आज राजकीय लेखन सदोष झालेले आहे हे सर्वच मान्य करतील. याला अपवाद (असलाच तर) पक्षाची अधिकृत भूमिका न मांडता स्वत:चे विचार मांडणाऱ्या बंडखोर लेखकांचा. कोणत्याही प्रकारच्या परंपरावादाला निर्जीव, अनुकरणातून येणारी शैली मानवताना दिसते. पत्रके, लेख, जाहीरनामे, श्वेतपत्रिका आणि साहाय्यकांनी तयार केलेली भाषणे यांतील राजकीय परिभाषेचे रंग पक्षानुसार वेगवेगळे असतात. पण ठरावीक शब्द त्यात इतके यंत्रवत येत असतात, की आपण नक्की काय सांगतोय याची कदाचित लिहिणाऱ्यालाही जाणीव नसावी- एखादी आरती म्हणताना त्यातील शब्दांचे अर्थ व विचार यांची जी अवस्था होते तसे!

विचारांशी नाते तुटलेले असे लिहिणे-बोलणे राजकीय कर्मठपणाला पोषक भूमी तयार करते. राजकीय लेखन किंवा भाषण करणे म्हणजे बहुतेक वेळा असमर्थनीय गोष्टींचे समर्थन करणे झालेले आहे. काही कठीण निर्णयांचे खरोखरच समर्थन केले जाऊ  शकते. पण त्यासाठी करावे लागणारे कठोर युक्तिवाद जनतेला स्वीकारण्यास जड आणि राजकीय पक्षांच्या उघड उद्दिष्टांच्या विरुद्ध असतात. त्यामुळे राजकारणाविषयी बोलताना व्याजस्तुती (अप्रिय गोष्टी गुळमुळीत शब्दांत मांडणे), निराधार गोष्टी गृहीत धरणे, नेमके प्रश्न टाळणे व मोघमपणा या गोष्टी आवश्यक बनून जातात.

भाषा आणि विचार

आंतरराष्ट्रीय राजकारणात याची टोकाची उदाहरणे सापडतात. स्वत:चे रक्षण करण्यास असमर्थ गावांवर विमानांतून बॉम्बवर्षांव केला जातो, तिथल्या रहिवाशांना वस्त्यांबाहेर पिटाळले जाते, ज्वलनशील गोळ्यांनी त्यांच्या झोपडय़ा बेचिराख केल्या जातात आणि या प्रक्रियेला नाव दिले जाते- ‘शांतीची प्रस्थापना’ (pacification)! लाखो शेतकऱ्यांपासून त्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या जातात आणि सोबत वाहून नेता येईल एवढे सामान लादून त्यांना पायपीट करायला भाग पाडले जाते. याला म्हणतात- ‘लोकसंख्येचे स्थलांतर’! लोकांना खटले न भरता कायदेशीर प्रक्रियेशिवाय वर्षांनुवर्षे तुरुंगात डांबले जाते किंवा गोळी घालून ठार केले जाते, नाही तर छळछावण्यांत पाठवले जाते. याला म्हणतात- ‘समाजातील धोकादायक प्रवृत्तींचा नाश’! प्रत्यक्षात जे घडते आहे त्याचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहणार नाही याची काळजी घेत त्याबद्दल बोलायचे असल्याने अशा प्रकारची भाषा निर्माण होते.

संस्कृतप्रचुर (किंवा लॅटिन) शब्दांच्या हिमवर्षांवाखाली सत्य असे आच्छादून टाकले जाते, की जे घडते आहे त्याचे स्वरूप आणि व्याप्ती नजरेआड होईल. जेव्हा सर्वासमोर मांडायच्या आणि मनात दडलेल्या उद्दिष्टांमध्ये अंतर असते तेव्हा आपोआपच लांबलचक वाक्ये, मोठे आणि प्राचीन बाजाचे शब्द वापरले जातात. जगण्याचे सर्वच प्रश्न राजकीय झालेले असताना राजकारण मात्र खोटेपणा, टाळाटाळ, अविचार, द्वेष आणि दुटप्पीपणाचे आगर होत चालले आहे. अशा वातावरणात भाषेची अधोगती अपरिहार्य आहे. जसे विचार भाषेला भ्रष्ट करतात तशी भाषाही विचारांना भ्रष्ट करते. शब्दांचा अनुचित वापर परंपरेच्या रूपाने जाणत्या-सवरत्या लेखकांच्या लेखनातही पसरू शकतो, कारण या प्रकारची दर्जाहीन भाषा काही बाबतींत सोयीची ठरते. या लेखाच्या पूर्वार्धात (१७ फेब्रुवारी) उदाहरण म्हणून आलेल्या तयार शब्दपट्टय़ा हा एक न सुटणारा मोह असतो, हाताशी असलेल्या डोकेदुखीच्या गोळीसारखा. अगदी या लेखातसुद्धा मी पुन:पुन्हा त्याच चुका केलेल्या दिसतील ज्यांचा मी इथे समाचार घेतोय!

मी आधी म्हटल्याप्रमाणे, भाषेचा हा ऱ्हास थांबविण्यासारखा आहे. हे खरे की भाषा सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब असल्याने केवळ शब्द आणि वाक्यरचनेच्या पातळीवर बदल घडवून आपण भाषेच्या जडणघडणीची दिशा बदलू शकत नाही. मात्र अर्थहीन शब्दप्रयोग जाणीवपूर्वक प्रयत्नांनी प्रवाहाबाहेर फेकता आल्याची उदाहरणे आहेत. लोकांनी जर ठरवले तर अनेक शब्द-प्रतिमांचे फुगे वापरातून बाद करता येतील. आणि ‘नाकारता येत नाही’ धाटणीची वाक्यरचना सरळ करता येईल. संस्कृतप्रचुर प्राचीन शब्द, परभाषेतील वाक्प्रचार आणि भरकटलेल्या शास्त्रीय संज्ञांना योग्य दिशा देता येईल. यांतून भाषेच्या वापरातील दिखाऊ भारदस्तपणा बराच कमी होऊ  शकेल.

भाषेच्या संवर्धनात ‘काय येत नाही?’

पण हे सगळे प्राथमिक मुद्दे झाले; भाषेचे रक्षण करण्यात आणखीही बरेच काही येते. मात्र त्याबद्दलच्या चर्चेची सुरुवात भाषेच्या संवर्धनात ‘काय येत नाही?’ यापासून करणे योग्य ठरेल. भाषेच्या रक्षणाचा कालसुसंगत नसलेल्या प्राचीन शब्दांच्या पुनरुज्जीवनाशी काहीएक संबंध नाही. तसेच अढळ अशी ‘प्रमाण’ भाषा तयार करणे हेही यात येत नाही. उलट आपली उपयुक्तता आणि कालसुसंगतता संपलेल्या प्रत्येक शब्दाच्या वापराला नकार देणे भाषेच्या रक्षणासाठी आवश्यक असते. भाषेच्या संवर्धनाचा व्याकरणशुद्धतेशी आणि परभाषेच्या (वाईट) प्रभावाशी फारसा संबंध नसतो. तसाच दिखाऊ  साधेपणा लेखनात आणण्याशी किंवा बोलीभाषांतील शब्दांना ऊठसूट उचलून धरण्याशीही त्याचा संबंध नसतो. भाषेची संस्कृतप्रचुरता कमी करणे म्हणजे संस्कृत मूळ असलेला शब्दन् शब्द शोधून त्याला सोपा प्राकृत/ देशी पर्याय देत बसणे नव्हे.

भाषेच्या योग्य वापरामध्ये मुख्य आव्हान असते ते कमीत कमी आणि लहानात लहान शब्द वापरून आपला अर्थ व्यक्त करण्यात. यासाठी गरज असते अर्थाला योग्य शब्द शोधू देण्याची; भारदस्त शब्दांत गुंडाळून त्याचा विपर्यास करण्याची नव्हे. गद्य लेखनातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे शब्दांना शरण जाणे. एखाद्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या (मूर्त) गोष्टीचा विचार करताना ती गोष्ट मनात दृश्य स्वरूपात (शब्दांशिवाय) येते आणि तिच्याबद्दल लिहिताना आपण त्या गोष्टीचे वर्णन अचूकतेने करणारे शब्द शोधतो. मात्र (अमूर्त) संकल्पनांचा विचार करताना आपली सुरुवातच संकल्पना व्यक्त करणाऱ्या ‘शब्दां’पासून होते. जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत तर ‘शब्दांचे वर्णन करणारे शब्द’ शोधण्याच्या प्रयत्नात प्रचलित शब्दांचा प्रवाह रेल्वेच्या डब्यांसारखा येऊन तुमचे काम करून जातो. या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही जो अर्थ मांडत होतात (किंवा शोधत होतात) तो अस्पष्ट होतो किंवा पूर्णपणे बदलून जातो.

‘शब्दनिवडी’चे ऑर्वेलकृत सहा नियम

अशा वेळी लिहिण्याआधी मनातले विचार दृश्य स्वरूपात मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे आपल्याला साहाय्यक ठरू शकते. या पायरीवर स्पष्टता आली, की मग आपल्याला योग्य शब्द ‘निवडता’ येतील. शेवटची पायरी असेल हे शब्द इतरांवर काय परिणाम करतील हे दोन पावले मागे सरकून आजमावून पाहण्याची. हे जेवढे निष्पक्षपणे होईल तेवढा गुळगुळीत आणि परस्परांना छेद देणाऱ्या प्रतिमांचा वापर कमी होईल. शब्दांच्या तयार पट्टय़ा आणि पुनरावृत्ती तर टळेलच, शिवाय एकूणच अस्पष्ट शब्दजंजाळ कमी होईल. एखाद्या शब्दाचा अथवा वाक्प्रचाराचा इतरांवर काय परिणाम होईल हे सांगताना केवळ अंत:प्रेरणेवर अवलंबून न राहता काही स्पष्ट नियमांची गरज भासते. यासंदर्भात साहाय्यक ठरतील असे काही नियम पुढे देत आहे.

१) छापील भाषेत वारंवार आढळणाऱ्या उपमा, प्रतिमा किंवा अलंकार यांचा वापर करू नका.

२) जिथे छोटा शब्द उपलब्ध आहे तिथे मोठा शब्द वापरू नका.

३) एखादा शब्द गाळून टाकणे शक्य असेल (अर्थाला बाधा न आणता) तर तो अवश्य गाळा.

४) कर्मप्रधान रचना अत्यावश्यक नाही तिथे कर्ताप्रधान रचना वापरा. (ऑर्वेलचा हा नियम इंग्रजीतील पॅसिव्ह ऐवजी अ‍ॅक्टिव्ह व्हॉइस वापरण्याबद्दल आहे.)

५) जिथे सोप्या भाषेतील पर्याय शोधणे (किंवा तयार करणे) शक्य आहे तिथे कोणताही परभाषिक शब्द किंवा स्वभाषेतील शास्त्रीय संज्ञा (तांत्रिक भाषा) वापरू नका.

६) काहीतरी उघडउघड विचित्र लिहिण्यापेक्षा यातील कोणतेही नियम तोडा!

अगदीच प्राथमिक स्वरूपाचे असलेले हे नियम प्रचलित दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणू शकतात. अर्थात, हे नियम पाळले म्हणजे लेखन चांगले होईलच असे नाही. परंतु त्यात अर्थहीनतेचा धोका पत्करून भारदस्तपणा आणण्याचा प्रयत्न नसेल.

राजकीय गोंधळ आणि भाषेचा ऱ्हास

भाषा विचारांना चालना देण्याचे, विचार व्यक्त करण्याचे (लपविण्याचे नव्हे!) साधन होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक आहेत. काही तत्त्ववेत्त्यांनी सर्वच अमूर्त शब्द अर्थहीन ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातून एकप्रकारच्या राजकीय निष्क्रियतेचे समर्थन केले जाऊ  शकते. जर तुम्हाला ‘फॅसिझम’ म्हणजे काय, हेच कळणे अशक्य असेल तर तुम्ही त्याविरुद्ध लढणार कसे? भाषेबद्दलच्या असल्या निर्थक टोकाच्या भूमिकांऐवजी आज गरज आहे राजकीय गोंधळाशी भाषेच्या ऱ्हासाचाही संबंध आहे हे लक्षात घेण्याची.

राजकारणाची भाषा बऱ्याचदा खोटय़ाचे खरे करण्यासाठी, हत्येचा सन्मान करण्यासाठी आणि एकूणच भंपकपणाला महानता देण्यासाठी बनलेली असते. कमीअधिक फरकाने हे सर्वच पक्षांना लागू पडते, मग ते परंपरावादी असोत की क्रांतिवादी. हे सगळे एका क्षणात बदलणे शक्य नसले तरी या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी भाषेपासूनच सुरुवात करावी लागेल. साधी-सोपी सुस्पष्ट भाषा राजकीय कर्मठपणातून (कोणत्याही रंगाच्या) येणाऱ्या अविचारांपासून दूर ठेवील. अशी भाषा आपल्याला योग्य वेळी स्वत:च्याच विधानांची निर्थकता लक्षात आणून देईल आणि सुस्पष्ट विचारांच्या आड येणाऱ्या, घासून गुळगुळीत झालेल्या निरुपयोगी शब्दांपासून मुक्तता मिळवून देईल.

– डॉ. मनोज पाथरकर

manojrm074@gmail.com