रवींद्र कुलकर्णी

‘‘आपला ग्रंथसंग्रह हे एका अर्थाने आपले आत्मचरित्र असते. आपली पुस्तके आपल्या बाजूने वा आपल्याच विरुद्ध उभी राहतात. ज्या पुस्तकांना आपण आपले म्हणतो, त्यांच्यावरून आपला न्याय केला जातो’’.. पण असा ‘न्याय’ ब्रिटनमधून सोव्हिएत रशियाला फितूर झालेल्या किम फिल्बी याच्या ग्रंथसंग्रहावरून करण्याची शक्यता हाताशी येता येता मावळली.. कायमचीच!

‘दुहेरी हेर’, ‘फितूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किम फिल्बीबद्दल वाचण्याचे आकर्षण मला टाळता येत नाही. १९५० आणि ६०च्या दशकांत ‘एमआय-सिक्स’ या ब्रिटिश गुप्तचर संस्थेचे जे चार फितूर ‘केम्ब्रिज फोर’ या नावाने (कु)प्रसिद्धीला आले, त्यातले सर्वात महत्त्वाचे नाव किम फिल्बीचे. हा किम फिल्बी दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीपासून ‘एमआय-सिक्स’मध्ये काम करीत होता. युद्धानंतर त्याची नेमणूक अमेरिकेतल्या ब्रिटिश दूतावासात झाली. तिथे तो फर्स्ट सेक्रेटरी होता. त्या वेळेला अणुबॉम्बची वैज्ञानिक कागदपत्रे सोव्हिएत गुप्तहेरांमार्फत रशियाला पोहोचल्याचे ध्यानात आले होते. या प्रकरणाचे धागेदोरे ब्रिटिश दूतावासापर्यंत पोहोचले, पण ते किम फिल्बीपर्यंत भिडले नाहीत. मात्र नंतरच्या अनेक प्रकरणांत संशयाचा काटा त्याच्याकडे वळत राहिला. तरीदेखील, अशा प्रत्येक संशयातून कोणत्याही पुराव्याच्या अभावी फिल्बी सहीसलामत सुटत राहिला.

अखेर १९५१ साली त्याला राजीनामा द्यावा लागला. यानंतरही ब्रिटिश गुप्तचर संस्थेशी त्याचे संबंध पूर्ण तुटले नाहीत. त्याच्या प्रामाणिकपणाची हमी त्या वेळचे परराष्ट्रमंत्री खुद्द हेरॉल्ड मॅकमिलन (जे पुढे ब्रिटनचे पंतप्रधानही झाले) यांनी दिली होती. यावर गदारोळ वाढला तेव्हा किम फिल्बीनेच पत्रकार परिषद घेतली आणि आपला कम्युनिस्टांशी कोणताही संबंध नसल्याचे ठासून सांगितले. फिल्बी नेहमी अडखळत बोले, पण या पत्रकार परिषदेत सराईतपणे खोटे बोलताना तो ठाम होता. ब्रिटनमध्ये त्याच्या संपर्कात असणाऱ्या युरी मोदिन या सोव्हिएत गुप्तचर अधिकाऱ्याने ही मुलाखत चित्रवाणीवर पाहिली आणि फिल्बीच्या खोटे बोलण्याच्या कौशल्यावर मोदिन फिदा झाला. नंतर बैरुतमध्ये पत्रकार म्हणून काम करत असतानादेखील फिल्बी ‘एमआय-सिक्स’चा गुप्तचर (अंडरकव्हर एजंट) होता. १९६३ साली तो सोव्हिएत रशियाला संवेदनशील माहिती पुरवत असल्याची ब्रिटिशांची खात्री झाली. पण त्याला पकडण्याआधीच तो बैरुतमधून नाहीसा झाला आणि काही दिवसांनंतर सोव्हिएत रशियाच्या राजधानीत- मॉस्कोत उगवला! फिल्बीला ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ हा किताब त्यापूर्वीच देणाऱ्या ब्रिटनची जगभर नाचक्की झाली. आपला गुप्तचर अधिकारी सोव्हिएत रशियाच्या ‘केजीबी’चा एजंट होता, याची ब्रिटनला खात्री होण्यासाठी ३० वर्षे जावी लागली, यावरून फिल्बीच्या कौशल्याची कल्पना यावी.

अशा किम फिल्बीचा ग्रंथसंग्रह, तो रशियात राहू लागल्यावर वाढला.

ग्रॅहॅम ग्रीनसारखे प्रथितयश लेखक शेवटपर्यंत त्याचे मित्र होते. पुस्तके पुरवण्याकामी ते फिल्बीला मदत करत. खुद्द ग्रॅहॅम ग्रीनदेखील ‘एमआय-सिक्स’ या ब्रिटिश गुप्तचर संस्थेत काही काळ काम करत होते. ‘अवर मॅन इन हवाना’, ‘कॉन्फिडेन्शिअल एजंट’ यांसारख्या ग्रीन यांच्या कादंबऱ्या हेरगिरीवर आधारलेल्या आहेत. त्यांनी फिल्बीच्या ‘माय सायलेंट वॉर’ या आत्मचरित्राला प्रस्तावनादेखील लिहिली आहे. त्यात ग्रीन लिहितात, ‘मी फिल्बीला ३० वर्षे ओळखतो. काही काळ आम्ही एकत्र काम केलेले आहे. मी त्याच्याबद्दल हजारो शब्द लिहिलेले आहेत. अनेकदा मी त्याच्या मॉस्कोतल्या घरी राहिलेलो असताना त्याच्याशी रोज सात ते आठ तास बोललेलो आहे. त्याच्यावर लिहिल्या गेलेल्या २० पुस्तकांतला शब्द न् शब्द मी वाचलेला आहे. त्याच्या पत्नीच्या संपर्कात मी अजूनही असतो, त्याच्या मुला-नातवंडांना मी ओळखतो. पण मला कुणी विचारले की फिल्बी कसा माणूस आहे? तर मला कबूल करावे लागेल की, मला नक्की सांगता येणार नाही.’

१९८८ साली वयाच्या ७६ व्या वर्षी फिल्बी मॉस्कोत वारला आणि त्याची चौथी बायको रुफिना पुखोवा हिच्या नावाने बरीच पुस्तके व कागदपत्रे मागे ठेवून गेला. त्यांची किंमत तिच्या कल्पनेच्याही पलीकडे होती, हे या रशियन स्त्रीला त्या वेळी तरी माहीत नव्हते.

फिल्बीच्या ग्रंथसंग्रहाची कल्पना ग्रॅहॅम ग्रीन यांना पुरेपूर होती. ग्रीनकडल्या काही पुस्तकांना रिक गेकोस्की या ब्रिटनमधल्या दुर्मीळ पुस्तक विक्रेत्याने बरीच किंमत मिळवून दिली होती. या रिक गेकोस्कीच्या कानांवर फिल्बीच्या संग्रहाची माहिती ग्रीन यांनी घालताच तो काही दिवसांतच रुफिना पुखोवाला भेटण्यासाठी मॉस्कोत पोहोचला. त्या वेळपर्यंत रशियादेखील नुकताच कम्युनिस्ट जोखडाखालून स्वत:ला मुक्त करून घेत होता. फिल्बीचा हजारो पुस्तकांचा आणि कागदपत्रांचा संग्रह पाहताना गेकोस्कीला त्याचे महत्त्व ध्यानात आले.

या संग्रहात १९३० सालचे ‘हॅण्डबुक ऑफ मार्क्‍सिझम’ होते. रशियन अभिजात पुस्तके (क्लासिक्स) होती. गेकोस्कीला त्या संग्रहात लगेच विकत घेण्यासारखे पुस्तक दिसले ते म्हणजे ‘द स्पाय कॅचर’! पुस्तकावर ते ‘फिल्बी व रुफिनासाठी भेट’ म्हणून असल्याचा उल्लेख होता आणि त्याखाली स्वाक्षरी होती ती ग्रॅहॅम ग्रीन यांची. त्याचे हजार पौंड गेकोस्कीने लगेच फिल्बीच्या पत्नीला दिले आणि पुस्तक ताब्यात घेतले. अवघ्या ३५० पानी पुस्तकाचे हजार ब्रिटिश पौंड म्हटल्यावर रुफिनाचे डोळे लकाकले!

फिल्बीच्या ग्रंथसंग्रहालयाला महत्त्व असण्याचे कारण म्हणजे, प्रत्येक ग्रंथसंग्रह हा संग्राहकाच्या मनाचे प्रतिबिंब असतो. एवढेच नव्हे, तर संग्राहकाच्या मनात ग्रंथसंगती असते. म्हणजे काय असते? फिल्बीच्या मनातल्या ग्रंथसंगतीबद्दल नाही सांगता येणार, पण स्वत:चे उदाहरण सांगू शकेन. अलीकडेच ‘नॅशनल जिऑग्राफिक’ने प्रकाशित केलेल्या ‘द लॉस्ट गॉस्पेल ऑफ ज्युडास’ या पुस्तकाने माझे लक्ष वेधून घेतले. त्यात पपायरसच्या पानांवर लिहिलेली, ज्युडासने ख्रिस्ताच्या जीवनाच्या संदेशाचा जो शोध घेतला त्याची कथा होती. जवळपास १७०० वर्षे हे हस्तलिखित इजिप्तमधल्या नाइल नदीकाठच्या गुहेत दडून राहिले होते. त्याच पुस्तकाकडे लक्ष जाण्यामागे, खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या जी. ए. कुलकर्णीच्या ‘यात्रिक’मधल्या प्रश्नाचे माझे स्मरण ताजे होते. खऱ्या तोंडांनी काल्पनिक भाकरी खाण्याची धडपड करणारा सर्वाटिसचा सँको, डोके ताडताड आपटून घेणाऱ्या रानवट दिसणाऱ्या लाल केसांच्या ज्युडासला त्याने ख्रिस्ताला धोका देण्याचे कारण विचारतो. कथेतला ज्युडास ते नेमके सांगू शकत नाही. त्याचे उत्तर त्या हस्तलिखितात होते. ‘यात्रिक’ ही कथा असलेले जीएंचे ‘पिंगळावेळ’- धों. वि. देशपांडेंचे ‘जीएंच्या कथा : एक अन्वयार्थ’ हे पुस्तक- अन् नंतर ‘द लॉस्ट गॉस्पेल ऑफ ज्युडास’ अशी संगती आपोआप तयार झाली. ख्रिस्तापेक्षा ज्युडासबद्दल कुतूहल वाटावे, हासुद्धा मला किम फिल्बीशी जोडणारा धागा आहे.

‘‘आपला ग्रंथसंग्रह हे एका अर्थाने आपले आत्मचरित्र असते. आपली पुस्तके आपल्या बाजूने किंवा आपल्याच विरुद्ध उभी राहतात. ज्या पुस्तकांना आपण आपले म्हणतो, त्यांच्यावरून आपला न्याय केला जातो’’ – हे अल्बटरे मॅग्युअलचे म्हणणे खरे आहे. फिल्बी फितूर होता. देशद्रोही होता. त्याचे अनेक सहकारी त्यानेच दिलेल्या माहितीमुळे शत्रुपक्षाकडून पकडले गेले, काही मारलेही गेले होते. पण इली कोहेन, लिओपोल्ड ट्रेपर वा रिचर्ड सोर्जे अशा सर्वोत्कृष्ट गुप्तचरांपैकी एक होता. मैत्री आणि राजकारण यांत राजकारण आधी येते, असे त्याने म्हटले आहे. जो तज्ज्ञ फिल्बीच्या साऱ्या संग्रहाचा अभ्यास करेल तो त्याच्या मनाचा अंदाज घेऊ शकणार होता. यासाठी फिल्बीचा हा अख्खा ग्रंथसंग्रह एकाच ठिकाणी असणे मात्र अत्यंत महत्त्वाचे होते.

गेकोस्कीने नंतर दोन-तीन दिवस वाटाघाटी केल्या. त्यात फिल्बीच्या या अख्ख्या ग्रंथसंग्रहाची किंमत ६०,००० पौंड (१९९०-९१ च्या विनिमयदरांनुसार, सुमारे ४७ लाख रुपये) नक्की करण्यात आली.

रुफिना पुखोवाला इंग्रजी येत नव्हते, त्यामुळे हा व्यवहार घडत असताना एक माणूस रुफिनाचा मदतनीस, दुभाष्या म्हणून रिक गेकोस्कीशी वाटाघाटी करत होता. हा माणूस ‘केजीबी’ या रशियन गुप्तचर संस्थेचा माजी कर्मचारी होता, जो फिल्बीकडे इंग्रजी शिकला होता. या सर्व घडामोडींच्या मागावर आणखीही कुणी तरी होते..

.. हे आणखी कुणी तरी म्हणजे ‘सदबीज’ या प्रख्यात लिलाव संस्थेसाठी काम करणारा एक दलाल, असे नंतर स्पष्ट झाले. अर्थात तो दुभाष्या आणि हा दलाल, या दोघांनीही आपापली ओळख लपवून ठेवली नव्हती.

गेकोस्कीसाठी साठ हजार पौंड ही मोठी रक्कम होती, पण हा ग्रंथसंग्रह तर संवेदनशील होता. त्यामुळे त्याने फिल्बीचा हा अख्खा ग्रंथसंग्रह विकत घेण्यासाठी ‘ब्रिटिश लायब्ररी’ला हाताशी धरले. असा स्फोटक ठरू शकणारा संग्रह त्यांना हवाच होता, पण त्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे याची परवानगी मागितली. मात्र इकडे ब्रिटिश परराष्ट्र खात्याच्या परवानगीसाठी ब्रिटिश लायब्ररीने पत्र पाठविले न पाठविले तोच, तिकडे- रशियातून फिल्बीच्या बायकोच्या त्या दुभाष्या-मदतनीसाचा दूरध्वनी रिक गेकोस्कीला आला (तेव्हा ईमेल नव्हते!). या दूरध्वनी संभाषणात, त्याने थंडपणे त्यांचे ठरलेले ‘डील’ रद्द झाल्याचे कळवले. रिक गेकोस्कीने केलेल्या युक्तिवादाचा समोरच्या व्यक्तीवर काहीही परिणाम झाला नाही. उलट त्याने लगेच फोन ठेवून दिला.

एखादी गुप्तचर संस्था किती ‘सतर्क’ असते याचा अनुभव रिक गेकोस्कीला आलाच, पण हे नेमके कसे घडले असावे याचा अंदाजही त्याला बांधता आला नाही.

रुफिनाने फिल्बीचा ग्रंथसंग्रह आणि कागदपत्रे ‘सदबीज’ या लिलाव संस्थेला दिली. तिला मिळाले साधारण तेवढेच- म्हणजे साठ हजार पौंड. मग त्या ग्रंथसंग्रहातल्या पुस्तकांपैकी काहींचा (सर्व नव्हे, काहीच पुस्तकांचा) आणि वर फिल्बीचा सिगारेट लायटर, बॅग, पासपोर्ट अशाही वस्तूंचा लिलाव ‘किम फिल्बीच्या मालकीच्या वस्तू’ अशा शीर्षकाखाली ‘सदबीज’ने लंडनमध्येच, १९९४ सालच्या २५ एप्रिल रोजी केला.. आजचीच तारीख.. २६ वर्षांपूर्वीची! अन्य पुस्तकेही ‘सदबीज’च्या पुढल्या काही ग्रंथलिलावांमध्ये एकेक/ दोनदोन करून विकली गेली असतील, किंवा नसतीलही.

थोडक्यात, फिल्बीच्या ग्रंथ-कागदपत्रांचा संग्रह आता जगभरच्या कित्येक अनाम खरेदीदारांकडे विखुरला गेला.

यापुढे कुणालाही हा ग्रंथसंग्रह- पुस्तके आणि कागदपत्रे- एकत्रितपणे पाहून, त्याचा अभ्यास करणे हे अशक्य होऊन बसले. या ग्रंथसंग्रहाच्या फळ्यांवरून फितुराच्या मनाचा व आपल्या गाढवपणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिटिश लायब्ररी आणि ब्रिटिश परराष्ट्र खात्याला, हात कपाळावर मारून घेण्याखेरीज काहीही करता आले नाही.

बायबलमध्ये मेंढय़ांचा कळप विखरून जाताना पाहून प्रेषित जेरिमा शोकमग्न झाला आणि त्याने त्याचा दोष मेंढपाळांना दिला. किम फिल्बीचा ग्रंथसंग्रह एकत्र टिकवून ठेवण्याची रिक गेकोस्कीची धडपड फुकट गेली. त्याला हळहळत बसावे लागले, कारण खऱ्या ग्रंथप्रेमिकाची मैत्री तर ‘परमेश्वराच्या दूता’ला धोका देणाऱ्या ज्युडासशीही असते आणि अशा ग्रंथप्रेमींची विखुरलेल्या पुस्तकांबद्दलची आसदेखील, ‘‘आय विल शुअरली असेम्बल यू ऑल, ओ जेकब.. लाइक शीप इन फोल्ड..!’’ (बायबल : मिकाह : २.१२) अशीच असते.

kravindra@ gmail.com