अमेरिकेत मागच्या दोन दशकांपासून इतिहासविषयक लेखन करणाऱ्यांमध्ये टिमोथी सींडर हे एक महत्त्वाचं नाव. सध्या ते येल विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत. युरोपच्या इतिहासात त्यांचा हातखंडा; मध्य आणि पूर्व युरोपच्या इतिहासावर सींडर यांनी लिहिलेली पुस्तके महत्त्वाची मानली जातात. मात्र २००८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ब्लडलॅन्ड्स – युरोप बीटविन हिटलर अ‍ॅण्ड स्टॅलिन’ या पुस्तकाने खऱ्या अर्थाने टिमोथी यांच्या इतिहासलेखनाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. गेल्या काही वर्षांत तर सींडर हे विसाव्या शतकाच्या इतिहासावर विस्तृत लेखन करू लागले आहेत. २०१२ मध्ये सींडर यांनी लिहिलेल्या ‘थिंकिंग द ट्वेन्टीएथ सेंच्युरी विथ टोनी ज्यूट’ या पुस्तकातून ते ध्यानात येईलच. विसाव्या शतकाच्या इतिहासावरील त्यांच्या या चिंतनातून आणखी एक नवे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.

बातमी त्या पुस्तकाचीच आहे. तर.. ‘ऑन टीरानी- ट्वेन्टी  लेसन्स फ्रॉम द ट्वेन्टिएथ सेंच्युरी’ हे त्या नव्या पुस्तकाचं शीर्षक. प्रकाशनाआधीपासूनच या पुस्तकाची चर्चा होती. जगभर उजव्या विचारसरणीचं आणि काहीसं हुकूमशाहीकडे कलू पाहणारं नेतृत्व प्रस्थापित होत असतानाच सींडर यांचं हे पुस्तक आलं आहे. अशा या आजच्या काळात या नवनेतृत्वाकडे कसे पाहावे, हेच या पुस्तकातून सींडर सांगू पाहतायत. या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने सींडर यांच्या झालेल्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी ते सांगितलंच आहे. एखादी राजवट बदलून नवी राजवट कशी स्थापली जाते, ते होताना काय काय घडतं, याचे अनेक दाखले विसाव्या शतकात मिळतात, विशेषत: युरोपच्या इतिहासात. लोकशाहीवादी राजवटींचे हुकूमशाही राजवटींमध्ये रूपांतर झाल्याचे या काळाने पाहिले आहे. त्यामुळे सध्याच्या जगाकडे पाहताना विसाव्या शतकाचा हा इतिहास महत्त्वाचा ठरू शकतो, असं सींडर यांचं म्हणणं आणि ते या १२८ पृष्ठांच्या पुस्तकात त्यांनी मांडलंच आहे.

इतिहासाचा अंत झाल्याची हाकाटी पिटून आता २५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या हाकाटीचा चढा काळ असताना लिहू लागलेल्या सींडर यांची इतिहासदृष्टी मात्र त्यापेक्षा निराळी आहे. त्यामुळेच हे नवे पुस्तक वाचायला हवे.