ग्रॅहॅम ग्रीन या कादंबरीकाराची ओळख लोकप्रिय कादंबरीकारअशीच राहिली आणि नोबेलसारख्या पारितोषिकांसाठी त्यांचा विचार झाला नाही.. मात्र यंदाच्या ३ एप्रिल रोजी त्यांच्या निधनाला २५ वर्षे होत असली, तरी त्यांच्या कादंबऱ्या आजही वाचल्या जातात, जुन्या पुस्तकांच्या दुकानांतून सहज म्हणून विकत घेतले तरीही ग्रॅहॅम ग्रीन यांचे पुस्तक सहसा हातून सोडवत नाही.. याचे महत्त्वाचे कारण असे की, ग्रीन या लेखकीय महत्ता समीक्षकांच्या हाती न सामावण्याइतकी विविधांगी होती..

‘सत्य आणि कल्पिताच्या सीमारेषेवरील कादंबरीकार’ अशी ग्रॅहॅम ग्रीन यांची ख्याती होती. ‘वास्तवातील माणसांपेक्षा मला माझ्या लेखनातील व्यक्तिरेखाच अधिक प्रिय आहेत आणि त्यांच्या सहवासात माझ्या आयुष्याचा बराच काळ गेला’ असे स्वत ग्रीन म्हणत, ते खरेही आहे. समीक्षकांनी त्यांच्या लेखनाला ‘ग्रीन लँड’ अशी संज्ञा दिली होती आणि ३० कादंबऱ्या, चार कथासंग्रह, सात नाटके, एक कवितासंग्रह आणि काही प्रवासवर्णने व ललितलेख संग्रह असा या ग्रीन लँडचा विस्तार आहे. त्यांच्या लेखनाचे जगातील २७ प्रमुख भाषांतून अनुवाद झाले आणि त्यांच्या पुस्तकांच्या एकंदर दोन कोटींहून अधिक प्रती खपल्या. त्यापैकी ‘द पॉवर अँड द ग्लोरी’, ‘द थर्ड मॅन’, ‘ब्रायटन रॉक’, ‘द मॅन विदिन’ या कादंबऱ्यांवर चित्रपट निघून तेही यशस्वी झाले.

ग्रॅहॅम ग्रीन यांचा जन्म १९०४ सालचा. पहिल्या महायुद्धाआधीचा त्यांच्या बालपणाचा काळ मुख्याध्यापक वडिलांच्या करडय़ा शिस्तीत गेला. ग्रॅहॅम यांची कल्पनाशक्ती तरल आणि बुद्धिमत्ताही असामान्य होती. घरातील धार्मिक वातावरणामुळे ते श्रद्धाळू वृत्तीचे झाले, पुढे मात्र हिंसा, क्रौर्य, विसंगती यांचे त्यांना जे दर्शन घडले, त्यामुळे पारंपरिक नीतिमूल्यांच्या ‘संस्कारा’तील फोलपणा त्यांच्या लक्षात आला. त्यांचे मानसिक संतुलन ढळले. काही काळ ते घर, शाळा सोडून पळूनही गेले होते. परतल्यावर मानसोपचार करवून, बरे होऊनच ते पुढे शिकू लागले आणि १९२५ साली ऑक्सफर्डहून पदवीधरही झाले. त्याच वर्षी त्यांचा ‘बॅबलिंग एप्रिल’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९२६ पासून लंडनच्या ‘द टाइम्स’मध्ये त्यांना नोकरी मिळाली, पण ती त्यांनी फार काळ केली नाही. पुढेही पत्रकारितेतील नोकऱ्या त्यांनी अल्पकाळासाठीच केल्या.

‘द मॅन विदिन’ (१९२९) ही  पहिली कादंबरी प्रकाशित होण्याआधी त्यांचा विवाह झाला होता. या कादंबरीला यश मिळाल्याने पूर्णवेळ लेखन करण्याचे त्यांनी ठरवले. प्रवासाची आवड प्रतिकूल परिस्थितीतही जोपसली. पत्नी व दोघा लहान मुलांना लंडनमध्येच सोडून, १९३४ मध्ये लायबेरियाच्या असुरक्षित प्रदेशात त्यांनी भटकंती केली होती. हा अनुभव पुढे ‘अ जर्नी विदाउट मॅप’मध्ये कामी आला. हैतीमधील कुप्रसिद्ध बेबी डॉक डय़ुविलिए यांच्या कारकीर्दीसंदर्भातील ‘द कॉमेडिअन्स’ ही कादंबरी वादग्रस्त ठरली, पण तिच्यातील चित्रण वास्तवदर्शी होते हे पुढे हैतीतील क्रांती आणि प्रतिक्रांतीमुळे सिद्ध झाले. असेच काहीसे ‘द क्वाएट अमेरिकन’ बद्दलही घडले. १९५५ सालच्या या कादंबरीने,  अमेरिका-व्हिएतनाम युद्धाची शक्यता वर्तविली होती. तेव्हा उभय देशांचे संबंध पाहता ते अशक्य वाटत होते, पण त्याच वर्षी नोव्हेंबरात अमेरिकी सैन्य व्हिएतनाममध्ये उतरले.

केवळ राजकारण नव्हे, तर जीवनाच्या सर्व अंगांत रस असणाऱ्या ग्रीन यांनी महायुद्धकाळात हेरगिरीही केली होती. क्रांतिपूर्व क्युबाची पाश्र्वभूमी असलेली ‘अवर मॅन इन हवाना’ आणि स्पेनमधील यादवीच्या काळात लिहिली गेलेली ‘द कॉन्फिडेन्शिअल एजंट’ या कादंबऱ्यांचे नायक गुप्तहेर आहेत. ‘ब्रायटन रॉक’मध्ये गुन्हेगारी अधोविश्वाचे चित्रण आहे तर ‘स्तंबूल ट्रेन’ इस्तंबूलपर्यंतच्या प्रवासातील (हीच गाडी पुढे ‘ओरिएंट एक्स्प्रेस’ झाली) चौघा सहप्रवाशांच्या मनोव्यापारांचे रंजक वर्णन येते आणि एक मोठे व्यावसायिक कंत्राट नायकाच्या हातून का गेले, याचा उलगडाही आधी रंजक वाटणाऱ्या त्या घटनाक्रमामुळेच शेवटी होतो. ‘अ गन फॉर सेल’चा नायक धंदेवाईक मारेकरी, तर ‘द हार्ट ऑफ द मॅटर’चा दक्षिण आफ्रिकेत पोलीस अधिकारी आहे. मद्यपी, जुगारी, अमली पदार्थाचे व्यापारी आणि व्यसनी, यांचे चित्रण करणाऱ्या ग्रीन यांनी राजकीय अस्थिरतेची चित्रणे उत्तम केली आहेत. पत्रकाराच्या शोधक नजरेने वास्तव हुडकण्याचे त्यांचे कसब वादातीत होतेच, पण कथानके पूर्णत काल्पनिक असूनही ती वास्तव वाटावीत, हे त्यांचे खरे बलस्थान.

तरीही काही समीक्षक त्यांना ‘कॅथॉलिक कादंबरीकार’ म्हणतात, यामागे कारणे आहेत. मेक्सिको, क्युबा यांचे  आकर्षण असलेल्या ग्रीन यांनी १९३७ साली मेक्सिकोतून रोमन कॅथलिकांचे उच्चाटन करून टाकण्यासाठी चाललेल्या धार्मिक छळाचा वृत्तान्त लिहिण्याचे काम पत्करले होते. उद्ध्वस्त चर्चेस, बऱ्याच धर्मोपदेशकांना ठार मारलेले आणि त्याहीपेक्षा अधिक जीव वाचवण्यासाठी पळून गेलेले.. ही स्थिती त्यांनी पहिली व त्याचा वृत्तान्त ‘द लॉ-लेस रोड’  या नावाने प्रसिद्धा झाला. मात्र याच शोधभटकंतीत, जंगलात लपून बसलेल्या एका पाद्रय़ाची हकीगत त्यांना समजली, ती पुढे ‘द पॉवर अँड द ग्लोरी’चा विषय झाली.  या कादंबरीचा नायक पाद्री असला, तरी तो कमालीचा मद्यासक्त बनला आहे. त्याला अनैतिक संबंधांतून एक मुलगाही होतो (आणि पुढे, दारूच्या नशेत ती मुलगी आहे असे समजून ता धार्मिक विधिपूर्वक मुलीचे नाव ठेवतो).. असे असले, तरी धर्मतत्त्वांवर त्याची अपार श्रद्धा आहे आणि धर्मप्रचाराचे काम तो प्रामाणिकपणे करतो आहे. माणसाचे कार्य हे त्याच्या व्यक्तिगत जीवनापेक्षा मोठे असते; तरीही व्यसनाधीनतेमुळे आणि अनैतिक वर्तणुकीमुळे आपण आयुष्यात काहीच साध्य करू शकलो नाही, असे त्याला वाटते. शेवटी एक भिकारी (समीक्षकांच्या मते याचे साम्य ज्युडासशी आहे) त्याची चुगली करतो. पोलीस त्याला पकडतात, लोकांसमोरच गोळय़ा घालून ठार मारतात. मात्र त्याच्या मृत्यूने त्याच्या धर्मबांधवांत श्रद्धेची ज्योत प्रज्वलित होते आणि त्याच्या मृत्यूलाही हौतात्म्याचे परिणाम प्राप्त होते. या कादंबरीविरुद्ध वादळ उभे राहिले होते.. तिच्यावर बंदी घालण्याचा विचारही मांडला गेला.. पण तत्कालीन पोप पॉल (सहावे) यांनीदेखील ती कादंबरी वाचली होती, त्यांना ती आवडली होती आणि ग्रीन यांना त्यांनी तसे सांगितलेही होते.. अर्थातच, हा वाद अल्पजीवी ठरला आणि कादंबरी तगली.

पापसदृश कृत्य हातून घडल्यावर, सदसद्विवेकबुद्धीच्या चरकात पिळून निघालेला नायक केवळ धर्माला अपेक्षित असलेल्या नैतिकतेसंदर्भात आपल्या कृत्यांची संगती लावतो आणि मग एकतर वेदनामार्गावरून अपरिहार्यपणे वाटचाल करतो किंवा मरणाला तरी कवटाळतो. या लेखनपद्धतीमुळे केवळ ‘कॅथलिक’ नव्हे, तर ‘आत्यंतिक निराशावादी’ असाही शिक्का ग्रीनवर बसला. पुढे १९७८ साली प्रसिद्ध झालेली ‘द ह्यूमन फॅक्टर’ ही वरवर हेरकथाच, पण तिचा ब्रिटिश गुप्तहेर नायक रशियाकडे मायदेशाची गुपिते फोडतो, त्या गुन्ह्यातून नामानिराळा राहातो आणि गुपिते फोडल्याबद्दल मृत्युदंडाची शिक्षा मात्र त्याच्या निरपराध सहकाऱ्याला होते. पुढे जगूनही हा नायक आतून उद्ध्वस्त होतो. ‘द मिनिस्ट्री ऑफ फिअर’चा नायक अपंग पत्नीची ‘यातनापर्वातून सुटका करण्यासाठी’ तिला ठार मारतो आणि उर्वरित आयुष्य अपराधीपणाच्या दडपणात घालवतो.

केवळ लेखनाशीच प्रामाणिक राहिलेल्या ग्रीन यांनी कधीही एकच एक  विचारसरणी जपली नाही. त्यांचे व्यक्तित्व विविधांगीच राहिले आणि विरोधाभासांनी भरलेलेही राहिले. काही काळ त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता, पण लवकरच भ्रमनिरास होऊन ते रशियाविरोधी बनले. रशियातील साम्यवादी अत्याचारी राजवटीचा निषेध म्हणून स्वतच्या पुस्तकांच्या रशियन भाषांतरांस त्यांनी मज्जाव केला.

ग्रॅहॅम ग्रीन भारतातही अनेकदा येऊन गेले होते. विनोबा भावे यांची भूदान चळवळ, आणीबाणीआधीच्या काळातील जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन यांबद्दल  त्यांना ममत्व होते.  नवोदितांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रीन यांच्या शिफारशीमुळे, ‘स्वामी अँड फ्रेंड्स’ या आर. के. नारायण यांच्या  अजरामर कादंबरीला बडे प्रकाशनगृह मिळाले, असे म्हणतात.

‘मृत्यूपेक्षा मी म्हातारपणाला भितो’ असे म्हणणारे ग्रीन ८६ वर्षे जगले. मात्र अखेरच्या तीन वर्षांत त्यांच्याकडून लेखन झाले नाही. १९८८ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘द कॅप्टन अँड द एनिमी’ ही कादंबरी त्यांची अखेरची ठरली आणि ३ एप्रिल १९९१ रोजी त्यांची प्राणज्योत निमाली.