30 September 2020

News Flash

ऑर्वेलची प्रकाशवाणी : गलिव्हरची चिरंतन सफर.. 

१८ व्या शतकातील पुरोगाम्यांच्या मूर्खपणामुळे स्विफ्ट विपर्यस्त परंपरावादाचा आसरा घेताना दिसतो.

‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’च्या १८६५ सालच्या आवृत्तीतील थॉमस मॉर्टनने (१८३३-६६) काढलेले रेखाटन.

डॉ. मनोज पाथरकर

आयरिश लेखक जोनाथन स्विफ्टची अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रसिद्ध झालेली ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ ही उपहासगर्भ कादंबरी मानवी समाजावर परखड भाष्य करते. दोनशे वर्षांनंतरही ही साहित्यकृती समकालीन का वाटते, याचा शोध जॉर्ज ऑर्वेलने १९४६ साली ‘पॉलिटिक्स व्हर्सेस लिटरेचर : अ‍ॅन एक्झामिनेशन ऑफ गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ या लेखात घेतला. त्या लेखाचा हा सारांशानुवाद..

परिपूर्ण मानवी समाजाचा वेध घेण्याची प्रेरणा युटोपीयन साहित्याला जन्म देते. मात्र सुव्यवस्थित समाजाची युटोपीयन कल्पनाचित्रे क्वचितच आकर्षक किंवा पटण्यासारखी असतात. कारण ‘मानवी सुख’ ही वर्णन करायला अत्यंत कठीण गोष्ट आहे. जोनाथन स्विफ्ट (१६६७-१७४५) याच्यासारखा लेखक आदर्श समाजाची कल्पना करताना ‘जगणेच’ नाकारतो. त्याच्या गलिव्हरच्या सफरींचा उद्देश खरे तर सुखाचा शोध घेण्याचा नसून मानवजातीवर प्रहार करण्याचा आहे.

या कादंबरीचा नायक प्रत्येक सफरीबरोबर बदलत गेलेला दिसतो (कादंबरीच्या चार भागांत वेगवेगळ्या प्रदेशांतील अनुभवांचे वर्णन येते). ‘लिलिपुट’ या बुटक्यांच्या देशात गलिव्हर वास्तवाचे भान असलेला धाडसी दर्यावर्दी आहे; ‘ब्रॉबडिंगनॅग’ या महाकाय लोकांच्या देशात तो मातृभूमीचे गुणगान करताना धक्कादायक गोष्टी बरळणारा पाहुणा होतो; ‘लापुटा’ या उडत्या बेटावर तो दरबारी आणि विचारवंतांमध्ये वावरणारा विशेष अतिथी होतो आणि अश्वलोकात जाईपर्यंत आमूलाग्र बदललेला गलिव्हर मानवजातीचा तिरस्कार करू लागतो. उत्तरोत्तर आक्रमक आणि निराशावादी होत गेलेल्या या कादंबरीत गलिव्हरच्या व्यक्तिमत्त्वातील दोन गोष्टी मात्र स्थिर राहतात- भोवतालच्या जगाचे बारकाईने निरीक्षण करण्याची क्षमता आणि हिकमती वृत्ती!

१८ व्या शतकातील पुरोगाम्यांच्या मूर्खपणामुळे स्विफ्ट विपर्यस्त परंपरावादाचा आसरा घेताना दिसतो. मानवजातीवर टीका करणाऱ्या स्विफ्टचा खरा राग सत्ताधारी पुरोगामी (व्हीग) पक्षावर आहे. मूळचा आयरिश असलेला हा लेखक ‘घृणास्पद कीटकांचा देश’ या शब्दांत ब्रिटनची संभावना करतो. ब्रिटनच्या परदेशातील दिग्विजयांवर आणि वसाहतीकरणावरही तो तुटून पडतो. आपण शोधलेले देश ब्रिटिश राजसत्तेला अंकित करता येणार नाहीत याचे त्याला समाधान आहे. लेखक म्हणून असामान्य प्रतिभा लाभलेल्या स्विफ्टचे व्यक्तिमत्त्व विरोधाभासांनी भरलेले होते. त्याची वैचारिक-राजकीय भूमिका खरे तर आजच्या चाणाक्ष असलेल्या मूर्ख पुराणमतवाद्यांपेक्षा फारशी वेगळी नाही. आधुनिकतेवर विनोदी शेरे मारण्यातच ही मंडळी धन्यता मानताना दिसतात. इतिहासाच्या प्रवाहावर आपण फारसा प्रभाव पाडू शकत नाही या जाणिवेतून ते टोकाच्या भूमिका घेऊ  लागतात.

स्विफ्टचे प्रतिगामित्व ठळकपणे जाणवते ते त्याच्या विज्ञानविषयक दृष्टिकोनातून आणि वैचारिक कुतूहलाच्या अभावातून. मूलभूत निरपेक्ष संशोधनाचे महत्त्व त्याच्या अजिबात लक्षात आलेले नाही. त्याच्या मते, विज्ञानाची उपयुक्तता मर्यादित असून त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. ‘लापुटा’तील विज्ञान अकादमीवरील टीकेत विनोदाचा भागच जास्त असला, तरी लक्षणीय बाब ही की, अकादमीच्या सदस्यांना ‘शास्त्रज्ञ’ न म्हणता ‘उपक्रमी’ म्हटलेले आहे! त्यांचा एकमेव उद्देश श्रम वाचविणारी आणि पैसा कमावण्यास साहाय्यभूत ठरणारी यंत्रे शोधण्याचा आहे. अवकाशातील तारे आणि धूमकेतूंचे ज्ञान असलेले ‘लापुटा’तील शास्त्रज्ञ स्विफ्टला हास्यास्पद वाटतात. मात्र तंत्रज्ञान, शेती आणि लेखनकला अवगत नसलेले अश्व त्याला आदर्श वाटतात. त्याला कौतुकास्पद वाटणारा अश्वांचा ‘विवेक’ तर्कनिष्ठ अनुमाने काढण्यासाठी नाही. त्यांचा ‘विवेक’ म्हणजे सर्वसामान्य समज वापरून जे दिसते ते स्वीकारणे, भावनातिरेक टाळणे आणि अंधश्रद्धांपासून दूर राहणे. छद्मविज्ञानच नव्हे, तर दृश्य परिणाम नसलेल्या सर्वच विद्या आणि सिद्धांतांना स्विफ्ट निरुपयोगी ठरवतो.

मात्र तो साधी राहणी आणि आदिमता यांचे उदात्तीकरण करणाऱ्यांपैकीही नाही. उत्तम आचार-विचारांबरोबरच साहित्य आणि इतिहास यांचे ज्ञान स्विफ्टला आवश्यक वाटते. शेती, स्थापत्य आणि नौकानयन यांचा अभ्यासही त्याला महत्त्वाचा वाटतो. परंतु सभोवतालच्या जगात आमूलाग्र बदल घडवून आणणे त्याला मान्य नाही. हे जग थोडे नीटनेटके आणि समजूतदार झालेले पुरेसे आहे. अज्ञातात नाक खुपसणे टाळणाऱ्या स्विफ्टची आदर्श जगाची कल्पना स्थिर आणि कुतूहलरहित संस्कृतीकडे झुकणारी आहे. त्याचा दृष्टिकोन धार्मिक परंपरावादाशी नाते सांगत असला, तरी धार्मिक श्रद्धेबद्दल तो फारसा उत्साही नाही. त्याच्या चांगुलपणाच्या कल्पनेत तीन गोष्टींचा समावेश होतो- स्वातंत्र्याची ओढ, धैर्य आणि परोपकारी वृत्ती! यामुळे कधी कधी तो चक्क प्रगतीवादी वाटतो. त्याला ब्रिटनमध्ये हव्या असलेल्या कल्याणकारी व्यवस्था- वृद्धांसाठी निवृत्तिवेतन, कायदे पाळणाऱ्यांना उत्तेजनार्थ सुविधा इत्यादी- ‘लिलीपुट’मध्ये दिसतात.

स्विफ्टचे सर्वात महत्त्वाचे साहित्यिक योगदान म्हणजे त्याने हुकूमशाहीचा घेतलेला समाचार. जनतेवर करडी नजर ठेवणाऱ्या गुप्तहेरांचा सुळसुळाट असलेल्या आणि बंडखोर शोधून अशा (कथित) देशद्रोहींविरुद्ध खटले चालविणाऱ्या पोलिसी राज्याची स्पष्ट कल्पना करण्याइतके द्रष्टेपण त्याच्याकडे होते. गलिव्हर म्हणतो, ‘‘प्रथम हे निश्चित केले जाते, की कुणाकुणावर राजाविरुद्ध कट केल्याचा आरोप करायचा आहे. मग त्यांना बंदी करून त्यांची सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक ताब्यात घेतली जातात. ही कागदपत्रे अशा तज्ज्ञांकडे पाठविली जातात, ज्यांच्याकडे शब्दांचे गूढ अर्थ उकलण्याचे अद्भुत कौशल्य असते. ‘त’वरून ‘तलवार’ हे त्यांना लगेच कळते.’’ सर्वसामान्यांच्या असंतोषाला युद्धज्वरात रूपांतरित करून स्वत:ची कातडी बचावण्यासाठी हे सगळे चालते हे स्विफ्टला ठाऊक होते. अतिशय तुटपुंज्या ऐतिहासिक सामग्रीतून केवळ आपल्या प्रतिभेच्या जोरावर तो हे चित्र रेखाटतो (त्याच्या काळातील राज्यकर्ते आजच्या हुकूमशहांएवढे शक्तिशाली नव्हते!).

असे असले तरी, स्विफ्टला ठामपणे जुलमी व्यवस्थेचा विरोधक आणि विचारस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता म्हणता येत नाही. कारण त्याचा दृष्टिकोन मुळात उदारमतवादी नाही. पारंपरिक सत्तास्थाने आणि त्यांचा दिखाऊपणा त्याला मान्य नाही, हे खरे. मात्र सामाजिक समतेच्या प्रस्थापनेचा त्याचा आग्रह नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्याला त्याचे ठाम समर्थन नाही, की लोकनियुक्त संस्थांकडून त्याला कसल्या अपेक्षा नाहीत. ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’मधील अश्वलोकात वंशभेदसदृश जातव्यवस्था पाहायला मिळते, तर ‘लिलीपुट’मधील शिक्षणव्यवस्था परंपरागत वर्गभेद गृहीत धरते. खरे तर अश्वलोक कायद्याचे राज्यच नाही. गलिव्हरला हद्दपार करण्यासाठी तिथली संसद आणि नागरिक त्याच्या मालकावर दबाव आणतात. यातून अराजकतावादी (anarchist) आणि शांतीवादी संकल्पनांमागे दडलेल्या हुकूमशाही प्रवृत्तीचे उत्तम दर्शन घडते. कोणतेही कायदे आणि तत्त्वत: कोणतीही सक्ती नसलेल्या व्यवस्थेत ‘बहुसंख्यांचे मत’ हाच व्यवहाराचा एकमेव निकष उरतो. कायद्यावर आधारित व्यवस्थेपेक्षा अशी व्यवस्था जास्त असहिष्णू असते. अश्वलोकात हुकूमशाही अशा पातळीवर पोहोचलेली आहे, जिथे बळाची आवश्यकताच भासत नाही. सर्वव्यापी समूहशरणतेमुळे नागरिक स्वत:हूनच राज्यव्यवस्थेला हवे तसे वागतात.

राजकीय अर्थाने मला स्विफ्टचा विरोधक असण्याशिवाय गत्यंतर नाही. मात्र लेखक म्हणून मी खुल्या दिलाने त्याचा चाहता आहे! त्याच्या कलेची मोहिनी इतकी अविनाशी आहे, की कितीदाही वाचली तरी ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’चा कंटाळा येत नाही. परंतु मग प्रश्न उपस्थित होतो की, लेखकाची मते मान्य असण्याचा त्याच्या साहित्याचा आस्वाद घेण्याशी काही संबंध आहे का? काही साहित्यकृतींच्या बाबतीत अशी शंका घेतली जाते, की त्यांचा जनमानसावर वाईट परिणाम होईल. मग त्या कलाकृतींमध्ये साहित्यगुणच नसल्याचे सिद्ध करणारा समीक्षासिद्धांत तयार केला जातो. प्रचलित साहित्यसमीक्षा अशीच राजकीय आणि सौंदर्यात्मक निकषांमध्ये गफलत करणारी आहे. मात्र वाचकाने ‘वैचारिक तटस्थता’ साध्य केल्यास लेखकाची मते अमान्य असतानाही त्याच्या लेखनातील साहित्यगुणांचा आस्वाद घेणे शक्य होते. कारण काही प्रमाणात साहित्यकृतीचे कलागुण तिच्या आशयापासून वेगळे करणे शक्य असते. स्विफ्टच्या साहित्याचे नेमके असेच होते.

स्विफ्टने रेखाटलेले जगाचे चित्र शेवटी चुकीचे ठरते. कारण मानवी जीवनात मूर्खपणा, दुष्टपणा आणि ओंगळपणा यांच्याव्यतिरिक्तही काही आहे, याकडे तो दुर्लक्ष करतो. अर्थात, त्याला दिसत असलेल्या गोष्टीही खऱ्याच आहेत. आपल्याला त्या जाणवतात, पण त्यांचा उल्लेख करण्यापासून आपण बिचकतो. मनात खोलवर कुठे तरी आपल्याला विश्वास असतो, की माणूस सर्वश्रेष्ठ प्राणी असून मानवी जीवन अमूल्य आहे. परंतु त्याच वेळी आपल्याला अस्तित्वाच्या भयानकतेचीही जाणीव होत असते. स्विफ्टचा दृष्टिकोन चुकीचा असून त्याचा घातक परिणाम होऊ  शकतो, हे मला पटते. पण त्याच वेळी माझ्यातले काही तरी त्याला प्रतिसाद दिल्याशिवाय राहत नाही.

खरेखुरे दर्जेदार साहित्य कमीअधिक प्रमाणात ‘पुरोगामी’ असते, असे मानले जाते. परंतु इतिहासाच्या प्रक्रियेत प्रतिगामित्व आणि प्रगतीवाद यांच्यात अविरत संघर्ष सुरू असतो. या दोन्ही प्रकारच्या दृष्टिकोनांतून लिहिलेल्या साहित्यकृती कला म्हणून उत्तम ठरू शकतात. यातील काही कल्पनाचित्रे इतरांपेक्षा जास्त निराधार असतात. ज्या प्रमाणात लेखक प्रचारक असतो त्या प्रमाणात त्याने मांडलेल्या मतांशी त्याने प्रामाणिक असणे अपेक्षित असते (अर्थात ही मते अगदीच बाष्कळ नसावीत). लेखकाच्या दृढविश्वासातूनच त्याची प्रतिभा आकार घेत असते. स्विफ्टकडे सर्वसामान्य माणसाचे शहाणपण नव्हते, पण त्याची नजर तीक्ष्ण होती. त्यामुळेच दडलेली सत्ये तो उपहासात्मक कटाक्षातून उघड करू शकला. ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ आजही महत्त्वाची साहित्यकृती ठरते, ती स्विफ्टच्या भेदक नजरेमुळे!

‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’च्या १८६५ सालच्या आवृत्तीतील थॉमस मॉर्टनने (१८३३-६६) काढलेले रेखाटन.

manojrm074@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 3:56 am

Web Title: politics vs literature an examination of gullivers travels
Next Stories
1 बुकबातमी : पहिला ‘जेसीबी’ पुरस्कार ‘जस्मिन डेज्’ला!
2 गणिती विश्वाची सफर..
3 नसून असलेल्या शहराची कादंबरी!
Just Now!
X