‘माझ्याकडले वापरता येण्याजोग्या पासपोर्टपैकी एकही उरला नव्हता’ अशा भन्नाट वाक्यानं सुरू होणारं ‘मिस्टर नाइस’ हे पुस्तक १९९७चं आहे आणि त्याच्या कळकट जुन्या प्रती मुंबईपुण्याच्या फुटपाथवरल्या विक्रेत्यांकडेही स्वस्तात मिळू शकतात. अशा विक्रेत्यांकडे- म्हणजे ‘बुक स्ट्रीट’वर जाणाऱ्या दर्दी वाचकांना या पुस्तकाचं (सोबत छापलेलं) मुखपृष्ठ ओळखीचंही वाटेल. या पुस्तकाचा कर्ता हॉवर्ड मार्क हा नऊ एप्रिलच्या रविवारी आतडय़ाच्या कॅन्सरनं वारला. ‘मिस्टर नाइस’ हे हॉवर्ड मार्कचंच एक टोपणनाव. बनावट पारपत्रांवर (पासपोर्ट) लावण्यासाठी अशी कित्येक टोपणनावं त्यानं धारण केली होती. असे खोटे पासपोर्ट मिळवणं आवश्यक होतं, कारण तो अमली पदार्थाच्या बेकायदा धंद्यात होता. न्यूझीलंड (कॅरिबियन बेटं), मेक्सिको, युरोपात इटलीसह अनेक देश अशा ठिकाणी त्याला सतत संचार करावा लागे आणि ब्रिटन व अमेरिकेत त्याचे ग्राहक किंवा ‘क्लायंट’ बरेच होते.. यात हॉलिवुडचे अभिनेते आणि अभिनेत्री, ब्रिटिश रंगभूमीवरला एखादा नट, ब्रिटिश व्यावसायिक, पॉप संगीताच्या रेकॉर्ड (पुढे सीडी) काढणाऱ्या कंपन्यांचे मालक अशांचा भरणा होता.
त्यामुळे झालं काय की, हा हॉवर्ड मार्कसुद्धा सेलेब्रिटीच मानला जाऊ लागला होता. पण निव्वळ गिऱ्हाइकांची प्रभाच त्याच्यावर फाकली म्हणून नव्हे, तर स्वतचं व्यक्तिमत्व कसं ‘साजरं’ करायचं याची कला मार्कला उत्तम अवगत होती. तरुणपणापासून सौम्य अमली पदार्थच विकणाऱ्या मार्कला सन १९८८ मध्ये – म्हणजे त्याच्या वयाच्या ४२व्या वर्षी, या धंद्यात तो चांगला स्थिरावला असताना- अमेरिकेत अटक झाली. त्याच्याकडे अमली पदार्थच सापडल्यामुळे २५ वर्षांची कैदही ठोठावली गेली. मात्र पुढल्या सातच वर्षांत ‘चांगल्या वर्तणुकी’मुळे पॅरोल घेऊन हा सुटला आणि सरळ मायदेशात- ब्रिटनमध्ये येऊन अमेरिकेच्या त्या तुरुंगाचं नावही घ्यायचं नाही असं ठरवून राहू लागला! ब्रिटनमध्ये त्यानं पार्लमेंटची एक निवडणूकसुद्धा लढवली- म्हणे ‘‘माझा जाहीरनामा एकच- सौम्य अमली पदार्थ जे सध्या बेकायदा ठरले आहेत, त्यांच्या कायदेशीर व्यापाराला चालना देणे!’’
मार्क विकायचा ते अमली पदार्थ हेरॉइनसारखे तीव्र नव्हते, पण ‘एलएसडी’सारखे म्हणजे सौम्य असूनही निषिद्धच मानले जाणारे होते. आपल्या भारतात धनिकवणिक बाळांकडे कोकेन सापडल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. हे कोकेन नऊ ग्रॅमपेक्षा कमी सापडलं तर ‘सौम्य’ मानलं जातं. तेव्हा कोणते अमली पदार्थ ‘सौम्य’ मानायचे, याचे नियम निरनिराळे आहेत.
हॉवर्ड मार्क हा कायदे वगैरे सांगण्याच्या जंजाळात फार अडकत नाही. त्याच्या लेखी हे अमली पदार्थ वगैरेंचं जग हे ‘मित्रांचं जग’ आहे! कोणतेही गुन्हेगारी व्यवहार ‘विश्वासा’वरच चालतात, पण एकमेकांवर विश्वास ठेवण्याआधी असल्या लोकांचा स्वतवर जो भन्नाट विश्वास असतो, त्याचं अप्रूप वाचकांना नक्की वाटणार आहे, हे मार्कला समजलं होतं. ‘मिस्टर नाइस’ या पुस्तकातून ही समज दिसते.
हे पुस्तक १९९७ साली प्रकाशित झाल्यानंतर मार्कची लोकप्रियता वाढलीच! मग तो ‘स्टँड-अप कॉमेडियन’ झाला. स्वतचीच गोष्ट खुसखुशीत शब्दांत सांगण्याचे त्याचे हे एकपात्री प्रयोगसुद्धा प्रेक्षकांची दाद घेऊन गेले. खटल्यांमध्ये अडकल्यानंतर सुब्रतो रायसारखी मंडळी पुस्तकं लिहितात, तेव्हा त्याचा ‘खरा लेखक’ कोण याचीच चर्चा असते. पण तसली चर्चा कधीही हॉवर्ड मार्कबद्दल झाली नाही, याचं कारण तो किती गप्पिष्ट, गोष्टिवेल्हाळ आणि गमत्या आहे, याची साक्षात् प्रचीती त्याच्या त्या एकपात्री कार्यक्रमांतून येत होती. ‘‘माझे संबंध कोणाकोणाशी असल्याचं बोललं जायचं म्हायत्येय? ड्रग माफिया किंवा कार्टेल तर सोडाच, पण फुटीर ‘आयरिश रिपब्लिकन आर्मी’ आणि थेट ब्रिटिश हेरखात्याशी सुद्धा!’’असं मार्क सांगायचा.. तेव्हा हेरखातं खरोखरच मार्कच्या पाठीशी होतं का, असा प्रश्न लोकांना छळायचा.
मार्क हे सारं छान गमतीनं बोलावं तसं सांगतोय पण जगातल्या क्रूरकम्र्यापर्यंत त्याचे धागेदोरे पोहोचताहेत, असं ओरडून सांगू पाहणारे काही पत्रकार मार्कची लोकप्रियता वाढत असताना ‘अपशकुन’ करत होतेच. पण लोकप्रियतेच्या लाटेमध्ये बेअक्कलपणा अध्याहृतपणेच असतो, त्यामुळे अशी लाट जगात कुठेही आली तरी लाटेविरुद्ध पोहणाऱ्यांकडे नेहमी दुर्लक्षच केलं जातं. तसंच या पत्रकारांचं झालं. पुढे या ‘मिस्टर नाइस’वर आधारलेला त्याच नावाचा चित्रपटही आला. मग ‘स्वतंत्र कलाकृती’ म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा प्रघात पाळला गेला.
या साऱ्याच्या पलीकडे, ‘शांताराम’ किंवा ‘पॅपिलॉन’ यांमधल्या नायकांनी जो आत्मशोध घेण्याचा प्रयत्न केला, तो मार्कनं कधी केलेला दिसत नाही. पॅपिलॉनमधून अदम्य जीवनेच्छा दिसते, शांताराम मध्ये तृप्तीला आध्यात्मिक पैलूही असू शकतात हीजाण वाढत गेलेली दिसते, तसं काही हॉवर्ड मार्कनं लिहिलेल्या ‘मिस्टर नाइस’ किंवा खूप नंतरच्या ‘मि. स्मायली’ या पुस्तकांतून होत नाही. सखोलता नसल्यामुळे त्याचं लिखाण हे ‘गमजा’च ठरतं.