एप्रिल, १९४६ मध्ये लिहिलेला ‘पॉलिटिक्स अ‍ॅण्ड द इंग्लिश लँग्वेज’ हा ऑर्वेलचा सर्वात प्रसिद्ध निबंध.. त्या निबंधाचे स्वैर भाषांतर दोन भागांत येथे प्रसिद्ध करीत आहोत; त्यापैकी हा पहिला भाग- ऑर्वेलच्या मुद्दय़ांना पुष्टी देणाऱ्या मराठी उदाहरणांसह!

भाषेच्या सद्य:स्थितीचा विचार करणाऱ्या कुणालाही भाषेचे काही खरे नाही असेच वाटेल. भाषेच्या अधोगतीमागे राजकीय आणि आर्थिक कारणे असतात; तो केवळ विशिष्ट पद्धतीने लिहिणाऱ्यांच्या बऱ्यावाईट प्रभावाचा परिणाम नसतो. पण मूळ कारणांमुळे घडून येणारा परिणाम आणखी दूरगामी बदल घडवून आणतो. जसे वैफल्यातून व्यसनांकडे वळणारी व्यक्ती व्यसनाचा परिणाम म्हणून अपयशी होऊन पूर्णपणे व्यसनाधीन होते. भाषा गबाळ आणि दोषपूर्ण होण्यामागे जसे अर्थहीन विचार असू शकतात, तसाच भाषेचा अजागळपणाही मनात निर्थक विचार उद्भवण्यास सहाय्यकारी होऊ शकतो. सुस्पष्ट विचार करणे ही राजकीय संवादाची पहिली पायरी असल्यामुळे भाषेच्या चुकीच्या वापराविरुद्ध केवळ लेखकांनीच नव्हे, तर सर्वानीच गंभीर असायला हवे.

मृत उपमा, ताणलेले शब्दप्रयोग

भाषेच्या अयोग्य वापरात प्रामुख्याने आढळणाऱ्या गोष्टी म्हणजे शिळ्या प्रतिमा आणि काटेकोरपणाचा अभाव. जे सांगायचे आहे ते लेखकाला एक तर मांडता येत नाही किंवा शब्दांच्या अर्थाबद्दल त्याला फारशी पर्वा नसते. आजच्या भाषेची- विशेषत: राजकीय लेखनाची- ही खासीयतच होत चालली आहे. एखादा विषय उपस्थित व्हायचा अवकाश, की मूर्त वास्तव अमूर्त कल्पनांमध्ये विरघळून जाते आणि वापरून गुळगुळीत झालेल्या शब्दांशिवाय काहीही सुचत नाही. हे टाळून अर्थपूर्ण लेखन करण्यासाठी थोडे कष्ट घ्यायची गरज आहे. अन्यथा भाषेचा वापर वेगवेगळ्या अंगांनी सदोष होत जातो.

नव्याने निर्माण केलेली उपमा दृश्य प्रतिमा साकारून विचारांना साहाय्यभूत ठरते. याउलट ‘मृत’ उपमा- उदा. ‘सोनेरी पान’ किंवा ‘रोपटय़ाचा वटवृक्ष होणे’- वापरून सवयीची झालेली असल्याने डोळ्यांसमोर योग्य चित्र उभे करू शकत नाही. नव्या प्रभावी उपमांचे एक टोक आणि गुळगुळीत प्रतिमांचे दुसरे टोक यांच्यामध्ये कमीअधिक प्रमाणात प्रभावहीन झालेल्या अनेक उपमा वावरत असतात. त्यांच्यामुळे सुस्पष्ट चित्र उभे करणारे नवे शब्दप्रयोग तयार करण्याचा त्रास वाचविता येतो. उदा. मुहूर्तमेढ रोवणे, मळलेली वाट, दुर्दम्य आशावाद, उत्तुंग भरारी, इत्यादी. कधी कधी आपल्याला त्यांच्या अर्थाचा किंवा त्यामागच्या संदर्भाचा पत्तादेखील नसतो (मुहूर्तमेढ म्हणजे काय?). त्यातच भर म्हणजे परस्परविरोधी प्रतिमा एकत्र करून वापरणे. असे करणाऱ्याला आपल्याला काय म्हणायचे आहे याच्याशी काहीही देणेघेणे नसावे, असे वाटते. उदा. ‘प्रश्न ऐरणीवर येतो’, मात्र त्याचे उत्तर शोधताना ‘काळ्या दगडावरची रेघ’ दिसते! यातून त्या विषयावरच्या खुल्या चर्चेची लेखकाला गरजच वाटत नसल्याचे स्पष्ट होते.

बऱ्याचदा सोप्या सरळ क्रियापदांऐवजी लांबलचक शब्दप्रयोग वापरला जातो. यामुळे योग्य क्रियापदे आणि नामे वापरण्याच्या तसदीपासून सुटका होते, शिवाय वाक्य पसरवून भारदस्त करता येते. उदा. ‘गोळ्याला आकार देणे’ (घडविणे), ‘असे म्हटल्यास वावगे ठरू नये’ (हे स्पष्ट आहे). योग्य आणि चपखल क्रियापदे वापरण्याऐवजी जड शब्दांना काहीतरी जोडून शब्द तयार केले जातात. उदा. ‘स्पष्ट’ (clear), ‘निश्चित’ (certain), ‘वादातीत’ (beyond debate) हे शब्द आपापल्या योग्य ठिकाणी स्वतंत्रपणे वापरण्याऐवजी तिन्ही जागी ‘नि:संदिग्ध’ हा शब्द वापरणे. यात भर पडते ती साचेबद्ध म्हणीवजा शब्दप्रयोगांची – शरसंधान करणे, वसा हाती घेणे, बुरखा (टराटरा) फाडणे, इत्यादी.

वजनदार आणि पारिभाषिक शब्द

साध्या सोप्या निरीक्षणांना एखाद्या निष्पक्ष शास्त्रीय शोधाचे वजन देण्यासाठी काही ‘वजनदार’ शब्दप्रयोग वापरले जातात. जसे- अपरिहार्यपणे नोंद घ्यावी लागणे, अहर्निश कार्यरत असणे, इतिकर्तव्यता मानणे, इत्यादी. आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रक्रिया वर्णन करताना अशोभनीय गोष्टींना सन्माननीय करण्यासाठी आणि युद्धासारख्या गोष्टींचा गौरव करण्याच्या प्रयत्नातून निर्माण होणारी शैली आपोआपच प्राचीनतेचा रंग धारण करते- उदा.  सिंहासन, रथ, निशाण, शंखध्वनी, दंड थोपटणे, अश्वमेध, यावच्चंद्रदिवाकरौ इत्यादी शब्द. बऱ्याचदा साध्या साध्या गोष्टींना सांस्कृतिक वजन देताना परभाषिक शब्दप्रयोग (किंवा त्यांची शब्दश: भाषांतरे) वापरले जातात. जसे- व्हायब्रेशन्स, स्पेस देणे किंवा अधोरेखित करणे (underline), मैलाचा दगड (milestone) B.

काही मोजके अपवाद आणि संक्षिप्त रूपे सोडली, तर शेकडो परभाषिक किंवा तत्सम शब्द वापरात येण्याइतके अर्थवाही नसतात. विशेषत: विज्ञान, राजकारण, समाजशास्त्र इत्यादींबद्दल लिहिणारा बऱ्याचदा संस्कृत शब्द प्राकृत शब्दांपेक्षा (इंग्रजीच्या संदर्भात लॅटीन / ग्रीक शब्द सॅक्सन शब्दांपेक्षा) जास्त उपयोगाचे आहेत, हे गृहीतच धरून चालतो. त्यामुळे सोपे पर्याय शोधण्याऐवजी प्राचीन आणि कठीण शब्द वापरात आणले जातात. उदा. अभ्युपगम, यादृच्छिक, अनुज्ञप्ती, परीविक्षाधीन (इंग्रजीत status quo, ameliorate, deracinated). नवे पारिभाषिक शब्द तयार करताना (संकल्पनेचे मराठीकरण करण्याऐवजी इंग्रजी शब्दाची लॅटीन किंवा ग्रीक मुळे शोधून) त्या अर्थाच्या संस्कृत शब्दांना उपसर्ग आणि प्रत्यय लावून शब्द बनवले जातात. जसे- परानुकंपी (parasympathetic), परमप्रभाव (hegemony), अपसमायोजन (maladjustment) इत्यादी. यातून योग्य प्रकारे अर्थ व्यक्त करणारा शब्द तर तयार होत नाहीच, उलट लेखन दुबरेध आणि अस्पष्ट होते.

अर्थहीन शब्दप्रयोग..

कला किंवा वाङ्मयसमीक्षेच्या क्षेत्रात कोणताही अर्थ निघू शकणारे लांबलचक उतारे बघावयास मिळतात. यातील काही शब्द इतक्या विविध अर्थानी वापरले जाणारे असतात, की कोणत्याही नेमक्या गोष्टीचा निर्देश होणे अशक्यच असते. एखादा समीक्षक म्हणतो की, ‘क्ष यांच्या कलाकृतीचा विशेष तिचा जिवंतपणा आहे’; तर दुसरा म्हणतो- ‘त्या कलाकृतीत जिवंतपणाच नाही’! वाचकही याला मतभिन्नता मानून मोकळा होतो. त्याऐवजी ‘जिवंतपणा’चा लेखकाचा अर्थ काय ते स्पष्ट करून सांगितले, तर वाचकाला जास्त चांगले समजेल. हीच गोष्ट ‘सपक, तरल, पसरट, पोत’ यांसारख्या शब्दांना लागू होते.

राजकारणाशी संबंधित बऱ्याच शब्दांचादेखील अशा प्रकारे वापर होतो. उदा. ‘फॅसिझम’ या शब्दाचा आज कोणताही सुस्पष्ट अर्थ नाही, त्यातून फक्त ‘काहीतरी नको असलेले’ एवढाच अर्थ ध्वनित होतो. ‘लोकशाही, समाजवाद, स्वातंत्र्य, देशभक्ती, वास्तववादी, न्याय’ यांसारख्या शब्दांना एकमेकांशी मेळ न बसणारे विविध (विसंगतसुद्धा) अर्थ आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यव्यवस्थांचे समर्थक आपल्या व्यवस्थेला ‘खरी लोकशाही’ म्हणवून घेत असल्याने लोकशाहीची काटेकोर व्याख्या त्यांना नको असते. एखाद्या देशाला लोकशाही म्हणणे म्हणजे त्याचे कौतुक करणे आहे, याबाबत मात्र सगळ्यांचे एकमत असते. या पठडीतले शब्द जाणीवपूर्वक अप्रामाणिकपणे वापरले जातात. म्हणजे, हे शब्द वापरणाऱ्या प्रत्येकाची स्वत:ची अशी एक व्याख्या असते, पण ऐकणाऱ्याला वेगळा अर्थ काढण्याची मुभा असते (किंबहुना ते अपेक्षितच असते.) असे शब्द अनेकदा वाचकाची दिशाभूल करण्यासाठी वापरले जातात. उदा. वर्ग, शास्त्र, पुरोगामी, प्रतिगामी, मध्यमवर्ग, समता.

भाषेच्या वापरातील हातचलाखी आणि विपर्यासांची ही यादी देताना अतिशयोक्ती करण्याचा अजिबात उद्देश नव्हता. अशा प्रकारची लेखनशैली सर्वदूर पसरलेली नाही. अजूनही वाईट लिखाणाइतकीच भाषेच्या साध्यासोप्या वापराची उदाहरणे सापडतात. अर्थ व्यक्त करणारे योग्य शब्द न निवडणे किंवा तो स्पष्ट करणाऱ्या नव्या प्रतिमा न शोधणे हे चूकच. पण त्याहीपेक्षा वाईट म्हणजे दुसऱ्या कुणीतरी आधीच जुळवून ठेवलेले शब्दप्रयोग बिनदिक्कत एकामागे एक चिकटवीत जाणे. आणि अशी जुळवाजुळव करून साळसूदपणे काहीतरी नवे सांगितल्याचा आविर्भाव आणणे. असे केल्याने योग्य शब्द शोधण्याचा त्रास तर वाचतोच, शिवाय वाक्यांना एक तालही विनासायास मिळून जातो. बऱ्याच तयार शब्दपट्टय़ा वाक्यांना टेकू देऊन तोलून धरतात. पण गुळगुळीत प्रतिमा, उपमा आणि वाक्प्रचार वापरून बौद्धिक कष्ट वाचवताना आपण जे सांगायचे आहे ते इतरांनाच नाही तर स्वत:लाही समजणे कठीण करतो.

चार (अधिक दोन) प्रश्न.. 

प्रत्येक लेखकाने कोणतेही वाक्य लिहिताना स्वत:ला किमान चार प्रश्न विचारावेत : मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे? कोणते शब्द ते योग्य प्रकारे मांडू शकतील? कोणती प्रतिमा किंवा वाक्प्रचार मला जे सांगायचे आहे ते अधिक स्पष्ट करून सांगेल? परिणामकारक ठरण्याइतपत ताजेपण या प्रतिमेत आहे काय?

खरे तर तो आणखी दोन प्रश्न स्वत:ला विचारू शकेल : मी हे आणखी कमी शब्दांत मांडू शकतो का? टाळता येईल असा शब्दप्रयोग मी वापरला आहे का?

पण हा सगळा त्रास घेण्याची तुमच्यावर कोणतीही सक्ती नाही. तुम्ही हे सहज टाळू शकता, फक्त तुमचे मन विचारांच्या पकडीतून मोकळे सोडायचे आणि तयार शब्दसमूहांना तिथे गर्दी करू द्यायची. हे शब्द तुमची वाक्ये आपोआपच तयार करतील. थोडय़ाफार प्रमाणात तुमच्या वतीने विचारही करतील आणि गरज पडेल तेव्हा तुमचे विचार (अर्थ) तुमच्यापासून लपवून ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी बजावतील. हे समजून घेतले, की भाषेचा घसरणारा दर्जा आणि राजकारण यांच्यातील सर्वात महत्त्वाचा संबंध लक्षात येतो.

डॉ. मनोज पाथरकर manojrm074@gmail.com