जमीनदार आणि पुरोगामी मुस्लीम कुटुंबातील झरीना भट्टी यांची ही आत्मकथा केवळ त्यांची राहात नाही. स्वतच्या जीवनसंघर्षांचे कोठेही उदात्तीकरण न करता, कोणतेही नाटय़ न आणता सरळपणे लिहिलेले हे पुस्तक मुस्लीम समाज आणि त्यातील बदल याविषयीही माहिती देते..
झरीना भट्टी हे नाव मराठी वाचकांना तसे अपरिचित असण्याची शक्यता आहे. कारण रूढार्थाने त्या लेखिका नाहीत. समाजशास्त्र व राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक असलेल्या झरीना यांनी गेल्या पाच दशकांपेक्षा अधिक काळापासून या विषयांत विपुल विद्यापीठीय लेखन केले आहे. भारतीय मुस्लीम समाज आणि त्यातही मुस्लीम समाजातील महिलांची स्थिती-गती हा त्यांच्या अभ्यासाचा, संशोधनाचा व आस्थेचा विषय राहिलेला आहे. विडी उद्योगातील महिला कामगारांविषयी त्यांनी सादर केलेला शोधनिबंध विशेष उल्लेखिला गेला आहे. ‘इंडियन असोशिएशन फॉर विमेन्स स्टडीज’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. याशिवाय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध समित्यांमध्ये, संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे. अशा प्रकारे त्यांच्या विद्यापीठीय व संशोधकीय कारकीर्दीचा थोडक्यात परिचयही करून देता येईल आणि तो महत्त्वाचाही आहे. परंतु स्त्रीवाद व उदारमतवादी विचारव्यूहाचा आपल्या लेखन व संशोधनात त्यांनी केलेला अंतर्भाव हा त्यापेक्षा अधिक नजरेत भरणारा आहे. भारतीय मुस्लीम समाजातील परंपरावाद, स्थितीवादाची चिकित्सा करत मुस्लीम महिलांसाठी मुक्त जीवनाचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला आहे. मुस्लीम महिलांचे प्रश्नांना आधुनिक स्त्रीवादी विचारांची चौकट देण्याचे काम ज्या मोजक्या अभ्यासकांनी स्वातंत्र्योत्तर काळात केले त्यात झरीना भट्टी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यांची ही ओळख आपल्यासाठी अधिक महत्त्वाची आहे. हे सर्व सांगण्याचे निमित्त ठरले आहे ते नुकतेच ‘सेज’ प्रकाशनाने प्रकाशित केलेले त्यांचे ‘पर्दा टू पिकॅडिली- अ मुस्लीम वूमन्स स्ट्रगल फॉर आयडेन्टिटी’ हे आत्मचरित्र.
आत्मचरित्र म्हटले की वैयक्तिक जीवनातील प्रसंग, आठवणी यांचाच भरणा. किंबहुना त्यांचे दस्तावेजीकरण करण्यासाठीच आत्मचरित्राचा खटाटोप केला जातो. झरीना यांच्या आत्मचरित्रातही वैयक्तिक आठवणींना उजाळा दिलाच आहे. परंतु, त्याबरोबरच गेल्या सुमारे आठ दशकांतील भारतीय मुस्लीम समाजाची झालेली वाटचालही यात प्रामुख्याने आली आहे. एकूण १४ प्रकरणांमध्ये विभागलेल्या या आत्मचरित्रात वैयक्तिक जीवनातील घटना, प्रसंगांची सामाजिक अंगाने चिकित्सा करत लेखिकेने वैयक्तिक जीवनाबरोबरच सामाजिक स्थित्यंतराचाही पट उभा केला आहे. उत्तर प्रदेशातील अवध भागात १९३३ मध्ये एका जमीनदार मुस्लीम कुटुंबात झरीना यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांनी मुस्लीम समाजातील अनेक रूढी व परंपरा जवळून पाहिल्या. पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणात मुस्लीम समाजातील या प्रथा-परंपरांची त्यांनी थोडक्यात ओळख करून दिली आहे. ‘इज्जत’ या कल्पनेमुळे व्यक्ती म्हणून आपल्यावर कशी बंधने येतात हे स्पष्ट करत त्यांनी मुस्लीम कुटुंबातील मुलींच्या आयुष्यात बालपणापासून विवाहापर्यंत येणाऱ्या विधींची माहिती दिली आहे. त्यामुळे पुस्तकात पुढे येणारे वर्णन वाचण्यासाठी वाचकांचा करून घेतलेला गृहपाठ असे या प्रकरणाचे स्वरूप झाले आहे. यानंतरच्या तीन प्रकरणांमध्ये लेखिकेने आपल्या कुटुंबाची ओळख व शाळेतील दिवसांचे वर्णन केले आहे. कुटुंबातील अन्सार चाचा हे स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत तर आणखी एक काका म्हणजे प्रसिद्ध उर्दू कवी ‘मजाज’. कुटुंबातील इतर सदस्यांबरोबरच लेखिकेने या दोघांच्या रंगवलेल्या व्यक्तिचित्रांतून तत्कालीन स्वातंत्र्य चळवळ व सामाजिक-सांस्कृतिक घटनांचे येत जाणारे उल्लेख वाचकाला त्या काळात घेऊन जातात. याच ठिकाणी भारतीय मुस्लीम समाजातील जातिव्यवस्थेची माहितीही मिळते. भारतातील मुस्लीम समाजात अश्रफ व कामीन असे दोन मुख्य भाग आहेत. यातील अश्रफांमध्ये सय्यद, शेख, मुघल व पठाण अशा चार जाती तर कामीनमध्ये हिंदू धर्मातून मुस्लीम धर्मात आलेल्यांचा व परंपरागत व्यवसाय करणाऱ्यांचा समावेश होतो. याशिवाय नव्याने मुस्लीम धर्म स्वीकारलेल्यांचा नवमुस्लीम हा गटही आहे. इतकेच नव्हे तर कस्बाती अर्थात जमीनदार व शहरी म्हणजे नोकरी-व्यवसाय करणारे मुस्लीम असे दोन वर्गही आहेत. या जाती-वर्गातील परस्परसंबंध, त्यांच्यातील व्यवहार यांचे सविस्तर वर्णन येथे आले आहे. हिंदू धर्मातील जातिव्यवस्थात्मक रचना मुस्लीम धर्मातही झिरपली असल्याचे विश्लेषण लेखिकेने याविषयी लिहिताना केले आहे. यानंतरच्या प्रकरणात फाळणी व त्यानंतरच्या जमीनदारी रद्द करण्याविषयीच्या कायद्यामुळे उत्तरेतील मुस्लीम समाजावर काय परिणाम झाले याचा आढावा आहे. एकीकडे धर्माची ओढ तर दुसऱ्या बाजूला स्थानिक सांस्कृतिक अनुबंध यांच्या द्वंद्वात काहींनी पाकिस्तानला जाण्याचा तर काहींनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. जे पाकिस्तानला गेले त्यांना तिथल्या पंजाबी व सिंधी संस्कृतीच्या वर्चस्वाचा सामना करावा लागला; तर इथे राहिलेल्यांना अल्पसंख्याक म्हणून राहावे लागले. दोन्ही बाजूंनी झालेली घुसमटच मुस्लीम मूलतत्त्ववादाला व अलगतेच्या भावनेला कारणीभूत असल्याचे मतही लेखिकेने वर्णनाच्या ओघात मांडले आहे.
यानंतरच्या भागात लेखिकेच्या जीवनातील एका महत्त्वाच्या कालखंडाचे वर्णन आले आहे. वयाने बारा वर्षांनी मोठय़ा असलेल्या आणि आधीच विवाहित असलेल्या हयातबरोबर लेखिकेचे लग्न लावून दिले जाते. त्याच्याबरोबर ती इंग्लंडला जाऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेते. या काळात तिथल्या साम्यवादी विद्यार्थ्यांच्या गटाशी तिची ओळख होते. १९४० ते ५०च्या दशकातील हे विद्यार्थी भारतातील स्वातंत्र्य चळवळ, संविधान, सामाजिक स्थिती यांच्याविषयी चर्चा करतात. लेखिकेने या विद्यार्थी संघटनांचा व त्यांच्या विचारांचा तिच्या जीवनावर पडलेल्या प्रभावाचे वर्णन केले आहे. दरम्यानच्या काळात लेखिका एका मुलीला जन्म देते. त्यामुळे या मुलीचा सांभाळ, हयातबरोबरचा संसार, अपुऱ्या पैशांमुळे महाविद्यालयाच्या उपाहारगृहात काम करणे तर दुसऱ्या बाजूला शिक्षणही चालू ठेवणे असा वैयक्तिक स्तरावरचा संघर्ष तिला करावा लागतो. याच काळात तिला एका महोत्सवानिमित्ताने साम्यवादी देशांचा प्रवास करण्याची संधी मिळते. या प्रवासाचे व तिथल्या अनुभवांचे सविस्तर वर्णनच एका प्रकरणात आले आहे. यानंतर लेखिका आपले शिक्षण पूर्ण करून हयातबरोबर भारतात परत येते; परंतु मायदेशात परतल्यावर हयातशी घटस्फोट होतो आणि तिला हुमा या मुलीसह एकटीने राहावे लागते. त्यानंतर इद्रक या कविमनाच्या व्यक्तीबरोबर झालेला विवाह, प्राध्यापकाची नोकरी, पुढे विविध संशोधन संस्थांमध्ये तसेच ‘यूएसएड’सारख्या जगड्व्याळ सामाजिक संस्थेमुळे अन्य देशांतही काम करायला मिळणे हा भाग आला आहे. याशिवाय स्त्रीवाद, भारतातील स्त्री-संघटना यांच्याविषयीही स्वतंत्र प्रकरणांमधून लेखिकेने लिहिले आहे.
‘पिकॅडिली’ हे लंडनमधील मध्यवर्ती भागाचे नाव. याच भागात अनेक नाटय़गृहे आहेत.. मात्र या पुस्तकात नाटय़मय वर्णनेसुद्धा अजिबात नाहीत. हे आत्मकथन प्रांजळ आहेच, पण ते सरळ आणि एकरेषीय आहे. बहुधा लेखिकेच्या विद्यापीठीय पाश्र्वभूमीमुळे असे झाले असावे; परंतु त्यामुळे लाभ असा की, लिखाणातून माहिती भरपूर मिळते. वाचकाला कोणतीही माहिती अवांतर किंवा विषयाबाहेरची वाटू नये, अशा प्रकारे लेखन करण्याचे झरीना भट्टी यांचे कसब वादातीत आहे. मुस्लीम महिलांविषयीचे ठोकळेबाज पूर्वग्रह मोडून काढणारे म्हणून, तसेच एका ‘पुरोगामी मुस्लीम स्त्री’च्या वाटचालीची कथा सांगणारे म्हणूनदेखील हे पुस्तक वाचनीय ठरते.

प्रसाद हावळे 
prasad.hawale@expressindia.com

‘पर्दा टू पिकॅडिली’- अ मुस्लीम वूमन्स स्ट्रगल फॉर आयडेन्टिटी
लेखिका : झरीना भट्टी
प्रकाशक : सेज पब्लिकेशन्स
पृष्ठे : १९६ , किंमत : ५९५ रु.