|| सुशीलकुमार शिंदे

पत्रकार-लेखक आतिष तासीर यांचे ‘ओव्हरसीज् सिटिझनशिफ ऑफ इंडिया’ अर्थात ओसीआय कार्ड भारत सरकारने रद्द केल्याने ते अलीकडे चर्चेत आले आहेत. भारताच्या परस्परविरोधी दोन रूपांतील द्वंद्वाचा शोध घेणाऱ्या त्यांच्या पुस्तकाचा हा परिचय..

हिंदू धर्मीयांच्या दृष्टीने ‘वाराणसी/ बनारस’ या शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते हजारो वर्षांपासून ज्ञानी-पंडितांचे शहर राहिलेले आहे. या शहरात मृत्यू आला तर जन्म-मरणाचा फेरा चुकतो, अशी आख्यायिका आहे. हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक असणाऱ्या डायना येक यांनी त्यांच्या ‘बनारस : सिटी ऑफ लाइट’ या पुस्तकात म्हटले होते : ‘काशीमध्ये संपूर्ण भारत सामावलेला आहे.’ पूर्वाश्रमीची काशी- अर्थात वाराणसी याच शहरावर बेतलेले लेखक-पत्रकार आतिष तासीर यांचे ‘द ट्वाइस बॉर्न’ हे वार्ताकथनसदृश पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. वाराणसीचे सामाजिक आणि सांस्कृतिक ताणेबाणे, सोबतच अलीकडच्या काही वर्षांत मोदी लाटेसोबतच विकसित होऊ  पाहणाऱ्या हिंदुराष्ट्र विचारधारेच्या पाश्र्वभूमीवर पौराणिक संकल्पनेतील ‘द्विज’ अर्थात वाराणसीतील ब्राह्मणांच्या कथनाला मध्यवर्ती ठेवून लिहिलेल्या या पुस्तकाला निश्चितच संदर्भमूल्य प्राप्त झालेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘डिव्हाइडर इन चीफ’ असा उल्लेख करत यंदाच्या मेमध्ये ‘टाइम’ या साप्ताहिकात लेख लिहिणारे पत्रकार, लेखक आतिष तासीर यांचे नाव अनेकांना परिचित झाले असेल. नुकतेच त्यांचे ‘ओव्हरसीज् सिटिझनशिप ऑफ इंडिया’ अर्थात ओसीआय कार्ड भारत सरकारने रद्द केले. सरकारच्या मते, तासीर यांनी त्यांच्या वडिलांच्या संदर्भातील माहिती लपवली होती. तर लेखिका अरुंधती रॉय किंवा इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या मते, सरकार तासीर यांच्याशी सूडबुद्धीने वागत आहे. आता तर जगभरच्या अनेक लेखक-पत्रकार-विचारकांनीही हाच सूर लावत, सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे. या साऱ्याने आतिष तासीर मागील काही आठवडे चर्चेत आहेत.

मात्र, याच तासीर यांनी स्वत:ची मुळे शोधण्याच्या प्रयत्नांतून काही काळ वाराणसीत राहून लिहिलेल्या ‘द ट्वाइस बॉर्न’ या पुस्तकाने वाराणसीचे बहुस्तरीय भू-सांस्कृतिक व धार्मिक वर्तमान वाचकांसमोर प्रभावी पद्धतीने उभे केले आहे. ‘ल्युटेन्स दिल्ली’च्या वर्तुळात वावरणारा हा लेखक आपल्या मुळांचा शोध घ्यायला वाराणसीला येतो. त्याच्या मते, संस्कृत ही इथल्या काही हजार वर्षांच्या भव्य परंपरेचा आढावा घेण्यासाठीची महत्त्वाची कडी आहे. या भूमीतून आपल्याला भारताच्या प्रचंड बौद्धिक श्रीमंतीचा लाभ मिळू शकेल, अशी लेखकाची धारणा आहे. आणि म्हणूनच तो संस्कृत शिकायची म्हणतोय. संस्कृतमधील साहित्य आणि ज्ञान भारताच्या आदिम बौद्धिक परंपरेकडे घेऊन जाईल, असे त्याला वाटतेय. या आदिम ज्ञानाचे ‘स्टेक होल्डर्स’ म्हणून तो ब्राह्मण समाजाकडे पाहतोय. त्यास पुन्हा ‘द्विज’ या पौराणिक आख्यायिकेची जोड आहे. मुळात ‘द ट्वाइस बॉर्न’ हे निव्वळ प्रवासवर्णन किंवा स्वत:ला मध्यवर्ती ठेवून तासीर यांनी केलेले कथन असे त्याचे वर्णन अयोग्य ठरेल. कारण ‘स्व’च्या शोधात निघालेल्या, परंपरा व संस्कृतीकडे चिकित्सक नजरेने पाहणाऱ्या एका पत्रकाराने भारतातील अतिप्राचीन नि धार्मिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण असलेल्या शहराला मध्यवर्ती ठेवून एकाच वेळी भूत-वर्तमानाचे केलेले व्यवच्छेदक वार्ताकन या पुस्तकात वाचायला मिळते.

या पुस्तकात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे असे कथन आहे. त्या कथनाला त्याच्या वर्ग-जातिव्यवस्थेचा पाया आहे. ते स्वत:ची किंवा स्वत:च्या पिढय़ांची कहाणी सांगू पाहतायत. एकाच वेळी परंपरेशी जोडले-तुटलेपणाच्या भावना इथल्या प्रत्येकाच्याच मनात आहेत. लेखक त्या नेमकेपणाने टिपतोय. म्हटले तर ‘द ट्वाइस बॉर्न’ हे अतिशय वैयक्तिक किंवा खासगी वाटावे अशा तळटिपांसहित वाचकांसमोर येते; पण त्यात अतिशय चपखलपणे कथनकाराच्या विचारविश्वाचा आणि वाराणसीच्या भू-सांस्कृतिक, धार्मिक परिवेशाचा समांतर धांडोळा घेतला जातोय. स्वत:ला भारतीय म्हणवणारे, पण स्वत:च्या भूमीत विदेशी असलेले कैक लोक लेखकाला या प्रवासात भेटतायत. अनेक पात्रे आहेत, ठिकाणे बदलत राहतायत नि गोष्टही बदलत जातेय. या साऱ्यात डोळ्यांसमोर उभा राहतो एक भव्य कॅनव्हास.. वाराणसीचा.. ‘अँग्लोसाइज्ड इंडिया’चा.. मेकॉलेपुत्र भारताचा किंवा ‘इंडिया’च्या मगरमिठीत सापडलेल्या ‘भारता’चा! विशेष म्हणजे, एकीकडे स्मृतिभ्रंश झालेले, तर दुसरीकडे भूतकाळाच्या अतिरंजित स्वप्नरंजनात जगणारे- असे दोन्ही लोक हा कॅनव्हास रेखाटण्यात हातभार लावत आहेत.

इथला प्रत्येक ब्राह्मण कथनकर्ता त्याच्या हरवलेल्या धार्मिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक वैभवाच्या कथा सांगतोय. ते वैभव किंवा त्यातून येणाऱ्या श्रेष्ठत्वाला ते मुकतायत याची हळहळ व्यक्त करतोय. पर्यायाने पुस्तकातले प्रत्येक पात्र हे समजूनउमजून आधुनिकतेतून येणाऱ्या गोष्टी स्वीकारूनही त्या नाकारू पाहतेय. द्वंद्वात्मक अवस्थेत जगू पाहतेय. आधुनिक विज्ञानाला स्वीकारावे की ‘आपण हजारो वर्षांपूर्वी याहूनही आघाडीवर होतो’ असे सांगत आपला अहंकार कुरवाळत बसावे, यात त्यांची फसगत होतेय. लेखक गमतीने नोंदवतो : जगात कोणताही शोध लागला, की आपल्याकडे वेद-पुराणांत त्याची कशी नोंद आहे हे सांगण्यात इथले विद्वान शर्थीने प्रयत्न करतात. प्लास्टिक सर्जरी, पुष्पक विमान किंवा महाभारतात वापरलेली औष्णिक हत्यारे वा त्या काळात होणारा इंटरनेटचा उपयोग.. अशी हजारो गृहीते इथला समाज बाळगून आहे. त्यांच्या अहंकाराला खतपाणी घालणारे राजकीय पुढारी नि व्हॉट्सअ‍ॅपसारखी आधुनिक संवादाची माध्यमे हा पेच वाढवत आहेत. त्यातूनच त्यांच्या पुराणालाच इतिहास समजण्याच्या मानसिकेतून भूत-वर्तमान अशा दोन्ही पातळ्यांवर लेखकाला गोंधळ दिसतोय.

या पुस्तकातून ठळकपणे काही व्यक्तिचरित्रे वाचकांसमोर येतात. के. डी. त्रिपाठी हे त्यातील एक. हे त्रिपाठी संस्कृतचे अभ्यासक आहेत. ‘संस्कृत नाटय़शास्त्र’ हा त्यांचा अभ्यासविषय. त्यांच्या थोरल्या भावाला १९४२ च्या आंदोलनात हौतात्म्य प्राप्त झालेले आहे. त्रिपाठी यांचा पंडित मदन मोहन मालवीय आणि त्यांच्या कुटुंबीयांशी स्नेह आहे. विज्ञानासोबतच नाटय़शास्त्रात रुची ठेवणारे त्रिपाठी संस्कृतमधील नाटय़परंपरेविषयी प्रचंड अभिमान बाळगून आहेत. तत्कालीन सुप्रसिद्ध पटकथाकार के. ए. अब्बास यांनी ‘बॉम्बे टॅब्लॉइड’मधील एका सदरात रशियातून आलेल्या काही प्रतिनिधींच्या बाबतीत घडलेली घटना सांगितली होती. या प्रतिनिधींना भारतात ‘शाकुंतल’ या नाटकाचा प्रयोग पाहायचा होता. त्यासाठी काही काळ आम्ही भारतातील मुक्काम वाढवू सांगणाऱ्या या प्रतिनिधींना असा कोणताच प्रयोग भारतात होत नाही, हे कोण सांगणार? अब्बास यांचा हा प्रश्न वाचून त्रिपाठींनी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. मग काही लोक एकत्र येऊन आर्थिक भुर्दंड सहन करून ‘शाकुंतल’चा प्रयोग उभा करतात. त्रिपाठी तासीर यांना अनेकदा या सामूहिक स्मृतिभ्रंशाविषयी सांगतायत. त्यातून होणारे सांस्कृतिक पतन त्रिपाठींना भयानक वाटत राहते. त्रिपाठी आपल्या गुरूविषयी- अर्थात के. चट्टोपाध्याय यांच्याविषयी सांगतायत. चट्टोपाध्याय हे सुभाषचंद्र बोस यांचे वर्गमित्र. त्यांचा नि सुभाषबाबूंचा पत्रव्यवहार असायचा. इंग्लंडमध्ये शिकत असताना सुभाषबाबू पत्रातून आपल्या या मित्राला स्वातंत्र्यसमरात थेट सहभागी होण्याविषयी विनंती करतात, तर चट्टोपाध्याय- ‘मी वेदांचा अभ्यास करून एक प्रकारे ‘सांस्कृतिक स्वातंत्र्या’साठी काम करतोय,’ असे सुभाषबाबूंना कळवतात. दुर्दैवाने ही निष्ठा आता राहिली नाही नि आपण संस्कृतिक गुलामगिरीत गेलो, अशा प्रकारचे निवेदन त्रिपाठी लेखकाला वारंवार करत राहतात.

या कथनात जसे वेळोवेळी भेटणारे वाराणसीमधील कथनकर्ते आहेत, तसेच लेखकाने पेरलेले देशोदेशींच्या लेखक-विचारवंतांची मतमतांतरेही आहेत. यात दस्तयवस्की, मार्क ट्वेन आहेत, गांधी-नेहरू आहेत, तसेच कालिदास आणि भर्तृहरीसुद्धा आहेत. कला समीक्षक अ‍ॅलिस बॉनर, ए. के. कुमारस्वामी, ऑक्टोव्हिआ पाझ, टी. एस. इलियट ते थेट तासीर यांचे एकेकाळचे मार्गदर्शक व्ही. एस. नॉयपॉल यांचीही उद्धृते आहेत. या साऱ्यांच्या मतांची मार्मिक पेरणी आपले म्हणणे अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी लेखकाने केली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या उमेदवारीसाठी वाराणसी हा लोकसभा मतदारसंघ निवडला. तेव्हा लेखक तिथेच होता. ‘माँ गंगाने मुझे बुलाया हैं’ असे मोदी प्रत्येक भाषणात सांगत होते. पण मोदींच्या विकासाच्या कथनासोबतच समांतर असे हिंदुत्वाचे राजकारण विकसित होत होते, असे लेखकाचे निरीक्षण आहे. मोदींच्या विजयानंतर मात्र हिंदूंचा देदीप्यमान भूतकाळ पुनर्जीवित करण्यासाठी एक मोठा वर्ग कार्यान्वित होतो. त्यात गोरक्षक आणि त्यांनी निर्माण केलेल्या दहशतीचा लेखक आढावा घेतो. त्याच वेळी हैदराबादमध्ये दलित संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्या करतो. त्या काळात झालेली आंदोलने आणि जातीय विद्वेष लेखक वाराणसीमधील जातीय भेदभावाच्या संदर्भात नोंदवतोय. आजूबाजूला हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी घडताना लेखक पाहतोय. आणि एकेकाळी श्रेष्ठत्व मिरवणाऱ्या वर्गाचा अहंकार मोदी आणि त्यांच्या राजकारणामुळे सुखावतोय, असे लेखकाला वाटते. दुसरीकडे एकेकाळी मोदींचे समर्थक असलेले लोक आर्थिक स्तरावरील अपयश, नोटाबंदी या सर्व गोष्टींमधून मोदी सरकारकडे ‘अनाऊन्समेंट राज’ म्हणून पाहतायत, असे लेखक सांगतो. पण तरीही स्वत:च्या उत्पन्नापेक्षा आशा-अपेक्षा आणि स्वाभिमानाला महत्त्व देणारा एक मोठा वर्ग ‘मोदी-कथना’त स्वान्तसुखाय असलेला लेखकाला दिसतो. पर्यायाने ‘द ट्वाइस बॉर्न’ हे वाचकासमोर बहुशाखीय नि बहुस्तरीय ‘पब्लिक व्हर्जन’ उभे करते. गोष्टी लहानसहानच आहेत, पण त्यांच्या पोटात मोठे गर्भित अर्थ दडलेले आहेत, हे वाचकाला सहज समजत जाते.

ब्राह्मण जातीतील व्यक्तींशीच संवाद साधूनही हे कथन एका जातीपुरते मर्यादित न राहता एक अखंड सामाजिक वीण वाचकासमोर उलगडत नेते. पण तरीही यात लिंगशोषणाच्या जाणिवांचा अभाव आढळून येतो. पितृसत्ताक व्यवस्थेच्या माध्यमातून झालेल्या किंवा होत असलेल्या शोषणावर टिप्पणी होणे अत्यावश्यक वाटते. सोबतच लेखकाने जनसामान्यांसाठी त्यांच्याच भाषेत रामायण लिहिणाऱ्या तुलसीदासाचा उल्लेख या पुस्तकात केलेला आहे, पण अतिशय त्रोटक. या निवडक कथनकर्त्यांची किंवा संस्कृत अभ्यासकांची तुलसी-रामायण आणि तुलसीदासांविषयीची मते किंवा धारणा नोंदवायला हव्या होत्या. त्या निवेदनातून भाषिक अस्मितेच्या परिवेशातून जातवास्तवाचे शोषणकारी स्वरूप निश्चितच वाचकाच्या हाती लागले असते. पण अशा काही मर्यादा सोडल्या, तर हे पुस्तक अनेक अर्थानी वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे आहे.

आजूबाजूला दिसणारी मृत्यूची गडद सावली, त्यातच भर घालणारे धुरकट कोंदट वातावरण नि सोबतच या शहराची तामसिक लहर वेगवेगळ्या लोकांच्या संवादातून तासीर यांनी योग्य पद्धतीने पकडलेली आहे. मुख्यत्वे जरी हे पुस्तक वाराणसीच्या ब्राह्मणांवर किंवा त्यांच्या विचारविश्वावर बेतलेले असले, तरीही यातून आपल्याला भारताची दोन रूपे दिसतात. एक म्हणजे, स्वत:मध्ये एकाच वेळी हजारो शतके घेऊन जगणारा भारत. वसाहतवादाच्या खुणा वागवणारा नि उत्तर-वसाहतवादामध्येही चिकाटीने आपल्या प्रथा-परंपरा, जातीय-धार्मिक अस्मिता इमानेइतबारे जगणारा. त्याच वेळी दुसरीकडे इंग्रजाळलेला नि आधुनिकतेला आत्मसात करू पाहणारा नवउदारमतवादी ‘इंडिया’सुद्धा दिसतो. हे द्वंद्व अखंड सुरू आहे. या पुस्तकात लेखकाने आपली मते किंवा निष्कर्ष न मांडता फक्त कथने नोंदवली आहेत. तेही स्वत:ला इथल्या परंपरेचा पाईक समजणाऱ्या ‘द्विज’ अर्थात ब्राह्मण वर्गाच्या मुखातून.. जसेच्या तसे! कोणत्याही प्रकारच्या निष्कर्षांची जबाबदारी संपूर्णत: वाचकांवर सोपवणारे आतिष तासीर यांचे ‘द ट्वाइस बॉर्न’ हे पुस्तक निश्चितच वाचकाला समृद्ध करणारे आहे.

shinde.sushilkumar10@gmail.com