गेल्या दोन शतकांपासून मुंबईतील वैचारिक विश्वाला आकार देणारी एशियाटिक सोसायटी ही संस्था.. तिच्या आजवरच्या वाटचालीत एतद्देशीय मंडळींबरोबरच युरोपीय अभ्यासकांचेही योगदान महत्त्वाचे, किंबहुना अग्रगामी ठरण्याजोगे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सोसायटीशी जोडल्या गेलेल्या युरोपीय अभ्यासकांपैकी पीटर पीटरसन हे एक महत्त्वाचे अभ्यासक. भारतविद्या (इंडोलॉजी), विशेषत: जुन्या संस्कृत हस्तलिखितांचा शोध व विश्लेषण हा त्यांच्या अभ्यासाचा प्रांत. मूळचे इंग्लंडचे असलेल्या पीटरसन यांनी आपले सारे आयुष्य भारतीय समाज-संस्कृतीच्या अभ्यासात झोकून दिले. त्यांच्या या संशोधनकार्याची, इथल्या वैचारिक विश्वातील त्यांच्या योगदानाची साक्षेपी नोंद घेणारं हे पुस्तक..

इंडोलॉजी (भारतविद्या) म्हणजे भारतीय भाषा, इतिहास, धर्म, साहित्य व अन्य संबंधित शाखांचे अध्ययन करणारी ज्ञानशाखा. आधुनिक भारताच्या सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीमध्ये इंडोलॉजी या ज्ञानशाखेचा- अभ्यासपरंपरेचा मोठा वाटा आहे. १८ व्या व १९ व्या शतकात युरोपीय वसाहतकारांच्या वाढत्या राजकीय व सांस्कृतिक प्रभावासोबत पाश्चात्त्य संशोधन-चिकित्सा पद्धतीने उपखंडातील समाज-संस्कृतीचा अभ्यास अनेक युरोपीय अभ्यासक व वसाहतींमधील जिज्ञासू-अभ्यासक अधिकारीवर्गाने सुरू केला. त्यातूनच भारतात व युरोपात या ज्ञानशाखेची पायाभरणी झाली. इंग्रजांचे राजकीय बस्तान बसल्यावर या अभ्यासपरंपरेला अधिक चालना मिळून अनेक युरोपीयनांनी व आधुनिक शिक्षणपद्धतीत शिक्षण घेतलेल्या स्थानिक नवशिक्षित मंडळींनी या ज्ञानशाखेत आपापल्या परीने योगदान दिले आहे. आज संस्कृती-इतिहास इत्यादी विषयांमध्ये सर्वाचीच रुची वाढत असताना, या आधुनिक ज्ञानपरंपरांचा अभ्यास करणाऱ्या जिज्ञासूंनी त्या विषयातील नवे लिखाण आवर्जून वाचावयास हवे. त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या, नव्याने प्रकाशित झालेल्या एका लक्षणीय लघुग्रंथाची ओळख या लेखाद्वारे करून देण्याचा हा अल्पप्रयत्न..

मुंबईच्या एसएनडीटी कला महाविद्यालयातील इतिहासाच्या प्राध्यापिका डॉ. नम्रता गणेरी यांनी लिहिलेला ‘पीटर पीटरसन’ हा एका इंडोलॉजिस्टच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा ग्रंथ मुंबईतील सुप्रसिद्ध एशियाटिक सोसायटीतर्फे नुकताच प्रकाशित झाला. वास्तवात मुंबईच्या सांस्कृतिक-शैक्षणिक इतिहासाचा आढावा घेणाऱ्या ‘फाऊंडर्स अ‍ॅण्ड गार्डियन्स ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ या मोठय़ा प्रकल्पाचा एक भाग म्हणून हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. मुंबईत जवळपास गेल्या दोन शतकांपासून अधिक काळ कार्यरत असलेल्या एशियाटिक सोसायटीची महती व ऐतिहासिक महत्त्व या ग्रंथमालिकेद्वारे वाचकांना आणि मुंबईकरांनादेखील या प्रकल्पाच्या-ग्रंथाच्या निमित्ताने जाणून घेता येईल. मुंबईतील वैचारिक विश्वाच्या परंपरेमध्ये एशियाटिक सोसायटीच्या भरीव योगदानाचा सार्थ अभिमान असलेल्या दिवंगत, ज्येष्ठ पत्रकार, व्यासंगी संपादक व एशियाटिक सोसायटी, मुंबईचे माजी अध्यक्ष अरुण टिकेकर यांच्या साक्षेपी अभ्यासदृष्टीतून व मुख्य संपादनाखील प्रस्तुत ग्रंथमालिकेत एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेशी संबंधित असलेल्या प्रमुख युरोपीय अभ्यासक-अधिकाऱ्यांच्या संशोधकीय आयुष्याचा आढावा घेतला गेला आहे.

या युरोपीय संस्थाचालक अभ्यासकांपैकी एक असलेल्या पीटर पीटरसन (१८४७-१८९९) यांनी सोसायटीमध्ये संशोधक, कार्याध्यक्ष (सेक्रेटरी), उपाध्यक्ष व अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. एडवर्ड मूर, जॉन फ्लीट, सर जॉर्ज बर्डवूड असे पूर्वसुरी, जॉर्ज ब्यूह्लरसारखे समकालीन, साक्षेपी संस्कृत-प्राकृत भाषेचे अभ्यासक व संशोधक यांच्या मांदियाळीत काम केलेल्या पीटर पीटरसन यांच्या चरित्राचा व अभ्यासकार्याचा आढावा घेताना डॉ. गणेरी यांनी या ग्रंथाचे १) प्रारंभिक आयुष्य व व्यावसायिक जीवन २) शिक्षण विभागातील सेवाकार्य ३) हस्तलिखित-शोधकार्य  व संशोधन ४) रॉयल एशियाटिक सोसायटी, मुंबई शाखेशी असलेले अनुबंध ५) निष्कर्ष – अशा पाच स्वतंत्र प्रकरणांत विभाजन केलेले आहे. शिवाय अ‍ॅकेडमिक पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथामध्ये असते तशीच जर्नल्स, नियतकालिकांची व संस्थांच्या नावाच्या लघुरूपांची (अु१ी५्रं३्रल्ल२) आणि संदर्भग्रंथांची सूची व परिशिष्ट चौकस वाचकांसाठी निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. ती सूची चाळताना अनुक्रम-संख्यांविषयीचे काही किरकोळ तांत्रिक मुद्रणदोष दुर्लक्षणीय ठरतात.

ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणाच्या सुरुवातीला असलेल्या परिचयवजा उपप्रकरणात १८५०-१९२० हा इंडोलॉजी या अभ्यासशाखेचा सुवर्णकाळ असल्याचे गणेरी सांगतात. आपल्या मताची पुष्टी करताना युरोपातून भारतात आलेल्या व युरोपीयन शिक्षणपद्धतीनुसार शिक्षण घेतलेल्या एतद्देशीय अभ्यासकांचा, त्यांच्या संशोधन प्रकल्पांचा आणि संस्था-शैक्षणिक नियतकालिकांचा (ख४१ल्लं’२)चा नामोल्लेखवजा उल्लेख करून लेखिकेने पीटरसन यांच्या व तत्कालीन अभ्यासविश्वातील कार्याचा पट मांडला आहे. युरोपीय पाश्चिमात्य दृष्टीतून पूर्वेच्या आशियाई-आफ्रिकी समाजांतील समाज-साहित्य-संस्कृती-कलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अर्थात पौर्वात्यवाद या संकल्पनेची गणेरी यांना जाण असल्याचे त्यांच्या विवेचनातून अनेक ठिकाणी जाणवत राहते. साधारणत: चरित्रग्रंथ- त्यातही अभ्यासकांचे चरित्रग्रंथ- लिहिताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा व जडणघडणीचा इतिहास अनेकदा केवळ कौटुंबिक माहितीपुरता मर्यादित राहतो. ‘पर्सनल हिस्ट्री’च्या अंगाने अभ्यासकांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांचा आणि वेगवेगळ्या काळात त्यांनी केलेल्या मांडणींचा व वैचारिक आलेखाचा तौलनिक अभ्यास करणारी चरित्रे फारशी आढळत नाहीत. ग्रंथाचे पहिले प्रकरण वाचताना गणेरी यांना या गोष्टीचे भान असल्याचे निश्चितच प्रतीत होते. मात्र, असे असले तरीही प्रकल्प संयोजकांच्या सूचनेनुसार आलेले जागेचे-शब्दमर्यादादीचे बंधन त्यांना आवश्यकता असूनही सविस्तर मांडणी करण्यासाठी बाधक ठरल्याचे जाणवत राहते. तरीही पीटरसन यांच्या कौटुंबिक पृष्ठभूमीचे प्रोटेस्टंट विचारांशी असलेले नाते, त्यातूनच उपजलेली चिकित्सक संशोधक वृत्ती इत्यादी गोष्टी संक्षेपात, पण नेमकं मांडायचा प्रयत्न गणेरी यांनी केला आहे. १८७३ मध्ये भारतात (मुंबईमध्ये) आल्यावर पीटरसन यांनी आरंभलेल्या कार्याचा पट मांडताना पीटरसन यांची एल्फिन्स्टन महाविद्यालयातील प्राध्यापकीय कारकीर्द, मुंबई विद्यापीठाचे लेखापाल म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा आढावा दुसऱ्या प्रकरणात घेतला गेला आहे. नामवंत अभ्यासक रा. गो. भांडारकर यांना डावलून पीटरसन यांची नेमणूक केल्यामुळे ‘भारतीय अभ्यासवर्तुळात निर्माण झालेला असंतोष’ ही महत्त्वाची घटना गणेरी यांनी येथे नोंदवली आहे. त्या नेमणुकीनंतर पीटरसन यांना झेलाव्या लागलेल्या त्रासाचा व त्यांच्याहून ज्येष्ठ व प्रस्थापित असलेल्या जॉर्ज ब्यूह्लरसारख्या बलाढय़-प्रस्थापित अभ्यासकांशी झालेल्या वादंगाचा परामर्शही लेखिकेने घेतला आहे. काही विशिष्ट अभ्यास-प्रकल्पांमध्ये भारतीय अभ्यासक/ कनिष्ठ स्तरावरील संशोधकांना सहभागी करून घेण्यासंदर्भातील ब्यूह्लर यांच्या नकारात्मक भूमिकेला पीटरसन यांनी केलेला विरोध, तसेच त्यांनी स्थानिक विद्यार्थ्यांशी निर्माण केलेले सौहार्दपूर्ण शैक्षणिक संबंध इत्यादी बाबी थोडक्यात पण अचूकपणे मांडण्यात आल्या आहेत. हे करताना ब्यूह्लरसारखे जर्मन इंडोलॉजिस्ट व अन्य ब्रिटिश इंडोलॉजिस्ट यांच्या संबंधांचा व अभ्यासक्षेत्रातील राजकारणाचा ताळेबंद अधिक ठळकपणे मांडून भारतात नव्याने रुजवल्या जाणाऱ्या इतिहास व भाषाभ्यासाच्या परंपरांवर सविस्तर भाष्य यानिमित्ताने करता आले असते. मात्र जागेच्या मर्यादेमुळे लेखिकेला या बाबींचा प्रमुख प्रातिनिधिक घटनांतून थोडक्यात आढावा घ्यावा लागला असावा.

पीटरसन यांनी महाविद्यालय-विद्यापीठीय वर्तुळात व एशियाटिक सोसायटीमध्ये काम करताना केलेल्या हस्तलिखित शोधकार्याचे व आनुषंगिक संशोधनाचे परिशीलन करतानाच ब्यूह्लर व कीलहॉर्न या महत्त्वाच्या अभ्यासकांनी मुंबईत व भारतभरात केलेल्या हस्तलिखित संपादनकार्याचा तपशीलवार आढावाही लेखिकेने उत्तमरीत्या घेतला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी मुंबई सरकारातून मिळणारे आर्थिक प्रायोजकत्व व अन्य तांत्रिक बाबी, भांडारकरांसमवेत पीटरसन यांनी हाती घेतलेला महाराष्ट्र, मध्यभारत व राजपुतान्यातील हस्तलिखितांसंबंधीचा शोधप्रकल्प, त्यादरम्यान आलेले अनेक सामाजिक अनुभव, अन्य ठिकाणच्या अभ्यासकांनी केलेले सहकार्य व त्यांचे सहसंबंध- यांच्या नोंदी घेण्याचं महत्त्वाचं काम या पुस्तकाच्या निमित्ताने झालं आहे.

चौथ्या प्रकरणात पीटरसन यांच्या एशियाटिक सोसायटीसोबत असलेल्या संबंधांचा आढावा घेताना सोसायटीच्या इतिहासावरच विशेष भर दिल्याचे जाणवते. अर्थात, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, ग्रंथलेखनाचा हा मूळ प्रकल्प ‘एशियाटिक सोसायटीत काम करणाऱ्या अभ्यासकांच्या कामातून मुंबई शहरातील अभ्यासकीय वर्तुळाचा इतिहास ग्रथन करणे’ हा असल्याने ती बाब वाचताना ठळकपणे लक्षात येईलच असे नाही. कारण त्याखेरीज या प्रकरणात भांडारकर व पीटरसन यांचे वात्सायनांच्या ‘कामसूत्रा’वरील निबंधात्मक काम, त्या कामाचा पुढील काळात वादग्रस्त व क्रांतिकारी ठरलेल्या संमतीवयाच्या कायद्याच्या  अनुषंगाने झालेला उपयोग अशा समाजशास्त्रीयदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या नोंदी गणेरी यांनी येथे केलेल्या आहेत.

ग्रंथाच्या शेवटच्या प्रकरणात पीटरसन हे पाश्चिमात्य संशोधन-चिकित्सापद्धतीनुसार काम करणाऱ्या भारतीय अभ्यासकांच्या नव्या सशक्त परंपरेला पौर्वात्यवादानुरूप धारणा व चिकित्सक वृत्तीला अधिक महत्त्व देणाऱ्या युरोपीय अभ्यासकांच्या मालिकेशी जोडणारे अभ्यासक असल्याचे गणेरी यांनी म्हटले आहे. ब्यूह्लरसारख्या ताकदवान अभ्यासकाचा वारसा पुढे नेताना पीटरसन यांनी केलेले कार्य; भांडारकर, भवानलाल इंद्रजी व अन्य स्थानिक अभ्यासकांशी प्रस्थापित झालेले मैत्रीपूर्ण संबंध आणि अभ्यासकीय वाद-देवाणघेवाण याचा संक्षेपात आढावा घेत प्रस्तुत ग्रंथाचा समारोप करण्यात आला आहे.

ग्रंथाच्या लेखिका डॉ. नम्रता गणेरी या सामाजिक व राजकीय इतिहासाच्या (र्रूं’ ंल्ल िढ’्र३्रूं’ ऌ्र२३१८) अभ्यासिका असल्याने पीटरसन व अन्य युरोपीय संस्कृततज्ज्ञ, भारतविद्यातज्ज्ञ यांनी प्रस्थापित केलेल्या अभ्यासपरंपरेकडे पाहण्याची त्यांची दृष्टी त्यांच्या शैक्षणिक पृष्ठभूमीला साजेशीच आहे. त्यांच्या त्या विषयातील औपचारिक ट्रेनिंगमुळेच पीटरसन-पूर्वकालीन व पीटरसनच्या कारकिर्दीतील इंडोलॉजिकल संशोधनांची, अभ्यासविश्वातील सामाजिक घडामोडींची, वासाहतिक काळात भारतीय समाजात रुजणाऱ्या/ रुजवल्या जाणाऱ्या आधुनिकतेची व आधुनिकतेच्या या राजकारणाची संक्षेपात का होईना, पण नेमकी दखल घेण्याचा हा त्यांचा प्रयत्न निश्चितच लक्षणीय ठरला आहे.

असे असले तरीही ग्रंथासाठी शब्दमर्यादा किंवा पृष्ठमर्यादा नसती तर युरोपीय अभ्यासकांनी भारतात रुजवलेल्या संशोधनदृष्टीचा पौर्वात्यवादाच्या अनुषंगाने आणि वासाहतिक इतिहासाच्या अंगाने आढावा घेण्याचे काम गणेरी यांना अधिक विस्ताराने करता आले असते, असे वाटत राहते. म्हणूनच हा ग्रंथ वाचताना विशेषत्वाने आठवण येते ती निराद चौधरी यांनी लिहिलेल्या मॅक्सम्युलर या विख्यात भारतविद्यातज्ज्ञाच्या चरित्राची. एका मोठय़ा ग्रंथमालिकेतील उप-ग्रंथ असल्याने पीटरसन यांच्या चरित्रलेखनाचा हा प्रपंच एक छोटेखानी संक्षिप्त ग्रंथापुरता मर्यादित राहिला असला, तरी गणेरी यांनी इंग्लंड व मुंबईतून संकलित केलेली पीटरसन यांच्याविषयीची कौटुंबिक-व्यावसायिक कागदपत्रे, छायाचित्रे व अन्य अभ्यासकीय साहित्य लक्षात घेता एक मोठा ग्रंथ आकाराला आणण्याइतपत साहित्य लेखिकेकडे निश्चितच आहे, असं ग्रंथ वाचताना जाणवत राहतं. इंग्रजांच्या वाढत्या अधिसत्तेबरोबर वाढत गेलेला युरोपीय सामाजिक व सांस्कृतिक नीतिमूल्यांचा आणि राजकीय व्यवस्थेचा प्रभाव, ब्रिटिश राजकीय धोरणांचा सांस्कृतिक जीवनावर होणारा परिणाम इत्यादी महत्त्वाच्या बाबींवर भर देऊन या लघुग्रंथाचा विस्तार गणेरींनी करावा, अशी अपेक्षा स्वाभाविकच व्यक्त होते. ब्रिटिश साम्राज्यशाही, त्या साम्राज्यशाहीला भारतीय समाजातून मिळणाऱ्या राजकीय-सांस्कृतिक प्रतिक्रिया, राष्ट्र-राज्य या पाश्चिमात्य संकल्पनेच्या प्रभावातून आकाराला येणारा भारतीय राष्ट्रवाद आणि मुंबईच्या औद्योगिक विकासासोबतच निर्माण झालेल्या वर्गवारीतून बदलत गेलेले जीवनमान या पृष्ठभूमीवर भारतीय संस्कृतीच्या व संस्कृत भाषेच्या झालेल्या पुनशरेधनाचा (डॉ. रा. ना. दांडेकर म्हणतात तसे- ऊ्र२ू५ी१८ ऋ रंल्ल२‘१्र३) आढावा घेणारा मोठा प्रकल्प एशियाटिक सोसायटीने पुढाकार घेऊन सुरू केल्यास ते एक मोठे संशोधकीय योगदानच ठरेल.

पीटर पीटरसन

लेखक : डॉ. नम्रता गणेरी

प्रकाशक : इंडस सोर्स बुक्स/ एशियाटिक सोसायटी, मुंबई

पृष्ठे : १०१, किंमत : १२५ रुपये

 

हेमंत प्रकाश राजोपाध्ये

rajopadhyehemant@gmail.com