भाषा ही माणसाच्या मेंदूची श्रेष्ठ  निर्मिती आहे. जगभरात ती वेगवेगळ्या पद्धतीने होत गेली. जे म्हणायचं आहे ते थेट  न म्हणता वेगळ्या पद्धतीने म्हणत त्यात नेमकेपणा आणि भाषेचं, बुद्धीचं सौंदर्य आणणं हा त्या भाषिक निर्मितीमधला एक महत्त्वाचा पैलू. म्हणींच्या स्वरूपात तो बहुतेक सगळ्याच भाषांमध्ये विकसित झालेला आहे. त्यामुळे म्हणी हा त्या त्या भाषांमधला महत्त्वाचा ठेवा आहे. त्या फक्त भाषिकदृष्टय़ाच महत्त्वाच्या नसतात, तर त्या त्या विशिष्ट समाजाचं प्रतिबिंब असतात. त्या त्या समाजाची मानसिकता, सांस्कृतिक वैशिष्टय़ं, तिथले रीतीरिवाज, समजुती, विचार करण्याची पद्धत या सगळ्याचं दर्शन म्हणींमधून होत असतं. भाषेच्या जरतारी वस्त्रामधली म्हणींची वीण घेऊन त्यातला स्त्रियांविषयीच्या म्हणींचा धागा तपासणं एवढं बारीक काम ‘नेव्हर मॅरी अ वुमन विथ बिग फीट’ या पुस्तकाच्या निमित्ताने मिनेक शिपर यांनी केलं आहे. आणि तेही कोणत्या एका विशिष्ट भाषेसंदर्भात नाही तर जगभरातल्या त्यांना उपलब्ध होऊ  शकणाऱ्या सगळ्या भाषांसंदर्भात.

मिनेक शिपर या ‘आंतरसंस्कृती वाङ्मय अभ्यास’ या विषयाच्या प्राध्यापक आहेत. अ‍ॅकॅडमिक स्कॉलर आहेत. जगभरातल्या विविध भाषांमधल्या म्हणींमधून दिसणारं स्त्रीजीवन टिपणारं त्यांचं ‘नेव्हर मॅरी अ विमेन विथ बिग फीट’ हे पुस्तक जगभर वाखाणलं गेलं आहे. या पुस्तकासाठी त्यांनी जगभरातल्या १५० देशांमधल्या २४० भाषांमधून १५ हजार म्हणींचा संग्रह केला. या म्हणींचं त्यांच्या त्यांच्या वैशिष्टय़ांनुसार वर्गीकरण केलं आहे. उदाहरणार्थ- स्त्रीशरीरावरून, विविध अवयवांवर बेतलेल्या म्हणी, मुलगी, पत्नी, आई, सासू, सून अशा स्त्रीजीवनातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, तसेच नातेसंबंधांवर आधारित म्हणी, प्रेम, लैंगिक जीवन, छळ यांच्यावर आधारित म्हणी. या सगळ्यांमधून जगभरात विविध संस्कृतींमध्ये पूर्वापारपासून स्त्रियांविषयी कोणकोणते समज-अपसमज आहेत, जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांमध्ये स्त्रियांविषयी पूर्वापार कसा विचार केला गेला आहे, सगळीकडे सातत्याने स्त्रियांना कसं दुय्यमच मानलं आणि वागवलं गेलं हे अधोरेखित होतं.

लेखिका म्हणते, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून होणाऱ्या स्थलांतरामुळे ठिकठिकाणच्या स्थानिक भाषिक, सांस्कृतिक गोष्टी आपल्याला समजायला लागल्या आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचा विचार आणि पुनर्विचार करणं शक्य आहे आणि आवश्यकही आहे. आज सगळं जग एका वैश्विक नागरिकत्वाच्या दिशेने चाललं आहे. अशा वेळी आज आपण कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे आणि कुठे पोहोचलं नाही पाहिजे हे समजण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल. त्याआधी आपण कुठून आलो हेही आपल्याला माहीत असायला हवे.

गेली १५ वर्ष शिपर यांनी हे काम केलं. त्यांच्या या सगळ्या कामामधून हाताला काय लागलं? याचं नेमकं उत्तर म्हणजे जगभरातल्या सगळ्याच समाजांच्या मानसिकतेमध्ये स्त्रियांविषयी पूर्वापार असलेली अत्यंत दुय्यमपणाची सखोल जाणीव. या पुस्तकाच्या शीर्षकातूनच ती खूप स्पष्टपणे व्यक्त होते. ‘नेव्हर मॅरी विथ अ वुमन विथ बिग फीट’ अर्थात- ‘तुमच्याहून मोठी पावलं असलेल्या स्त्रीशी कधीच लग्न करू नका’ असा उपदेश करणाऱ्या मालवई आणि मोझांबिक भाषेतील म्हणीशी तंतोतंत साधर्म्य असणारी म्हण मिनेक बाईंना चिनी भाषेत सापडली. चिनी भाषेत ती म्हण ‘मोठी पावलं असणारीला कधीच नवरा मिळत नसतो’ अशा अर्थाने येते. तेलुगु आणि हिब्रू भाषेतही या म्हणीशी साधर्म्य असणारी म्हण असल्याचं त्या नोंदवतात. तर संपूर्ण युरोपात ती ‘अ विमेन हू नोज लॅटिन विल नेव्हर फाइन्ड अ हजबंड’ अशा स्वरूपात येते. लॅटिन येणं याचा अर्थ विद्यापीठात शिकायला जाणं, सुशिक्षित असणं असा आहे. स्त्रीनं शिकणं,  शारीरिक- बौद्धिकदृष्टय़ा पुरुषाहून वरचढ असणं समाजाला मान्य नव्हतं हेच यातून दिसतं.

जगातल्या अगदी कमी लोकसंख्येच्या तसेच सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या भाषांमध्ये स्त्रियांविषयी अर्थाचं साधर्म्य दाखवणाऱ्या म्हणी सापडाव्यात हा योगायोग नक्कीच नाही. जगात संपर्क यंत्रणा आजच्यासारखी नसतानाच्या काळातही एकच विचार सगळीकडे मांडला जाणं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मानवी मेंदू सारख्याच प्रकारे काम करतो, असं म्हणता येईल.

स्त्रीचं शरीर, तिचं वागणं, तिचं गर्भाशय, तिचं जगणं यावरील आपलं नियंत्रण जाण्याच्या भीतीतून या समजुती निर्माण झाल्या असाव्यात. स्त्री ही घरातच असायला हवी हे अनेक म्हणी स्पष्ट करतात. पण त्यांची घरातली उपस्थिती पुरुषांना गोंधळात टाकते, त्यांच्या मनात भीती  निर्माण करते. तिला नियंत्रित ठेवण्यासाठी पुरुषाला अहोरात्र संघर्षच करावा लागतो असं यातून दिसतं.

सगळ्याच म्हणींमधून फक्त स्त्री-पुरुष असमानता, स्त्रीचं दुय्यम स्थान एवढंच दिसतं असं म्हणता येणार नाही. काही म्हणींमध्ये अतिशय तरल असा विनोददेखील आहे. जमैकातील  क्रीऑल भाषिकांत म्हण आहे की, ‘बाळाच्या वडिलांचं नाव हे बाळाच्या आईचं सर्वोच्च गुपित असतं’ किंवा डॉमिनिकन रिपब्लिकच्या  क्रिओल भाषेत म्हण आहे की, ‘जी सासूने किती बाऊल सूप प्यायलं हे मोजेल तिला उपाशी झोपावं लागेल.’ अर्थातच, अशा म्हणींची संख्या कमी आहे. एरवी आजच्या काळाच्या संदर्भात खटकतील, राग येण्यापेक्षा स्टिरिओटाइपची गंमत वाटेल अशाही म्हणी त्यात आहेत. उदाहरणार्थ, मोरोक्कोमधल्या लॅडिनो भाषेत म्हण पाहा- ‘माशाला पोहायला शिकवावं लागत नाही आणि स्त्रियांना बोलायला शिकवावं लागत नाही.’ पण बऊल भाषेतल्या एका म्हणीत तिचं हे बोलणंही इतकं महत्त्वाचं असतं, की ‘घर रिकामं असण्यापेक्षा वाईट  बायको असलेली परवडली’ असं ही म्हण सांगते! हौसा नावाच्या भाषेतली म्हण बाईच्याच संदर्भात गाईचा आधार घेऊन सांगते की, ‘गाईचं दूध काढण्याआधी तिला गोंजारावं लागतं.’

अशा काही म्हणी वगळल्या तर एरवी मात्र सगळ्याच समाजांनी स्त्रीच्या जगण्याला नकारात्मक संदर्भच दिला आहे. राजस्थानातली एक म्हण सांगते की, ‘मुलगी जन्मली तर तिला निवडुंगासारखं वाढवा आणि मुलगा जन्मला तर गुलाबाच्या फुलासारखं वाढवा.’ हीच राजस्थानी भाषा ‘स्त्रिया या वहाणांसारख्या कधीही बदलता येतात’ असं सांगते, तर व्हेनेझुएलामधील स्पॅनिश म्हण सांगते की- ‘स्त्रिया या बससारख्या असतात. एकजण बसमधून उतरतो, तर दुसरा त्या बसमध्ये चढतो.’ अरेबिक भाषा सांगते की, ‘अविवाहीत स्त्री म्हणजे खजूर नसलेलं पामचं झाड.’ तर जपानी भाषेने ‘स्त्रिया आणि वहाणा जुन्या होतात तेव्हाच जास्त वापरायला अधिक चांगल्या असतात’ असा सल्ला दिला आहे. ‘पायातली वहाण पायातच बरी’ हे मराठी भाषेनेही बजावले आहेच.

बहुतेक संस्कृतींनी स्त्रीच्या घराबाहेर पडण्यावर एवढय़ा मर्यादा घातल्या आहेत, की त्यातल्या म्हणींनी स्त्रियांनी मृत्यूनंतरच घराबाहेर पडलं पाहिजे, असं बजावून सांगितलं आहे. पश्चिम सहारा, अरेबिक, मघरेबमधल्या म्हणी सांगतात की, ‘लग्न आणि मृत्यू या दोनच गोष्टींसाठी स्त्रीने घर सोडलं पाहिजे.’ तर एका पश्तू म्हणीत ‘स्त्रीची जागा घरात आणि दफनभूमीत असते’ असं म्हटलं आहे. इंग्लंडमधल्या एका म्हणीनुसार ‘बाप्तिस्मा होतो तेव्हा, लग्न होतं तेव्हा आणि मृत्यूनंतर, अशा तीन वेळाच स्त्री घराबाहेर जाऊ  शकते.’ फ्रान्समधल्या कॅटॅलन भाषेने अगदी स्त्रियांच्या मृत्यूची चर्चा केली नाही, पण त्यांची तुलना मांजराशी केली आहे. ही भाषा म्हणते ‘स्त्रिया आणि मांजरं घरात, तर पुरुष आणि कुत्रे रस्त्यातच बरे.’ तर  इटालियन भाषेतल्या एका म्हणीनुसार ‘गाईंना आणि स्त्रियांना कधीच परदेशात पाठवू नये.’ एका इंडोनेशियन म्हणीनुसार ‘म्हशींना गोठय़ात, सोनं पाकिटात आणि स्त्रियांना घरातच ठेवलं पाहिजे.’

बऱ्याच भाषांमध्ये ‘घराबाहेर सोडलं तर स्त्रिया आणि कोंबडय़ा हरवू शकतात’ या आशयाची म्हण आहे. तर चिनी भाषा प्राणीपक्ष्यांशी तुलना करत स्त्रिया किती धोकादायक आहेत हे सांगताना म्हणते की, ‘स्त्रीचं सौंदर्य माशांना बुडायला आणि पक्ष्यांना खाली जमिनीवर पडायला भाग पाडतं.’ घाणामधली अशांटी नावाची भाषा तर ‘बायको ही ब्लँकेटसारखी असते, पांघराल तर उकडेल आणि बाजूला ठेवाल तर थंडी वाजेल’ असं सांगते! या सगळ्यात फक्त एक तिबेटी म्हण शहाणपणाची गोष्ट सांगते. ती म्हण अशी- ‘१०० पुरुषांचे आणि १०० स्त्रियांचे गुण एकत्र केले तर एक योग्य माणूस तयार होतो.’ अर्थात या सगळ्यात ‘आई म्हणजे दुसरा देवच’, ‘आईचं दूध सगळ्यात पवित्र’ यांसारख्या म्हणी आहेतच. पण आईपणाच्या पलीकडच्या स्त्रीकडे बघताना मात्र जराही संवेदनशीलता नाही, हेच ठळकपणे लक्षात येतं.

म्हण ही कोणत्याही भाषेतली सगळ्यात लहान अशी रचना किंवा भाषिक अभिव्यक्ती आहे. तो एक प्रकारचा साहित्यप्रकारच आहे. जगभरात तिच्यातून लिंगभेद प्रकर्षांने व्यक्त झाला आहे, असं या अभ्यासातून लक्षात येतं. स्त्री-पुरुषांचं नातं हे जगातलं सगळ्यात मूलभूत राजकीय नातं (बेसिक पोलिटिकल रिलेशनशीप) मानलं, तर आजवर ते असमानतेकडेच कसं झुकलेलं होतं हेच या पुस्तकातून पुढे येतं. या साऱ्यात पुरुषांचं हित जपणारा विचार कधी थेट तर कधी छुप्या पद्धतीने दिसतो.

खरं तर एक निरीक्षण असं सांगतं, की म्हणी, वाक्प्रचार यांचा भाषेत जास्त वापर स्त्रियांनीच केला आहे. त्यांच्या एकूणच अभिव्यक्तीवर एकेकाळी बंधनं असल्यामुळे जे म्हणायचं आहे ते थेट म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी हा आधार घेतला असणार. तो त्यांच्याच विरोधी असणं हा विरोधाभास या पुस्तकातून स्पष्ट दिसतो.

जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजांनी आता स्त्रीपुरुष समानतेच्या बाबतीत मोठा टप्पा पार केला आहे. त्यांची जागा आता माजघरात आणि दफनभूमीत नाही, तर त्या समाजात ताठ  मानेने वावरतात. अगदी आपल्याच मराठी समाजातलं उदाहरण घ्यायचं तर नवरात्रीच्या काळात खेळला जाणारा भोंडला आणि त्याची गाणी ही आता फक्त सांस्कृतिक गंमत उरली आहे. छळणाऱ्या सासूरवाडीबद्दल काहीही बोलता येत नाही म्हणून ते खेळांमधून आणि गाण्यातून व्यक्त करणं या असहाय्यतेच्या पातळीवरून स्त्री पुढे आली आहे. पण खेदाची गोष्ट म्हणजे, अगदी फक्त मराठीपुरता विचार केला तरी असं लक्षात येतं, की भाषेला वैभवशाली करणाऱ्या नवीन म्हणी आता फारशा निर्माणच होताना दिसत नाहीत. मुळात म्हणींचा भाषेतला वापरही तुलनेत कमी झाला आहे आणि नवीन म्हणी तयार होताना दिसत नाहीत. म्हणजे भाषेच्या पातळीवर आपण एका साचलेपणाच्या टप्प्यावर आलो आहोत का, असाही विचार व्हायला हवा.

याचाच पुढचा मुद्दा असा की, जगातली कोणतीही भाषा एका रात्रीत तयार झालेली नाही. साऱ्याच भाषा उत्क्रांत होत गेल्या आहेत. म्हणी, वाक्प्रचार, व्याकरण, उपमा, उत्प्रेक्षा असं सगळ्याच भाषांमधलं भाषावैभव ही विकसित होत गेलेली गोष्ट आहे. संज्ञापनाची साधनं मर्यादित होती तेव्हा हे सगळं वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये विकसित होत गेलं. आज ही साधनं प्रगत अवस्थेत आहेत. परंतु आज एकूण मानवजातीच्या जगण्याची व्याप्ती लक्षात घेता यापुढील काळात नवी भाषा उत्क्रांत होण्याची शक्यता माणसाने गमावली आहे का, असाही प्रश्न या म्हणींच्या निमित्ताने पडतो.

  • ‘नेव्हर मॅरी अ वुमन विथ बिग फीट – वुमेन इन प्रॉव्हर्ब्स फ्रॉम अराऊंड द वर्ल्ड’
  • लेखक : मिनेक शिपर
  • प्रकाशक : स्पिकिंग टायगर पब्लिशिंग प्रा. लि.
  • पृष्ठे : ४४३, किंमत : ५९९ रुपये.

वैशाली चिटणीस

vaishali.chitnis@expressindia.com