एखाद्या पुस्तकानं चार्ल्स डार्विन, व्हर्जिनिआ वुल्फ यांसारख्यांना प्रभावित केलं असेल, त्यांना वाचनानंद दिला असेल, तर ते पुस्तक कुठल्याही ग्रंथप्रेमीच्या संभाव्य वाचनयादीत असायलाच हवं. ते पुस्तक आहे- ‘नॅचरल हिस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅन्टिक्युटिज ऑफ सेलबोर्न’ आणि त्याचा लेखक आहे- रे. गिल्बर्ट व्हाइट! हे पुस्तक प्रकाशित होऊन आता सव्वादोनशे वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि या काळात त्याच्या ३०० हून अधिक आवृत्त्या जगभरच्या विविध भाषांत प्रसिद्ध झाल्या आहेत. या पुस्तकामुळं व्हाइटला ‘आद्य निसर्गशास्त्री’ म्हणून ओळख मिळाली आणि मुख्य म्हणजे, ‘बायबल, शेक्सपिअरची नाटकं आणि जॉन बनीअनचं ‘पिलग्रीम्स प्रोग्रेस’ यानंतरचं इंग्रजीत सर्वाधिक छापलं गेलेलं पुस्तक’ असा या पुस्तकाचा गवगवा केला जातो. हे एवढं या पुस्तकाची महत्ता पटण्यास पुरेसं ठरावं. तर, असं हे पुस्तक सध्या पुन्हा चर्चेत आलं आहे. त्याचं कारण, १७८९ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची खुद्द रे. व्हाइटची हस्तलिखित प्रत आता ऑनलाइन वाचण्या/ पाहण्यासाठी उपलब्ध झाली आहे, तेही मोफत!

झाडंझुडपं, पक्ष्या-प्राण्यांविषयी असलेल्या जिव्हाळ्याला जाणीवपूर्वक निसर्गाभ्यासाची जोड देणारा व्हाइट आपल्या निरीक्षणांच्या तपशीलवार नोंदी ठेवत असे. शिवाय त्याचे मित्र डॅनेस बॅरिंग्टन, थॉमस पेनन्ट यांनाही ते पत्राद्वारे कळवत असे. त्याच्या या पत्ररूपी नोंदींचं पुस्तक व्हाइटचा भाऊ बेंजामिन यानं प्रसिद्ध केलं. तेच हे- ‘नॅचरल हिस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅन्टिक्युटिज ऑफ सेलबोर्न’! त्याची मूळ हस्तलिखित प्रत सेलबोर्नमधल्या व्हाइटच्या घरी- जे आता ‘गिल्बर्ट व्हाइट संग्रहालय’ म्हणून ओळखलं जातं- ठेवण्यात आली होती. गेली अनेक वर्ष या प्रतीमधली मोजकीच पानं पाहण्याची मुभा या संग्रहालयात होती, परंतु तीही दुरूनच! मात्र, आता या हस्तलिखित प्रतीची सर्वच्या सर्व- ३३९ पृष्ठे संग्रहालयाच्या संकेतस्थळावर(http://gilbertwhiteshouse.org.uk/manuscript/) उपलब्ध करून देण्यात आली आहेत.