ज्या गाजलेल्या लेखकांची नवी पुस्तकं प्रकाशित झाली वा होताहेत, त्यांची त्यांच्या प्रकाशकांच्या किंवा प्रसिद्धी-नियोजकांच्या आग्रहाखातर कुठल्या ना कुठल्या ‘लिटफेस्ट’ मध्ये वर्णी लावली जाते, हे आता उघडं गुपित आहे. तरीही ‘लिटफेस्ट’ हा प्रकार वाचकांना वा जगाबद्दल कुतूहल असलेल्यांना भावतोच- मग तो जयपूरचा असो, पुण्याचा असो, बेंगळूरुचा असो की मुंबईचा! ‘टाटा लिटलाइव्ह’मध्येही समजा जरी असे काही प्रकार घडत असतील, तरी मुंबईचा हा इंग्रजीकेंद्री साहित्योत्सव ग्लॅमर आणि गांभीर्य यांची चांगली सांगड घालणारा ठरला आहे. या ‘लिटफेस्ट’च्या संयोजकांत अनिल धारकर यांच्यासारखा साक्षेपी संपादक आहे म्हणून असेल; पण इथे श्रोते येतात ते थोरामोठय़ांच्या केवळ नावांसाठी नव्हे तर कशाबद्दल बोलणार आहेत, विषय काय आहे, याहीसाठी- असं यंदा जाणवतं आहे..  गुरुवारपासून (१६ नोव्हें.) सुरू झालेला हा ‘लिटलाइव्ह’ उत्सव शनिवारी आणि रविवारीही नरीमन पॉइंटचं राष्ट्रीय संगीत नाटय़ केंद्र (एनसीपीए) आणि जुहूचं पृथ्वी थिएटर इथं सुरू राहणार आहे. त्यात १८ नोव्हेंबरच्या सकाळीच (१०.३०) ‘अर्थव्यवस्था कुठे चालली आहे?’ या विषयावर पी. चिदम्बरम, रिझव्‍‌र्ह बँकेचे भूतपूर्व गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी, एचएसबीसीच्या कंट्री हेड नैना लाल-किडवाई हे सहभागी होतील, तर दुपारी (१२ वाजता) ‘मतदान केले की झाले?’ या विषयावर माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी आणि ‘द हिंदू’चे एन. राम यांच्यासह कार्यकर्ते अरुण फरेरा यांचाही सहभाग आहे. यापैकी राम हे बोफोर्स प्रकरण बाहेर काढणारे! त्यांनीच लिहिलेल्या  ‘व्हाय स्कॅम्स आर हिअर टु स्टे’ या घोटाळय़ांची अपरिहार्यता सांगणाऱ्या पुस्तकावरील चर्चेत (दुपारी ३.३०) पुन्हा चिदम्बरम आणि रेड्डी आहेत. ‘राष्ट्रवाद’ या विषयावरील चर्चेत राष्ट्रवादी भूमिका मांडणारे अभ्यासू प्राध्यापक मकरंद परांजपे व कशाचाच मुलाहिजा न ठेवणारे परदेसशस्थभारतीय कलासमीक्षक होमी भाभा यांचा सहभाग आहे. असे विषय काहीसे वादग्रस्त असूनही बुद्धीला आवाहन करणारे ठरतात. पण याखेरीज विज्ञान, चित्रकला-संग्रहालयांचं भवितव्य अशा विषयांवरही चर्चा होणार आहेत. साहित्य हा अर्थातच अशा उत्सवांचा प्राण. अरुणा ढेरे आणि उल्रीक ड्रेसनर या मराठी आणि जर्मन कवयित्रींची एकमेकींशी कवितांच्या भाषांतराबद्दल चर्चा, गिरीश कार्नाड आणि शांता गोखले यांच्या गप्पा, किरण नगरकर यांची प्रकट मुलाखत आदी सत्रांतून साहित्यप्रेमींनाही काही ना काही मिळणारच आहे.सर्व कार्यक्रम सर्वाना मोफत, पण शिस्तीची मात्र अपेक्षा अशा स्वरूपाच्या या साहित्योत्सवाची आणखी माहिती घेण्यासाठी लिंक :  http://www.tatalitlive.in