१९६० नंतर पाश्चात्त्य देशांत आणि १९९० नंतर भारतासारख्या देशांमध्ये मूळ धरलेल्या माध्यमे, पब, मॉल संस्कृतीची स्पंदने १९४६ सालीच जॉर्ज ऑर्वेलने ‘Pleasure Spots’ या लेखात अचूक टिपली होती. त्या लेखाचा हा अनुवाद..

सुखाचे बेट वाटावे अशा भविष्यातील रिसॉर्टबद्दल नुकतेच वाचनात आले. होनोलुलु बेटावर काही काळ व्यतीत करून अलीकडेच परतलेल्या एका लेखिकेने तो लेख लिहिला होता. दुसऱ्या महायुद्धाचे हादरे तिथे फारसे जाणवलेले नसावेत, कारण एक पायलटच त्यांना म्हणाला, ‘या युद्धात नवनव्या गोष्टी शोधण्यासाठी माणसाची कल्पनाशक्ती पुरेपूर वापरली गेली. मात्र दुर्दैवाने तिचा वापर माणसांना तणावातून मुक्त करण्याचे एखादे साधन निर्माण करण्यासाठी केला गेला नाही. थकल्याभागल्या जीवांना आराम मिळेल, जगण्यासाठी तहानलेल्यांना चोवीस तास मनोरंजन आणि खाण्यापिण्यासाठी हवे ते उपलब्ध असेल. ताजेतवाने होऊन उत्साहाने ते पुन्हा आपल्या कामाला लागतील असे काही त्यातून निर्माण झालेच नाही.’ हे ऐकून लेखिकेला एका उद्योगपतींच्या स्वप्नातील प्रकल्पाची आठवण झाली. पर्यटकांचे नंदनवन म्हणून लोकप्रिय होण्याची खात्री असलेल्या त्यांच्या प्रकल्पाचे वर्णन थोडे विस्तारानेच करायला हवे –

‘अनेक एकरांवर पसरलेली व सरकत्या छताने आच्छादलेली एक विस्तीर्ण पोकळी असेल. तिच्या मध्यभागी पारदर्शी प्लास्टिकचा, तळाशी रोषणाई केलेला नृत्याचा एक मंच असेल. त्याच्या चोहोबाजूंनी वेगवेगळ्या मजल्यांवर विविध सेवासुविधांची रेलचेल असेल. त्यात असतील शहरातील उंच इमारतींचे दर्शन घडविणारे बार, उपाहारगृहे, बोलिंग अ‍ॅलीज आणि कृत्रिम तलाव. पाण्यात खेळणाऱ्यांसाठी असलेल्या तलावांमध्ये खळाळत्या लाटा उसळत असतील, तर नुसतेच किनाऱ्यावर बसणाऱ्यांसाठी एक शांत जलाशय असेल. एका मध्यवर्ती मंचावरून प्रसृत होणारे संगीत सगळीकडे झिरपावे यासाठी ठिकठिकाणी ध्वनिक्षेपक यंत्रणा उभारलेली असेल. बाहेर एक हजारांपेक्षा जास्त क्षमतेचे दोन कार-पार्क असतील, ज्यातला एक मोफत असेल. दुसऱ्यात पार्किंगच्या रांगेत उभे असताना सिनेमा पाहता यावा यासाठी मोठमोठे पडदे असतील. पेट्रोल/ऑइल विकतानाच हवी ती मदत देण्यासाठी गणवेशधारी सेवक असतील. खाद्यपदार्थ वा पेयांच्या ऑर्डर्स घेणाऱ्या सॅटिन स्लॅक्समधल्या सेविकांची लगबग असेल..’

जेव्हाही मी ‘सुखाचे बेट’, ‘आनंदाचा रिसॉर्ट’, ‘मायानगरी’ यांसारखे शब्द ऐकतो तेव्हा मला कवी कोलरिजच्या ‘कुबला खान’ या कवितेतील ओळी आठवतात-

‘स्वप्ननगरीत आला कुबला खानचा आदेश

रातोरात बनवा सुखाच्या घुमटांचा देश

वाहतील पवित्र नद्या गुहांतून समुद्राकडे

सभोवती उभे असतील मनोऱ्यांचे कडे

सुगंधी झाडांनी लगडलेल्या बागांच्या मध्यात

प्राचीन टेकडय़ा आणि जंगलांच्या हृदयात

बहरू द्या सूर्यप्रकाशात न्हालेली हिरवी बेटे’

पण कोलरिज चुकलाच! नद्या ‘पवित्र’ असून काय उपयोग? उद्योगपतींच्या हातात कुबलाचा ‘सुखाचा घुमट’ वेगळेच रूप धारण करील. वातानुकूलित गुहांमध्ये प्रकाश बेतानेच पसरावा अशी अंतर्गत रचना केलेली असेल. नद्यांना बांध घालून पोहण्याचा तलाव केलेला असेल. गुलाबी रोषणाई केलेल्या कृत्रिम समुद्रावर व्हेनिसमधल्या गोंडोलामधून फेरफटका मारता येईल. कोलरिजने वर्णन केलेली हिरवाई साफ करून तिथे टेनिस कोर्ट आणि स्केटिंग रिंक असतील. थोडक्यात, ‘जिवाची चैन’ करण्यासाठी आसुसलेल्या कुणाही मर्त्य मानवाला हवे ते सगळे तिथे असेल. मला खात्री आहे, की अशी शेकडो ‘सुखाची बेटे’ जगभर सगळीकडे उभी राहत आहेत. ही ‘नंदनवने’ आधुनिक ‘सुसंस्कृत’ माणसाची सुखाची कल्पना अचूक व्यक्त करतात. आलीशान नृत्यमंच, चित्रपट-महाल, तारांकित हॉटेले, उपाहारगृहे, लक्झरी जहाजे यांसारख्या ठिकाणी अशी बेटे आताच अवतरलेली आहेत. भविष्यातील नंदनवनांची झलक तिथे पाहायला मिळते.

अशा विविध रूपांत उभ्या राहिलेल्या सुखाच्या बेटांची काही सर्वसाधारण वैशिष्टय़े अशी :

(१) तिथे कुणीही एकटे नसते.

(२) कुणीही ‘फक्त आपल्यासाठी’ काही करायचे नसते.

(३) तिथून अरण्यांचे, निसर्गसौंदर्याचे ओझरते दर्शनही होत नाही.

(४) प्रकाश आणि तापमान कृत्रिमरीत्या नियंत्रित केलेले असतात.

(५) सदैव सर्वत्र संगीतलहरी कानांवर पडत असतात.

यातील ‘संगीत’- शक्य असल्यास सगळ्यांसाठी सारखेच- हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्याचा एक उद्देश आहे विचार आणि संभाषण टाळण्यासाठी पाश्र्वभूमी तयार करणे, तर दुसरा उद्देश आहे सर्व प्रकारचे नैसर्गिक आवाज- पक्ष्यांचा किलबिलाट किंवा वाऱ्याची शीळ – विसरायला लावणे. या उद्देशाने रेडिओ वापरणारी हजारो माणसे आजच दिसतात. इंग्लंडमध्ये अशी अनेक घरे आहेत जिथे रेडिओ कधीही बंद केला जात नाही. मधूनमधून केवळ स्टेशन बदलले जाते, जेणेकरून फक्त सुगम संगीत कानी पडावे. बऱ्याचदा मी लोकांना रेडिओ सुरू ठेवून जेवताना किंवा गप्पा मारताना पाहिले आहे. अशा वेळी खरे तर संगीत व  बोलणाऱ्यांचा आवाज एकमेकांवर कुरघोडी करीत परस्परांना छेद देतात. मात्र तरीही असे करीत राहण्यामागे लोकांचा काही तरी हेतू साध्य होताना दिसतो. एकीकडे संगीताचा आवाज मधेमधे येत राहिल्याने गप्पा गंभीर किंवा सुसंगत होत नाहीत, तर दुसरीकडे गप्पांचा आवाज मधेमधे येत राहिल्याने संगीतही पूर्ण एकाग्रतेने ऐकता येत नाही. या दोन्ही गोष्टी अर्थातच ‘विचार’नामक भयानक गोष्टीला मनात मूळच धरू देत नाहीत. कारण-

‘दिवे मालवू नका, संगीत ओसंडून वाहू द्या

नाही तर आपल्याला दिसेल कुठे आहोत आपण

पछाडलेल्या जंगलात अंधाराला

घाबरणाऱ्या मुलांसारखे

कधीच सुखी वा शहाणे न होऊ  शकलेले’

मला तर वाटते की, या सुखाच्या बेटांचे सुप्त उद्दिष्ट माणसाला पुन्हा आईच्या गर्भाशयातील परिस्थितीत नेण्याचे असावे. तिथेही उजेड-वारा आत येत नाही, तापमान आपोआप नियंत्रित केलेले असते आणि काम करण्याची किंवा खाण्यापिण्याची चिंता सतावीत नाही आणि जर काही विचारतरंग मनात उमटलेच तर ते मातेच्या हृदयाच्या अविरत, लयबद्ध धडधडीत विरून जातात.

कोलरिजची ‘सुखाच्या घुमटाची’ कल्पना निसर्गाभोवती- म्हणजे बागा, राने, नद्या, गुहा आणि गूढ विवरे असलेल्या पर्वतांभोवती फिरते. हिमनद्या, वाळवंटे वा धबधबे अशा थक्क करणाऱ्या विविध  निसर्गरूपांसमोर प्रत्ययाला येणाऱ्या आध्यात्मिक अनुभूतीची किनार या कल्पनेला आहे. ही अनुभूती वैश्विक शक्तीसमोरील माणसाच्या क्षुद्रतेच्या आणि शक्तिहीनतेच्या जाणिवेत उगम पावते. चंद्र सुंदर वाटण्यामागे आपण तिथवर पोहोचू शकत नाही हेही एक कारण असते. समुद्राची विशालता आपल्याला भारून टाकते, कारण कुणीही तो सुरक्षितपणे पार करेल याची खात्री नसते. एखादे फूल आनंद देते, कारण त्याच्या फुलण्यामागे काही तरी अगम्य गूढ लपलेले असते; पण गेल्या शतकात निसर्गाच्या तुलनेत माणसाची शक्ती सतत वाढती राहिलेली आहे. अणुशक्ती वापरणाऱ्या माणसाला पर्वत अक्षरश: ‘हलविणे’ आता शक्य आहे, ध्रुवावरील बर्फाचे पाणी करून वाळवंट हिरवेगार करणेही शक्य आहे. अशा परिस्थितीत पक्ष्यांचे संगीत ऐकणे भावविवशतेचा आविष्कार वाटू शकते. जागोजागी रानावनांचे अवशेष मागे ठेवणे ‘अनाकलनीय’ वाटू शकते. त्याऐवजी लयीत डोलायला लावणारे संगीत हवेहवेसे वाटते, कृत्रिम प्रकाशात न्हाऊन निघालेल्या उड्डाणपुलांनी संपूर्ण पृथ्वी आच्छादून टाकावीशी वाटते.

हा प्रश्नच मुळात निर्माण झालाय, कारण भौतिक विश्वाचा यशस्वीरीत्या शोध घेताना माणूस स्वत:चा शोध घेण्यात मात्र अपयशी ठरला आहे. अशा परिस्थितीत आपली जाणीव कशात तरी बुडवून टाकणे यालाच तो ‘सुख’ किंवा ‘आनंद’ म्हणू लागलेला आहे. कारण असे केले नाही तर धोका आहे आपण आपल्यालाच प्रश्न विचारायला लागण्याचा. माणूस असणे म्हणजे काय? माणसाच्या गरजा काय आहेत? माणूस स्वत:ला कशा प्रकारे उत्तमरीत्या व्यक्त करू शकतो? अशा प्रश्नांमुळे आपल्याला अडचणीची ठरणारी सत्ये लक्षात येण्याचा धोका आहे. आपल्याला जाणवू शकते, की श्रमांपासून सुटका करून घेणे मानवी बुद्धिमत्तेचे सर्वोच्च उद्दिष्ट नाही. हातापायांत चैतन्य असेपर्यंत विद्युतझोतांमध्ये आणि रेकॉर्डवर वाजणाऱ्या संगीतात स्वत:ला बुडवून घेणे आयुष्याची इतिकर्तव्यता नाही.

माणसाला सुरक्षितता, मोकळा वेळ आणि आराम हवा असतो हे खरे, मात्र त्याहीपेक्षा त्याला जास्त आवश्यकता असते एकांताची, काही तरी निर्माण करण्याची आणि गूढतेच्या जाणिवेची. हे जर नीट लक्षात घेतले तरच माणूस विज्ञान आणि यंत्रसंस्कृती यांनी दिलेली प्रत्येक देणगी विचारपूर्वक वापरू शकेल. कोणतीही गोष्ट वापरताना तो सतत स्वत:ला विचारील, की यातून माझे ‘माणूस’पण फुलणार आहे की कोमेजणार आहे? आपला सर्वोच्च आनंद श्रमांतून मुक्त होण्यात, आराम करण्यात, पत्ते खेळण्यात, खाण्यापिण्यात किंवा प्रणयात नाही हे त्याच्या लक्षात येईल. आयुष्याच्या उत्तरोत्तर होत जाणाऱ्या यांत्रिकीकरणाचा उत्स्फूर्त तिटकारा वाटणे संवेदनशील माणसाचे लक्षण आहे, हे त्याला कळेल.  असा तिटकारा केवळ भावविवश रूढीवाद नसून असे वाटण्यातच माणसाचे माणूसपण आहे. सिनेमा, रेडिओ, ध्वनिमुद्रित संगीत, विमाने यांसारख्या बऱ्याच आधुनिक शोधांची प्रवृत्ती आपली जाणीव बोथट करण्याची असते. आपल्या जिज्ञासेला बांध घालण्याची आणि एकूणच आपल्याला प्राण्यांच्या अधिकच जवळ नेण्याची असते. अशा वेळी आपल्या जीवनात साधेपणाची जितकी जास्त बेटे टिकवता येतील तितके आपल्याला माणसात राहणे साध्य होईल.

डॉ. मनोज पाथरकर manojrm074@gmail.com