात मोठी ग्रंथविक्री साखळी असलेल्या ‘बार्न्‍स अ‍ॅण्ड नोबल’च्या सव्वासहाशेच्या वर दुकानांमध्ये आणि त्यांच्या संकेतस्थळावरही ‘बीकमिंग’चाच बोलबाला असल्याचं ‘बार्न्‍स अ‍ॅण्ड नोबल’कडून सांगण्यात येत आहे. एकूणच ‘बीकमिंग’ हे यंदाचं सर्वाधिक खप झालेलं पुस्तक ठरू शकतं, असा अंदाज ग्रंथविक्रेत्यांच्या वर्तुळात वर्तवला जात आहे.

असं नेमकं काय आहे या पुस्तकात? तर, दक्षिण शिकागोतील बालपणापासून अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ म्हणून व्हाइट हाऊसमधल्या आठ वर्षांच्या वास्तव्यापर्यंत मिशेल ओबामा यांच्या प्रवासाचा धावता आलेख या ४२६ पानी पुस्तकात आहे. प्रकाशनपूर्व मुलाखतींमध्ये मिशेल यांनी आपल्या दोन्ही मुलींचा – मिलिया आणि साशा- जन्म आयव्हीएफ तंत्रानं झाल्याचं गुपित उघड केलं होतं, शिवाय ट्रम्प यांनी बराक ओबामा यांच्याबद्दल पसरवलेल्या अफवांविषयी मिशेल यांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे तर या पुस्तकाविषयीचं कुतूहल वाढलं होतं. शिवाय सध्याच्या व्हाइट हाऊसमधील वातावरणाबद्दल सांगणारी तीन – वुडवर्ड, कॉमी आणि वुल्फ यांची- पुस्तकं चर्चेत असताना मिशेल यांच्या पुस्तकातून त्याआधीच्या व्हाइट हाऊसविषयी जाणून घेण्यासाठी वाचकांमध्ये उत्सुकता होती.

एका माजी ‘फर्स्ट लेडी’नं लिहिलेलं हे पहिलंच पुस्तक आहे का? तर तसंही नाही. मिशेल यांच्या आधी फर्स्ट लेडी असलेल्या लॉरा बुश यांचं ‘स्पोकन फ्रॉम द हार्ट’ हे २०१० साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक असो वा त्याआधीच्या हिलरी क्लिंटन यांचं ‘लिव्हिंग हिस्ट्री’ असो, माजी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीनं आत्मचरित्र वा आठवणीपर पुस्तकं लिहिण्याची परंपरा अमेरिकेत खूप जुनी आहे. अगदी अलीकडच्या काळातील लिंडन बी. जॉन्सन यांच्या पत्नी लेडी बर्ड जॉन्सन यांच्या १९७० साली प्रसिद्ध झालेल्या ‘अ व्हाइट हाऊस डायरी’पासून (पॅट निक्सन यांचा अपवाद वगळता) पुढच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाच्या पत्नीनं अशी पुस्तकं लिहिली आहेत. त्यात वैयक्तिक जीवनातील तपशिल जसे मांडले गेले, तसाच व्हाइट हाऊसमधील सत्तेचा सारीपाटही उलगडला गेला. अमेरिकेचा घडता इतिहास अशा सत्ताकेंद्राच्या समीप वावरणाऱ्या ‘फर्स्ट लेडीं’च्या नजरेतून पाहायला मिळतो. अशा फर्स्ट लेडींबद्दलचं ‘फर्स्ट वुमेन’ हे केट अँडरसन ब्रोवर लिखित पुस्तकही गतवर्षी प्रसिद्ध झालं आहे. त्यात याचे अनेक तपशील मिळतील. पण तूर्तास मिशेल ओबामा यांच्या ‘बीकमिंग’चं वाचन करायला हवंच. यथावकाश त्याचं सविस्तर परीक्षण ‘बुकमार्क’मध्येच वाचायला मिळेल!