18 January 2019

News Flash

‘पठडीबाज’, तरी थरारक..

विश्वाची निर्मिती कशी झाली? पृथ्वीवरच जीवसृष्टी कशी बहरली?

विश्वाची निर्मिती कशी झाली? पृथ्वीवरच जीवसृष्टी कशी बहरली? मानवाचा जन्म कसा  झाला? हे अनादी काळापासून मानवाला पडलेले प्रश्न. या प्रश्नांची उत्तरे मिळालीच नाहीत, असेही नाही. बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगत होत गेलेल्या मानवाने त्या त्या काळात आपापल्या परीने या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतला आणि हाती जे लागले ते मांडले. यातील काही उत्तरे कल्पनाशक्तीवर आधारित होती, तर काही भोवतालच्या परिस्थितीचा वेध घेऊन तर्कशुद्धपणे मांडलेली होती. मग पुढे विज्ञानाने या निर्मितीची शास्त्रशुद्धपणे मांडणी केली. पण तरीही आजतागायत या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळाली आहेत, असा दावा वैज्ञानिक वा संशोधकही करू शकणार नाहीत. त्यामुळेच या तीन प्रश्नांवर सखोल चर्चा सुरू होते, तेव्हा या चर्चेचा शेवट ‘ही तर ईश्वराची किमया!’ या मुद्दय़ावर होतो. अर्थात, विज्ञानाला हे मान्य नसल्याने ‘विज्ञान विरुद्ध ईश्वर’ असा संघर्ष वेळोवेळी उफाळून वर येत असतो.

नेमका हाच धागा पकडून अमेरिकी कादंबरीकार डॅन ब्राऊनने ‘ओरिजिन’ ही त्याची नवी कादंबरी गुंफली आहे. ‘ओरिजिन’- अर्थात बीज, मूळ, प्रारंभ. मानवयुगाचा प्रारंभ कसा झाला, त्याचे बीज वा मूळ कशात आहे, हा मुद्दा ‘ओरिजिन’च्या केंद्रस्थानी आहे. मात्र, ही काही विज्ञान कादंबरी नव्हे; तर ब्राऊनच्या याआधीच्या कादंबऱ्यांसारखीच ती एक थरारक गूढकथा आहे. आधीच्या सर्व कादंबऱ्यांमधील नायक असलेला हार्वर्ड विद्यापीठातील सिम्बॉलॉजी (प्रतीकांचा अन्वयार्थ लावणारे शास्त्र) या विषयाचा प्राध्यापक रॉबर्ट लँगडन हाच ‘ओरिजिन’चाही नायक आहे.

‘ओरिजिन’च्या कथानकाची सुरुवात ही एडमंड क्रिश्च या अब्जाधीश संशोधक, भविष्यवेत्त्याच्या जगातील तीन प्रमुख धर्मगुरूंसोबतच्या बैठकीपासून होते. या बैठकीत एडमंड त्याच्या संशोधनाविषयी एक सादरीकरण करतो. त्याने केलेला शोध अवघ्या जगाला हादरवून सोडेल, असा दावाही तो या वेळी करतो. आपल्या या क्रांतिकारी शोधाचे सादरीकरण महिनाभराने करणार असल्याचे एडमंड या धर्मगुरूंना सांगतो. मात्र प्रत्यक्षात या बैठकीच्या तिसऱ्याच दिवशी स्पेनमधील बिल्बाव येथील गुगेनहाइम या वस्तुसंग्रहालयात एडमंडचे हे सादरीकरण आयोजित करण्यात येते. जगभरातील निवडक नामांकितांना निमंत्रण असलेल्या या परिषदेला एडमंडचा एकेकाळी शिक्षक असलेल्या प्रा. रॉबर्ट लँगडन यालाही बोलावणे येते. या परिषदेचे थेट प्रक्षेपण टीव्ही तसेच इंटरनेटवरून होणार असते.  निरीश्वरवादी अशी प्रतिमा असल्याने एडमंडचे नवीन संशोधन जगभरात औत्सुक्याचा विषय बनलेले असते. परिषदेला सुरुवात होताच एडमंड मोठा गौप्यस्फोट करतो. मानवाचा जन्म कसा झाला, हे आपण शोधून काढले आहे. हे संशोधन खुले होताच जगाचा धर्म आणि देव या संकल्पनेवरून विश्वास उडेल आणि धर्मभेदावरून होणाऱ्या लढाया, दहशतवादी हल्लेही थांबतील, असा दावा एडमंड करतो. परंतु या शोधाचे सादरीकरण करण्यापूर्वीच सर्वाच्या डोळय़ांदेखत त्याची  हत्या होते.

रॉबर्टसाठी हा धक्का असतोच, पण या संग्रहालयाची क्युरेटर असलेली अम्ब्रा विडाल हीदेखील या घटनेने हादरून जाते. अम्ब्रा ही स्पेनचा भावी राजा ज्युलियनची वाग्दत्त वधू आहे. एडमंडच्या हत्येनंतर रॉबर्ट आणि अम्ब्रा त्याचे गूढ राहिलेले सादरीकरण जगासमोर आणण्याचा निर्धार करतात. यामध्ये त्यांची मदत एडमंडनेच तयार केलेले ‘विन्स्टन’ नावाचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरण करते. एडमंडने आपले सादरीकरण स्पेनमधील एका अज्ञातस्थळी असलेल्या संगणकात ठेवले असून ते सुरू करण्यासाठी ४७ शब्दांचा मोठा पासवर्ड शोधण्याचे पहिले आव्हान रॉबर्ट आणि अम्ब्रासमोर उभे राहते.

एकीकडे या दोघांची ही शोधमोहीम सुरू असताना रॉबर्टनेच एडमंडची हत्या केली असून तो अम्ब्राचे अपहरण करून फरार झाल्याची आवई उठवली जाते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा या दोघांच्याही मागे लागतात. तिसरीकडे, एडमंडची हत्या करणाऱ्या अव्हिला या माजी सैनिकाला रॉबर्टची हत्या करण्याच्या सूचना त्याचा अज्ञात धनी  करतो. अशा तिहेरी पाठलागात ‘ओरिजिन’ची कथा पुढे सरकते. स्पेनमधील विविध ऐतिहासिक वास्तूंमधून एडमंडच्या छुप्या संगणकाचा व पासवर्डचा शोध घेत अखेर रॉबर्ट हे सादरीकरण जगजाहीर करतो.

मात्र ‘ओरिजिन’ची कथा येथे संपत नाही, तर येथून तिला एक नाटय़मय वळण मिळते. मानवाचा जन्म कसा झाला, याविषयीचा हा शोध जाहीर होताच जगभर खळबळ उडते आणि त्याच वेळी एडमंडची हत्या कोणी घडवली याचाही उलगडा होतो. थरारक पाठलाग, अभ्यासपूर्ण तपासातून उलगडणारी गुपिते आणि धक्कादायक उलगडा अशा सूत्रांनी भारलेल्या या कादंबरीचा शेवट काय होतो, हे प्रत्यक्ष ‘ओरिजिन’ वाचूनच जाणून घेणे इष्ट!

रॉबर्ट लँगडन-अम्ब्रा विडाल, मारेकरी अव्हिला, एडमंडचे संशोधन, विन्स्टन यांच्याखेरीज स्पेनचा भावी राजा ज्युलियन, राजगुरू व्होल्डेस्पिनो या पात्रांभोवतीही ‘ओरिजिन’चे कथानक फिरते. कथानकाचा प्रत्यक्ष कालावधी दोन-तीन दिवसांचा असला तरी, ते भूत-भविष्यकालीन संदर्भ मांडत वेगवेगळी वळणे घेते. वाचकाला गुंतवून ठेवण्याची डॅन ब्राऊनची हातोटी ‘ओरिजिन’मधूनही दिसून येते. ब्राऊनच्या आधीच्या कादंबऱ्यांप्रमाणेच ‘ओरिजिन’ची गोष्टही वेगाने पुढे सरकते, मात्र रहस्यभेद करण्याची घाई ब्राऊन करत नाही. कादंबरीतील सर्वच पात्रांबद्दलचे रहस्य शेवटच्या काही पानांतूनच उलगडले जाते. त्यामुळे ‘ओरिजिन’ रटाळ वाटत नाही.

कथानकाचा विस्तार करताना त्यामध्ये येणाऱ्या वास्तू, गोष्टी, ठिकाणे यांचे विस्तृत वर्णन करण्याची ‘ब्राऊनियन’ शैली या कादंबरीतही दिसून येते. ‘दा विंची कोड’ या कादंबरीत फ्रान्स, ‘एंजल्स अ‍ॅण्ड डेमन्स’मध्ये व्हॅटिकन सिटी, ‘इन्फनरे’मध्ये इटली, ‘द लास्ट सिम्बॉल’मध्ये वॉशिंग्टन.. असा प्रवास घडवून आणणाऱ्या ब्राऊनने ‘ओरिजिन’ची पूर्ण कथा स्पेन, त्यातही बार्सिलोना या शहराभोवती केंद्रित ठेवली आहे. एडमंडचे सादरीकरण होणार असलेल्या बिल्बावच्या गुगेनहाइम वस्तुसंग्रहालयातील प्रसंगात ब्राऊनने तेथील वैशिष्टय़पूर्ण कलाकृतींचे विस्तृत वर्णन केले आहे. त्यामुळे लँगडनच्या नजरेतून आपणच हे वस्तुसंग्रहालय पाहात आहोत, असा भास होत राहतो. त्याचप्रमाणे बार्सिलोना शहरातील ऐतिहासिक व प्रसिद्ध वास्तूंचे वर्णनही ‘ओरिजिन’मध्ये पानोपानी आढळते. जगप्रसिद्ध स्थापत्यकार-वास्तुविशारद अँटोनी  गॉडीच्या ‘सॅग्राडा फॅमिलिया चर्च’ आणि ‘कॅसा मिला’ या इमारतींच्या वैशिष्टय़पूर्ण बांधणी, तसेच तेथे कोरलेल्या कलाकृतींच्या माध्यमातून रॉबर्ट लँगडन रहस्यभेद करत असताना वाचकावर अपेक्षित परिणाम ब्राऊनने साधलेला असतो. ब्राऊनच्या आधीच्या कादंबऱ्यांचेही हेच वैशिष्टय़ राहिले आहे. ‘दा विंची कोड’मध्ये ब्राऊनने लिओनादरे दा विंचीच्या जगप्रसिद्ध कलाकृतींमधील चिन्हांचा वापर करून कथानक रंगवले होते. तर ‘एंजल्स अ‍ॅण्ड डेमन्स’ या कादंबरीत व्हॅटिकन सिटी व फ्लोरेन्स या शहरांतील विविध शिल्पांच्या माध्यमातून त्याने कथानकात रंजकता पेरली होती. त्याचप्रमाणे ‘ओरिजिन’मध्ये ब्राऊनने कॅसा मिला आणि सॅग्राडा फॅमिलिया या वास्तूंच्या वैशिष्टय़ांचा वापर केला आहे.

ब्राऊनच्या कादंबऱ्यांची युरोप-अमेरिकेतील समीक्षक ‘पठडीबाज’ अशी संभावना करतात. त्यात तथ्य नाही असेही नाही. कारण एखादे ऐतिहासिक शहर, तेथील जगप्रसिद्ध वास्तू, या वास्तूंची विकिपीडियासह सर्वत्र उपलब्ध असलेली माहिती, जगातल्या प्रत्येक ठिकाणाची इतकंच काय तेथील छुप्या मार्गाची खडान्खडा माहिती असलेला एक प्राध्यापक, कथानकाच्या सुरुवातीलाच त्याला भेटणारी एक सुंदर आणि बुद्धिमान तरुणी, चित्र-शिल्पांमधील प्रतीकांची संकेते अशी साचेबद्ध मांडणी ब्राऊनच्या सर्वच कादंबऱ्यांमध्ये दिसून येते. शिवाय ब्राऊनच्या सर्वच कथानकांमध्ये नायकाचा संघर्ष परंपरा, इतिहास, धर्म, रूढी यांच्याशीच होताना दिसतो. त्यामुळे ब्राऊनची नवीन कादंबरी आली की त्यात या गोष्टी हमखास असतील, हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकेल!

असे असले तरी, गोष्ट सांगण्याची ब्राऊनची शैली वाचकांना धरून ठेवते. कथानकात पुढे काय घडणार हे जाणून घेण्याची वाचकाची उत्सुकता संपते, तेव्हा त्या कादंबरीबद्दलची ओढही संपून जाते. ब्राऊनच्या कादंबऱ्यांमध्ये मात्र असे अपवादानेच घडते. कादंबरी वाचायला सुरुवात करतानाच वाचकाला ‘आता लँगडन काहीतरी भन्नाट गुपिते शोधणार..!’ याची पुरेपूर कल्पना असते. त्यामुळे ती गुपिते काय असतील, हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे ‘पठडीबाज’ असल्या तरी, डॅन ब्राऊनच्या कादंबऱ्या सर्वसामान्य वाचकांना पसंत पडतात आणि ‘बेस्टसेलर’ही ठरतात!

व्हॅटिकन शहरातील सेंट पीटर चौकात सेल्फी काढणाऱ्या एका परदेशी पर्यटकाने ‘याच ठिकाणी लँगडनला अँटिमॅटरचा उलगडा झाला’ असे छायाचित्राखाली लिहून ते प्रसारित केले होते, असे अलीकडेच एका ठिकाणी वाचनात आले होते. ही बाब खरी की खोटी कोण जाणे; परंतु ब्राऊनच्या कादंबऱ्या वाचल्यानंतर त्यातील वास्तूंना भेट  देण्याची वाचकाची इच्छा प्रबळ होते, हे मात्र निश्चित!

  • ‘ओरिजिन’
  • लेखक : डॅन ब्राऊन
  • प्रकाशक : बॅन्टम
  • पृष्ठे : ४१५, किंमत : ७९९ रुपये.

आसिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com

First Published on December 23, 2017 3:27 am

Web Title: origin novel by dan brown