24 January 2021

News Flash

निवृत्तीनंतरचे निर्वाळे..

समस्या एकमेकांशी बोलणी करूनच सोडवता येण्यासारखी आहे.

|| श्रीरंग सामंत

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचे हे पुस्तक- पाकिस्तानी राजकारणात तेथील लष्कराचा हस्तक्षेप किती, अफगाण प्रश्नात पाकिस्तानची भूमिका काय आणि पाकिस्तानच्या धोरणांत अमेरिका व चीन या देशांचा प्रभाव कितपत, यांवर प्रकाश टाकणारे आहे..

राज्यकारभार किंवा सरकारी कार्यक्षेत्रात भारत आणि पाकिस्तान या देशांकडून परस्पर प्रतिद्वंदी म्हणून उभे असतात, ते काही काळाने या निष्कर्षांप्रत येतात की, समस्या एकमेकांशी बोलणी करूनच सोडवता येण्यासारखी आहे. अशा तऱ्हेच्या प्रयत्नांना ‘ट्रॅक टू डिप्लोमसी’ असे म्हणतात. म्हणजे मागच्या दाराने होणारी चर्चा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे (आयएसआय) माजी प्रमुख असद दुर्राणी आणि भारतीय गुप्तचर संस्थेचे (रॉ) माजी प्रमुख अमरजितसिंग दुलत यांच्यात कित्येक वेळा झालेला वार्तालाप. त्यांना एकमेकांशी साधलेला संवाद पुस्तकरूपात प्रसिद्ध करावा एवढा महत्त्वाचा वाटला आणि त्यांचे ‘द स्पाय क्रॉनिकल्स’ हे पुस्तकही प्रसिद्ध झाले.

तर.. यातले असद दुर्राणी हे पाकिस्तानच्या सैन्यात होते. पण काही राजनैतिक कारणामुळे त्यांना सैन्यातून निवृत्ती देण्यात आली आणि परवेझ मुशर्रफ यांच्या कार्यकाळात सौदी अरेबियामध्ये पाकिस्तानचे राजदूत म्हणून नेमण्यात आले. त्याआधी बेनझीर भुत्तो यांच्या कार्यकाळात ते जर्मनीत पाकिस्तानचे राजदूत होते. नवाज शरीफ, बेनझीर भुत्तो, नंतर परवेझ मुशर्रफ आणि शेवटी आसिफ अली झरदारी यांची राजवट त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. तसेच झिया-उल-हक यांच्यानंतरच्या सर्व पाकिस्तानी सैन्यप्रमुखांची कारकीर्द त्यांनी जवळून पाहिली आहे. या अनुभवांवर आधारित ‘ऑनर अमंग स्पाईज्’ हे पुस्तक त्यांनी अलीकडेच लिहिले आहे. मात्र, या लेखात दुर्राणी यांच्या ‘पाकिस्तान अड्रिफ्ट : नेव्हिगेटिंग ट्रबलड् वॉटर्स’ या पाकिस्तानी सैन्य व राज्यकर्ते यांच्यातील संबंध आणि गेल्या शतकातील राजकीय परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेणाऱ्या पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत. पाकिस्तानी राजकारण व परराष्ट्र धोरण यांत तेथील लष्कराचे स्थान काय, अफगाण प्रश्नात पाकिस्तानची भूमिका काय होती आणि पाकिस्तानच्या धोरणांत अमेरिका व चीन या देशांचा कितपत प्रभाव असतो, या विषयांवर दुर्राणी यांनी पुस्तकात बराच प्रकाश टाकलेला आहे.

सर्वसाधारणपणे भारतीयांचा असा समज आहे की, भारतात जी काही घातपाती कृत्ये घडतात त्यात आयएसआयचा मोठा वाटा असतो, किंबहुना आयएसआय अप्रत्यक्षपणे कुठे ना कुठे गुंतलेली असते. परंतु दुर्राणी यांचे म्हणणे असे की, आयएसआय किंवा पाकिस्तानी लष्कर यांचा भारतातील दहशतवादी किंवा घातपाती घटनांशी काही संबंध नाही. उदाहरणार्थ, २००८ च्या नोव्हेंबरमधील मुंबईवरील हल्ल्याचा त्यांनी फक्त प्रासंगिक उल्लेख केला आहे आणि असे सुचवले आहे की, पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या संस्थेचा त्यामागे हात असावा. मात्र, पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंधांविषयी मात्र दुर्राणी यांनी विस्ताराने लिहिले आहे. अस्वस्थ बलुचिस्तानविषयीही त्यांनी लिहिले आहे.

पुस्तकास पाकिस्तानविषयक अभ्यासक अ‍ॅनातोल लायवेन यांची प्रस्तावना आहे. त्यांनी दुर्राणी यांना पाकिस्तानचे ‘अग्रणी सैन्यविचारवंत’ म्हटले आहे. पुस्तकाची सुरुवातीची प्रकरणे जनरल झिया यांचे अखेरचे दिवस व बेनझीर भुत्तो यांच्या कार्यकाळाचे परीक्षण करणारी आहेत. दुर्राणी हे बेनझीर यांचे प्रशंसक नाहीत, हे त्यातून स्पष्ट होते. पाकिस्तानच्या राजकारणात चीन, रशिया आणि अमेरिका यांचा काय आणि किती प्रभाव होता, यावरही दुर्राणी यांनी प्रकाश टाकला आहे. त्यानंतर पाकिस्तानमध्ये कसे सत्तापालट होत गेले व त्यामध्ये लष्कर व आयएसआयचा किती सहभाग होता यावरही दुर्राणी यांनी भाष्य केले आहे. १९८८ मध्ये बेनझीर भुत्तो सत्तेवर आल्या तेव्हा दुर्राणी हे लष्करी हेर खात्याचे प्रमुख होते, त्यामुळे त्यांच्या भाष्याला अनुभवाचा आधार आहे.

पुस्तकात पाकिस्तानच्या अफगाणिस्तानमधील भूमिकेवर दुर्राणी यांनी विस्तृत लिहिले आहे. त्यातून हे स्पष्ट होते की, अफगाणिस्तानवर वर्चस्व ठेवणे हे पाकिस्तानला स्वत:च्या अस्तित्वासाठी गरजेचे वाटते. पाकिस्तानच्या कांगाव्यापल्याड, ते अफगाणिस्तानातील भारताच्या भूमिकेस जास्त महत्त्व देत नाहीत. दुर्राणी यांचे पूर्वज अफगाण असल्यामुळे त्यांचा साहजिकच अफगाणिस्तानकडे ओढा आहे. एके ठिकाणी दुर्राणी नमूद करतात की, अफगाणिस्तानाचे त्यावेळचे प्रमुख हमीद करझाई हे त्यांना बंधुवत वागवीत.

नवाज शरीफ यांच्याविषयीही दुर्राणी यांचे मत फारसे बरे नाही. शरीफ यांचा उल्लेख त्यांनी ‘मिया साहिब’ असा केला आहे. शरीफ यांची कुठल्याही विषयाकडे लक्ष देण्याची क्षमता फक्त तीन मिनिटे असे आणि आपले ते खरे करण्यात त्यांना कसलाही विधिनिषेध नसे, असे ते सांगतात. पुढे परवेझ मुशर्रफ यांची कारकीर्दही ते उलगडून दाखवितात. मुशर्रफ यांच्या राज्यकारभारात- विशेषत: कारगिल प्रकरणात काय चुका झाल्या, याविषयी दुर्राणी यांनी मत मांडले आहे. कारगिलमधील नामुष्कीसाठी ते मुशर्रफ यांनाच जबाबदार धरतात. अनुषंगाने पाकिस्तानच्या काश्मीर धोरणावरही दुर्राणी यांनी भाष्य केले आहे. मुशर्रफ-वाजपेयी यांच्यातील आग्रा येथील चर्चेविषयी दुर्राणी लिहितात, त्या वेळी मुशर्रफ यांच्या चतु:सूत्रीचा स्वीकार होणारच होता, पण तो प्रयत्न भारतीय दुराग्रही नेत्यांनी उधळून लावला.

पुस्तकातील अत्यंत वाचनीय प्रकरण दहशतवादाविषयी आहे. दुर्राणी यांचे म्हणणे असे की, पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत नसून, तेथील परिस्थितीस भारताचे धोरणच जबाबदार आहे. पण पुढे ते हेही मान्य करतात की, काश्मीरमधील हुर्रियत म्हणजे पाकिस्तानने सर्व भारतविरोधी गटांना एकत्र आणण्यासाठी तयार केलेला मंच आहे. ते लिहितात, दहशतवादाची परिभाषा काळ आणि वेळाप्रमाणे बदलत असते. पण युद्धाचे अंतिम लक्ष्य चिरस्थायी शांतता हे आहे. पण ते तेव्हाच साध्य होऊ शकते जेव्हा आज शत्रू असलेले लोक उद्या मित्र होण्याची शक्यता असेल. म्हणूनच युद्धात नागरी निकष पाळणे जरुरी असते. परंतु बंडखोर किंवा सशस्त्र विद्रोह करणाऱ्या गटांचा सामना करताना असे निकष लावणे अवघड असते. मात्र, हे विद्रोही किंवा विरोधक स्वदेशातील असतात तेव्हा राज्यकर्त्यांनी वाटाघाटींच्या पर्यायाकडे दुर्लक्ष करून चालत नाही, असे सांगत दुर्राणी यांनी उत्तर आर्यलडचे उदाहरण दिले आहे.

अमेरिका-पाकिस्तान संबंध दुर्राणी यांनी (पाकिस्तानसाठी) ‘धोकादायक की प्राणघातक?’ या शीर्षकाखाली पडताळले आहेत. याबाबतीत ते हेन्री किसिंजर यांनी दिलेल्या इशाऱ्याचा उल्लेख करतात : ‘अमेरिकेशी शत्रुत्व नुसते धोकादायक ठरते, पण मैत्री प्राणघातक असते.’ दुर्राणी नमूद करतात की, ‘अमेरिकेबरोबरचे पाकिस्तानचे संबंध कधीही धोरणात्मक नव्हते, ती एक सोयीची मैत्री होती. काश्मीरचा मूळ प्रश्न सोडवण्यात आमचा हा संरक्षक मदत करू शकत नाही हे आमच्या लक्षात आले आहे.’ भारत-चीन संबंधांच्या बाबतीत दुर्राणी यांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. चीनची पाकिस्तानमध्ये केवळ आर्थिक नव्हे, तर भू-सामरिकदृष्टय़ाही मोठी गुंतवणूक आहे. चीन पाकिस्तानचा उपयोग भारतावर दबाव आणण्याबरोबरच मध्यपूर्वेतील देशांत शिरकाव करण्यासाठी करत आहे, असे दुर्राणी यांची जाणते निरीक्षण आहे. भारत-पाक संबंधांस दुर्राणी यांनी ‘न सुटणारी गुंतवळ’ म्हटले आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील मुख्य पेच अर्थात काश्मीर प्रश्न केवळ बोलणी करूनच सोडवता येणे शक्य आहे, त्यास लष्करी कारवाई हा पर्याय होऊ शकत नाही, हा दुर्राणी यांचा निर्वाळा सयुक्तिक ठरावा.

‘पाकिस्तान अड्रिफ्ट : नेव्हिगेटिंग ट्रबलड् वॉटर्स’
लेखक : असद दुर्राणी
प्रकाशक : कॉन्टेक्स्ट
पृष्ठे : १६४, किंमत : ४९९ रुपये
svs@cogentpro.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 12:59 am

Web Title: pakistan adrift navigating troubled waters mppg 94
Next Stories
1 परिवर्तनाचे बोल..
2 ओबामा-बायडेन : धोरणे आणि परिणाम
3 मतभेदांनी घडलेली संस्कृती..
Just Now!
X