पाकिस्तान हा केवळ भारतापासून वेगळा झालेला एक तुकडा नव्हे.. गेल्या सहा दशकांत हा देश लोकशाही आणि लष्करशाही यांच्यात हेलकावत राहिलेला, पाश्चात्त्य आणि आखाती मदतीवर अर्थगाडा चालविणारा आणि नागरिकांना जीवित-वित्त हमी देता न आलेला, असा झाला आहे.. तो तसाच का, हे सांगणारे पुस्तक..
एका सलग भूभागाची भारत आणि पाकिस्तान अशी कृत्रिम फाळणी झाल्या घटनेला आता ६८ वर्षे उलटली आहेत. इतका कालावधी उलटल्यानंतर फाळणीच्या जखमा सुकायला हव्या होत्या, पण त्या आजही का भळभळतात वा भळभळत ठेवल्या जातात? इतक्या दीर्घ कालावधीनंतरही पाकिस्तान एका भक्कम पायावर उभे न राहता, एक ग्राहक (खरे तर याचकच) राष्ट्र म्हणून अन्य विकसित राष्ट्रांच्या मदतीवर का अवलंबून आहे? आणि या देशात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारवर नेहमीच लष्कराचा वरचष्मा का राहिला? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी व्हिंटेज बुक्सचे ‘पाकिस्तान अ‍ॅट द क्रॉस रोड्स’ हे ख्रिस्तॉफ जॅफ्रेलॉट यांनी संपादित केलेले पुस्तक जिज्ञासूंना उपयुक्त ठरू शकेल.
पुस्तकात एकूण अकरा अभ्यासकांचे लेख दोन भागांमध्ये समाविष्ट आहेत. शाहिद जावेद बर्की यांच्या लेखाचा अपवाद वगळल्यास सारे लेख अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचे आहेत. आरंभी जॅफ्रेलॉट यांनी करून दिलेला पुस्तक परिचय वाचताच पुस्तकाचा आवाका लक्षात येतो.
या परिचयात १९४७-४८ या वर्षी जीनांनी लिहिलेली एक टिप्पणी संपादक उद्धृत करतात. या टिप्पणीत जीनांनी म्हटले आहे, ‘‘काँग्रेसने विद्यमान समझोता अगदी मनाविरुद्ध स्वीकारला आहे, ते आता शक्य तितक्या लवकर, भारताचे ऐक्य पुन्हा साध्य करण्याचे उद्घोषित करत आहेत आणि त्यांच्या या निश्चयामुळे ते पाकिस्तानचा पराभव करू इच्छितात आणि म्हणूनच ते पाकिस्तानचे नैसर्गिक शत्रू समजले पाहिजेत.’’ जीनांच्या या धारणेने वा संशयाने पाकिस्तान आपली वाट निश्चित करत राहिला आहे.
पाकिस्तानचा जन्मापासूनचा इतिहास, जसा भारत-पाकिस्तान संघर्षांचा आहे, तसाच तो लोकशाही आणि लष्कर यांच्यातील संघर्षांचाही आहे. त्याचा आढावा पुस्तकाच्या ‘मिलिटरी आणि डेमोक्रसी’ या अकील शहा यांच्या लेखात घेतला आहे. परवेझ मुशर्रफ (१९९९-२००७) यांचा आठ वर्षांचा एकतंत्री कारभार संपुष्टात आल्यावर पाकिस्तानमध्ये काही प्रमाणात लोकशाही अस्तित्वात आली, या गोष्टीची नोंद घेऊन, लेखकाने २००७ पासूनच्या नागरी-लष्करी संबंधांचा विक्षेपमार्ग, राजकारणातून लष्कराने स्वत:ला मुक्त ठेवण्याचा ढंग, ते लष्कराने केलेले हस्तक्षेप आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून लष्कराचा प्रभाव या अंगांनी स्पष्ट केला आहे.
पाकिस्तानची पहिली घटना, १९५६ मध्ये अस्तित्वात आली आणि त्यानुसार झालेल्या निवडणुकीत ‘स्वायत्ततावादी’ बंगाली आणि त्यांचे पश्चिम पाकिस्तानातील सहयोगी पक्ष यांचे सरकार स्थापन झाले. लष्कराने हे शासन ऑक्टोबर १९५८ मध्ये उद्ध्वस्त केले. सांविधानिक व्यवस्था उधळली आणि ‘प्रतिबंधक एकतंत्र’ स्थापित केले. अशा साऱ्या घटना या लेखात नोंदल्या आहेत आणि त्यानंतरची सरकारे ही लष्करी वर्चस्व असणारी वा लष्करी राहिली हे स्पष्ट करून, २००७ नंतर घडलेले बदल समोर आणून पुढील काळात पाकिस्तानमध्ये पाकिस्तान नागरी आणि लष्करी अशा दोलायमान अवस्थेतून वाटचाल करत राहील असे भाकीत केले आहे.
महम्मद वसिम यांच्या ‘द ऑपरेशनल डायनॅमिक्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज इन पाकिस्तान’ या लेखात पाकिस्तानातील सध्याच्या विविध संघर्षांच्या अभिव्यक्तींना राजकीय पक्षांच्या भूमिकांतून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यात पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लीम लीग – नवाझ, पाकिस्तान तेहरिक इन्साफ, मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट, अवामी नॅशनल पार्टी अशा मोठय़ा पक्षांसह अर्धा डझनांहून जास्त छोटय़ा पक्षांचा ऊहापोह केला आहे. यातील बहुतेक पक्ष धोरणांपेक्षा नेतृत्वावर आधारित असले, तरी याच पक्षांनी संसदेच्या माध्यमातून पाकिस्तानच्या लोकशाहीला काही प्रमाणात का असेना, मान्यता मिळवून दिली आहे.
‘ज्युडिशिअरी अ‍ॅज अ पॉलिटिकल अ‍ॅक्टर’ या फिलिप ओडेनबर्ग यांच्या लेखात अलीकडच्या काळात पाकिस्तानच्या न्यायपालिकेने आपला सन्मान आणि स्वायत्तता सिद्ध करण्याच्या प्रयत्नांतून निष्पन्न झालेल्या सकारात्मक बाबींची चर्चा केली आहे. एक प्रकारच्या या ‘ज्युडिशिअल अ‍ॅक्टिव्हिझम’ने पाकिस्तानात लष्करी सत्तेला मोठा पायबंद घातला. न्याय. चौधरी यांनी याबाबतीत घेतलेली कणखर भूमिका या लेखात स्पष्ट होते. या न्यायपालिकेने पाकिस्तानी लोकशाहीला मोठा आधार दिला आणि पाकिस्तानला खऱ्या आणि परिणामकारक लोकशाही मार्गावर आणले.
मरियम आबू झहाब यांचा ‘टर्माइल इन द फ्रंटियर’ हा छोटासा लेख, पाकिस्तान जरी धर्माच्या आधारे निर्माण केलेले राष्ट्र असले तरी ते कधीही एकात्मिक नव्हते आणि बांगलादेश वेगळा झाल्यानंतरही उर्वरित पाकिस्तान एकात्मिक नाही, सरहद्द प्रांत आजही धुमसत आहेत, याचीही जाणीव देतो. तालिबानीकरणामुळे निर्माण झालेली परिस्थिती, त्यावरचे उपाय यांची चर्चा करताना लेखकाने, ‘‘तालिबानीकरण ही पश्तुनींची समस्या नाही, तर सुन्नी-देवबंदी दहशतवादाचा विस्तार ही खरी समस्या आहे,’’ या वस्तुस्थितीवर बोट ठेवले आहे. हसन अब्बास यांच्या ‘इंटर्नल सिक्युरिटी इश्यूज इन पाकिस्तान’ या लेखात बदलत्या वातावरणात पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नावर, तालिबानी आणि मूलतत्त्ववादी दहशतवादी गटांपासून पाकिस्तानला असलेल्या धोक्याबद्दल गंभीर चर्चा करून लेखकाने ‘पोलीस रिफॉर्म्स’च्या शिफारशींवरही भाष्य केले आहे.
शाहिद जावेद बर्की आणि अदनान नसीमुल्ला यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या ‘पाकिस्तान्स इकॉनॉमी’ या लेखात पाकिस्तानी अर्थव्यवस्था राजवित्तीय न्यूनता, प्रचंड महागाई, राखीव डॉलर्समध्ये सतत होणारी घट आणि गुंतवणुकीला लागलेली गळती याने ग्रासलेली असल्याचे स्पष्ट करून पाकिस्तानचा जीडीपी भारत, बांगलादेश, श्रीलंका यांच्या तुलनेत २०१०पासून सातत्याने कमी राहिल्याचे दाखवून दिले आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था बाहय़ मदतीवरच अवलंबून आहे आणि हे आर्थिक पाठबळ अस्थिर आणि राजकीयदृष्टय़ा विशेषत: सार्वभौमत्वाच्या दृष्टीने महागात पडणार असल्याचा निष्कर्ष लेखकांनी काढला आहे.
पुस्तकाचा दुसरा भाग पाकिस्तानच्या अन्य देशांशी असलेल्या संबंधांबद्दल असून, त्यात अफगाणिस्तान, अमेरिका, चीन, सौदी अरेबिया, इराण आणि भारत यांच्या संदर्भातील लेख आहेत.
अविनाश पालीवाल यांच्या पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्या २००१ पासूनच्या संबंधांवरील लेखात, त्यांचे एकमेकांबरोबरचे संबंध, त्यातील चढ-उतार याचा विस्तृत आढावा लेखकाने घेतला आहे. या लेखात ९/११ नंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान या उभय देशांच्या संबंधांवर कोणते तातडीचे परिणाम झाले, २००५ च्या तालिबानच्या उदयानंतर या संबंधांवर नेमका काय प्रभाव पडला याचीही चर्चा लेखकाने केली आहे. या सर्वामध्ये अफगाणिस्तानचे भारताजवळ जाणे पाकिस्तानला चिंतेचा विषय वाटतो, हे लेखकाने नोंदले आहे.
या पुस्तकातील ख्रिस्तॉफ जॅफ्रेलॉट यांचा ‘यू.एस. – पाकिस्तान रिलेशन्स अंडर ओबामा’ हा एक महत्त्वाचा आणि प्रदीर्घ लेख आहे. अन्य कोणत्या कारणाने नव्हे, तर पाकिस्तानच्या भौगोलिक स्थानामुळे, शीतयुद्ध, रशियाचे मध्य-पूर्वेतील अतिक्रमण, साम्यवादाला विरोध यांवर अमेरिका-पाकिस्तान संबंध अवलंबून असल्याचे लेखकाने स्पष्ट केले आहे. हे संबंध हितसंबंधांवर आधारित असल्याने अस्थायी असल्याचे लेखक स्पष्ट करतो. त्या संबंधांमध्ये सातत्याने होत असलेले बदल आणि तरीही अमेरिकेची पाकिस्तानला सातत्याने होत असलेली लष्करी आणि अन्य मदत, तसेच अमेरिकेचा हस्तक्षेप या गोष्टी समजून घेण्यासाठी हा लेख मुळातूनच वाचायला हवा.
फरा जान आणि सर्ज ग्रँगर यांच्या ‘पाकिस्तान-चायना सिम्बिऑटिक रिलेशन्स’ या लेखात लेखकद्वयींनी चीन पाकिस्तानचा सार्वकालिक मित्र असे म्हणून, या दोन्ही राष्ट्रांची भारताशी असलेली सातत्यपूर्ण प्रतिस्पर्धा हा या संबंधांचा मुख्य आधार असल्याचे म्हटले आहे. चीन-पाकिस्तानचे हे संबंध १९६० च्या अक्साई चीन सीमावादावरून भारत-चीन संघर्षांनंतर दृढ होऊ लागले आणि याबाबतीत भारताने समझोता केल्यानंतरही त्यामध्ये वाढ होतच राहिली आहे. चीन आणि पाकिस्तानातील लष्करी संबंधांच्या प्रदीर्घ इतिहासाची लेखक नोंद घेतात आणि चीनने पाकिस्तानला दिलेल्या लष्करी मदतीचा आणि सामूहिक लष्करी प्रकल्पांचा आढावा घेतात. या संबंधांच्या बाबतीत लेखकांनी ‘सिम्बिऑटिक’ म्हणजे ‘परोपजीवीचा एकतर्फी लाभ’ हा शास्त्रीय शब्द वापरला असला तरी या संबंधांनी जशी पाकिस्तानला लष्करी व अन्य मदत मिळाली आणि एक कायम कैवारी मिळाला, त्याचप्रमाणे चीनला भारतीय उपखंडामध्ये हात-पाय पसरायला वाव मिळाला, ही गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही. नेपाळ, श्रीलंकेसह सारी शेजारी राष्ट्रे भारताकडे संशयाने पाहात असताना भारताने चीन-पाकिस्तान संबंधांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज आहे.
भौगोलिक सलगता, इतिहास आणि भाषा याबाबत इराणशी जवळीक असतानाही पाकिस्तानचा अरब जगताकडे आणि सुन्नी इस्लामकडे असलेला कल, सना हरून यांनी ‘पाकिस्तान बिट्विन सौदी अरेबिया अ‍ॅण्ड इराण’ या लेखात स्पष्ट केला आहे. स्वतंत्र राष्ट्रे म्हणून अस्तित्वात आल्यापासून म्हणजे १९४७ पासून आजपर्यंत भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी राष्ट्रांचे एकमेकांकडे शत्रू या भावनेतून पाहाणे, काश्मीर प्रश्न आणि बांगलादेश युद्ध यांसारख्या घटनांमुळे भारताबद्दल पाकिस्तानला असलेली साधार भीती, या गोष्टींमुळे या दोन राष्ट्रांचा एकमेकांवर विश्वासच नाही आणि यामुळे या राष्ट्रांचा- खास करून पाकिस्तानचा- लष्करावरील खर्च वाढत राहिला व यामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्था पाकिस्तानी सामान्य जनतेला एक चांगले जीवनमान देऊ शकली नाही, असे फेडरिक ग्रेर यांच्या ‘इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान’ या लेखात म्हटले आहे. याच काळात भारताने आपल्या मध्यम वर्गाला एक चांगले जीवनमान उपलब्ध करून दिले. पाकिस्तानातील बदलती राजकीय परिस्थिती आणि तेथील जनतेच्या आकांक्षा पाकिस्तानातही ही गोष्ट घडविण्यास आग्रही असतील, असा लेखाचा रोख आहे. तथापि भारत आणि पाकिस्तान या उभय देशांतील संबंध तुष्टीकरण आणि प्रासंगिक संकटांतूनच जाण्याचे संकेत व्यक्त करून, लेखकाने यातून मोठय़ा संघर्षांची शक्यता मर्यादित असल्याचे सांगून शांतीची अपेक्षा शून्य असल्याचे म्हटले आहे.
सदर पुस्तकातील त्रुटी सांगायचीच झाली तर पाकिस्तानातील पुरोगामी चळवळी, तेथील दहशतवादी वातावरणातही न्यायाचा आणि विवेकाचा आवाज जागा ठेवणारी सिव्हिल सोसायटी आणि त्यांना आपल्या अल्प शक्तीने का असेना, साथ देणारा प्रसारमाध्यमांतला एक गट यावर एक प्रकरण असायला हवे होते.
भारताशी चार युद्धे लढलेल्या आणि दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतात अशांती कायम ठेवणाऱ्या पाकिस्तानला समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.

डॉ. विवेक कोरडे
drvivekkorde@gmail.com

 

 

‘पाकिस्तान अ‍ॅट द क्रॉसरोडस – डोमेस्टिक डायनामिक्स अँड एक्स्टर्नल प्रेशर्स’

संपादन : ख्रिस्तॉफ जॅफ्रेलॉट
प्रकाशक : व्हिंटाज बुक
पृष्ठे : ३७६, किंमत : ४८९ रुपये