पारंपरिक अर्थशास्त्राच्या पाठय़पुस्तकांत वर्णिलेला ‘अर्थपरायण मानव’ आणि रोजच्या जगण्यातील खरीखुरी माणसे यांच्या वर्तनात फरक असतोच. खऱ्याखुऱ्या माणसांना त्यांच्यासमोरच्या उपलब्ध पर्यायांतून निवडीचे स्वातंत्र्य हवे असतेच, परंतु हे स्वातंत्र्य कशा प्रकारे वापरावे याचे मार्गदर्शनही करणे गरजेचे असते.. यासाठी ‘लिबर्टेरियन पॅटर्नालिझम’ या आगळ्या-वेगळ्या व्यवस्थेचा आग्रह धरणारे- अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्काराचे यंदाचे मानकरी ठरलेल्या  रिचर्ड थेलर यांनी वर्तणुकीय अर्थशास्त्राचे आणखी एक तज्ज्ञ कॅस सन्स्टीन यांच्यासमवेत लिहिलेले हे पुस्तक..

शिकागो विद्यापीठाच्या ‘बूथ स्कूल ऑफ बिझनेस’मधले प्राध्यापक आणि अर्थतज्ज्ञ रिचर्ड थेलर हे यंदाच्या अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले. ते त्यांच्या ‘वर्तणुकीय अर्थशास्त्रा’च्या (Behavioral Economics) सिद्धांतासाठी विशेष करून ओळखले जातात. पारंपरिक अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र यांची सांगड घालून जनसामान्यांच्या निर्णयप्रक्रियेचे विश्लेषण करून त्याबाबत त्यांनी काढलेले काही निष्कर्ष, याचा पुरस्कारासाठीच्या निवड समितीने विशेष गौरव केला आहे. शिकागो आणि हार्वर्ड येथे अध्यापन केलेले कायद्याचे आणि वर्तणुकीय अर्थशास्त्राचे तज्ज्ञ कॅस सन्स्टीन यांच्याबरोबर सुमारे एका दशकापूर्वी थेलर यांनी ‘नज- इम्प्रूव्हिंग डिसिजन्स अबाऊट हेल्थ, वेल्थ अ‍ॅण्ड हॅपीनेस’ हे पुस्तक लिहिले आणि अर्थशास्त्रीय चर्चाना एक नवी दिशा दिली.

raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
TDS on salary tax regime
पगारावरील टीडीएस वाचवण्यासाठी जुनी की नवी कोणती कर रचना निवडणार? जाणून घ्या
System for one vote of disabled person in remote village
लोकशाहीची खरी ताकद! दिव्यांग व्यक्तीच्या एका मतासाठी यंत्रणा दुर्गम गावात
Andhasraddha Nirmulan Samiti
अर्ज भरण्यासाठी मुहूर्त पाहणाऱ्या उमेदवारांमुळे अंधश्रद्धेला खतपाणी – अंनिसचा आक्षेप

आधुनिक लोकशाहीमध्ये नागरिकांना त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या पर्यायांची निवड करण्याचे स्वातंत्र्य मोठय़ा प्रमाणात मिळणे अपेक्षित असते. पारंपरिक अर्थशास्त्रात माणसे अत्यंत तर्कशुद्धपणे आणि भावनेच्या आहारी न जाता विचार करू शकतात, असे गृहीत धरलेले असते. अर्थशास्त्राच्या पाठय़पुस्तकात वर्णन केलेल्या अशा प्रकारच्या ‘अर्थपरायण मानवा’बद्दल लेखक उपरोधाने म्हणतात की, ‘हा आइनस्टाइनप्रमाणे विचार करू शकतो, त्याची स्मृती आयबीएम बिग ब्लू संगणकाइतकी असते आणि त्याची इच्छाशक्ती महात्मा गांधींएवढी असते!’ लेखकांनी पुढे अनेक ठिकाणी असे काल्पनिक अर्थमानव आणि रोजच्या आयुष्यातली खरी माणसे यांच्या वर्तनात कसा फरक असतो याची चर्चा केली आहे.

जितके जास्त पर्याय उपलब्ध असतील तितकी लोकांना निवड करण्यासाठी मदतीची गरज असते. त्यासाठी एक वेगळी व्यवस्था लेखकांनी सुचवली आहे. या व्यवस्थेचे वर्णन करण्यासाठी वापरलेला ‘Libertarian Paternalism’ (म्हणजे अधिकाऱ्यांकडून कोणतीही ढवळाढवळ न होता लोकांना निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य देणारी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांचे निवडीचे स्वातंत्र्य काढून घेणारी व्यवस्था) हा शब्दप्रयोग म्हणजे तत्त्वत: वदतोव्याघात आहे. पण व्यवहारात तसे नाही, अशी लेखकांची भूमिका आहे. लोकांना निवडीचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे अशी ठाम भूमिका घेताना, ते स्वातंत्र्य कशा प्रकारे वापरावे याबद्दल त्यांचे काही प्रबोधन करणेही आवश्यक असते, हे लेखकांच्या भूमिकेचे सार आहे.

लोकांवर एखादी गोष्ट लादण्याऐवजी त्यांना ‘नज’ करणे, म्हणजे एखादी हलकीशी कोपरखळी किंवा धक्का देऊन त्यांचे लक्ष वेधून घेणे आणि ती गोष्ट करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे, हा मार्ग लेखकांनी सुचवला आहे. अर्थमानव मात्र अशा धक्क्यांकडे दुर्लक्ष करतो आणि प्रामुख्याने फायद्याच्या गोष्टींनाच प्रतिसाद देतो. या धक्क्यांमुळे सामान्य लोकांच्या निवडस्वातंत्र्यावर कोणतीही बंधने येत नाहीत. अमुक एकच निवड करावी अशी सक्ती केली जात नाही. पण लोकांनी कशी आणि कोणती निवड करावी यासाठी त्यांना एक प्रकारचे मार्गदर्शन केले जाते. असे मार्गदर्शन करणाऱ्यासाठी लेखकांनी ‘निवड शिल्पकार’ असा शब्दप्रयोग वापरला आहे.

लोक ज्या परिस्थितीत निर्णय घेतात त्यासाठी मागचा-पुढचा संदर्भ पुरवणे ही निवड शिल्पकाराची जबाबदारी असते. मुक्त बाजारपेठेच्या समर्थकांच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे, सक्ती आणि बंदी याऐवजी प्रलोभने आणि मार्गदर्शक धक्का यांचा वापर झाला तर सरकारचा आकार आणि आवाका मर्यादित राखता येतो. निवडीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना हेरॉइन, वेश्याव्यवसाय, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे अशा काही गोष्टींवर सरकार बंदी आणू शकते, हे मात्र लेखकांनी मान्य केले आहे.

निवड शिल्पकार देऊ शकतील अशा मार्गदर्शक धक्क्यांची अनेक उदाहरणे या पुस्तकात दिलेली आहेत. अमेरिकेतल्या शाळांमध्ये मुलांच्या दुपारच्या जेवणाची सोय स्वयंसेवा (बफे) प्रकारच्या भोजनकक्षात केली जाते. एका प्रयोगात, या कक्षात केवळ अन्नपदार्थाची मांडणी आणि क्रम यांच्यात बदल केल्यामुळे मुले काय खातात आणि किती खातात यात फरक पडलेला दिसून आला. त्यातून अनेक पदार्थाच्या खपात २५ टक्क्यांपर्यंत घट किंवा वाढ करणे शक्य होते, असेही लक्षात आले.

मतपत्रिका छापताना ज्या उमेदवारांचे नाव आधी येते, त्यांना काही प्रमाणात फायदा होतो असा अनुभव आहे. जर एखाद्याने विशिष्ट उमेदवाराला फायदा होईल अशा क्रमाने मतपत्रिका बनवली, तर तो निवड शिल्पकाराची भूमिका बजावत असतो. आपल्या मुलांना शिक्षणाचे कुठले पर्याय आहेत हे सांगताना स्वत:चे मत स्पष्टपणे किंवा सूचकतेने सांगणारे पालकही निवड शिल्पकारच असतात. लोकांच्या निवडस्वातंत्र्याबाबत टोकाची भूमिका घेणाऱ्या लोकांच्या दृष्टीने कोणताही मार्गदर्शक धक्का नि:पक्ष किंवा तटस्थ नसतो. सहज, सोप्या निवडीचे खरे स्वातंत्र्य हाच त्यावर उतारा असू शकतो.

मार्गदर्शक धक्के कसे देता येतील यासाठी लेखकांनी काही तंत्रे आणि पद्धती सुचवल्या आहेत. लोकांकडे रु. ५०, ७५, १०० किंवा १५० अशा देणग्या मागण्यापेक्षा रु. १००, २५०, १००० किंवा ५००० अशा देणग्या मागितल्या तर जास्त देणग्या मिळण्याची शक्यता असते. जेव्हा उपलब्ध (मर्यादित) माहितीनुसार लोक एखाद्या दिशेने निर्णय घेत असतील तेव्हा त्यांना अधिक माहिती देऊन- म्हणजेच मार्गदर्शक धक्का देऊन- त्यांचे निर्णय खऱ्या शक्यतांच्या दृष्टीने वळवणे शक्य असते.

एखादी गोष्ट गमावल्यामुळे होणारे दु:ख हे ती मिळाल्यामुळे होणाऱ्या आनंदाच्या सुमारे दुप्पट असते. लेखकाच्या एका सहकाऱ्याला पीएच.डी. केल्यावर निवृतिवेतनाचे फायदे मिळणार हे माहीत असूनही त्याची पीएच.डी. पूर्ण करण्यात चालढकल चालली होती. त्याला प्रोत्साहन म्हणून लेखकाने त्याच्याकडून पुढच्या तारखांचे प्रत्येकी १०० डॉलरचे काही चेक घेतले आणि दर महिन्याला प्रबंधातले पुढचे एक प्रकरण पूर्ण केले नाही तर एकेक चेक वटवला जाईल, असे बजावले. प्रत्यक्षात निवृत्तिवेतनाचे फायदे १०० डॉलरपेक्षा बरेच जास्त असूनही त्या सहकाऱ्याला प्रबंध पूर्ण करण्यासाठी ते पुरेसे प्रोत्साहन वाटत नव्हते. मात्र दरमहा १०० डॉलर गमावणे जास्त त्रासदायक वाटल्यामुळे लेखकाला एकही चेक वटवायची संधी न देता त्याने आपला प्रबंध पूर्ण केला.

जर आपल्या आसपासचे अनेक लोक नियम पाळत नाहीत अशी लोकांची समजूत झाली तर अधिकाधिक लोक नियमांचे उल्लंघन करण्याची शक्यता वाढते. म्हणूनच आपली मुले कोणत्या महाविद्यालयात जातात यापेक्षा कोणाच्या संगतीत असतात याचा पालकांनी विचार करावा, असा सल्ला लेखकांनी दिला आहे. समाजाकडून नाकारले जाण्याची भीती आणि सहकाऱ्यांसारखे वागण्यासाठी स्वत:वर ओढवून घेतलेला मानसिक दबाव यांमुळे लोक उघड पुराव्याकडे दुर्लक्ष करून इतरांप्रमाणे चुकीची उत्तरे देण्याची किंवा चुकीचे वागण्याची शक्यता जास्त असते. आपण काय म्हणतो आहोत हे इतरांना कळणार असेल तर लोक चारचौघांसारखे बोलण्याचा प्रयत्न करतात. अस्खलित आणि सुसंगत बोलणारे लोक आपल्या गटाला आपल्याला हव्या त्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. रशियामध्ये किती लोक कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात आहेत, हे लोकांना नक्की माहीत नसल्यामुळे ती राजवट प्रदीर्घ काळ टिकली. या घटनेतून, सरकारी यंत्रणेचे लोकांना मिळणाऱ्या माहितीवरचे नियंत्रण आणि विरोधकांना तशी न मिळालेली संधी यांचा रशियन लोकांच्या वागण्यावरचा आणि राजकारणावरचा प्रभाव आपण समजून घेऊ शकतो.

संगणक वापरताना तुम्ही संगणकाने सुचवलेला (default) पर्याय वापरू शकता किंवा त्यात तुमच्या मर्जीनुसार काही बदल करू शकता. प्रत्यक्षात संगणकाने सुचवलेला पर्याय म्हणजे निवड शिल्पकाराच्या मते ‘सर्वात योग्य’ असा पर्याय असतो. तो पर्याय मनापासून निवडणारे आणि आळशीपणाने दुसरा पर्याय निवडायची तसदी न घेणारे लोक मिळून मोठय़ा प्रमाणात निवड शिल्पकाराला हवा असलेला पर्याय निवडतात. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे- अवयव दान. नेत्र, मूत्रपिंड, त्वचा वगैरे अवयवांचे दान करता येते, त्यापैकी ८० टक्क्यांहून जास्त अवयवदान दात्यांच्या मृत्यूनंतर होते. मरणोत्तर आपल्या अवयवांचे दान करावे म्हणून नोंदणी करण्याची प्रक्रिया जर किचकट असेल, तर लोकांचा अशी नोंदणी करण्यामागचा उत्साह कमी होतो. म्हणून काही देशांमध्ये प्रत्येकाची मरणोत्तर अवयवदान करण्याला संमती आहे, असे गृहीत धरले जाते. मात्र कोणाला हे मान्य नसेल तर त्याला तशाही प्रकारची नोंदणी करण्याची मुभा असते. मरणोत्तर अवयवदानाला संमती देणारा पर्याय संगणकाद्वारे सुचवून या देशांनी अशी संमती देणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यात यश मिळवले.

अनेक देशांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक निर्बंध घातले गेले आणि त्याचे काही चांगले परिणामही दिसून आले आहेत. मात्र कधी कधी असे निर्बंध लादताना नोकरशहांकडून चुका होताना दिसतात आणि मग असे निर्बंध मागे घ्यावे लागतात. शिवाय लोक प्रत्येक वेळी आपले वर्तन बदलतीलच असे नाही. अशा वेळी मार्गदर्शक धक्का देण्याचे मार्ग सुचवताना काही बाबतींत निर्बंध अपरिहार्य असतात याची कबुली लेखक देतात. गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी वाजवीपेक्षा जास्त गुरे बाळगली तर चाऱ्याचा फार मोठा प्रश्न उभा राहू शकतो. अशा वेळी प्रत्येकाने किती गुरे बाळगावी यासाठी काही निर्बंध स्वत:वर घालावे लागतात. बेसुमार मासेमारी करणाऱ्या कोळ्यांना अशाच प्रकारची तडजोड करावी लागते.

एकंदरीतच पर्यावरणाच्या संदर्भात जागतिक पातळीवरचे निवड शिल्पकार या संकल्पनेचा विचार करणे योग्य ठरेल, असे लेखकांना वाटते. प्रदूषण करणाऱ्या व्यवसायांवर अधिक कर आणि दंड हा मार्ग असू शकतो. प्रदूषण टाळले तर कर आणि दंडही टाळता येतील. म्हणून सरसकट र्निबधांपेक्षा हा मार्ग लेखकांना जास्त श्रेयस्कर वाटतो. पेट्रोलच्या वाढत्या किमती लोकांना लगेच आणि स्पष्ट दिसतात. प्रदूषणाची किंमत भविष्यात दिसणारी पण वर्तमानात लपलेली असते. म्हणून पेट्रोलच्या किमती योग्य पातळीपर्यंत वाढवून लोकांना पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहन देणे राजकारण्यांना कठीण जाते.

लेखकांनी विवाहासंदर्भात काही नवे विचार मांडले आहेत. लोकांचे आणि विविध संस्थांचे वैयक्तिक किंवा धार्मिक निवडस्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी विवाहसंस्थेचे खासगीकरण करावे, असा उपाय लेखकांनी सुचवला आहे. विवाह ही संस्था कायद्याच्या कक्षेतून बाहेर काढून धर्मगुरू, सामाजिक कार्यकत्रे किंवा इतर कोणत्याही गटाला आपल्या पद्धतीने राबवण्याची मुभा द्यावी. त्यानुसार एखाद्या धार्मिक संस्थेला फक्त आपल्या जाती-धर्मात भिन्नलिंगी व्यक्तींना विवाहाची अनुमती देता येईल आणि त्यावर कोणी आक्षेप घेऊ शकणार नाही. दुसऱ्या एखाद्या गटाला त्याच्या पद्धतीने फक्त समलिंगी किंवा त्यांच्या आवडीच्या कुठल्याही गटातल्या लोकांचा विवाह मान्य असेल आणि त्यालाही कोणी आक्षेप घेऊ शकणार नाही. अशा विवाहांना कायद्याचा आधार नसेल आणि कायद्यानुसार मिळणारे फायदे-तोटेही त्यांना मिळणार नाहीत. याउलट ‘सरकारमान्य’ विवाह म्हणजे फक्त कोणत्याही दोन व्यक्तींमधला ‘घरगुती भागीदारी करार’ असेल. या भागीदारांना कुठलाही भेदभाव न करता, सध्याच्या समाजात फक्त विवाहित व्यक्तींना मिळणारे कायदेशीर, कर-विषयक, मालकी व वारसाहक्क वगैरे अधिकार मिळतील. घटस्फोटामुळे होणारे मुलांचे नुकसान टाळण्यासाठी काही निर्बंध आणि सक्तीचे नियम करावे लागतील. पण या नियमांची आणि घटस्फोटाच्या आर्थिक परिणामांची सुस्पष्ट कल्पना भावी वधू-वरांना विवाहापूर्वी दिली तर त्याचा फायदा होईल, असा लेखकांना विश्वास वाटतो.

जर लोकांना त्यांच्या प्रयत्नांच्या यशाबद्दल तात्काळ आणि स्पष्ट माहिती दिली, तर त्यातून ते काही शिकण्याची बरीच शक्यता असते, हा लेखकांचा दावा योग्यच आहे. त्यांनी सुचवलेले अनेक मार्ग सहजसोपे, तर्कसुसंगत आणि व्यवहारज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे आहेत. जर घरातल्या एअरकंडिशनरच्या तापमानाबरोबर वापरलेल्या विजेच्या खर्चाचीही रक्कम दाखवण्याची सोय झाली, तर त्याचा उपयोग लोक अधिक काळजीपूर्वक करतील. ‘तुम्ही मतदान करू इच्छिता का?’ असे निवडणुकीच्या आदल्या दिवशी विचारल्यामुळे लोकांना त्याची आठवण राहील आणि ते मतदान करण्याची शक्यता वाढेल. बहुतेक लोकांना गोडाधोडाचे खायला आग्रह करावा लागत नाही. पण व्यायाम करण्यासाठी कोणी तरी त्यांच्या मागे लागावे लागेल. मात्र ‘लिबर्टेरियन पॅटर्नालिझम’ ही व्यवस्था अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांना किंवा जगात इतरत्र डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही विचारसरणीच्या लोकांना मान्य होईल, हा लेखकांचा आशावाद वास्तवात उतरण्याची शक्यता कमीच आहे!

‘नज- इम्प्रूव्हिंग डिसिजन्स अबाउट हेल्थ, वेल्थ अ‍ॅण्ड हॅपीनेस’

लेखक : रिचर्ड थेलर आणि कॅस सन्स्टीन

प्रकाशक : पेंग्विन यूके

पृष्ठे : ३२०, किंमत : ४७९ रुपये

विवेक गोविलकर vivekgovilkar@gmail.com