गोविंद डेगवेकर

समाजमाध्यमी ज्ञानकाळात पसरवल्या गेलेल्या हिंदुत्ववादाचा चिकित्सक शोध घेणारे हे पुस्तक ‘सर्वसमावेशक भारता’च्या वाटचालीतील अडथळ्यांचीही जाणीव करून देणारे आहे..

आज वाचक दोन प्रकारचे आहेत. पहिला समाजमाध्यमी आणि दुसरा पुस्तकी. दुसरा वाचक पुस्तकांचा असला, तरी तो फार दुर्मीळ होत चाललाय आणि पहिला वाढत चाललाय, हा त्यांतला फरक. समाजमाध्यमी वाचकाची वाढ होण्यामागची कारणं अनेक आहेत. जसं राजस्थानातील अलवारमधील पहलू खानला भर चौकात ठेचून मारण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील एक संदेश पुरेसा होता. म्हणजे अनेक ग्रंथांमधून, पुस्तकांतून कृतिशीलतेचे अनेक दाखले लेखकांनी देऊनही ‘तटस्थ’ राहणारा वाचक, समाजमाध्यमावर अचानक ‘कार्यरत’ होऊ लागला, हे ‘भारतीय डिजिटलायजेशन’चे यशच! पुढे पुढे ऑनलाइन वाचकसंख्येत वाढ होत जाणार आहे, हे खरे. त्यामुळे पुस्तकवाचकांची संख्या घटत जाणार हेही निश्चित आणि आज जो महापुरासारखा ‘डाटा’ स्मार्टफोनमधून धबधबा कोसळत वाहून जात आहे, त्याला धन्यवाद देणाऱ्यांची संख्याही वाढलेली असेल.

आता ही संख्यावाढीची गृहीतके कशासाठी? तर, देशात २०१४ सालच्या सत्तापालटानंतर देशात मुस्लीमविरोधी वातावरणात वाढ झालेली दिसते. गाईंच्या कत्तली केल्यावरून, कत्तलीतून मिळालेले तिचे मांस ‘रेफ्रिजरेटर’मध्ये ठेवल्यावरून मुसलमानांना ठार मारले जाऊ लागले. वर पुन्हा- ‘कुणी ‘गोमाते’ला मारणार असेल तर त्याची गत अखलाक, पहलू खान यांच्यासारखी केली जाईल,’ असे सांगण्यात येऊ लागले. हे असे होण्यामागे ‘पुस्तकी ज्ञान’ कमी; पण भरपूर ‘डाटा’ फुकटात वाटणाऱ्यांमुळे जे ‘ऑनलाइन ज्ञान’ खिशात आले, त्यातून तर मुस्लिमांना पाकिस्तानात हाकलून द्यावे इथवर ‘मानसिक तयारी’ अनेकांनी करवून घेतली.

हे ‘अनेक’ कोण? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, बजरंग दल आणि त्यांच्या प्रेरणेतून जन्माला आलेल्या उत्तर भारतातील अनेक छोटय़ा हिंदुत्ववादी संघटना. या संघटनांचा एकच उद्देश दिसून येतो; तो म्हणजे- राष्ट्रवाद! आम्ही म्हणू तो राष्ट्रवाद! म्हणजे मुसलमानांनी गाईला ‘माता’ मानायलाच हवं. ‘भारतमाता की जय’ म्हणायलाच हवं. मदरसा वा मुस्लीम शिक्षणसंस्थेवर भगवा फडकवायलाच हवा.. इत्यादी. आणि हे सारे त्यांच्याकडून होणार नसेल, तर ते राष्ट्रवादी नाहीत.. त्यांची जागा पाकिस्तानात आहे!

तर, अशा या समाजमाध्यमी ज्ञानकाळात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर आणि अनेक जाहीर सभा-भाषणांतून पसरवल्या गेलेल्या हिंदुत्ववादाचा शोध ‘ऑफ सॅफ्रॉन फ्लॅग्ज अ‍ॅण्ड स्कलकॅप्स : हिंदुत्व, मुस्लीम आयडेन्टिटी अ‍ॅण्ड द आयडिया ऑफ इंडिया’ या पुस्तकात घेण्यात आला आहे. सामाजिक भाष्यकार आणि ज्येष्ठ पत्रकार झिया उस्सलाम यांनी धर्मनिरपेक्ष भारतीय संस्कृती, तिच्यावर वेळोवेळी झालेली आक्रमणे पचवून जिवंत राहिलेल्या विविधांगी समाजजीवनाचे चित्र या पुस्तकात मांडले आहे. रूढ मानसास ‘अप्रिय’ वाटाव्या अशा बऱ्याच गोष्टी या पुस्तकात आहेत. उदा. ‘विशेष एका धर्माचा या देशावर अधिकार नाही’ हे त्यातील एक मत. ‘मुळात या देशावर हिंदूंनाच अधिकार आहे,’ असे वाटणाऱ्यांना; पण तो तसा नाही हे कळाल्यावर अस्वस्थ वाटते. अशा अस्वस्थांना हे पुस्तक वाचल्यानंतर समदृष्टी मिळावी, इतके विपुल दाखले झिया उस्सलाम यांनी या पुस्तकात दिले आहेत.

पुस्तकातील पहिला भाग ‘हिंदुत्वा’वर आहे. यातील पाच प्रकरणांमध्ये भारतीय म्हणजे कोण, हिंदुत्ववाद्यांचे तुष्टीकरणाचे राजकारण, ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंद स्वराज’ यांवरील विवेचन आहे. लेखक म्हणतात, ‘‘भारतीयत्वा’ची स्वा. सावरकरांनी मांडलेली संकल्पना- म्हणजे जे या भूमीला ‘पितृभूमी आणि पुण्यभूमी’ मानतात, त्यांनाच भारतीय म्हणून येथील सर्व अधिकार व हक्क मिळतील; उर्वरितांना या देशातील बहुसंख्याकांशी वागताना ‘दुधात साखर’ बनून राहावे लागेल- पुढे सरसंघचालक हेडगेवार आणि मधोक यांनी सातत्याने भूमिका म्हणून मांडली.’ भारतीयत्वाची व्याख्या संघाच्या स्थापनेपासून म्हणजे १९२५ पासून ठासून मांडली जात होती. तीच पुढे कायम ठेवत २०१४ पासून तिचा कमालीचा आग्रह पुढे कसा वाढवत नेला गेला, हे अनेक उदाहरणांनिशी लेखक या पुस्तकात दाखवून देतात. ‘देशात वेळोवेळी दंगलीही पेटविण्यात आल्या. त्या पेटविण्यासाठी पुराणातील गोष्टी नव्या रूपाने ‘गीता प्रेस’च्या माध्यमातून मांडण्यात आल्या. म्हणजे हा देश शुद्ध आर्याचा आहे. तेच या भूमीचे खरे मालक आहेत. त्यानंतर आलेले सुलतान, सय्यद, लोधी, मोगल आणि शेवटचे ब्रिटिश हे ‘अन्य जन’ आहेत, अशी शिकवण त्यातून दिली गेली,’ असे लेखक म्हणतात.

‘भारत हा ‘हिंदू राष्ट्र’ करण्याचा संघाने विडा उचलला आहे. संघाशी संलग्न सर्व संस्था त्याच प्रयत्नात आहेत. सर्वाना हिंदू छत्राखाली आणणे म्हणजेच भारत बलशाली बनवणे अशी संघाची धारणा आहे,’ हे सांगताना लेखकाने स्थापनेपासूनच संघाने महिलांना दिलेले दुय्यम स्थान अधोरेखित केले आहे. त्याच वेळी हिंदू स्त्रियांबरोबरच मुस्लीम महिलांना धार्मिक स्थळी प्रवेशास मुभा देण्याची मागणी कशी मुस्लीम तुष्टीकरणाची आहे, हेही ते स्पष्ट करतात.

‘हिंदुत्व अ‍ॅण्ड दलित्स’ या टिपणात लेखक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुहेरी नीती उघड करून दाखवतात. ते म्हणतात, ‘२०१४ साली स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ झाला. त्या वेळी मोदी यांनी २०१९ पर्यंत देशात उघडय़ावर शौचास बसणाऱ्यांची संख्या शून्यावर आणण्याचा संकल्प सोडला. पंतप्रधानांनी हातात झाडू घेतला आणि त्यानंतर साऱ्यांनी तेच करीत ‘सेल्फी’ काढले. पंतप्रधानांच्या या महत्त्वाकांक्षी अभियानाचे कौतुक अनेकांनी केले, किंबहुना तसे ते करण्यास काही अडचण नाही. म्हणजे भविष्यात मानवी मैला डोक्यावरून वाहून नेणारेच या देशात नसतील, ही पंतप्रधानांची भावना निश्चितच अभिमानास्पद आहे. परंतु देशातील वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. ग्रामीण भागात आजही मानवी मैला डोक्यावरून वाहून नेला जात आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक व आंध्र प्रदेशमधील काही भागांत हा अमानवी प्रकार अजूनही सुरूच आहे. एक लाख ८० हजार दलित घरांमधील सदस्य भारतातील सात लाख ९० हजार सार्वजनिक आणि खासगी मालकीची शौचालये स्वच्छ करतात. मॅगसेसे पुरस्कार विजेते बेझवाडा विल्सन यांच्या नेतृत्वाखालील सफाई कर्मचारी संघटनेच्या ताज्या आकडेवारीत हे स्पष्ट करण्यात आले आहे.’

इथे लेखकाने उपस्थित केलेला सवाल असा की, नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयांची स्वच्छता करणार कोण? म्हणजे वर्णव्यवस्थेने लादलेल्या ‘सेवे’च्या शृंखला तोडून टाकायच्या आणि सरकारच्या अभियानाचा भाग म्हणून पुन्हा तीच ‘सेवा’ बजावायची?

‘रिडिस्कव्हिरग नॅशनल ऑयकॉन्स’ या प्रकरणात सरदार वल्लभभाई पटेल, शहीद भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संघाने कसे ‘आपलेसे’ केले, हे लेखकाने मांडले आहे. ‘जे सर्वाना वंद्य ते संघाला वंद्य असते! म्हणजे कोणत्याही राष्ट्रीय नेत्याची विचारसरणी ही संघाच्या विचारांना छेद देत असली, तरीही ती ‘सुसंगत’ करून घेण्याची तयारी संघ नेहमीच ठेवतो. म्हणजे ‘मुस्लीमही या देशात सुखासमाधानाने राहतील, त्यांना परभावाने वागवू नका,’ अशी भूमिका कायम मांडणाऱ्या सरदार पटेलांशी संघाची विचारसरणी सुसंगत कशी काय असू शकते,’ असा सवाल लेखक करतात.

म्हणजे दोन इंग्रजी दैनिकांतील मुस्लीम लोकसंख्यावाढीविषयक आकडेवारीचा दाखला देताना लेखकाने २००१ ते २०११ दरम्यान मुस्लीम लोकसंख्यावाढीचा दर मागील दशकाच्या तुलनेत मंदावल्याचे दाखवून दिले आहे. याच काळात मुस्लिमांमधील स्त्री-पुरुष गुणोत्तर हे हिंदूंपेक्षा उत्तम आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या लोकसंख्यावाढीच्या दरावरून बहुसंख्याक हिंदूंना घाबरवण्याची गरज नसल्याचे लेखक सूचित करतात.

संघ शहीद भगतसिंग यांच्याशी सख्य सांगत त्यांच्या नास्तिक विचारांकडे दुर्लक्ष करतो. डॉ. हेडगेवार आणि डॉ. आंबेडकर यांची तुलना संघाकडून केली जात असते; मात्र, आंबेडकरांची- ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ ही भूमिका उद्धृत करून लेखकाचा प्रश्न असा की, मग संघाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या एकात्मीकरणाचा नेमका अर्थ काय?

त्यानंतरच्या चार प्रकरणांमध्ये गोरक्षण आणि त्याच्याशी निगडित मुद्दय़ांचा तपशिलाने ऊहापोह करण्यात आला आहे. गाईचे मांस बाळगल्याच्या अफवेवरून कोणाच्याही घरात घुसण्याचा अधिकार कोणाला नाही, याकडे लेखक लक्ष वेधतात. ‘गाय हा उपयुक्त पशू आहे, पूजनीय नाही’ या सावरकरांच्या लेखातील उतारा गोभक्तांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. ‘भारतात गाईंची सर्वाधिक कत्तल ब्रिटिशांनी त्यांच्या सैन्याचे पोट भरण्यासाठी केली. गाईंची कत्तल आणि मुस्लिमांचा काहीएक संबंध नव्हता. साधारण १८८२ सालानंतर गाय हा महत्त्वाचा मुद्दा बनला आणि आता तर गाय हा ‘राजकीय पशू’ बनला आहे,’ असे लेखक म्हणतात.

भारताचा मध्ययुगीन इतिहास हा एकरेषीय नाही. हा इतिहास समजून घेण्यासाठी समावेशक दृष्टिकोनच कसा गरजेचा आहे, हे लेखक अनेक उदाहरणांवरून दाखवून देतात. ‘भारतावर आक्रमण करून येथे ज्यांनी राज्य स्थापन केले, ते परके राहिले नाहीत. भारतातील अनेक सल्तनती, शाह्य़ा आणि खान घराण्यांनी येथील सांस्कृतिक जीवनही विकसित केले, इथल्या मातीवर प्रेम केले आणि या मातीतच ते मिसळले. बाबर, हुमायून, शहाजहां, अकबर आणि शेवटी औरंगजेब वा दारा शुकोह यांनी सत्तेसाठी केवळ हिंदूंविरोधातच धोरणे राबवली नाहीत, तर त्यांना आप्तस्वकीयांशीही लढा द्यावा लागला. यासाठी त्यांना हिंदूंमधील पराक्रमी सेनापतींचीही मदत घ्यावी लागली,’ असे लेखक नमूद करतात.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात मुस्लीम अस्मितेवर भाष्य करण्यात आले आहे. यात मुस्लीम महिलांचे समाजातील स्थान, खरा मुसलमान कोण, कुराणाचा अर्थ नकारात्मक पद्धतीने लावण्याचा प्रयत्न आणि गेले वर्षभर गाजत असलेला तिहेरी तलाकचा मुद्दा या साऱ्यांविषयी लेखकाने लिहिले आहे. ‘तिहेरी तलाक हा एकतर्फी कधीच नसतो आणि तो पुरुषाला ‘तलाक, तलाक, तलाक’ असे एकाच श्वासात म्हणून बायकोला सोडचिठ्ठी देता येत नाही. नवरा-बायको यांच्यातील एकत्र राहण्याच्या सर्व शक्यता संपुष्टात येतात, तेव्हा केवळ दोघे नवरा-बायकोच नव्हे तर मध्यस्थी करणाऱ्या अधिकारी व्यक्तीसमोर तसे मान्य करावे लागते. त्यानंतरही कोणाचे मन वळणार असेल, तर पुढे तीन महिन्यांचा कालावधी दिला जातो. तरीही सलोखा शक्य नसल्यास पुरुषाला तिहेरी तलाक जाहीर करण्याची मुभा दिली जाते,’ असे लेखक म्हणतात.

पुस्तकातील तिसऱ्या भागात ‘भारताची कल्पना’ मांडण्यात आली आहे. या कल्पनेत भारतातील सर्वजन साहचर्य बाळगतील, हे गृहीत आहे. म्हणजे त्यांना ‘सारे जहाँ से अच्छा..’ म्हणताना भारतीय समाजव्यवस्था आधार वाटेल आणि राज्यघटनेवरील विश्वास अधिकच दृढ होत जाईल!

‘ऑफ सॅफ्रॉन फ्लॅग्ज अ‍ॅण्ड स्कलकॅप्स : हिंदुत्व, मुस्लीम आयडेन्टिटी अ‍ॅण्ड द आयडिया ऑफ इंडिया’

लेखक : झिया उस्सलाम

प्रकाशक : सेज/ सीलेक्ट

पृष्ठे: २९५, किंमत : ४९५ रुपये

govind.degvekar@expressindia.com