‘‘पुस्तक लिहून पूर्ण करण्यासारखी दुसरी चांगली भावना नसेल,’’ या वाक्यानं सुरुवात केलेल्या ट्वीटमध्ये बराक ओबामा यांनी त्यांच्या नव्या पुस्तकाची घोषणा गुरुवारी केली. ओबामा यांच्या याआधीच्या दोन- ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर’ (१९९५) आणि ‘द ऑडॅसिटी ऑफ होप’ (२००६)- या दोन विक्रमी खप झालेल्या पुस्तकांप्रमाणेच त्यांचे हे नवे पुस्तकदेखील आत्मकथानात्मक आहे. आधीच्या या दोन्ही पुस्तकांनी ‘लिहिता-वाचता राजकारणी’ अशी ओबामी यांची ओळख अमेरिकी जनतेला करून दिली होती. २००८ साली अध्यक्षीय निवडणुकीतला ओबामा यांचा प्रचार प्रभावी होण्यास जसं त्यांचं आशावादानं भारलेलं वक्तृत्व कारणीभूत होतं, तशीच या पुस्तकांमुळे निर्माण झालेली त्यांची प्रतिमाही महत्त्वाची ठरली. ओबामा निवडणुकीत यशस्वी झाले व अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्षही ठरले. तिथपासूनचे त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळातील त्यांचे अनुभव या नव्या पुस्तकात वाचायला मिळणार आहे.

पेंग्विन रॅण्डम हाऊस या प्रकाशनसंस्थेतर्फे हे तब्बल ७६८ पानी आत्मकथन दोन खंडांत प्रसिद्ध होणार असून त्यातील पहिला खंड ‘अ प्रॉमिस्ड लॅण्ड’ हा एकाच वेळी २५ भाषांत प्रकाशित केला जाणार आहे. ऐन जागतिक वित्तीय अरिष्टात अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून ते २०११ च्या मेमध्ये पाकिस्तानात दहशतवादी ओसामा बिन लादेनला टिपण्यापर्यंतच्या काळातील अनेक घटनांविषयी ओबामा यांनी या पहिल्या खंडात लिहिले आहे. एरवी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीआधीचा काळ अशा स्वरूपाच्या नवनव्या पुस्तकांचा असतोच; प्रचारावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्नही त्याद्वारे केला जातो. परंतु त्यावरून, ओबामा यांच्या या नव्या पुस्तकाचाही हेतू तोच असेल असा कयास बांधणार असाल तर गफलत होईल. कारण हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे १७ नोव्हेंबर रोजी, म्हणजे यंदाची अध्यक्षीय निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल दोन आठवडय़ांनी!