सुधीर शालिनी ब्रह्मे  

प्रसारमाध्यमं आणि विकासाची प्रक्रिया यांच्यातील परस्परसंबंध तपासणाऱ्या पुस्तकाचा परिचय..

व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या अनेक शब्दांचे नेमके अर्थ माहीत नसतानाही ते आपण वापरत असतो, अंधानुकरणाने किंवा फॅशन म्हणून. ‘स्मार्ट’, ‘सस्टेनेबल’, अगदी ‘डेव्हलपमेंट’सुद्धा त्यांपैकीच! ‘माइंडफुल कम्युनिकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट : पस्र्पेक्टिव्हज् फ्रॉम एशिया’ या पुस्तकात मात्र शीर्षकातील संदिग्धता स्पष्ट केलीय शब्दांच्या साद्यंत उलगडय़ासह. पुस्तकातील २३ लेख लिहिले आहेत प्रसारमाध्यमांशी थेट संबंध असलेल्या, तसेच जनसंवाद क्षेत्रात अध्यापन करीत असलेल्या विचारवंतांनी. आशियाई परिप्रेक्ष्यातून विकासाची वेगवेगळ्या अंगांनी वैचारिक मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे.

अझमान अझवान अझमावती, चाय मिंग हॉक आणि सोफियन यांनी मांडलेला मलेशियन दैनिकांतील वृत्तांकनाचा लेखाजोखा आणि थेरेसा पॅट्रिक सॅन दिएगो यांनी फिलिपाइन्समधील अमली द्रव्यांच्या अवैध व्यवहार करणाऱ्या टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी सरकारने राबवलेल्या मोहिमेत तुडविण्यात आलेल्या मानवी मूल्यांचा, अमानुष हत्याकांडाचा घेतलेला धांडोळा वाचताना ‘पळसाला पाने तीन’ याचा प्रत्यय येतो. मलाय, चिनी आणि भारतीय वंशाच्या लोकांमुळे मलेशियात संमिश्र संस्कृती नांदत असली, तरी हा देश मुस्लीमबहुल आहे. इथली वृत्तपत्रे सरकारने कायदेशीर, आर्थिक आणि राजकीय आयुधांचा वापर करून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या नियंत्रणात ठेवली आहेत. तरुण पिढीला लक्ष्य करून सरकारने या कारवायांना देशाभिमानाची जोडही दिली आहे. भारताचे प्रतिबिंब वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहत असल्याचे हे सर्व वाचताना प्रकर्षांने जाणवते. फिलिपाइन्समधील टोळीयुद्धाचा वृत्तान्त मुंबईतील चकमकींची आठवण करून देतो.

इतरत्र जे होतेय तेच आपल्याकडे होतेय, असे हतबल समर्थन सुपातल्या आपल्याला एक दिवस जात्यात नेऊन ठेवणार आहे. दुष्ट प्रवृत्तींच्या विरोधात पहिली बंडाची हाळी देण्याचाच अवकाश असतो, मग हाळीची दुंदुभी होण्यास वेळ लागत नाही. सत्कृत्याची सुरुवात स्वत:पासून करावी लागते. याच भूमिकेतून शाश्वत विकासाची १७ उद्दिष्टे २०३० सालापर्यंत साध्य करण्याचे ध्येय संयुक्त राष्ट्राने निश्चित केले. गरिबीचे उच्चाटन, सर्वासाठी समृद्धी आणि पृथ्वीचे रक्षण यांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या अंमलबजावणीस २०१६ च्या जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रसारमाध्यमांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. विवेकी पत्रकारितेचा नवा अभ्यासक्रम तयार करण्याची गरज आहे. त्यातूनच विवेकी संवाद माध्यम आणि त्याचा शाश्वत विकासाशी संवाद जोडण्याची संकल्पना पुढे आली. बँकॉकच्या चुलालाँगकॉर्न विद्यापीठातील संवादकला विभागाने त्या अनुषंगाने आशियाई विचारमंथन घडवून आणण्याचा प्रकल्प हाती घेतला. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने (युनेस्को) आंतरराष्ट्रीय विकास कार्यक्रमाद्वारे त्याला अर्थसाहाय्य केले आहे.

भारत, श्रीलंका, म्यानमार, चीन, भूतान, जपान, कंबोडिया, लाओस, मलेशिया, फिलिपाइन्स, दक्षिण कोरिया या देशांतील पत्रकारिता आणि जनसंवाद माध्यमांतील २५ अभ्यासकांनी विकासाची आदर्श वाटचाल कशी असावी, यावर आशियाई अध्यात्मवादाच्या दृष्टिकोनातून विचारमंथन केले आहे. विकास हा ‘शाश्वत’ (सस्टेनेबल) होण्यासाठी त्याला दिशा देण्याचे काम पत्रकारितेचे आहे आणि त्यासाठी पत्रकारांचा विवेक जागृत असणे महत्त्वाचे. मात्र ते होण्यासाठी पत्रकारितेचा सद्य:कालीन अभ्यासक्रम बदलणे गरजेचे आहे. कारण तो पाश्चात्त्य विचारसरणीवर आधारलेला आहे; ज्यात संघर्षांत्मक वृत्तांकनाला प्राधान्य देण्यात आले आहे. पाश्चात्त्य संस्कृती ही चंगळवादी आहे. या भोगवादी महावृक्षाला भांडवलदारी अर्थव्यवस्थेचे खतपाणी मिळाले आहे. असमानतेतच त्याची मुळे असून गरजेपेक्षा अधिकतेची, चैनेची हाव आणि ती भागविण्यासाठी होणारा भ्रष्टाचार, आहे-रे आणि नाही-रे यांच्यातील दरीतून उफाळणारा विद्वेष आणि गुन्हेगारी या दुष्टचक्रात समाज भरडला जात आहे.

संयुक्त राष्ट्र सचिवांना या कार्यक्रमासंदर्भात लिहिलेल्या पत्रात पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे, ‘जेव्हा आपण केवळ स्वार्थ पाहतो आणि व्यक्तिगत बाबींपेक्षा दुसरं काहीही महत्त्वाचं मानत नाही, तेव्हा मानवाच्या एकात्मिक विकासाचा आधार असलेला जगण्याचा हक्क आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मानवी पर्यावरणाचं रक्षण यांना धोका निर्माण होतो.’ कॅथलिक धर्मसत्ता चंगळवादविरोधी आणि म्हणून पाश्चात्त्य विचारसरणीला अपवाद आहे, असे म्हणता येईल. पोप यांचे हे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास कार्यक्रमास पूरक आहे, कारण त्यात सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे. मानवतावादी बैठक असलेल्या बौद्ध, कन्फ्युशियन आणि हिंदू/जैन तत्त्वज्ञानाच्या पुनरुज्जीवनातून निर्माण होणारा विवेकी विकास हाच भौतिकवादी विकासाला पर्याय ठरू शकेल, अशी मते या शोधनिबंधांतून व्यक्त झाली आहेत.

‘युद्ध माणसाच्या मनात उगम पावले, त्यामुळे शांतीचे रक्षणही मानवी मनातच विकसित व्हायला हवे’ या संयुक्त राष्ट्रांच्या उद्देशिकेस (प्रिएम्बल) अनुसरून सत्कृत्य करण्यास प्रवृत्त करणारी मार्गदर्शक तत्त्वे आणि समजूतदारपणा जीवनव्यवहारात आचरणारी बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित विपश्यना- ध्यानधारणेची तत्त्वे हीच विवेकी जनसंवादास पूरक आहेत, असा विचार फुवादोल पियासिलो या थायलंडच्या भिख्खूंनी मांडला आहे. ते जनसंवाद विषयातील चुलालाँगकॉर्न विद्यापीठाचे पदवीधर आहेत. क्वालालम्पूरमधील ‘बुद्धिस्ट चॅनल’चे संस्थापक लिम कुई फोंग, कोलंबो विद्यापीठातील जनसंवाद विषयाचे वरिष्ठ व्याख्याते सुगाथ महिंदा सेनारथ, बौद्ध साहित्यिक आनंदा कुमारासेरी, दक्षिण कोरियाचे एमी हायाकावा आणि अरीयारथना अथुगाला यांनी याच विचाराच्या पुष्टय़र्थ आपली मते मांडली आहेत.

थायलंडचे सामाजिक विचारवंत सुलक सिवारक्सा यांनी मात्र विपश्यना- ध्यानधारणेला बौद्ध धर्माशी फारकत घेणारा पलायनवाद म्हटले आहे. मध्यम आणि उच्चवर्णीयांमधली ती एक ‘फॅशन’ असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. भगवान बुद्धांचा अष्टांग मार्ग हाच योग्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. ध्यानधारणेत मानवी दु:ख- व्यक्तिगत व व्यक्तीसभोवतालचे- दुर्लक्षिण्याला महत्त्व दिले आहे; स्वाभाविकच पर्यावरणविषयक समस्यांना येथे थाराच नाही. अष्टांग मार्गात नकारात्मकतेवर मात करून एकात्मिक सकारात्मकता माणसात निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे, असे त्यांनी या आक्षेपाच्या समर्थनार्थ म्हटले आहे.

वृत्तपत्रांची भूमिका गौण ठरून जनसंवाद माध्यमे प्रभावी ठरत आहेत. कारण ती बैठकीच्या खोलीतून स्वयंपाकघरात, माजघरात पोहोचली आहेत. ही माध्यमे सर्वार्थाने ‘प्रचार माध्यमे’ झाली आहेत. त्यांचा सर्व प्रकारच्या जाहिरातबाजीसाठी उत्तम उपयोग भांडवलदार करून घेत आहेत आणि राजसत्ता त्यांनी आपल्या दावणीला बांधली आहे. सत्ता मिळविण्यासाठी त्यांचाच उपयोग केला जातो. या मुद्दय़ावर सर्वच विचारवंतांचे एकमत आहे. या माध्यमांच्या मदतीने, त्यांच्या प्रचारातून व्यक्त होणारा विकास हा अल्पजीवी आहे. मानवतेला सुरुंग लावणारे, महायुद्धाला, वसुंधरेच्या विध्वंसाला पूरक असे वातावरण निर्माण होत आहे. भौतिक विकास म्हणजे मानव संस्कृतीचा विकास नव्हे. आध्यात्मिक विकास हाच खरा विकास आहे, असे प्रतिपादन सर्वाच्याच विचारात प्रकटले आहे.

भारतीय परिप्रेक्ष्यातून शाश्वत विकासाची मांडणी केली आहे ती बिनोद अगरवाल आणि संजय रानडे यांनी. अगरवाल यांनी बौद्ध, जैन आणि हिंदू तत्त्वज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी धर्म-तत्त्वज्ञानापेक्षाही मौलिक संशोधनाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आहे. मुंबई विद्यापीठातील पत्रकारिता विभागप्रमुख संजय रानडे यांनी पत्रकारितेचा नवा अभ्यासक्रम रससिद्धांत आणि काव्यशास्त्रावर आधारित असावा, असा विचार मांडला आहे. हा विचार काहीसा बादरायणी संबंधावर आधारित असल्याने वैचारिकदृष्टय़ा तो अतार्किकही ठरतो. मात्र आपल्या सर्व विवेचनाचे सार मांडताना सामाजिक जबाबदारीचे भान पत्रकाराला असणे आवश्यक असल्याचे जे त्यांनी म्हटले आहे, ते सर्वस्वी योग्य व स्वीकारार्ह आहे.

या विचारमंथनातून प्रकटणारा सूर मात्र भेसूर नसला तरी बेसूर वाटतो. विकासाची प्रक्रिया नेहमी केंद्र ते परीघ अशीच असते. समष्टीपर्यंत पोहोचलेला विकास पुन्हा व्यक्तीकडे आणायचा म्हणजे कालक्रमणा उलटी करावी लागणार आहे. हा प्रवाह उलटविण्यासाठीच का केला एवढा अट्टहास, असा प्रश्न वाचकाला पडल्यास हा पुस्तकप्रपंच म्हणजे ‘संभ्रमामि युगे युगे’ असेच म्हणावे लागेल. आशियाई दृष्टिकोनातून विचार करता दोष केवळ पाश्चात्त्य विचारसरणीवर आधारलेल्या पत्रकारितेला देऊन चालणार नाही. आशियातील बहुतांश देशांत आज प्रचलित असलेली लोकशाही व्यवस्थाही पाश्चात्त्यच आहे. घोडे पेंड खातेय ते एकाच ठिकाणी, लोकशाहीला लायक ठरण्यासाठी आवश्यक असलेली सुज्ञता, सुजाणता आणि सजगता नागरिकांत नाहीये. त्यामुळे नागरी, सामाजिक आणि राजकीय साक्षरता वाढविण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळ्यांवर होणे ही खरी काळाची गरज आहे.

‘माइंडफुल कम्युनिकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट : पस्र्पेक्टिव्हज् फ्रॉम एशिया’

संपादन : कलिंगा सेनेविरत्ने

प्रकाशक : सेज पब्लिकेशन इंडिया प्रा. लि.

पृष्ठे : ३५३, किंमत : ९९५ रुपये

sudhir.brahme@gmail.com