News Flash

हुकूमशाहीच्या पडद्याआड…

किम जोंग-उन हे या राजघराण्याची तिसरी पिढी. राष्ट्रपित्याचा दर्जा मिळवलेल्या आजोबांनी, म्हणजे किम यल-सुंग यांनी ४६ वर्षं राज्य केलं

‘बीकमिंग किम जोंग-उन’ लेखिका : जंग एच. पाक प्रकाशक : वनवर्ल्ड  पब्लिकेशन्स पृष्ठे : ३३६, किंमत : २,१५६ रुपये

|| अरुंधती देवस्थळे

उत्तर कोरियाचे राष्ट्रप्रमुख किम जोंग-उन यांची घडण कशी झाली, हे या पुस्तकातून कळतेच; पण त्या देशाची सद्य:स्थितीही ते दाखवून देते…

कोरियात दुसऱ्या महायुद्धाअखेरपर्यंत जपानी साम्राज्यवादी सत्ता होती. १९४५ मध्ये ती संपुष्टात आल्यावर उत्तर कोरियात रशियाचे आणि दक्षिण कोरियात अमेरिकेचं आधिपत्य सुरू झालं. १९५०-५३ च्या दरम्यान दोन कोरियांमध्ये युद्ध धुमसत राहिलं आणि लाखोंनी युद्धबळी गेले. एकीकरणाचे प्रयत्न उभयपक्षी फेटाळून लावण्यात आले. उत्तर कोरियात रशियन प्रभावाखाली समाजवादी म्हणवणाऱ्या कम्युनिस्ट हुकूमशाहीची सुरुवात झाली. इथंच किम घराण्याच्या निरंकुश सत्तेचा पाया घातला गेला. खऱ्या-खोट्या कहाण्या जनमानसात प्रभावीपणे पेरून, घराण्यातले पुरुष व स्त्रिया कसे दैवी शक्तीचे पाईक आहेत आणि त्यांना लाभलेल्या अद्वितीय गुणांनी परकीय राज्यकत्र्यांपासून स्वातंत्र्य मिळवून जनकल्याणासाठी सत्ता हाती घेणं हाच एकमेव मार्ग कसा आहे, हे जनतेच्या मनावर गोंदवलं गेलं. बदलत्या परकीय सत्तांना वैतागलेल्या, स्वातंत्र्याची स्वप्नं बघणाऱ्या, दारिद्र्याशी झुंजणाऱ्या जनतेला, असंच भव्यदिव्यतेचा दावा करणारं आणि स्थिरतेची हमी देणारं स्वदेशी नेतृत्व हवं होतं. ते किम यल-सुंग यांनी, म्हणजे किम जोंग यांच्या आजोबांनी, बरोबर हेरून हाती घेतलं. रशियन राजवट मोडून काढणं सोपं नव्हतंच. दोन तात्पुरती सरकारं आली-गेली आणि १९४८ मध्ये उत्तर कोरिया स्वतंत्र देश झाला; पण जनतेला मात्र अजून स्वातंत्र्य मिळालेलं नाही. किम घराण्याचं लोकसंमत एकछत्री साम्राज्य सुरू झालं, विरोधकांचा अतिशय क्रूर तऱ्हेने बीमोड करण्यात आला. अगदी स्वत:च्या कुटुंबातल्या लोकांचीही खैर केली गेली नाही. किम यल-सुंगना देशाचं जनकत्व बहाल करण्यात आलं! देशहिताच्या नावावर विरोधी आवाज दडपले गेले, घराण्याशी इमान बाळगणाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर नेमलं. त्यांचा आणि त्यांच्यानंतर सत्ताधीश झालेल्या त्यांच्या मुलाचे म्हणजे किम जोंग-यल वाढदिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे करण्याची प्रथा रुजवण्यात आली. त्यांची नावं अनेक संस्थांना दिली गेली आणि जागोजागी त्यांचे पुतळे, पोस्टर्स, घोषणाफलक उभारण्यात आले. एकूण काय, घराण्याचं ‘ब्रॅण्डिंग’ अविरत चालूच राहिलं. ही झाली पार्श्वभूमी!

शेजारी चीन आणि अमेरिका या दोन्ही महासत्तांशी संबंधात कुठलेही स्थायी धोरण निश्चित न करता, संयुक्त राष्ट्रांचे कुठलेही संकेत न पाळता, देशात कमालीची गरिबी असून केवळ अणुशक्तीच्या जोरावर ताठ्यानं राहणाऱ्या उत्तर कोरियाकडे जगाची नजर असते. पण संपूर्ण देशाभोवती, गेली काही वर्षं जसा काही पोलादी पडदा उभारलेला आहे. बाहेरच्यांना या देशातल्या घडामोडी आणि स्वत:च्या ‘मर्जीचा मालिक’ असलेल्या सत्ताधीश किम जोंग-उनबद्दल कितीही जाणण्याची गरज असली, तरी तिथं शोधपत्रकारितेतही कोणाची डाळ शिजतच नाही. हे कसं घडत असावं? गरिबी आणि जुलूमशाहीला पिढ्यान्पिढ्या निमूटपणे सामोरे जाणाऱ्या जनतेला काहीही आशादायक बदल समोर दिसत नाही. नागरिकांना देश सोडून कुठे जाताही येत नाही, देशाअंतर्गत प्रवासाला सरकारी परवानगी लागते. लोकसंख्येत २० टक्के मुलांची वाढ कुपोषणामुळे खुंटलेली असल्याचं ‘यूनिसेफ’च्या पाहणीत नोंदवलं आहे. निर्बंध इतके कडक, की दक्षिण कोरियन सिनेमा पाहणं, चिनी दूरचित्रवाणी बघणं किंवा बायबलची प्रत बाळगणं हे उच्च दर्जाचे गुन्हे मानले जातात, त्यासाठी लोकांना अमानुष हाल करून तुरुंगात डांबलं जातं. देशभर तुरुंग आणि राजकीय गुन्हेगारांसाठी छळछावण्या आहेत. अशा कैद्यांची संख्या सव्वा लाखाच्या आसपास! आणि तरीही या युगात, अडीच कोटी पूर्ण साक्षर जनता कडेकोट बंदोबस्तात गप्प राहते कशी? देशात प्रवेश मिळवण्यासाठी महत्प्रयासांती परवाना मिळतो आणि पर्यटकांना दाखवावी तशी मोजकी स्थळं दाखवली जातात. त्यांना तुम्हाला द्यायची असते ती आणि तेवढीच माहिती, जिग-सॉ पझलच्या तुकड्यांसारखी मिळू शकते.

या पार्श्वभूमीवर, आधी अमेरिकी गुप्तचर संस्था ‘सीआयए’मध्ये ‘अ‍ॅनॅलिस्ट’ आणि नंतर अमेरिकेची ‘डेप्युटी नॅशनल इंटेलिजन्स ऑफिसर फॉर कोरिया’ म्हणून काम केलेल्या जंग एच. पाक हिच्यासारख्या मूळ कोरियन वंशाच्या लेखिकेचं ‘बीकमिंग किम जोंग-उन’ हे स्वानुभव आणि शोधकार्यावर आधारित पुस्तक २०२० च्या अखेरीस बाहेर येतं, तेव्हा पहिल्याच आठवड्यात लाखो प्रती विकल्या जातात आणि वेगवेगळ्या देशांतून छपाईचे हक्क व अनुवादांसाठी विचारणा होऊ लागते, पत्रकार आणि अकादमिक वर्तुळात ते चर्चेचा विषय बनतं, यात आश्चर्य ते काय? याआधी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या अ‍ॅना फायफील्ड यांनीही किम जोंग-उन यांच्यावर ‘द ग्रेट सक्सेसर’ (२०१९) हे पुस्तक लिहिलं होतं, त्यावरही वाचकांच्या उड्या पडल्या होत्या. पण कोरियातून निसटलेल्या आई-बापांच्या लेकीनं ‘सीआयए’त स्थान कमावून लिहिलेलं पुस्तक, ‘सीआयए’च्या मान्यतेने प्रकाशित होतं तेव्हा त्याची अधिकृतता नक्कीच वाढते.

किम जोंग-उन हे या राजघराण्याची तिसरी पिढी. राष्ट्रपित्याचा दर्जा मिळवलेल्या आजोबांनी, म्हणजे किम यल-सुंग यांनी ४६ वर्षं राज्य केलं आणि सत्तेसाठी किम राजघराण्याला पर्याय राहणार नाही याची तजवीजही केली. १९९४ मध्ये, त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र किम जोंग-यल हे सिंहासनाचे सुनियोजित वारसदार बनले. राज्यावर येणारी परदेशी सत्तांची आक्रमणं, दुष्काळ आणि इतर देशांकडून घ्यावी लागणारी आर्थिक मदत यांसारखी आव्हानं पेलायला वडिलांनी मुलाला शिकवलं होतं. किम जोंग-यलनी २०११ पर्यंत, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत राज्य चालवलं. २०११ पासून किम जोंग-उन यांची राजवट सुरू झाली. त्यांच्या वाट्याला असलं कुठलं बडं आव्हान आलं नाही. दडपशाही आणि दहशतीसाठी लागणारं ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ मात्र त्यांना तयारच मिळालं.

किम राजघराण्याचे दोन्ही सत्ताधीश, म्हणजे किम जोंग-उन यांचे आजोबा आणि वडील ही दोन्ही माणसं हुकूमशाहीत अव्वल आणि रंगील्या तबियतीची. उंची कपडे, विदेशी भेटवस्तू, महागडी परदेशातून मागवलेली मद्यं आणि खाद्यपदार्थ, ग्लॅमरस बायकांशी संबंध, विशेषत: अल्पवयीन मुलींना राजमहालात बोलावून लैंगिक सुख घेणं या रोजच्याच गोष्टी! त्यांनी घालून दिलेली कुमारिकांच्या ‘प्लेझर स्क्वॉड’ची प्रथा अजूनही चालूच आहे. त्यात ठेवलेल्या सुंदरींना अनेक कसोट्यांतून जावं लागतं. सत्तेच्या २०-२५ वर्षांत, एकीकडे देश गरिबीत पिचत असताना राजघराण्याचे शंभरेक प्रशस्त प्रासाद आणि राजवाडे देशातील निसर्गसुंदर जागांवर उभे राहिले होते. मूळ राजवंशातली मंडळी आणि गणिका व त्यांची पोरंबाळं वेगळी ठेवली जात. जेव्हा सत्तांतराची वेळ होई तेव्हा राजाकडून त्याच्या ज्येष्ठ राजपुत्राला जबाबदारीसाठी तयार करण्यात येई आणि त्याचबरोबर अंगवस्त्रांच्या दोन मुलांचीही निवड राजाला काही झाल्यास कारभार सांभाळण्यासाठी होत असे. पण किम जोंग-उनच्या बाबतीत सगळंच उलटंपालटं झालं. नशीब बलवत्तर म्हणून ज्येष्ठ राणीपुत्र नसूनही, आईच्या महत्त्वाकांक्षेमुळे आणि स्वभावातील कमालीच्या आक्रमकतेमुळे वयाच्या आठव्याच वर्षी वडिलांनी किम जोंग-उनला सत्ता सोपवण्याचा विचार सुरू केला. त्याच्यात त्यांना देशाचं नेतृत्व करायला आवश्यक असलेले गुण स्पष्ट दिसत होते. आठव्या वाढदिवशी गोलमटोल किमने सैनिक अधिकाऱ्याचा गणवेश घातला होता; त्यावर कडी म्हणजे, खरेखुरे जनरल्स त्याला सलामी देत होते.

अधिकृत माहितीनुसार, किम जोंग-यलना दोन बायका आणि पाच गणिका. त्यांपैकी एक, जपानी नटी को याँग-हुई हिच्यापासून तीन मुलं झाली. दोन मुलगे आणि एक मुलगी. किम जोंग-उन हे मधले. मोठ्याचा स्वभाव मवाळ. हुई अतिशय महत्त्वाकांक्षी असल्यानं तिनं आपल्या मुलांना स्वित्झर्लंडच्या बर्नमधल्या आंतरराष्ट्रीय शाळेत दाखल केलं. म्हणून त्यांच्याकडून हुकूमशाहीतून सुटका मिळेल अशी जनतेला आशा होती. पण किमला शिक्षणात फारसा रसच नव्हता. ग्रेड्स फारशा चांगल्या नसत, पण त्याचं त्यांना काही वाटत नसावं. किमला फुटबॉल आणि बास्केटबॉल हे मैदानी खेळ मात्र खूप आवडत. २००१ मध्ये शालेय शिक्षण संपवून मायदेशी परतल्यानंतर किम जोंग-उन यांनी किम यल-सुंग विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी आणि लष्करी प्रशिक्षण घेतलं. त्यांचा ‘परफॉर्मन्स’ इतका चांगला होता म्हणतात, की ते संपताच, किमना फोर स्टार जनरलचा दर्जा मिळाला आणि देशाच्या सर्वोच्च सुरक्षा समितीत त्यांना सामील केलं गेलं.

विशीतच निरंकुश सत्ता हाती आल्यानं, चढलेल्या जोशातून त्यांना देशाची स्थिती खराब असली तरी अण्वस्त्रे व्यक्तिश: स्वत:च्या हातात ठेवून जगाला संशयमिश्रित धाकात टाकता आलं. विश्वसत्तेचा रोख ओळखून आपलं स्थान बळकट करण्यासाठी हायड्रोजन बॉम्ब आणि दीर्घ पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे बनवली. बैठकी, वाटाघाटी होत राहिल्या, पण किमच्या इराद्यांचा ठाव कोणाला लागलेला नाही. दक्षिण आणि उत्तर कोरियात कमालीचा फरक आहे. दक्षिण कोरिया आशियातल्या इतर देशांसारखा आहे; सेऊल ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनानंतर तर आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा नक्कीच उंचावली आहे. तर उत्तर कोरिया वर्गातल्या एखाद्या भांडखोर, एकलकोंड्या मुलासारखा बाजूला पडला आहे, राजवटीला अर्थात हेच तर हवं आहे.

किम जोंगना प्रश्न विचारलेले मुळीच आवडत नाहीत. सरकार कुठलेही आकडे किंवा तारखा जाहीर करत नाही. वेगवेगळ्या सूत्रांकडून मिळणाऱ्या आकड्यांनुसार शंभर टक्के साक्षरता असूनही ५०-५५ टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली, बकाल जिणं जगते आहे. इथे लठ्ठ माणसांचं प्रमाण लक्षात यावं इतकं कमी, बहुसंख्य कुपोषितच दिसतात. मुख्य व्यापार चीनबरोबर, निर्यातीपेक्षा आयातीचं प्रमाण बरंच जास्त! खुल्या व्यापाराला सरकार उत्तेजन देतं, त्याचा काही भाग राजाच्या तिजोरीत पाठवण्यात येतो. आयातीत ‘समाजवादी नंदनवना’चा आभास निर्माण करणाऱ्या, चंगळवादी तरुणाईला आकर्षित करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, फॅशन ब्रॅण्ड्स, उंची गाड्या, वाहनं, युरोपीय बाजारामधून येणारे चीज आणि चॉकलेटं वगैरे मोठ्या शहरी बाजारांत उपलब्ध आहेत. रशिया आणि चीनसारखीच पारंपरिक साम्यवादी बंधनं झुगारून समाजात आलेली चंगळवादाची त्सुनामी, किम जोंग युगात इथेही आहे. ‘अणुशक्ती’, ‘सेना’ आणि ‘मार्केट’ हे परवलीचे शब्द! साधारण ३७ टक्के जनता सैन्य किंवा सुरक्षेसंबंधी नोकऱ्यांत लावलेली आहे. दुसरीकडे श्रीमंतांची श्रीमंती भराभर वाढताना दिसते. कामगारांसाठी नोकरी सुरक्षा हक्क नाहीत. कायद्याची भाषा कोणी करतच नाही. अनेक लोक  भुकेचं दमन करण्यासाठी ‘मेथ’सारख्या अमली पदार्थांच्या आहारी गेलेले दिसतात. दोन्ही पुस्तकांत वेगवेगळ्या रीतीनं सांगितलं आहे की, जनमानसावर दहशतीचा इतका जबरदस्त पगडा आहे की सर्वसामान्य माणसं आपापसात बोलतानादेखील राजवटीविरुद्ध ब्र काढू धजत नसावीत. कोणाचा कोणावर विश्वास नसावा असं वाटतं. विद्रोहाची किंवा देशातून निसटण्याची कुणकुण सरकारला लागताच संशयितांना जबर शिक्षा होते.

आजोबा आणि वडिलांसारखी काहीही मुलूखगिरी खात्यावर जमा नसताना, सत्तेत आलेल्या ‘सायबरस्मार्ट’ किम जोंगनी प्रचार यंत्रणा कौशल्यानं वापरल्याचं दिसतं. आपण घराण्याच्या थोर परंपरेचे वारस आहोतच, पण ‘मिलिटरी जीनिअस’ असल्यानं देशाला आपल्या नेतृत्वाची किती गरज आहे, हे त्यांनी सर्वसामान्यांच्या गळी उतरवलं. किम सत्तेत आल्यापासून घराण्याच्या महत्तेची आणि देशाच्या थोरवीची भाषणं वेळोवेळी ठोकत असतात. शांत व्यक्तिमत्त्वाच्या सुंदर पत्नीबरोबर परदेशांत, अधेमधे स्वदेशात हिंडताना ते लोकांत मिसळल्यासारखं दाखवतात आणि ती छायाचित्रं प्रसारमाध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचवतात. संदेश स्पष्ट आहे : कर्ताधर्ता फक्त मीच आहे, माझ्याशी इमान राखा, जमेल ते आपल्या देशात आणून देईन. पाऊल वाकडं पडलं तर मात्र खैर नाही, हे तुम्ही पाहातच आला आहात.

असं असूनही करोनापर्वात देशाची आणखीच ढासळती अर्थव्यवस्था सावरणं अपरिहार्य झालं आहे आणि खदखदणाऱ्या असंतोषाची धग किमपर्यंत पोहोचली आहे. दक्षिण कोरियात हुकूमशाही लोकांनी संपवली, हे चिवट लढ्याचं उदाहरणही अस्वस्थ करणारं असावं. आजवर अण्वस्त्रं राखून, उद्दामपणे ओढून घेतलेली जपान, अमेरिका, रशिया, चीन व दक्षिण कोरियाची नाराजी आणि वाढते निर्बंध परवडणारे नाहीत. जगात एकही मित्रराष्ट्र नसल्याने, संयुक्त राष्ट्रांचे माजी अध्यक्ष बान कि मून यांच्या वारंवारच्या सल्ल्याने की काय, पण पंजा सैलावण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. आपण एक सन्मानजनक, आधुनिक नेतृत्व ठरावे ही ३७ वर्षीय किम जोंग-उनची तीव्र इच्छा आहे असं म्हणतात, हुकूमशाहीकडून त्या बदलाकडे नेणारा रस्ता त्यांनाच निवडावा लागणार आहे. पुस्तक अमेरिकी चष्म्यातून लिहिलं गेलेलं असलं, तरी ते पडद्याआड काय चाललंय त्याबद्दल बरंच काही सांगून जातं, ध्वनित करतं. त्यातून किम सरकारची धोरणं, संभाव्य बदलाची दिशा कळेल अशी अपेक्षा करणं योग्य नव्हतंच.

arundhati.deosthale@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2021 12:02 am

Web Title: north korean president kim jong un korea world war ii japanese imperialist power akp 94
Next Stories
1 परिचय : ते देखे कवी…
2 ‘भारतीय इस्लाम’चे अंतरंग…
3 बुकबातमी : नंतरचे सावरकर…
Just Now!
X