13 December 2017

News Flash

संचिताचा संच

भारताच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १ ऑगस्टलाच नऊ पुस्तकांचा एक संच बाजारात आला आहे

लोकसत्ता टीम | Updated: August 12, 2017 2:48 AM

भारताच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १ ऑगस्टलाच नऊ पुस्तकांचा एक संच बाजारात आला आहे. यात अगदी १५०० ते २००० वर्षांपासूनची भारतीय – पण इंग्रजीत भाषांतररूपानं उपलब्धच असलेली- पुस्तकं निवडली गेली आहेत. या संचाला थेट धार्मिक रंग असू नये, हे पथ्य हा संच प्रकाशित करणाऱ्या ‘पेंग्विन इंडिया’नं पाळलेलं दिसतं.

या संचातलं पहिलं पुस्तक आहे, गुप्तकाळात लिहिलं गेलेलं ‘कामसूत्र’ (‘अ गाइड टु द आर्ट ऑफ प्लेझर’). वात्स्यायनाच्या या ग्रंथाचं इंग्रजी भाषांतर. आदित्यनारायण धैर्यशील (एएनडी) हक्सर यांचं हे पुस्तक २००१ मध्ये प्रकाशित झालं होतं. तर कालिदासाच्या ‘अभिज्ञानशाकुंतलम्’चं विनय धारवाडकरांनी केलेलं भाषांतर २०१६ मध्ये ‘पेंग्विन’नं आणलं होतं. या दोन पुस्तकांखेरीज १९९२ पासून भरपूर मागणी असलेलं आणि राजनैतिक अधिकारी एल. एन. रंगराजन यांनी भाषांतरित केलेलं कौटिल्याचं ‘अर्थशास्त्र’देखील या संचात आहेत. संचातली पुढली दोन पुस्तकं आध्यात्मिकतेचे निराळे पैलू दाखवणारी आहेत : तिरुवल्लार यांचं ‘कुरल’ (अनुवाद :  पी. एस. सुंदरम) आणि ‘आय, लल्ला’ (अनुवाद : रणजित होस्कोटे). ‘बाबरनामा’मधून मुघल भारतात येण्यापूर्वीचा भारत समजतो, त्यामुळे तेही पुस्तक इथं आहे. पण ‘बाबरनामा’चं अ‍ॅनेट सुसाना बेव्हेरिज यांनी मूळ तुर्क भाषेतून केलेलं चारखंडी भाषांतर तर इंटरनेटवरही उपलब्ध आहेच! इथं आहे, ती दिलीप हिरो यांनी संक्षेपित केलेली आवृत्ती. गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकूर (टागोर), सआदत हसन मण्टो आणि भीष्म साहनी या तीनच अर्वाचीन लेखकांची पुस्तकं या संचात आहेत. अनुक्रमे ‘घरे बाइरे’ (अनुवाद : श्रीजाता गुहा), ‘माय नेम इज राधा’ (‘इसेन्शिअल मण्टो’, अनुवाद : मुहम्मद उमर मेमन) आणि ‘तमस’ (अनुवाद :  डेझी रॉकवेल) ही ती पुस्तकं.

‘घरे बाइरे’वर सत्यजित राय आणि ‘तमस’वर गोविंद निहलानी यांनी चित्रपट केले होते म्हणून किंवा अन्य कारणांनी या नऊपैकी बहुतेक पुस्तकं अनेकांना माहीत असतील अशी आहेत. मराठीतही काही पुस्तकांचे अनुवाद उपलब्ध आहेतच. पण भारतीय नव-रत्नांचा हा संच बाजारात आणताना वेष्टन, बांधणी आणि एकंदर टापटिपीकडे लक्ष देण्यात आलं असल्यानं त्याचाही ग्राहकवर्ग असेलच!

First Published on August 12, 2017 2:48 am

Web Title: penguin classics box set