जॉन एफ. केनेडी हे जानेवारी, १९६१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. या पदावर असतानाच- २२ नोव्हेंबर, १९६३ रोजी त्यांची हत्या करण्यात आली. तेव्हापासून केनेडी यांच्या राजकीय कारकीर्द व खासगी जीवनाविषयी जगभरात अनेकांना औत्सुक्य आहे. त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या अनेक पुस्तकांतूनही ते दिसून आलेच आहे. याशिवाय केनेडी यांच्याशी निगडित काही ना काही पुन:पुन्हा चर्चेत येत असतंच. अशीच एक चर्चा या आठवडय़ात होत आहे. ती म्हणजे केनेडी यांच्या डायरीच्या लिलावाची. केनेडी हे राष्ट्राध्यक्षपदी येण्याच्या, किंबहुना सार्वजनिक राजकारणात येण्याच्याही आधीची ही डायरी. खरं तर त्यातील नोंदी १९९५ मध्येच ‘प्रील्यूड टू लीडरशिप- द पोस्ट वॉर डायरी ऑफ जॉन एफ. केनेडी’ या पुस्तकातून जगासमोर आल्या आहेत; परंतु या डायरीच्या लिलावामुळे या नोंदी आणि हे पुस्तकही पुन्हा चर्चेत आलं आहे.

नाविक दलात नोकरी केल्यानंतर केनेडी हे काही काळ विल्यम हर्स्ट यांच्या वर्तमानपत्रासाठी काम करत होते. या काळात घडलेल्या अनेक जागतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार ठरले. १९४५ मध्ये काही महिने ते युरोपमधून बातमीदारी करत होते. या काळात त्यांनी ब्रिटनची निवडणूक, पोटस्डॅम येथील परिषद- ज्यात जोसेफ स्टॅलीन, हॅरी ट्रमन व विन्स्टन चर्चिल यांच्यात झालेली चर्चा- अशा अनेक घटना जवळून पाहिल्या. त्या काळात ते सोबत एक डायरी बाळगत, ज्यात ते आपली निरीक्षणे नोंदवून ठेवत. त्याच डायरीचा आता लिलाव होऊ घातला आहे. ७२ वर्षांपूर्वीच्या या ६१ पानी डायरीत काही नोंदी या टंकलिखित, तर काही केनेडी यांच्या हस्ताक्षरात आहेत. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी केनेडी यांनी केलेल्या या नोंदींमधून महायुद्धोत्तर जगाचे दर्शन तर घडतेच, परंतु केनेडी यांच्या पत्रकार ते राजकारणी या प्रवासाच्या मध्यावरील या नोंदी असल्याने त्या काळाचा त्यांच्यावर प्रभाव कसा पडत होता हेही त्यातून दिसून येते.