गतवर्षी विराम घेतलेल्या साहित्याच्या नोबेलने यंदा दोन जणांना गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी पोलंडच्या लेखिका ओल्गा टोकर्झुक आणि ऑस्ट्रियाचे नाटककार पीटर हॅण्ड्की यांची नावे गुरुवारी जाहीर झाली. एक लेखिका आणि एक लेखक असे निवडीतील संतुलन निवड समितीने राखले असले; तरी अनेकांना ते उफराटे संतुलन वाटते आहे, हे ती नावे जाहीर झाल्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रियांतून दिसते आहे. गतवर्षी बुकर पुरस्कार पटकाविणाऱ्या व आतापर्यंतच्या साहित्याच्या नोबेल मानकऱ्यांत १५ व्या स्त्री-लेखक ठरलेल्या पोलिश कादंबरीकार ओल्गा टोकर्झुक यांच्या निवडीचे अनेकांनी स्वागत केले आहे. विशेष म्हणजे, पोलंडमधील उजव्या राष्ट्रवाद्यांवर टीका करणाऱ्या आणि पोलंडला आपल्या इतिहासातील वसाहतवादी वृत्तीची आठवण करून देणाऱ्या टोकर्झुक यांच्या निवडीबद्दल पोलंडचे राष्ट्रध्यक्ष आंद्रेज डुडा यांनी अभिनंदन केले असून सांस्कृतिक मंत्री पोयर्त् ग्लिन्स्की यांनी ‘आतापर्यंत आपण टोकर्झुक यांची पुस्तकं वाचली नाहीत, याचं वैषम्य वाटतं’ असे प्रांजळपणे कबुल केले.

याउलट, यंदाचे दुसरे नोबेल मानकरी ऑस्ट्रियाचे नाटककार, निबंधकार पीटर हॅण्ड्की यांची निवड अनेकांना धक्कादायक वाटते आहे. याचे पहिले कारण म्हणजे, खुद्द हॅण्ड्की यांनी पाचएक वर्षांपूर्वी ‘नोबेल पुरस्कार देणंच बंद केलं पाहिजे,’ असे आग्रही मत मांडले होते. त्यामुळे नोबेलसाठी निवड होणे हे हॅण्ड्की यांनाही अनपेक्षितच होते; निवड समितीतील सदस्य ‘भले लोक’ असल्याची पहिली प्रतिक्रिया हॅण्ड्की यांनी दिली आहे, ती यामुळेच! दुसरे आणि गंभीर कारण म्हणजे हॅण्ड्की यांची विवादास्पद भूमिका. नव्वदच्या दशकातील युगोस्लाव्ह युद्धादरम्यान झालेल्या सर्बियातील मुस्लिमांच्या क्रूर हत्याकांडाबद्दल त्यांनी बोटचेपी भूमिका घेतलीच, पण सर्बियाचे तत्कालीन अध्यक्ष मिलोसेविक यांचेही त्यांनी समर्थन केले होते. त्यानंतर हॅण्ड्की यांच्यावर सलमान रश्दी, स्लॉव्हाय झिझेक अशांपासून विविध मानवाधिकार संघटनांनीही टीका केलीच; त्या टीकेवर ते आजही कायम आहेत, हे हॅण्ड्की यांना यंदाचे नोबेल जाहीर झाल्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रियांतून ठळकपणे दिसते आहे.