सुशीलकुमार शिंदे

‘एलजीबीटीक्यू’ समुदायाबाबत भारतीय समाजात आणि कॉर्पोरेट क्षेत्रात घडलेल्या बदलांचा वेध घेणाऱ्या पुस्तकाविषयी..

समलिंगी प्रौढांमध्ये संमतीने असलेले लैंगिक संबंध कायदेशीर ठरवणारा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने २००९ साली दिला होता. त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. आणि अखेर बरोब्बर दोन वर्षांपूर्वी- ६ सप्टेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता बेकायदेशीर नसल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. यातील पहिल्या निकालाच्या आधी लेखक परमेश साहनी यांचे ‘गे बॉम्बे : ग्लोबलायझेशन, लव्ह अ‍ॅण्ड (बि)लाँगिंग इन कंटम्परेरी इंडिया’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. त्यात त्यांनी समलैंगिकता आणि शहरांचा अवकाश यांच्यातील परस्परसंबंध स्वानुभवासह कथन केला होता. अलीकडेच त्यांचे ‘क्वीरीस्तान : एलजीबीटीक्यू इनक्लुजन इन इंडियन वर्कप्लेस’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. परमेश साहनी हे सध्या गोदरेज उद्योगसमूहात काम करतात. ‘गोदरेज इंडिया कॅल्चर लॅब’च्या माध्यमातून ते सक्रिय आहेत. ‘एलजीबीटीक्यू’ समुदायास सामावून घेणाऱ्या कार्पोरेट कार्यसंस्कृतीचा साहनी पुरस्कार करतात. भारतातील काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये प्रभावी कार्यस्थळांच्या निर्मितीसाठी ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. साहनी सांगतात, जेव्हा ‘गोदरेज’सारखा एखादा मोठा उद्योगसमूह एलजीबीटीक्यू समुदायासाठी पुढाकार घेतो तेव्हा फक्त भारतीयच नव्हे तर जागतिक स्तरावरसुद्धा अशा कंपनीसाठी निर्माण होणारी ‘गुड विल’ ही कोणत्याही जाहिरातीपेक्षा अधिक परिणामकारक असते. अशा अंतर्भावी प्रयत्नांचे दाखले ‘क्वीरीस्तान’ या पुस्तकात वाचायला मिळतात.

हे पुस्तक लिहिण्यामागे साहनी यांची एक ठोस भूमिका आहे. त्यांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट केले आहे की, ते कॉर्पोरेट कंपन्यांचा इतिहास लिहिणारे कोणी इतिहासलेखक वगैरे नाहीत किंवा या विषयातील तज्ज्ञही नाहीत. परंतु जगभरात एलजीबीटीक्यू समुदायाच्या संदर्भात घडणाऱ्या विविध घटनांचे, बदलांचे ते साक्षीदार आहेत, किंबहुना त्या परिवर्तनाचा ते भाग राहिलेले आहेत. तरीही मागील दोन दशकांतील सकारात्मक बदल वाचकांसमोर मांडताना ते बदलांची निव्वळ जंत्री देत नाहीत. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील संदर्भ जगभरातील विविध शहरांमध्ये, विद्यापीठांमध्ये किंवा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये घडणाऱ्या बदलांना जोडत एक कमालीची रोचक मांडणी ते पुस्तकात करतात. त्यामुळे ‘क्वीरीस्तान’ या लेखकाने मांडलेल्या संकल्पनेशी वाचक स्वत:ला सहज जोडून घेतो. या लेखकाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पातळीवर अगदी आपल्या हाकेच्या अंतरावार घडलेल्या बदलाला नव्याने अवगत होतो. हे लेखकाचे यश आहे.

एलजीबीटीक्यू समुदायाच्या सामाजिक स्वीकाराहार्यतेबाबत शुभम सिंघल यांनी एका जागतिक दर्जाच्या नियतकालिकासाठी केलेल्या सर्वेक्षणाचा संदर्भ लेखकाने पुस्तकात दिला आहे. या सर्वेक्षणानुसार, एलजीबीटीक्यू असणे म्हणजे नैतिकदृष्टय़ा इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचे अध:पतन करणे आहे, असे मानणारा मोठा वर्ग आजही देशात आहे. काही लोकांच्या मते, समलिंगी असणे हा आजार आहे. आजार म्हटले की अंधश्रद्धा आणि हा आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या बाबा-बुवांचे प्रस्थ आलेच. त्यातही शिक्षणाचा अभाव असेल, तर एलजीबीटीक्यू समुदायातील व्यक्तींना मानसिक कुचंबणेबरोबरच शारीरिक हिंसेलाही सामोरे जावे लागते. कार्यस्थळांमध्ये अनेकदा शेरेबाजीला सामोरे जावे लागते, नि त्यातून होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाणही कमी नाहीये. त्यामुळे विविधतेचा सन्मान करणाऱ्या सर्वसमावेशक कार्यस्थळांची निर्मिती हे नेहमीच कॉर्पोरेट कंपन्यांसमोर आव्हान राहिलेले आहे. मात्र स्वत: केलेल्या प्रयोगांचा दाखला देत लेखक सांगतो की, सर्वसमावेशक कार्यस्थळे ही कर्मचाऱ्यांच्या कल्पकतेला अधिक बळ देणारी असतात. सुरक्षितता देणाऱ्या, प्रतिभेची कदर करणाऱ्या कोणत्याही उद्योगसमूहातील कर्मचारी हा इतरांच्या तुलनेत अधिक योगदान देणारा असतो. यासाठी लेखक गोदरेज, टाटा स्टील, महिंद्रा टेक किंवा केपीएमजी यांसारख्या विविध कंपन्यांची, त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांची उदाहरणे, अवतरणे, केस स्टडीज् वाचकापुढे ठेवतो.

पाच भागांमध्ये विभागलेल्या या पुस्तकातील दुसरा भाग हा भारतातील एलजीबीटीक्यू समुदाय, त्यांच्याविषयी वापरली जाणारी भाषा आणि त्यांच्या इतिहासावर मार्मिकपणे भाष्य करतो. ‘एलजीबीटीक्यू’ या समुदायवाचक शब्दाचा वेध घेताना लेखक लिहितो, ‘एलजीबीटीक्यू समुदायातील व्यक्तीसाठी वापरले जाणारे शब्द वा भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाषेचे स्वत:चे एक राजकारण असते. एलजीबीटीक्यू समुदायासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेत बऱ्याचदा हिंसा वा तिरस्कारचा दर्पही दिसून येतो. आपल्याकडे सरकारदफ्तरी केल्या गेलेल्या नोंदी वा संसदेने पारित केलेल्या विधेयकांमध्येही यासंदर्भात त्रुटी वा गंभीर गोंधळ आढळून येतो.’ म्हणूनच ‘एलजीबीटीक्यू’ या शब्दाचा अभ्यासकांनी, या विषयावर काम करणाऱ्या संस्थांनी लावलेले अर्थ, वापरलेले शब्द यांची सविस्तर यादी लेखकाने दिली आहे.

आपल्याकडे काहींचा असा समज आहे की, समलैंगिकता ही संकल्पना जणू काही ‘मॅक्डोनल्ड्स’सारखी पश्चिमेकडूनच आयात केली आहे. मात्र, हा समज खोडून काढण्यासाठी लेखक अगदी रामायण-महाभारताबरोबरच ऋग्वेद आणि पौराणिक कथांचा संदर्भ देत आपल्याकडे समलैंगिकता आधीपासूनच आढळते हे दाखवून देतो. समाजाने त्याचा त्या त्या काळी सहजतेने केलेला स्वीकारही लेखकाने अधोरेखित केला आहे. यासाठी देवदत्त पटनायक यांच्या ‘शिखंडी’ या अलीकडच्या पुस्तकातील, तसेच संस्कृत भाषेतील ग्रंथ ते पाली भाषेतील ‘जातक कथा’ आदी अनेक संदर्भ लेखकाने दिले आहेत. याचसंदर्भात तमिळ, बंगाली या भाषांमधील मौखिक परंपरेतील कथासाहित्याचे दाखलेही वाचायला मिळतात. एकंदरीत समलैंगिकतेकडे, भिन्नलैंगिकतेकडे सहजतेने पाहण्याची परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून असल्याचे लेखक अधोरेखित करतो.

लेखकाने प्रख्यात इंग्लिश अभिनेते सर इयान मॅकेलेन यांच्याबरोबर झालेल्या दीर्घ संवादाबद्दल पुस्तकात लिहिले आहे. ‘एक्स-मेन’ तसेच ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’सारख्या सिनेमांतील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. इयान मॅकेलेन हे समलैंगिक. पण वयाची पन्नाशी गाठेपर्यंत ही गोष्ट जाहीर करण्याचे काही त्यांना धाडस झाले नाही. तोपर्यंत त्यांच्या काही सहकलाकारांचा अपवाद वगळता, त्यांच्या कुटुंबातील किंवा प्रसारमाध्यमांतील कोणासही याची कसलीच कल्पना नव्हती. स्वत:च्या लैंगिक निवडीचे ओझे हा कलाकार कित्येक वर्षे वागवत राहिला. मात्र, जेव्हा त्यांनी हे जाहीर केले तेव्हा त्यांच्या ८० वर्षांच्या आईने अगदी सहजपणे ते स्वीकारले. यानंतर त्यांचा अभिनयसुद्धा कमालीचा सुधारला. आजूबाजूचा सकारात्मक बदल पाहून, मॅकेलेन सांगतात की, ‘‘क्रांती नेहमीच रस्त्यावर घडते असे नाही. तर कधी कधी ती बोर्डरूममधूनही आकाराला येत असते.’’ लेखकही आशावाद व्यक्त करतो की, भारतातील जागतिक दर्जाच्या कॉर्पोरेट कंपन्या एलजीबीटीक्यू समुदायाबाबत सकारात्मक धोरणा आखू लागल्याने आधुनिक भारत घडवण्याच्या प्रक्रियेला वेग येईल.

वेगवेगळ्या माध्यमांचा कल्पक वापर करत एलजीबीटीक्यू समुदायाचे स्वीकारार्ह असे चित्रण अलीकडे मोठय़ा प्रमाणात होताना दिसून येत आहे. ‘दोस्ताना’, ‘अलिगढ’, ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटांची दखल यासंदर्भात घ्यावी लागेल. याच धर्तीवर ‘मेड इन हेवन’सारख्या वेबमालिका आहेत. भूपेन कक्कर, अमृता शेरगील ते सचिन कुंडलकर अशी विविध काळांतील आणि वेगवेगळ्या भाषांतील कलावंतांच्या सर्जनशील निर्मितीत सहजतेने डोकावणारे एलजीबीटीक्यू समुदायाचे विश्व दिसेल. ‘प्रोजेक्ट बोलो’च्या माध्यमातून चित्रकर्मी श्रीधर रंगायन यांनी केलेले व्हिडीओ-डॉक्युमेंटेशन असो किंवा सुनील गुप्ता व चरण सिंग यांनी देशभरातून संकलित केलेला एलजीबीटीक्यू समुदायाचा मौखिक इतिहास असो अथवा वेगवेगळ्या शहरांतून निघणारा ‘क्वीर प्राइड मार्च’ असो; हे सारे उपक्रम कल्पकतेने स्थितिशील समाजधारणेला ठोस धक्के देऊ पाहताहेत, असे लेखक म्हणतो.

चेतन दातार लिखित ‘एक माधव बाग’ हे नाटक पाहिल्यानंतर, लेखकाच्या एक वरीष्ठ कार्यालयीन सहकारी अतिशय भावनिक अवस्थेत त्यांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या की, ‘‘घरी गेल्यानंतर मी माझ्या मुलीला घट्ट मिठी मारणार. तिची लैंगिक अभिमुखता काहीही असू दे, पण तिला एक व्यक्ती म्हणून आनंदी पाहायचे आहे.’’ आपल्या मुलीची समलैंगिकता सहजपणे स्वीकारणाऱ्या चित्रा पालेकर आणि त्यांच्यासारख्या पालकांनी चालवलेल्या ‘स्वीकार’ या गटाविषयी लेखक सविस्तर सांगतात. लैंगिक निवड ही अतिशय वैयक्तिक बाब असून, ती व्यक्ती-व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकते आणि ती मोकळीक देताना पालकांनी त्यांच्याबरोबर उभे राहणे किती आवश्यक आहे, हे विविध व्यक्तींच्या उदाहरणांतून लेखकाने अधोरेखित केले आहे. त्यामुळे या पुस्तकात एलजीबीटीक्यू समुदायाच्या अनुषंगाने बहुतांश संदर्भ येत असले तरी, हे पुस्तक फक्त एलजीबीटीक्यू समुदायाबद्दलच नाही, तर त्यांना आश्वासक पद्धतीने स्वीकारू पाहणाऱ्या समाजाविषयी अधिक आहे. युटोपियन समाजाचा भाबडा आशावाद लेखकाने बाळगलेला नाही; परंतु स्वीकारार्हतेतून सहिष्णू आणि सर्वसमावेशक असा समाज निर्माण होण्याची शक्यता हीच ‘क्वीरीस्तान’च्या निर्मितीकडील वाटचाल आहे, हे मात्र लेखक नोंदवितो.

मागील काही वर्षांत एलजीबीटी समूहाच्या संदर्भात राजकीय स्तरावर घडलेल्या अनेक घटनांचा आढावा लेखकाने घेतलेला आहे. तेलंगणा राज्यनिर्मितीसाठी आंदोलन सुरू होते, तेव्हा त्यात एलजीबीटीक्यू समुदायसुद्धा सामील झालेला होता. राज्यनिर्मिती झाल्यानंतर मात्र एलजीबीटीक्यू समुदायाच्या प्रश्नांना रीतसर बगल देण्यात आली. त्या वेळी एलजीबीटीक्यू समुदायाने दलित, महिला व अल्पसंख्याक समूहांच्या लढाऊ संघटनांना बरोबर घेऊन काढलेल्या ‘क्वीर स्वाभिमान यात्रे’ची लेखक नोंद घेतो. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे नामदेव ढसाळ यांनी वेश्या आणि भिन्नलैंगिक समुदायाला बरोबर घेऊन काढलेल्या ‘समता मार्च’चाही लेखक उल्लेख करतो. छत्तीसगढमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उपस्थितीत घडून आलेली १५ भिन्नलैंगिक व्यक्तींच्या सामूहिक विवाहसोहळ्याची घटना लेखकाला ऐतिहासिक वाटते. देशात पहिल्या ‘तृतीयपंथी कल्याण मंडळा’ची निर्मिती करणारे तमिळनाडू राज्य असो किंवा एलजीबीटीक्यू समुदायासाठी धोरणनिश्चिती करणारे केरळ किंवा त्याच धर्तीवर ओडिशा, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांनी घेतलेले निर्णय असोत अथवा एलजीबीटीक्यू समुदायाच्या प्रश्नांबाबत प्रकाश आंबेडकर, शशी थरूर, सुप्रिया सुळे, एच. डी. देवेगौडा यांसारख्या राजकीय मंडळींनी वेळोवेळी दाखवलेली राजकीय इच्छाशक्ती असो; हे सारे लेखकास आश्वासक वाटते.

पुस्तकात भारतातील कॉर्पोरट कंपन्या, देशोदेशीच्या क्वीर चळवळी आणि कार्यकर्त्यांचा, त्यांच्या माध्यमातून घडलेल्या बदलांचा आणि बदलणाऱ्या मानसिकतेचा वेध घेतला असला, तरीही ही सारी मांडणी काही महत्त्वाच्या कॉर्पोरेट संस्था, महत्त्वाची महानगरे आणि काहीअंशी विशेषाधिकार मिळालेल्या मंडळींपुरतीच मर्यादित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून लेखकाने उल्लेख केलेली चेन्नईतील सी. मौली यांची मांडणी महत्त्वाची आहे. मौली विचारतात की, तुम्ही ज्याला सर्वसमावेशक म्हणताय ते तरी सर्वसमावेशक आहे का? हा प्रश्न फक्त लेखकापुरता किंवा राज्यसंस्था वा एलजीबीटीक्यू समुदायासाठी कार्यरत असलेल्या संस्थांपुरता मर्यादित नाही, तर समाज म्हणून आपल्यासाठीसुद्धा आहे.

कॉर्पोरेट कार्यालयांत वा समाजात घडू पाहणाऱ्या बदलांविषयी एलजीबीटीक्यू समुदायाला मध्यवर्ती ठेवून लिहिलेले आणखी एक पुस्तक असे ‘क्वीरीस्तान’चे स्वरूप निश्चितच नाहीये. येणाऱ्या काळासाठी ते एक मार्ग दाखवू पाहतेय. लेखक सांगतो तसे, जर तुम्ही एलजीबीटीक्यू समुदायाचा भाग असाल, तर हे पुस्तक तुम्हाला तुम्ही नागरिक म्हणून पात्र असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी, त्या बिनदिक्कत मागण्यासाठी धाडस देईल. जर तुम्ही एलजीबीटीक्यू समुदायाचा भाग नसाल, तर हे पुस्तक तुम्हाला प्रगल्भ करणारे विचारभान देईल. थोडक्यात, तुम्ही कोणीही असा, ‘क्वीरीस्तान’ हे वाचायलाच हवे असे पुस्तक आहे.

लेखक युवा साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी आहेत.

shinde.sushilkumar10@gmail.com