शहरीकरणाची स्वत:ची अशी एक प्रक्रिया असते. चंडीगड आणि नवी मुंबई ही सुनियोजित शहरे त्यास अपवाद आहेत. मात्र, गेल्या २० वर्षांत भारतातील शहरीकरणाची प्रक्रिया बकालीकरणाच्या दिशेने प्रवास करते आहे. हे असे होऊ द्यायचे नसेल तर या प्रक्रियेचा विविधांगी अभ्यास व्हायला हवा. हेच काम ‘अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिटय़ूट’ गेली काही वर्षे सातत्याने करते आहे. ठरावीक अंतराने प्रकाशित होणारा ‘मुंबई रीडर’ हा दस्तावेज हे त्याचेच उत्तम उदाहरण. त्यापैकी ‘मुंबई रीडर १९’ अलीकडेच प्रकाशित झाले. या निमित्ताने शहराचा विकास, त्याच्या विद्यमान व येऊ घातलेल्या समस्या यांचा वेध घेता येतो. ‘मुंबई रीडर’ने हा लेखाजोखा थोडा सोपा करण्याचे काम केले आहे. भारतातील इतर शहरांपेक्षा मुंबईचे शहरीकरण अनेक अर्थानी वेगळे आहे. त्यामुळे केवळ त्याचा उभा-आडवा छेद घेऊन भागत नाही, तर या छेदांमध्ये असलेल्या पोकळ्यांचाही वेध घ्यावा लागतो; तेव्हा कुठे मुंबईचे सर्वंकष वाटावे असे चित्र उभे राहते. असाच छेद घेण्याचा हा प्रयत्न आहे.

काळी-पिवळी टॅक्सी ही मुंबईची जुना ओळख. मात्र आता ओला-उबेरमुळे ती अस्तंगत होण्याच्या वाटेवर आहे का, याचा वेध घेणाऱ्या छावी शर्मा यांच्या लेखाने या दस्तावेजाची सुरुवात होते. त्यानंतर मुंबईतील इमारतींचे स्वयंपुनर्निर्माण (अदिती नायर, रोहित लाहोटी), शहरांचे नियोजन : तेव्हा आणि आता (शिरीष पटेल), प्लानिंग ई डिझास्टर (द. म. सुकथनकर व पंकज जोशी), बेस्ट बससेवा सर्वासाठी (समीरा खान), वारसा वास्तूंचे संवर्धन (व्ही. रंगनाथन), व्हिक्टोरिअन गोथिक आणि आर्ट डेको (सुकन्या शांता) या विषयांवरील लेखांचा यात समावेश आहे. यातील लक्षवेधी मांडणी करणारा आहे तो अमिता भिडे यांचा ‘द लोकल अ‍ॅज अ पॉलिसी स्पेस’ हा महत्त्वपूर्ण लेख. साधारणत: शहरीकरणाची नवी दिल्लीकेंद्रित केली जाणारी मांडणी व त्यात असलेल्या स्थानिक मुद्दय़ांचा अभाव याची अभ्यासपूर्ण मांडणी करत हा लेख मुंबईच्या नियोजनाचे वेगळेपण स्पष्ट करतो. तर तनुश्री वेंकटरमण यांचा लेख पूर्व किनारपट्टीवरील पोर्ट ट्रस्टची मोकळी होणारी जमीन मुंबईकरांसाठी मात्र किती अत्यल्प उपलब्ध असेल हा मुद्दा अधोरेखित करणारा आहे. खूप काळजीपूर्वक वाचावेत असे लेख आहेत ते नौझर भरुचा- मालती अय्यर आणि सुकन्या शांता यांचे. अगदी खेटून उभ्या असणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या इमारतींमुळे सामान्यांना ऊन, वारा कसा दुष्प्राप्य झाला आहे, याच अवस्थेमुळे मुंबईतील वस्त्यांमध्ये क्षयरोगाने कसे ठाण मांडले आहे, हे वास्तव त्यांतून समोर येते. सातत्याने सुरू असलेल्या बांधकामांच्या डेब्रिजची समस्या (जेन बोर्जेस, लक्ष्मण सिंग), प्लास्टिकची समस्या (वैष्णवी चंद्रशेखर), खारफुटींवर होणारे अतिक्रमण (बद्री चटर्जी), ट्रेडमिल टाइम्स (विद्याधर दाते) या लेखांशिवाय पावसाळ्यात मुंबईच्या होणाऱ्या तुंबईवर प्रकाश टाकणारे भाव्या दोरे आणि गीतांजली चंद्रशेखर यांचे लेख महत्त्वाचे आहेत. यात भाव्या दोरे यांचा लेख विस्तारित मुंबई असा उल्लेख होणाऱ्या वसई-विरारमध्ये गेल्या दोन वर्षांत निर्माण झालेल्या पावसाळ्यातील पूरस्थितीबद्दलचा आहे. तर आता शहराला पूरनियोजनाची गरज असल्याचे स्पष्ट करणारा लेख स्मृती कोप्पिकर यांनी लिहिला आहे. मार्टिना स्पाइस यांचा लेख खेळण्याच्या आक्रसत चाललेल्या जागांवर आहे. डॅरिल डिमॉन्टे यांचा वायुप्रदूषणावरचा लेखही यात समाविष्ट आहे. मात्र चेंबूर परिसरातील भयानक औद्योगिक प्रदूषणाबद्दल त्यात सविस्तर अपेक्षित होते, त्याऐवजी त्यात देशभरातील वायुप्रदूषणावर जागा वाया घालविण्यात आली आहे. मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाने धोक्याची पातळीही ओलांडली आहे, त्यावर लिखाण अपेक्षित होते. मात्र इथे अपेक्षाभंगच होतो. याशिवाय सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल उल्का महाजन, अजित रानडे आणि शांता गोखले यांचे लेख यात आहेत. मात्र हे लेख ‘मुंबई रीडर’मध्ये अस्थानी वाटतात. याशिवाय समीरा खान, ज्योती पुनवानी, पूर्वा देऊळकर, शाह आलम खान यांच्या काही अनुभवात्मक लेखांचाही समावेश यात आहे. शिवाय काही महत्त्वाचे न्यायालयीन निवाडे अखेरीस देण्यात आले आहेत.