सचिन दिवाण sachin.diwan@expressindia.com

वेद-पुराणकाळापासून भारताची लष्करी परंपरा आजवरच्या आधुनिक काळापर्यंत कशी विकसित होत गेली, याचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाविषयी..

मूळचे उत्तराखंडचे असलेले उमा प्रसाद थाप्लियाल संरक्षण मंत्रालयाच्या इतिहास विभागाच्या संचालक पदावरून १९९६ साली निवृत्त झाले. त्यानंतर थाप्लियाल यांची भारतीय आणि लष्करी इतिहासावरील काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘मिलिटरी हिस्टरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात थाप्लियाल यांनी भारताच्या लष्करी इतिहासाचा विस्तृत आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

वेद आणि पुराणकाळापासून भारताची लष्करी परंपरा आजवरच्या आधुनिक काळापर्यंत कशी विकसित होत गेली, याचा परिचय थाप्लियाल यांनी या पुस्तकात करून दिला आहे. भारताचे भौगोलिक स्थान, साधनसंपत्तीची मुबलकता, येथे बहरलेल्या विविध संस्कृती, त्यांच्या संपन्नतेकडे आकर्षित होऊन झालेली परकीय आक्रमणे, त्यांना येथील सत्तांनी दिलेली लष्करी टक्कर, प्रसंगी ओढवलेले पराभव, त्यातून स्थापन झालेल्या परकीय राजवटी, त्याने झालेले सामाजिक अभिसरण, नव्या लष्करी संकल्पनांची आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण अशा संकरातून उत्क्रांत झालेली आजची भारतीय सेनादले असा प्रदीर्घ प्रवास पुस्तकात वाचायला मिळतो. त्यात वेद आणि पुराणकाळातील परंपरा, आर्याचे आगमन, सिकंदराचे आक्रमण, नंद- गुप्त- मौर्य साम्राज्ये, त्यांचा ऱ्हास, सातवाहन-वाकाटक-चालुक्य- प्रतिहार- पाला- पल्लव- राष्ट्रकूट- चोला- पंडय़ा- चेरा- राजपूत आदी शासकांचा काळ, त्यांच्या सेनादलांची रचना आदी बाबींचा विस्तृत आढावा यात आहे. त्यानंतर मुघल साम्राज्य, त्याचे पतन, मराठा आणि अन्य भारतीय सत्तांचा उदय, पेशवाईचा उदयास्त, युरोपीय शक्तींचे आगमन, त्याने झालेला आधुनिकतेचा स्पर्श, कवायती फौज, आधुनिक बंदुका आणि तोफांचे आगमन आदी बाबींचा ऊहापोह केला आहे.

भारतावर ब्रिटिशांचा एकछत्री अंमल सुरू होण्यापूर्वीच्या लढाया, बंडे, उठाव, १८५७ चे बंड आदी माहितीही रोचक आहे. त्यानंतर ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील भारतीय सेनेचा पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील मोठय़ा प्रमाणावरील सहभाग, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे प्रयत्न, त्यानंतर ब्रिटिश-भारतीय सैन्यात झालेले उठाव आणि स्वातंत्र्यप्राप्ती हा भाग येतो. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान, चीन यांच्याशी झालेली युद्धे, बांगलादेश निर्मिती, त्यानंतर वाढलेला पंजाब, ईशान्य भारत आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद, श्रीलंकेत पाठवलेली भारतीय शांतिसेना, कारगिलचे युद्ध, त्यानंतर सुरू झालेले सेनादलांचे आधुनिकीकरण, तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत भारताने बजावलेली भूमिका आदी विषय येतात.

संरक्षण मंत्रालयाच्या इतिहास विभागातील प्रदीर्घ अनुभवाचा थाप्लियाल यांच्या लिखाणाला फायदा झाल्याचे पुस्तकात दिसून येते. त्यातील सुरुवातीची प्रकरणे काहीशी समृद्ध म्हणता येतील अशी आहेत; पण पुस्तकातील कथन जसजसे पुढे सरकते तसतशी माहिती अधिकाधिक जुजबी आणि त्रोटक होत गेलेली जाणवते. त्यात संशोधनापेक्षा ‘गुगल’च्या काळात सुलभ झालेले माहितीचे एकत्रीकरण अधिक झालेले दिसून येते. प्राचीन व मध्ययुगीन भारत आणि त्यानंतर १८५७ चे बंड येथपर्यंत पुस्तकाची शंभरावर पाने खर्ची झाली आहेत. पण कारगिल युद्ध केवळ पाच-सहा पानांत, सिक्कीममधील १९६७ सालचा आणि अरुणाचल प्रदेशच्या समदोरांग चू भागातील १९८६-८७ सालचा चीनबरोबरील संघर्ष प्रत्येकी १० ओळींपेक्षा कमी जागेत उरकले आहेत. ५१६ पृष्ठांच्या या पुस्तकात एकही छायाचित्र किंवा नकाशा नाही. नाही म्हणायला काही कोष्टके आहेत; पण ती अपुरी आहेत. एखाद्या विषयाचा विस्तृत कालखंडातील समग्र आढावा घेताना तपशिलांकडे दुर्लक्ष होत जाण्याचा धोका उद्भवतो. तसे या पुस्तकाबाबतही झाले आहे. सुरुवातीच्या इतिहासाची जी प्रकरणे काहीशी तपशिलवार वाटतात, त्यातही अस्सल संशोधन किती आणि संरक्षण मंत्रालयाच्या इतिहास विभागातील सेवेत असल्याने सहजपणे उपलब्ध झालेली माहिती किती, हा प्रश्न उरतोच!

अर्थात, त्याने पुस्तकाचे महत्त्व मात्र कमी होत नाही. विस्तृत कालखंडातील घटनाक्रम नोंदवणाऱ्या कोणत्याही पुस्तकाला ही मर्यादा येतेच. ती मान्य करून पुस्तकाची बलस्थाने समजावून घेणे गरजेचे आहे. येथे पुस्तकावर मर्यादा आणणारे घटकच त्याची बलस्थानेही ठरू शकतात. काहीसा त्रोटक असला, तरीही वेद-पुराण काळापासून आजवरचा भारताचा लष्करी इतिहास एका पुस्तकात वाचायला मिळणे ही एक संधी आहे. यातील वेगवेगळ्या किंवा एकेका विषयावर स्वतंत्र आणि विस्तृत विवेचन करणारी पुस्तके उपलब्ध आहेतच. मात्र, सेनादलांसंबंधी अनेक बाबींची संगतवार माहिती वाचकाला एक दृष्टिकोन प्रदान करू शकते. तेथे या पुस्तकाचे खरे यश आहे. या पुस्तकात ज्या पद्धतीने भारतीय सेनादलांचे कालसुसंगत दस्तावेजीकरण केले आहे ते आजवर अभावानेच उपलब्ध होते.

इतक्या मोठय़ा काळात बदलत गेलेली सेनादलांची संरचना या एकाच मुद्दय़ाचा विचार केला तरीही पुस्तकात खूप उपयुक्त माहिती आहे. सैन्य चतुरंगिणी असे. म्हणजे रथ, हत्ती, घोडे आणि पायदळाचे सैनिक ही त्याची चार प्रमुख अंगे असत. महाभारत काळात युद्धात कौरव वा पांडवांकडून १८ अक्षौहिणी सैन्याचा वापर केल्याचे उल्लेख आहेत. एक रथ, एक हत्ती, तीन घोडे आणि पाच पायदळ सैनिक अशा १० जणांचे सर्वात लहान ‘पत्ती’ नावाचे दल असे. त्यानंतर प्रत्येक पायरीवर त्यात तिपटीने वाढ होत जाऊन ‘सेनामुख’ (३०), ‘गुल्म’ (९०), ‘गण’ (२७०), ‘वाहिनी’ (८१०), ‘प्रतन’ (२४३०), ‘चमू’ (७२९०) आणि ‘अनिकणी’ (२१,८७०) अशी रचना असे. अनिकणीला तीनऐवजी दहाने गुणून एक अक्षौहिणी (२,१८,७००) तयार होत असे. आजच्या आधुनिक सैन्यातही १० सैनिकांचे एक सेक्शन हे सर्वात लहान दल असते. त्यानंतर त्यात प्रत्येक टप्प्यावर तिपटीने वाढ होत जाते. त्यानुसार सेनामुख म्हणजे प्लॅटून, गुल्म म्हणजे कंपनी, वाहिनी म्हणजे बटालियन, प्रतन म्हणजे ब्रिगेड, चमू म्हणजे डिव्हिजन, अनिकणी म्हणजे कोअर आणि अक्षौहिणी म्हणजे आर्मी (संपूर्ण सैन्य या अर्थाने नव्हे, तर एक बॅटलफिल्ड फॉर्मेशन या अर्थाने) असे साधर्म्य दिसून येते. मात्र येथे अनिकणीला दहाऐवजी तीनने गुणून येणारा अक्षौहिणीचा ६५,६१० हा आकडा अधिक सयुक्तिक वाटतो. मुघल काळात सैन्यात दशमान पद्धतीने म्हणजे दहाच्या पटीत वाढत जाणारी सैनिकी रचना होती.

सुरुवातीच्या प्रकरणांत लेखकाने काही निरीक्षणे नोंदवली आहेत. भारतवर्षांच्या खंडप्राय आकारामुळे येथे अनेक राज्ये तयार झाली. त्यांच्यात संघर्ष झाले; पण चंद्रगुप्त मौर्य वा समुद्रगुप्तासारख्या शासकांच्या एकछत्री अमलात तुलनेने शांतता नांदली. त्याचा समाजाच्या प्रगतीला फायदा झाला. उत्तर सीमेवर जसे हिमालयाचे, पूर्व सीमेवर आसामच्या जंगलांचे आणि दक्षिणेला दोन्ही तीरांवर समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभल्याने तेथून फारसे हल्ले झाले नाहीत; पण वायव्येला तसे नैसर्गिक संरक्षण नसल्याने तेथून सर्वाधिक हल्ले झाले. तरीही त्या सीमेवर भारतीयांनी कधीही पुरेशी संरक्षक यंत्रणा उभी केली नाही. बहुतांशी हल्ल्यांच्या प्रसंगी भारतीयांनी शत्रूला फारसा तगडा प्रतिकार केला नाही. हल्लेखोरही येथेच स्थायिक झाले. भारतीय सैन्याची मनोवृत्ती वा पवित्रा कायमच बचावात्मक (डिफेन्सिव्ह) राहिला. भारतीय सैन्याने संख्याबळ अधिक असल्याचा फायदा कधीच करून घेतला नाही. सम्राट कनिष्काचा काळ वगळता भारतीयांनी परकीय भूमीवर कधी आक्रमण केले नाही. प्राचीन भारतीय सैन्याची व्यूहरचना कायम पंजाब

आणि गंगा-यमुनेच्या मैदानी प्रदेशाला अनुसरून केलेली होती. ती पर्वतीय वा जंगलातील युद्धाला अनुसरून कधीही नव्हती. यातील काही निरीक्षणे आजही लागू होतात.

अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य ही एक मोठी ताकद म्हणून उदयास आली होती आणि तिचा राजकारणातील हस्तक्षेप वाढला होता. ब्रिटिशांनी प्रथम १७९४ साली लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या सल्ल्यानुसार आणि पुढे १८५७ च्या बंडानंतर स्थापन झालेल्या ‘पील कमिशन’च्या शिफारसींनुसार सैन्याची रचना बदलली. त्यानंतर वेळोवेळी स्थापन झालेल्या आयोग आणि समित्यांनी सैन्याच्या रचनेत बदल सुचवले. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांदरम्यान सैन्याच्या भारतीयीकरणावर भर देण्यात आला. १९२५ साली स्थापन करण्यात आलेल्या ‘स्कीन समिती’त मोतीलाल नेहरू आणि मोहम्मदअली जिना यांचा समावेश होता. याच समितीच्या शिफारसीनुसार डेहराडून येथे ‘इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी’ (आयएमए) स्थापन झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सेनादलांचे पुरते स्वदेशीकरण झाले. त्यानंतर भारतीय सेनादले उत्तरोत्तर अधिकाधिक बलशाली होत गेली.

मात्र, बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी भारतीय सेनादले पुरेशी सक्षम नाहीत या मुद्दय़ाकडेही लेखकाने लक्ष वेधले आहे. सेनादलांची रचना अद्याप २० व्या शतकातील पारंपरिक युद्धांच्या अनुषंगाने केलेली दिसते. त्यात २१ व्या शतकातील तिन्ही सेनादलांच्या एकत्रित कारवायांच्या (जॉइंट ऑपरेशन्स) अनुषंगाने बदल होणे आवश्यक आहे. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी वेगळ्या क्षमता आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. सायबर आणि नेटवर्क-सेंट्रिक युद्धाचे आव्हान पेलण्यासाठी तांत्रिक क्षमता वाढवली पाहिजे. तिन्ही सेनादलांच्या आधुनिकीकरणाचा वेग अद्याप पुरेसा नाही. आधुनिक शस्त्रास्त्रे देशात तयार होत नाहीत आणि ती परदेशातून विकत घेताना खूप विलंब होतो. त्याचा विपरीत परिणाम देशाच्या संरक्षण सज्जतेवर होत आहे. हे वेळोवेळी दिसून आलेले मुद्दे लेखकाने अधोरेखित केले आहेत. भूदल, नौदल आणि हवाईदलासह निमलष्करी दले, सैन्याशी निगडित अन्य विभाग यांची रचना, कार्यपद्धती आदी बाबी लेखकाने सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. भारतीय सेनादलांचा इतिहास, संरचना आणि कार्यपद्धती समजावून घेण्यासाठी अभ्यासक तसेच सामान्य वाचकांच्या कधीही हाताशी असावा, असा हा एक संग्राह्य़ दस्तावेज आहे.

‘मिलिटरी हिस्टरी ऑफ इंडिया’

लेखक : उमा प्रसाद थाप्लियाल

प्रकाशक : रूपा

पृष्ठे : ५१६, किंमत : ९९५ रुपये