• प्रॉमिस मी, डॅड
  • प्रकाशक : मॅकमिलन
  • लेखक : जो बायडेन
  • पृष्ठे : २६० किंमत : ६९९

प्रिय जो बायडेन,

बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असतानाच्या काळात तुम्ही २००९  ते २०१७ अशी सलग आठ वर्षे उपाध्यक्षपदी होता. मात्र त्या आठ वर्षांत ओबामा जितके प्रसिद्धीच्या झोतात वावरले, तितकी चर्चा-मीडिया कव्हरेज काही तुमच्या वाटय़ाला आले नाही. अर्थात, कोणत्याही देशाला जसे एका बाजूला ओबामांसारखे प्रसिद्धीच्या झोतात वावरणारे व जाहीररीत्या दिशादर्शन करणारे नेते आवश्यक असतात तसेच तुमच्यासारखे शांतपणे पडद्याआड कार्यरत राहून, देशाचा गाडा हाकणारे नेतेही गरजेचे असतात. तुमची ३६ वर्षांची ‘सिनेट’ या अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहामधील कारकीर्द आणि त्यानंतर उपाध्यक्षपदाची आठ वष्रे अशा ४४ वर्षांच्या सक्रिय राजकीय आयुष्यात डेमोक्रेटिक पक्षाचे एक संवेदनशील, संयमी, अभ्यासू आणि अनुभवी नेते अशीच ओळख करून दिली जाते. अमेरिकी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या नात्यात कामाची विभागणी, निर्णयप्रक्रियेत सल्ला-मसलत आणि राजकीय महत्त्व देणे / न देणे या कारणांमुळे ज्या प्रकारचे स्वाभाविक ताण-तणाव असतात तसे तुमच्याबाबत कधीही जाणवले नाही. उलट इतक्या अस्वस्थ कालखंडात सर्वोच्च सत्तापदावर असूनही ओबामा आणि तुमची मत्री हा कायमच कुतूहलाचा विषय होता. जानेवारी २०१७ मध्ये उपाध्यक्षपदाची कारकीर्द संपवून तुम्ही शांतपणे बाजूला झालात.

त्याच वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये तुमचे ‘प्रॉमिस मी, डॅड’ हे पुस्तक अमेरिकेत प्रकाशित झाले. तुम्ही पुस्तके लिहिणार आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत राहणार हे तुमच्याविषयी किमान माहिती असलेल्या व्यक्तींनीसुद्धा गृहीतच धरले होते. तुम्ही वैयक्तिक स्वरूपाचे पुस्तक लिहाल असे मात्र वाटले नव्हते. त्यामुळे हे पुस्तक पाहून थोडय़ा कुतूहलमिश्रित आश्चर्याची भावना झाली होती. मात्र तरीही तुमचे पुस्तक आहे, काही तरी वेगळे नक्की वाचायला मिळेल म्हणून पुस्तक वाचायला घेतले. २६० पाने आणि ११ प्रकरणे यांत विभागलेले हे पुस्तक वाचायला सुरुवात केली की खाली ठेवावेसेच वाटत नाही. निवेदनाचा ओघ, लेखनाची शैली आणि पुस्तकाचा विषय तिन्ही बाबी वाचकांना अक्षरश: खिळवून ठेवतात. त्यामुळे पुस्तक संपल्यानंतर इतके सुंदर पुस्तक आपण वाचले आणि तुम्ही एक राजकीय नेते असूनही वाचकांचा अपेक्षाभंग केला नाही याबद्दल एक आनंदाची-समाधानाची भावना शिल्लक राहते.

तुमच्या तीन मुलांपकी बो बायडेन हा सर्वात मोठा मुलगा. त्याला मेंदूचा कॅन्सर झाला आहे असे कळल्यानंतर एका बाजूला त्याच्यावर उपचार करणे, दुसरीकडे अशा कठीण काळात स्वत:चे आणि कुटुंबाचे धर्य टिकवणे आणि त्याचबरोबरीने उपाध्यक्षपदाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे अशी तारेवरची कसरत तुम्ही करत होतात. त्या अनुभवावर आधारित असे हे पुस्तक वाचताना वाचकांना अजिबात निराशा येत नाही. २००३ च्या इराक युद्धात अमेरिकी सन्यात अधिकारी असलेला बो बायडेन पुढे (२००७ ते २०१५) डेलावेअर या राज्याचा अ‍ॅटर्नी जनरल पदावर कार्यरत होता. एका कर्तबगार बापाचा तितकाच कर्तबगार मुलगा अशी ओळख असलेला बो बायडेन हा अमेरिकी राजकारणातला उगवता तारा होता. अशा या तरुणाने कॅन्सरसाठीचे जगातले सर्वोत्तम उपचार मिळूनही वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी प्राण सोडणे, हे तुमच्यासाठी आणि मनाने एकमेकांच्या अतिशय जवळ असलेल्या तुमच्या कुटुंबासाठी किती दु:खद असेल याची कल्पनाही करता येत नाही.

एकीकडे, आपल्या मुलावर उपचार चालू आहेत त्यामुळे त्याच्याकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवे ही एक वडील म्हणून असलेली जाणीव आणि दुसरीकडे देशाचा उपाध्यक्ष असल्याने आवश्यक त्या जबाबदाऱ्या पार पाडणे, त्यासाठी गुप्तता पाळणे, माध्यमांना या साऱ्यापासून दूर ठेवणे वगरे हे सारे वाचताना तुम्ही काय अनुभवातून गेला असाल हे सतत समोर येत राहते. या दु:खाचा विचार करायला वेळ मिळू नये म्हणून तुम्ही स्वत:ला कामात बुडवून घेतले होते. हा काळ प्रत्यक्ष जगताना झालेल्या वेदना आणि नंतर लाडक्या मुलाच्या आठवणी यामुळे पुस्तकात ते दिवस वाचकांसमोर उभे करताना, तुम्ही काय स्वरूपाचा मानसिक त्रास पुन्हा सहन केला असेल हेदेखील कोणत्याही संवेदनशील वाचकाला जाणवू शकते. मात्र तरीही तुमचे हे लेखन मनात विषण्णता किंवा ‘फ्रस्ट्रेशन’ पेरत नाही; तर संघर्ष करण्याची उमेद देते.

२०१४ ते २०१६ या काळाचा आणि तुमच्या वैयक्तिक संघर्षांचा समग्र पट वाचकांसमोर उभे करणारे पुस्तक लिहिताना तुम्ही प्रत्येक प्रकरणात आवश्यक तेवढी पार्श्वभूमी  तयार करून देता. वाचकाला विश्वासात घेऊन विवेचनाला आवश्यक असेल त्या प्रमाणात अमेरिकेतील राजकीय व्यवस्था, देशांतर्गत पातळीवरील आव्हाने (उदा.- समलैंगिक व्यक्तींचे हक्क), तत्कालीन आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि त्यानिमित्ताने अमेरिकी राजकारण-परराष्ट्र धोरण यांचीही आनुषंगिक चर्चा करता. तो काळ युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हस्तक्षेपाचा, इराक आणि सीरियात ‘इस्लामिक स्टेट’ नावाचे नवे संकट उभे राहण्याचा. इराक आणि युक्रेन या दोन्ही देशांत अंतर्गत अस्वस्थता आणि राजकीय साठमारी यामुळे अस्थिर सरकारे सत्तेत होती. दोन्ही देश अमेरिकेसाठी महत्त्वाचे असल्याने अमेरिकी परराष्ट्र धोरणासमोरील ही दोन्ही अतिशय अवघड आव्हाने तुम्हीच हाताळत होतात. तसेच मध्य अमेरिकेतील एल साल्वादोर, ग्वाटेमाला आणि होन्डुरास या तीन देशांमधील गुन्हेगारी कमी करणे आणि विकासाच्या प्रश्नांना हात घालणे या दृष्टीनेसुद्धा तुम्ही कार्यरत होतातच. अशी ही आव्हाने हाताळताना तुमचा अनुभव आणि क्षमता पणाला लागत होती हेही पुस्तक वाचताना जाणवत राहते.

पुस्तक अधिकाधिक जिवंत आणि विश्वासार्ह वाटावे यासाठी तुम्ही त्या काळातील तुमची भाषणे आणि वैयक्तिक डायरीतील नोंदी हेही वाचकांसमोर ठेवता. तुम्हाला हे सांगायलाच हवे की, स्वत:च्या मनातील विचार, प्राप्त परिस्थितीत घेतलेले निर्णय आणि त्याबरोबरीने मुलाच्या आजाराची चिंता यांचे कोलाज-चित्र वाचकांसमोर जसजसे येत जाते तसतसा वाचक तुमच्याबरोबरच तो काळ आणि ती संकटे जगू लागतो. चित्रपट पाहताना जसे प्रेक्षक स्वत:ला चित्रपटातील पात्रांशी जोडून घेतात नेमका तसाच अनुभव तुमचे हे पुस्तक वाचताना येतो.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच तुम्ही न्यू यॉर्क शहरातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू आणि तुमची त्या संदर्भातील प्रतिक्रिया याविषयी लिहिलेले आहे. उपाध्यक्ष या नात्याने तिथे जाताना तुम्ही त्या दोन अधिकाऱ्यांपकी एका अधिकाऱ्याच्या पत्नीला सांगता की, आज हे दु:ख खूप मोठे वाटत असले तरी काही काळाने अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही मागे, या काळाकडे पाहाल आणि तुमच्या चेहऱ्यावर नकळतपणे स्मित उमललेले असेल. तुमच्या वयाच्या २९व्या वर्षी स्वत:च्या पहिल्या पत्नीच्या अपघाती मृत्यूच्या अनुभवातून आलेला हा अनुभव तुम्ही त्यांच्याशी आणि वाचकांशी शेअर करता. ज्यांनी ज्यांनी अशा दु:खाचा अनुभव घेतला असेल त्या प्रत्येकाला हा ‘आधी दु:ख आणि मग काही काळाने उमललेले स्मितहास्य’ असा अनुभव आलेला असेल. यातूनच मनात दु:खाला बाजूला टाकून आपले नित्याचे आयुष्य चालू ठेवण्याची आणि स्वीकारलेले नियत कर्तव्य पार पाडण्याची ऊर्मी येते. पुस्तकात असे अनुभवातून आलेले शहाणपण पानोपानी विखुरलेले आहे. राजकारणात सगळी कारकीर्द घालवूनही तुम्ही संवेदनशील वर्तन आणि विचार यामुळे सातत्याने अचंबित करत राहता. उदा.- वरील प्रसंगातच जेव्हा केवळ एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी भेट देणे असे ठरलेले असते तेव्हा तुम्ही मुद्दाम वाट वाकडी करून, वेळात वेळ काढून दुसऱ्या, चिनी-अमेरिकन पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबालासुद्धा भेटायला जाता. त्यांना इंग्रजी येत नसते, तुम्हाला चिनी येत नसते. मात्र तरीही तुमचा ‘शब्देविण संवादु’ होतो.

बो बायडेनने आपल्याला कॅन्सर झाला आहे हे कळल्यानंतर तुमच्याकडून प्रॉमिस (वचन) घेतलेले असते की, काहीही झाले तरी त्याच्या आजाराने तुम्ही खचून जाणार नाही आणि तुम्ही तुमचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच जगात राहाल. मात्र हे प्रॉमिस करणे सोपे असले तरी प्रत्यक्षात जगणे किती कठीण असते हे जेव्हा बो ३० मे २०१५ रोजी हे जग सोडतो, तेव्हा लक्षात येते. त्याच्या मृत्यूनंतर देशभरातून नागरिक तुमच्या भेटीला आले होते, तासन्तास रांगेत उभे राहून तुमची भेट घेण्यासाठी थांबले होते. बोच्या फ्युनरल सíव्हसला तर स्वत ओबामा सहभागी झाले होते. मात्र असे असूनही जेव्हा त्या न्यू यॉर्कमधील चिनी-अमेरिकन पोलीस अधिकाऱ्याचे वडील तुम्हाला तुमच्या मुलाच्या मृत्यूनंतर आवर्जून भेटायला येतात, तासन्तास रांगेत उभे राहून मग प्रत्यक्ष भेटीत काहीही न बोलता आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मिठी मारतात तो या काळातला सर्वात हृद्य प्रसंग असतो असे तुम्ही जे म्हणता ते उगीच नव्हे. तो प्रसंग वाचताना वाचकांचेही डोळे पाणावतात.

मात्र या कसोटीच्या काळातही तुमची टीम त्यांचे कर्तव्य विसरलेली नसते. त्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये प्रचलित घडामोडींवर लक्ष ठेवणे, त्या दृष्टीने आवश्यक असे अहवाल तयार करणे वगरे काम चालूच असते. वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून तुम्ही परत सक्रिय झालात. राष्ट्राध्यक्षपदासाठी २०१६ मध्ये होणारी निवडणूक तुम्ही लढवावी अशी इच्छा राखणारा बो स्वतच त्या मोहिमेचे नेतृत्व करणार होता. मात्र त्याच्या मृत्यूनंतर तुमच्यापुढे पेच असतो की, उभे राहावे की राहू नये? ते २०१५ साल असते आणि प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. मात्र कोणताही ठोस निर्णय न घेता तुम्ही काही महिने जाऊ देता. खरे तर वातावरण तुम्हाला खूपच अनुकूल असते. तसेच बो गेल्यामुळे जनतेची सहानुभूतीपण तुमच्या बाजूला असते. मात्र असे असूनही तुम्हाला लक्षात येते की, विरोधकांकडून केला जाणारा प्रचार, वैयक्तिक हल्ले, या मोहिमेचा कुटुंबावर पडणारा ताण आणि त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम यामुळे ही निवडणूक लढवणे हा फार कठीण आणि क्लेशकारक अनुभव ठरला असता. त्यामुळे मग तुम्ही निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेता. या टप्प्यावर पुस्तक संपते.

आज आजूबाजूला अप्रामाणिक आणि असंवेदनशील राजकीय नेत्यांची गर्दी झालेली असताना तुमच्यासारखा नेता किती दुर्मीळ आहे याची जाणीव पुस्तक वाचताना पटत राहते. पुस्तकात एका टप्प्यावर तर तुम्ही चक्क आíथकदृष्टय़ा कुटुंबाला स्थिर करायचे आहे असे सांगता. म्हणजे ४४ वष्रे सर्वोच्च स्तरावर राजकारण करूनही तुम्हाला अशा मध्यमवर्गीय चिंता भेडसावत असतील तर तुम्ही का आणि कसे वेगळे आहात हे लगेच लक्षात येते. तसेच आज तुमच्या देशात (आणि आमच्या देशातही!) ज्या स्वरूपाचे नेतृत्व आहे ते पाहता तुमच्यासारखे सुसंस्कृत, सभ्य, अभ्यासू आणि संयमी नेते राजकीय व्यवस्थेत सर्वोच्च स्तरावर पोहोचणे किती दुर्मीळ आणि तरीही का आवश्यक आहे हे पटते.

तुमचा वाचक,

 

– संकल्प गुर्जर